Pratibha Tarabadkar

Drama Thriller

4.3  

Pratibha Tarabadkar

Drama Thriller

हनिमून एक्स्प्रेस - भाग 1

हनिमून एक्स्प्रेस - भाग 1

4 mins
391


 'ओ साब, उठो, कितनी देर सोएंगे? लोग अपने अपने घर कभी के पहुंच गये!न जाने कितनी नशा करते हैं ये लोग!'कोणीतरी परागला जोरजोरात हलवत होतं.परागने मोठ्या कष्टाने कसेबसे डोळे उघडले.समोर हातात झाडू आणि बादली घेऊन रेल्वेचा सफाई कर्मचारी उभा होता.परागने डोळे चोळले.आपण कुठे आहोत तेच त्याला कळेना.त्याची गोंधळलेली अवस्था पाहून त्या सफाई कर्मचाऱ्याने त्याला उठून बसण्यास मदत केली.साखळीने बांधून ठेवलेल्या बॅगा परागकडून चाव्या घेऊन सोडविल्या आणि प्लॅटफॉर्म वरील बाकावर परागला बसवून,सामान त्याच्या हाती सोपवून तो पुन्हा आपल्या कामाकडे वळला.परागने प्लॅटफॉर्म वरील पाटीकडे नजर टाकली.'इंदौर'आणि अंधुक अंधुक त्याला आठवायला लागले.ऑपरेशन आटोपून घाईघाईने कशीबशी पकडलेली ट्रेन,घरच्यांचे फोनवर फोन,स्टेशनवर वाट पहात उभी राहिलेली गायत्री!'गायत्री'...पराग खाडदिशी शुद्धीवर आला.गायत्री कुठे आहे?पराग जिवाच्या आकांताने गाडीकडे धावला.पण गाडी निर्मनुष्य होती.परागला आता रडू येऊ लागले.बाकावर बसून ओक्साबोक्शी रडणाऱ्या परागकडे इन्स्पेक्टर शर्मांचे लक्ष गेले.रेल्वेतील पोलिस सेवेतील इ.शर्मा सहज पाय मोकळे करायला प्लॅटफॉर्म वर आले होते.इ.शर्मांनी परागला सामान उचलण्यास मदत करुन आपल्या केबिनमध्ये आणले.

 

'मी डॉक्टर पराग कुलकर्णी',पराग आता बराच सावरला होता.'दोन दिवसांपूर्वी माझे गायत्रीशी लग्न झाले आणि हनिमूनसाठी आम्ही इंदौरला येण्यासाठी निघालो.''हनिमूनसाठी इंदौरला?'इ.शर्मांनी आश्चर्याने विचारले.'लोक हनिमूनला हिलस्टेशन, समुद्र काठ निवडतात आणि तुम्ही इंदौर निवडलेत?'

 'हो,गायत्रीला स्वप्नात उज्जैनचा महाकालेश्वर आला होता.तेव्हापासून ती हट्टच धरुन बसली होती म्हणून आम्ही इकडे आलो.'

 'मग गायत्री कुठे आहे?'इ.शर्मांच्या या प्रश्नावर परागला दरदरून घाम फुटला.'अरे देवा',परागने डोके गच्च पकडले.त्याला काहीच आठवेना.गाडीत आपण गायत्री बरोबर जेवलो आणि मग...'तुम्ही जयावती हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडीक सर्जन आहात वाटतं!'इ.शर्मा परागच्या व्हिजिटिंग कार्डवर नजर टाकत म्हणाले.'एव्हढे मोठे सर्जन आणि जनरल डब्यातून प्रवास?''विमानाची वेळ सुटेबल नव्हती आणि एसी चे तिकीट मिळेना म्हणून... रिझर्व्हेशन 

