हरवलेलं माझं बालपण
हरवलेलं माझं बालपण
लहानपणी पाच पैसे, दहा पैसे, वीस पैसे, चार आणे, आठ आणे, हेच ते आमचे पैसे, अगदी पैशाची उलाढालच म्हणा हवं तर. त्यातून घरी आलं पाहुणे तर आम्ही वागायचो साधं भोळ असल्यासारखं. मग पाहुण्यांनी एक रुपया दिला की, अहाहा काय तो आनंद, अगदी मोठी लॉटरी लागल्याचा...
मग दुकानदाराने एक रुपयाच्या पसा (ओंजळ) भरून लेमनच्या गोळ्या आमच्या हातात टेकवल्या की आमचापण चेहरा खुलायचा. आणि शर्टच्या वरच्या खिशात त्या गोळ्या ठेऊन वर त्या पडू नये म्हणून एक हात त्या खिशावरती धरून आमची स्वारी गावभर फिरायला सज्ज असायची... थकून दमून झोपी जायचो... पहाटे वाकळेतून बाहेर पडणं म्हणजे शिक्षा दिल्यासारखं वाटायचं...
पारड्यात चुलीवर तापलेल्या पाण्याची अंघोळ असायची. लाईफबाॅयशिवाय दुसरी कंपनी माहिती नसायची... साबण संपला की
निरम्यानंच डोकं धुवायचं... मग खाऊन जेवूण आमची स्वारी चिंचा, पेरू, आंब्याची झाड शोधायला जायची... नाहीतर जिभेला रंग चढवत गारेगार चोखायचं...
गोणपाटाची बैलगाडी करायची त्यालाच मातीची बैल जुंपायची. सकाळची शाळा म्हणजे शनिवार खूप बरं वाटायचं. रविवारी सुट्टी असायची... मग रविवार सगळा रामायण, महाभारत, शक्तीमानसाठी निघून जायचं...
शाळेला तर नियमित जायचं... दोन बटणाचं खाकी दप्तर पाठीवर असायचं... वर्षा अखेरीस उरलेल्या पानांची वही बायंडिंग करायची... निम्म्या किंमतीत घेतलेली पुस्तकं सोबतीला असायची. त्याला खाकी पुठ्ठे घालण्याची वेगळीच लगबग असायची, नवीन पुस्तकाचा वास घेत अभ्यासाला सुरुवात करायची...
मधल्या सुट्टीत... टाकीच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचं... जमेल तेवढं करत होतो, टेन्शन काय नसायचं... कारण, नुसतं पास झालो तरी आई-बाप खुश असायचे...
पावसाळा आला की ईरलं डोक्यावर असायचं भिजण्यासाठी ईरल वाऱ्याबरोबर सोडायचं... चिखलातनं वाट काढताना स्लिपर त्यात रूतायची... एकमेकांचे हात पकडून मुख्य रस्त्यानंच निघायचो... दिवसभर हुंदडून पेंगत पेंगत जेवायचं... एकाच अंथरूणावर ओळीनं सगळ्यांनी निजायचं... वाकळंतल्या ऊबीत झोप मस्त लागायची... दिवसभराची मस्ती रात्री स्वप्नात दिसायची... कशाला आलं आता हे शहाणपण... खरंच खूप सुंदर होतं माझं बालपण...