गायत्रीनेच केले.मला कशाला वेळच नव्हता

'तिचं सामान?'इ.शर्मांनी प्रश्न केला.'हे काय,तिची बॅग,सॅक इथेच आहे.'परागने हाताने निर्देश केला.'तिचा मोबाईल?'तो तिच्या पर्समध्ये आहे.'काही हरवलं नाही ना ते बघा.'परागने मान डोलावली आणि बॅग उघडली.सर्व वस्तू अगदी नीटपणे रचल्या होत्या अजिबात विस्कटलेल्या नव्हत्या.तिची पर्स उघडली पण परागला त्यात काय तपासणी करावी कळेना.इ.शर्मांनी गायत्रीचा मोबाईल तपासणी करण्यासाठी दिला.अचानक परागला आठवले, घरी फोन केला नाही.मग त्याने मोबाईल स्वीच ऑन केला.'आश्चर्य आहे , तुम्ही डॉक्टर असून मोबाईल बंद ठेवता?'पराग गोंधळला.कदाचित खूप दमलो होतो आणि झोप येत होती म्हणून बंद केला असेल.'त्याने बाबांचा फोन ‌फिरवला


'बाबा, गायत्री हरवलीये हो,'परागच्या बोलण्याने घरी भूकंप झाला असेल या जाणीवेने परागचा चेहरा रडवेला झाला हे पाहून इ.शर्मा परागच्या बाबांशी बोलू लागले.मोबाईलमध्ये काहीच संशयास्पद सापडले नाही.परागचे ओढूनताणून आणलेले अवसान आता गळू लागले होते.घरी या बातमीने किती हाहाकार माजला असेल याचे चित्र परागच्या डोळ्यासमोर आले आणि नकळत त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू ‌लागले.इ.शर्मांनी गाडीच्या वाटेवर अपघात होऊन एक तरुणी रेल्वे मार्गावर सापडली का याची चौकशी केली पण कुठेच अशी नोंद नव्हती.'कदाचित दारातून वाकून पहाताना तोल जाऊन खाली पडली असेल आणि जंगली श्वापदांनी ओढून नेली असेल.अशा घटना घडल्या आहेत या मार्गावर,'इ.शर्मांच्या या बोलण्यावर 'अरे देवा,'असे म्हणत पराग मटकन खाली बसला.

 

गायत्री हरवल्याची तक्रार दाखल करुन पराग मुंबईला परतला.बिल्डींगमधील प्रत्येक खिडकीत माणसे दिसत होती. 'अशी कशी अदृष्य झाली गायत्री?'गायत्रीचे बाबा परागवर धावून गेले.'मला खरंच माहित नाही हो,'पराग काकुळतीला येत म्हणाला.'मला इतकी गाढ झोप लागली होती की इंदूरला गाडी पोहोचली तेव्हा सुद्धा मी गाढ झोपेत होतो.''मला आता पोलिसांकडे तक्रार करावी लागेल.'गायत्रीचे बाबा म्हणाले.'पोलिस?'पराग आणि त्याच्या आई-बाबांनी‌ एकमेकांकडे भेदरून पाहिले.


'गायत्रीचे आई-वडील कोण?'इ.कदमांनी विचारले.गायत्रीचे आई-बाबा पुढे झाले.'आमची तक्रार नोंदवून घ्या सर! माझ्या मुलीचे तीन दिवसांपूर्वी या पराग बरोबर लग्न झाले आणि हनिमूनसाठी ते इंदूरला गेले तर आता आमची गायत्री सापडत नाहीये हो'गायत्रीच्या बाबांचा आवाज चिरकला.'

 'सापडत नाही म्हणजे? अशी कशी अदृष्य झाली? हवेत विरघळली की वाऱ्याने गिळली?'इ.कदम गरजले आणि ते परागकडे वळले.'शप्पत सांगतो सर, मला इतकी गाढ झोप लागली होती की काहीच कळलं नाही.'पराग रडकुंडीला आला.'तिचं सामान सुद्धा जसंच्या तसं आहे.''तिचा मोबाईल?'इ.कदमांनी विचारले.'तो पण तिच्या पर्समध्ये आहे.'पराग तत्परतेने म्हणाला.'त्यावर काही मेसेज?''नाही, काही नाही'.इ.कदमांनी गायत्रीची बॅग , सॅक तपासली.त्या सगळ्या गोष्टी गायत्रीच्या आई-बाबांनी ओळखल्या.'बरं,तिचे दागिने?'इ.कदमांनी विचारले.'हो , आहेत घरातील कपाटात.सगळे पाहुणे गेले की बॅंकेच्या लॉकरमध्ये टाकणार होतो आम्ही',परागची आई म्हणाली.'दोन शक्यता असू शकतात,'इ.कदमांनी क्षणभर विचार केला आणि सांगू लागले.'अनैतिक व्यवसायासाठी मुलींना पळवणारी टोळी किंवा ‌ मानवी अवयवांच्या तस्करी साठी...धाडदिशी आवाज झाला.गायत्रीची आई बेशुद्ध होऊन खाली कोसळली.पराग धावला.त्याने सराईतपणे योग्य ते उपचार सुरू केले आणि त्यांना शुद्धीवर आणले.इ.कदम बारकाईने त्याचे निरीक्षण करत होते.'बरं , तुम्हाला खंडणीसाठी फोन आला तर मला ताबडतोब खबर द्या.'इ.कदम समारोप करीत म्हणाले तशी सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उडाला.

 


'कदमसाहेब,जरा या कुलकर्णींच्या केसचा विचार करा,'मोरे काकुळतीने म्हणाले.'हे माझे फार जुने मित्र, सहकारी आहेत.कितीतरी वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाला जवळून ओळखतो मी!पराग अतिशय सज्जन, हुशार, मेहनती आहे.फार कष्टाने तो डॉक्टर झाला आहे...' ते सगळं ठीक आहे हो मोरे.ही मंडळी सज्जन आहेत हे मी कधीच ओळखले पण आम्हाला कायद्याने वागावे लागते.बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा नियम आहे आमचा!तुम्हीच सांगा,कोण विश्वास ठेवेल यांच्या गोष्टींवर?'


ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडले.गायत्रीचा ठावठिकाणा लागेना तशी संशयाची सुई पराग आणि त्याच्या कुटुंबियांवर स्थिर झाली.कुलकर्णी कुटुंबाला अटक करण्यात आली.पराग आणि त्याचे वडील,दोघांची नोकरी गेली.पेपर,इतर माध्यमांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.टी.व्ही.वर या केसवर डिबेट झाली आणि आरोग्य रक्षकच कसा भक्षक झाला यावर एकमत झाले.


परागची केस कोर्टात उभी राहिली पण पुराव्याअभावी त्यांना जामिनावर सोडण्यात आले.कुलकर्णी कुटुंब आता घरात कोंडून बसू लागले.समाजात झालेल्या बदनामीने त्यांना बाहेर तोंड दाखविण्यास जागा उरली नाही.'गायत्री कुठे असेल? सुरक्षित असेल ना? आपल्याला कशी एव्हढी काळझोप लागली?तिची काळजी घेण्यात आपण कसे कमी पडलो?'परागचे डोके विचार करकरुन शिणून जात असे.त्याचे आई-वडील या घटनेनंतर पार खचून गेले होते.पराग आताशा पाय मोकळे करायला भर दुपारी टळटळीत ऊन्हात बाहेर पडत असे.

 

'शुक शुक, डॉक्टर'आपल्याला कोण हाक मारतोय म्हणून परागने मागे वळून पाहिले.एक वृद्ध गृहस्थ हाक मारत होते.'डॉक्टर,मी तुम्हाला किती शोधलं, बरं झालं आज तुम्ही भेटलात!'वेगाने चालल्यामुळे त्या गृहस्थांचा श्वास फुलला होता.'आपण तिथे बसू या का?'झाडाच्या सावलीतील बाकाकडे बोट दाखवत त्यांनी विचारले.पराग नाईलाजाने तयार झाला.

'मी पानसे.मला तुम्हाला काही महत्त्वाचे सांगायचे आहे.'परागची मुद्रा प्रश्नार्थक झाली.पानसे सांगू लागले. पानसेकाका परागला काय सांगू लागले?

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama