गंधाळलेल्या सांजवेळी - भाग २
गंधाळलेल्या सांजवेळी - भाग २
(सगळे प्रसंग, व्यक्तींची नावे काल्पनिक आहेत. यांचा वास्तव्याशी दूरान्वयानेसुद्धा काडीमात्रही संबंध नाही. हे सगळेच प्रसंग फक्त आणि फक्त कथेची गरज म्हणून घेतले आहेत याची सगळ्यांनीच नोंद घ्यावी ही विनंती.)
दुसऱ्या दिवशी रेवती सकाळी लवकरच उठली. स्वतःच आवरून आपल्यासाठी आणि रेवाला वेगवेगळे डबे तयार केले. ऑफिसमध्ये आज प्रेझेंटेशन करायचं होतं. आठवणीने सगळ्या फाईल्स तिने घेतल्या. मग रेवाला उठवले.
" माऊ ए माऊ, चला उठा "
पण रेवा काय उठली नाही. रेवतीला सवयच होती याची. रेवा कधीच लवकर वेळेत उठायची नाही. १० हाका मारल्यानंतर कुठे बाईसाहेब डोळे चोळत उठायच्या आणि मम्माला बोलवून तिच्या मांडीवर जाऊन परत झोपायच्या. त्याशिवाय सकाळ पूर्णच व्हायची नाही तिची.
रेवतीला आपल्या गोड परीला झोपेतून उठवायची अजिबात इच्छा नसायची पण काय करणार? तिला रेवाला पाळणाघरात सोडून पुढे ऑफिसला जायचं असायचं.
" माऊ चल उठ बरं लवकर. आज्जीकडे जायचंय ना? "
" रेवडी चल ग.. मम्माला उशीर झाला तर रागावतील ना? मग मम्मा रडेल... तुला चालेल का मम्मा रडली तर? "
ही मात्रा बरोबर लागू पडायची.
मग रेवाचं आवरून तिला चॉकलेट दूध पाजून गाडीत बसवलं. तिची खेळण्यांची बॅग आणि खाऊचा डबा मागच्या सीटवर ठेवला आणि दोघी मायलेकी निघाल्या.
रस्त्यात रेवाची अखंड बडबड चालू होती. रेवतीसुद्धा तितक्याच उत्साहाने तिची बडबड ऐकत होती. थोड्याच वेळात ते पाळणाघरापाशी आले. कार बाजूला पार्क करून ती रेवाला घेऊन आतमध्ये गेली.
हॉलमध्ये खेळण्यांचा पसारा पडला होता. २-३ रेवाच्या वयाचीच काही मुले खेळत होती. त्यांच्यात आपल्या आवडत्या मैत्रिणीला इशुला बघून रेवा तिच्याकडे पळत सुटली. रेवतीने तिला हाक मारली,
" माऊ, आज पापा नाही दिलास ? "
" मम्मा " रेवाने जवळ येऊन रेवतीच्या गालावर किस केली. तिनेसुद्धा आपल्या गोड बाळाचा पापा घेतला. तिच्या वस्तू निर्मला मावशींकडे देऊन, रेवाकडे लक्ष द्यायला सांगून ती ऑफिसला जायला निघाली.
ऑफिसमध्ये आज छान प्रेझेंटेशन झालं होतं. शुक्रवारी डील होण्याची शक्यता होती. लंच पर्यंत तिचं सगळं काम आवरलेलं. त्यामुळे बॉसला विचारून ती लवकर निघाली घरी जायला. आज तिला रेवासोबत भरपूर वेळ घालवता येणार होता.
ती पाळणाघराजवळ आली. मावशींना हाक मारण्यापेक्षा आपणच आत जावं म्हणून ती आतमध्ये गेली. लोखंडी मेन गेटची कडी काढून ती पुढे गेली. हॉलचा दरवाजा उघडच होता. तिने डोकावून पाहिलं तर ६-७ लहान लहान २-५ वर्षांची मुलं शिवांशच्या अवतीभोवती बसलेली होती. कुणी त्याच्या मांडीवर बसलं होतं. सगळ्यांची तोंडं, हात चॉकलेटने माखलेले... आणि त्याच चॉकलेटच्या हातांनी ते शिवांशसोबत मस्ती करत होते. त्यामुळे त्याचेही कपडे चॉकलेटने चिकट झालेले. पण सगळी पाखरं खळखळून हसत होती. मस्ती करत होती. उड्या मारत होती. आपल्या बोबड्या भाषेत त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. हे सगळं पाहून तिच्याही चेहऱ्यावर हसू आलंच.
हसणंसुद्धा किती सांसर्गिक असतं.. एकाला हसताना पाहून दुसराही नकळत हसतो. आणि इथेतर एवढे निष्पाप जीव निर्व्याज हसत होते. निर्मला मावशीसुद्धा आपल्या आरामखुर्चीत बसून आपल्या या लहान नातवंडांकडे डोळेभरून पाहत होत्या. इतक्यात त्यांना दाराशी उभी असलेली रेवती दिसली. तिला एवढ्या लवकर पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं. त्या लगबगीने गेल्या तिकडे.
" काय ग? आज एवढ्या लवकर? बरं नाहीये का? "
" अहो नाही मावशी. आजचं काम लवकर संपलं म्हणून मग लवकरच निघाले. तेवढाच माऊसोबत वेळ घालवायला मिळेल. "
" अरे वा! छानच आहे.. "
" थांब ती चॉकलेटने पूर्ण भरलीये. मी तिला फ्रेश करून घेऊन येते तू बस तोवर. "
" असूदेत ना. घरी गेल्यावर मी आवरेन तिचं. "
" तिला काय अशी नेणारेस? चिकट चिकट वाटेल तिला. खरतर सगळ्यांनाच फ्रेश करायचंय.. हा शिवसुद्धा ना.. अगदी भरवून टाकलंय पोरांना त्याने. "
" असूदेत हो. नाहीतर असं एवढं लोभसवाणं, गोजिरं रूप कधी बघायला मिळतं? अगदी गोकुळातल्या कान्हाची आठवण झाली मला. बाई या पोरांना माझीच दृष्ट लागायची. " असं म्हणत तिने सगळ्यांवरून मायेने आपल्या कपाळावर कडकड करत बोटं मोडली आणि दृष्ट काढली.
" छे ग.. आईची दृष्ट कधीच लागत नाही आपल्या मुलांना.. मी काय बोलत बसले? तू बस. मी सगळ्यांना तयार करूनच आणते. तू मग रेवाला घेऊन जा. चालेल ना? की आधी रेवाला तयार करून देऊ? "
" नको नको. मी बसते तुम्ही सगळ्यांनाच तयार करा. असंही घरी तर कुणीच नसतं तिच्याशी खेळायला. इथेतरी सगळ्यांसोबत राहुदेत तिला. "
" बरंय.. आलेच मी. "
" चला चला चला चला.. मस्त पाण्यात खेळू.. कोण कोण खेळणार? "
निर्मला मावशींनी असं विचारताच सगळीच मुलं "मी, मी" असा गलका करत त्यांच्या मागून गेली. मागे परसबागेत मोठे मोठे पाण्याचे टब भरून ठेवले होते. पाणी बघून सगळी मुले डुंबायला लागली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला लागली.
इकडे शिवांशसुद्धा उठला आणि फ्रेश होऊन येतोच म्हणून गेला. रेवती तिथेच सोफ्यावर बसली. थोड्या वेळाने शिवांश आला तेच सोबत कॉफीचे २ मग घेऊन..
" घ्या कॉफी "
" अहो तुम्ही कशाला केलीत? मी निघणारच होते आता.. उगाच त्रास तुम्हाला. "
" अहो त्रास कसला आलाय? तुम्ही ऑफिसमधून दमून आला असणार आणि मुलांना यायला अजून वेळ लागेलच. पाण्यात एकदम मस्ती सुरु आहे त्यांची. म्हणून मग घेऊन आलो. आता तुम्हाला जर ऑड वाटलं असेल तर सॉरी. मी घेऊन जातो कॉफी. "
" अहो काहीही काय? ऑड नाही पण उगाच तुम्हाला त्रास झाला म्हणून म्हणाले. थँक यू कॉफीसाठी. "
दोघेही समोरासमोर बघून कॉफीचा आस्वाद घेत होते. गरम गरम वाफाळलेली कॉफी, वेलची आणि जायफळाचा येणार सुगंध, कॉफीची टेस्ट खूप छान होती.. एवढा वेळ ड्राईव्ह करून आल्याचा तिचा थकवा पार कुठल्या कुठे गेला.
" खरंच छान झाली हं कॉफी. खूप तरतरीत वाटतंय आता. थँक यू सो मच.. "
" Thank you to you too!! कॉफीला कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल.. "
ते दोघे बोलतच होते की बच्चे कंपनीचा आवाज आला. यांची कॉफी संपेपर्यंत सगळेच उड्या मारत, हसत खिदळत हॉलमध्ये आले. रेवा जाऊन रेवतीला बिलगली.
" चला जायचंय ना? "
" तू लवकल का आलीस मम्मा "
" मम्माला तिच्या माऊसोबत भुर्रर्र जायचंय ना म्हणून... येणार ना माऊ मम्मासोबत? "
" हो... इशू पण येनाल ना? "
" हो आपण इशुला पण घेऊ जाऊ. "
" इशू, माऊ चला आपल्या बॅग्स घ्या.. आणि गाडीत जाऊन बसा. पळा पळा "
दोघीही आनंदाने नाचत गाडीकडे गेल्या.
" मावशी तुम्ही काळजी नका करू. अवंतीला फोन करून मी कळवेन इशुला सोबत घेऊन गेल्याचं. "
" ठीक आहे. "
" चला येते. "
" हो ये. "
रेवती निघाली तस तिचं लक्ष समोरच उभ्या शिवांशवर गेलं. त्याला एक स्माईल देऊन कॉफीसाठी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन ती आपल्या चिमण्यांकडे निघाली. शिवांशने सुद्धा तिला स्माईल देऊन बाय केलं.
रेवती कार जवळ अली तेव्हा पाहिलं की रेवा आणि इशू मागच्या सीटवर बसून गोंधळ घालत होत्या. तिने त्यांच्याकडे एकदा हसून पाहिलं आणि अवंतीला फोन केला. पण तिने काही फोन उचलला नाही. मिसकॉल पाहून परत फोन करेल हा विचार करून ती ड्राइवर सीटवर जाऊन बसली.
" मग बच्चा पार्टी, कुठे जायचं? "
" मम्मा पाल्क (पार्क)... "
" मावशी, लायन किंग बगायला.. "
" हं आपण आधी लायन किंग बघू. मग जेवायला जाऊ. मग संध्याकाळी पार्कमध्ये जाऊ.. चालेल? "
एवढ्या भरगच्चं कार्यक्रमाने दोघी खुश झाल्या. किंचाळत, ओरडत, हसत त्यांचा प्रवास सुरु होता. ते कोथरूडच्या सिटी प्राईडला आले. रेवतीने ऑनलाईन तिकिटे बुक केली होती. आणि तिच्या नशिबाने शोसुद्धा अव्हेलेबल होता आणि त्याची तिकिटेसुद्धा. एका हातात रेवाचा हात तर दुसऱ्या हातात इशिताचा हात पकडून ती आतमध्ये गेली.
दोघीना तिथेच सोफ्यावर बसवून त्यांच्यासाठी काही खायला घ्यायला ती फूड काउंटरवर लाईनमध्ये उभी होती. इतक्यात तिला अवंतीचा फोन आला.
" सॉरी अगं रेवती, एका मीटिंगमध्ये होते. आत्ता बाहेर आले आणि लगेच तुला कॉल केला. "
" मला वाटलेलंच बिझी असशील ते. आणि काही नाही मी लवकरच फ्री झाले म्हणून लवकर आले होते ना. तर थोडावेळ मुलांना बाहेर घेऊन जावं म्हणून पाळणाघरात गेले. कुठे रोज असा वेळ मिळतो. तेवढीच मुलं खुश. रेवा आणि इशुला मी बाहेर घेऊन आलीये. हेच सांगायला फोन केलेला. "
" अच्छा म्हणजे दोघींचीही मज्जा आहे.. कुठे आहे इशू आणि रेवडी? "
" अगं त्यांना सोफ्यावर बसवून इकडे फूड काउंटरला आलीये. बरं ऐक ऑफिस नंतर घरीच ये डिनरला. एकत्रच जेवू मग जा तू इशुला घेऊन. "
" अगं कशाला रेवती तुला त्रास? "
" अगं त्रास कसला आलाय त्यात? उलट एकटीने जेवायचं कंटाळा येतो. आणि असंही विशाल नाहीये ना? मग परत घरी जाऊन जेवण वगैरे कशाला बनवतेस? तू ये एकत्रच डिनर करू. "
" चालेल चल मग. भेटू रात्री. बाय. "
" बाय "
रेवतीने स्नॅक्स घेतले आणि तिघी मूवी बघायला गेल्या. तिघीनींही छान एन्जॉय केला तो मूवी. मग ती दोघीना घेऊन रेस्टॉरंटमध्ये आली. पोटभर जेवून मग त्या रमतगमत पार्कमध्ये गेल्या. कधी इशुला झोका दे तर कधी रेवाला.. झोपक, घसरगुंडी, सीसॉ असे अनेक खेळ खेळून दमल्यावरच दोघीनी निघायचं असं रेवतीला सांगितलं. रेवतीने मग गाडी घराकडे घेतली. घरी गेल्यावर दोघींनाही अंघोळी घातल्या. रेवाचा आवडता बेबी पिंक कलरचा ज्यावर छोटेछोटे पांडा होते असा मऊमऊ नाईट ड्रेस रेवाने स्वतःच इशुला दिला. आणि तिने ब्लू कलरचा व्हाईट डॉट असलेला ड्रेस घातला.
याबाबतीत रेवतीला फार कौतुक वाटायचं रेवाचं. सगळ्या गोष्टी ती शेअर करायची. आपली आवडती खेळणी असो व ड्रेस किंवा इतर काही वस्तू. ती पटकन शेअर करायची. हा गुणसुद्धा तिने श्रेयसचाच उचललेला. रेवती अशी नव्हती अजिबात. आपल्या गोष्टी ती कधीच शेअर करायची नाही. कितीही प्रयत्न केला तरी... आपल्या आवडत्या वस्तू असो वा आवडत्या व्यक्ती.....
टीव्हीच्या आवाजाने तिचं लक्ष बाहेर गेलं. रेवा आणि इशू मघाशीच हॉलमध्ये गेल्यासुद्धा होत्या. कार्टून बघत दोघी बसल्यात तोवर जेवण बनवावं म्हणून ती किचनमध्ये गेली. भरून भेंडी, व्हेज पुलाव, कोशिंबीर, पापड असा सुग्रास बेत केला होता. आता फक्त पोळ्या बाकी होत्या करायच्या. तिने पटापट पोळ्या सुद्धा बनवल्या. तेवढ्यत बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर अवंती दारात उभी होती.
" ये ग.. उशीर झाला यायला? "
" ट्रॅफिक.. वैताग येतो मला तर. "
" हाहाहा "
" हसतेस काय? तू पण अशीच वैतागून येतेस. "
" हो ग.. पण काही इलाज नाही ना? तू बस मी पाणी आणते. "
पाणी पिऊन अवंती फ्रेश व्हायला गेली. तोवर रेवतीने प्लेट्स मांडल्या होत्या.
" मम्मा आज मावशी आमाला पाल्क मदे गेऊन गेल्ती.. "
" मावशी आमी ना आज लायन किंग पाइला.. "
आणि अशाच बडबडीत सगळ्यांचं जेवण झालं.
" रेवती, आज इशू भलतीच खुश आहे. किती दिवस झाले बाहेर गेलीच नव्हती. मी आणि विशाल दिवसभर ऑफिसमध्ये. रात्री उशिरा मावशींकडून तिला घरी न्यायचं. घरी जाऊन जेवली की लगेच झोपते. सकाळी ती उठायच्या आत विशाल गेलेलासुद्धा असतो. तिचं तसंच घाईघाईत आवरून मावशींकडे सोडायचं आणि ऑफिसला पळायचं.. रविवारीसुद्धा डेडलाईनमुळे बरेचदा काम असत. आणि जेव्हा ते नसत तेव्हा आम्ही दोघेही आठवडाभर एवढे कंटाळलेले असतो की घरीच झोपून राहावंसं वाटत.
आपल्या सगळ्यांचीच थोड्याफार फरकाने हीच स्टोरी असते. या सगळ्यात मुलांना वेळच देता येत नाही. आजीआजोबा तिकडे गावाकडे. सुट्ट्यांमध्ये महिनाभर फक्त जात येत. त्यांना इकडे या म्हटलं तर ते कर्मात नाही बाई तुमच्या शहरात. नुसती सगळ्यांची दार बंद... असं सांगतात. "
" बरोबर आहे अवंती. आपण स्वप्नांच्या, आपल्या करिअरच्या मागे पळतो. पण यात आपण ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय त्यांनाच वेळ द्यायचा राहून जातो. खरंतर त्यांच्या चिवचिवाटात सगळा थकवा दूर झाल्यासारखा वाटतो बघ. "
" हो ग.. बघू विशाल आला की त्याला सांगतेच की ४ दिवसांची तरी ऍटलीस्ट सुट्टी घेऊ आणि कुठेतरी फिरायला जाऊ म्हणून. बघू काय बोलतोय आता त्यावर ते. "
" मस्त प्लॅन आहे. शनिवार रविवारची सुट्टी तर असतेच. मग गुरुवार शुक्रवारची जोडून सुट्टी घ्या आणि जाऊन या."
" हो बघुयात. बरं चल. थांबले तर इथेच गप्पा मारत थांबावंसं वाटेल. उद्या परत ऑफिस आहे. "
" हो चला... कितीही विचार केला तरी वेळ काही थांबवता येत नाही. "
अवंतीने पेंगुळलेल्या इशुला खांद्यावर घेतले आणि खाली गेली. त्यांची कार जाताना रेवतीने बाल्कनीमधून पाहिले आणि बेडरूममध्ये गेली. रेवा खेळता खेळता तशीच झोपलेली. तिच्या अंगावर पांघरून घालून तीसुद्धा तिच्याशेजारी झोपली. दमल्यामुळे तिलाही लगेच झोप आली.
दिवस सरकत होते. अखेर शुक्रवार आला. त्यांना वाटत होतं तसंच झालं. डील क्रॅक झाली होती. कंपनीला खूप मोठा प्रॉफिट होणार होता. ऑफिसमध्ये तिची सगळी टीम खुश होती. नैना म्हणाली,
" एवढी मोठी डील क्रॅक झालीये.. सेलिब्रेशन तो बनता है ना बॉस? "
" ए हो खरंय. चला आजच मस्त बाहेर डिनरला जाऊयात. "
" ए कीर्ती तुला डिनरशिवाय काही सुचतं का ग? मी काय म्हणतो आपण पार्टी करूयात... "
" अभिषेक, तुला तरी पार्टी शिवाय दुसरं काही सुचत का? "
" ए भांडताय काय? माझ्याकडे मस्त प्लॅन आहे. आपण डिनरला जाऊ आणि सोबतच ड्रिंक्स मागवू.. डिनर का डिनर, पार्टी की पार्टी और सेलिब्रेशन का सेलिब्रेशन.. काय वाटत तुला अक्षदा? "
" मला वाटत नैना तुझं बरोबर आहे. अभिषेक, कीर्ती, now ok? "
" ok "
" चालेल "
" प्रियांका आणि राधिका तुमचे नखरे अजिबात नकोयत हा.. घरी सांगा की मीटिंग आहे लेट होईल. पण यावेळी यायचं म्हणजे यायचंच.. तुम्ही नेहमीच गायब असता. "
" ए हो. यावेळी गपगुमान दोघीनी यायचं. "
" अगं पण रात्री उशीर होईल. "
" होऊदेत की. आदेश त्याच साईडला राहतो ना? तो तुला ड्रॉप करेल. करशील ना रे आदेश? "
" हो नैना मी करेन प्रियंकाला ड्रॉप. "
" आणि माझं काय? "
" राधिका, तुला अक्षय करेल ड्रॉप. "
" चालेल "
" केव्हा आणि पार्टीनंतर जायचं मग? "
" आज जाऊयात? "
" नको रे रितिक आज नको. उद्या जाऊयात. उद्या सुट्टी आहेच. आणि पार्टीनंतर निवांत झोपायला आख्खा रविवार पण आहे. आता ऑफिसमधून दमून पार्टीला नको जाऊयात. "
" बरोबर आहे तुझं मानस. आणि मला पण रेवाला घायला जायचंय. उद्या तिला मी अवंतीकडे पाठवेन. आज अचानक मलाही नाही जमणार. "
" चालेल मग उद्या भेटूयात नक्की. "
" हो. चला बाकीचं ग्रुपवर डिस्कस करा. "
" हो. "
नैना, अक्षदा, प्रियांका, राधिका, कीर्ती आणि रेवती या ६ मुली आणि अक्षय, रितिक, आदेश, अभिषेक आणि मानस ही ५ मुलं अशी ११ जणांची टीम होती. ऑफिसमधली सगळ्यात मोठी टीम यांचीच होती. आणि रितिक होता यांचा टीम लीडर.
गप्पा मारत सगळे पार्किंगमध्ये आले. रेवतीने कार काढली. ती निघणार तोच तिला अभिषेकचा आवाज आला मागून.
" रेवती, अगं थांब ना "
तिने साईड मिररमधून पाहिलं तर अभिषेक तिच्याकडेच येत होता.
" काय रे? "
" अगं माझी बाईक स्टार्ट होत नाहीये. मेकॅनिकला बोलावलंय पण त्याला तासभर लागेल म्हणे. मग गाडी इथेच पार्क केलीये मी. वॉचमनला सांगितलंय. मेकॅनिक येऊन गाडी रिपेअर करून जाईल. मला आजच्या दिवस लिफ्ट देशील प्लिज? "
" अरे विचारतोस काय? ये की.. "
" थँक्स ब्रो.. "
" ब्रो? तू सिस का नाही म्हणत रे? मी फिमेल आहे.. ब्रो काय? ब्रो नाहीये मी.. "
" तू है रे.. तुझे मालूम नहीं है लेकिन तू है... "
त्याच्या या वाक्यावर दोघेही हसले.
" मग रेवडी कशीये आमची? "
" मस्त एकदम.. फार दंगा वाढलाय आजकाल.. आणि बडबड तर खूपच.. "
" क्या बात है यार. भरपूर दिवस झाले तिला भेटलो नाहीये. लवकरच भेटावं लागेल.. "
" हो ती सुद्धा सगळ्यांची आठवण काढत असते. "
" एवढासा जीव पण किती लळा लावलाय तिने सगळ्यांना... "
रेवतीने फक्त स्माईल केली. कर्वेनगरला अभिषेकला ड्रॉप करून ती पाळणाघरात गेली. तिथून रेवाला पिक केलं आणि दोघी घरी आल्या.
जेवण करून रेवाला झोपवून तिने अवंतीला कॉल केला.
" हॅलो अवंती अगं झोपलेलीस का? "
" छे ग एवढ्यात कुठे? आत्ताच इशुला झोपवलंय.. थोड्या वेळात झोपेन. तू कसा काय यावेळी फोन केलास? "
" अगं उद्या ऑफिसच्या ग्रुपने पार्टी करायचं ठरवलंय. डील क्रॅक झाली ना खूप मोठी. मग डिनरला जायचं ठरलंय. नाही म्हणणार होते पण सारखं नाही म्हणणं पण बरोबर वाटत नाही ना.. "
" हो तू जा निवांत. आणि जाताना रेवडीला माझ्याकडे ड्रॉप कर. विशालला यायला अजून २ दिवस लागतील. इशू आणि रेवा खेळतील एकत्र. उद्या दुपारी घेऊन जाऊ दोघीना कुठेतरी. "
" हेच विचारायला फोन केलेला. एक काळजी मिटली. रेवा तुझ्याकडे असेल तर निश्चिन्त असेन मी. "
" तू नको काळजी करुस तिची. तिला ड्रॉप कर माझ्याकडे. "
" चालेल.. गुड नाईट. "
" गुड नाईट. "
दुसरा दिवस आवराआवरित गेला. शनिवारची सुट्टी म्हणून रेवालासुद्धा तिने उठवलं नव्हतं. दुपारी निवांत उठल्यावर थोडा टाइम तिच्या सोबत स्पेंड करून संध्याकाळी आवरून तयार होऊन ती निघाली. रेवाला अवंतीकडे सोडलं आणि ठरलेल्या ठिकाणी पोचली. कुणी आलं होतं. कुणी रस्त्यात होतं. फायनली सगळे आले आणि ऑर्डर दिली.
सगळेच आज कॅजुअल्स मध्ये छान दिसत होते. फॉर्मलमध्ये बघायची सवय असल्याने आज सगळे वेगळे दिसत होते. गप्पांना ऊत येत होता. खाऊन झाल्यावर ड्रिंक्सची ऑर्डर सोडली सगळ्यांनी. पण रेवतीने नको म्हणून सांगितलं.
" का ग? ड्रिंक का नाही करणार तू? "
" ड्रिंक करत नाही असं नको बोलूस. आम्हाला माहितीये तू ड्रिंक करायचीस ते. "
" अगं हो मी करत होते पण रेवा पोटात असल्यापासूनच ड्रिंक बंद केली आणि आता नाही पीत. "
" अगं पण रेवडी कुठे आहे इथे. आणि तू तर तिला अवंतीकडे सोडलंयस ना? मग सकाळी फ्रेश होऊन जा तिच्याकडे. "
" नको अरे खरंच.. मी ड्रिंक पूर्णपणे सोडलीये. "
" अगं पण "
" अरे राहुदेत रे. नसेल करायचं तिला ड्रिंक. & we shouldn ' t forget that she is a mother . "
" थँक्स अभिषेक.. बरं तुमचा कार्यक्रम चालूदेत मी घरी जाते. "
" आता घरी का? थांब की "
" नको तुम्ही सगळेच drunk असाल. आणि शुद्धीत राहून मी तुमची नौटंकी सहन नाही करू शकणार.. हाहाहा "
सगळेच हसले...
" हो जा नीट. आणि पोचल्यावर मेसेज कर "
" हो बाय.. तुम्ही काळजी घ्या जरा.. "
" बाय.. "
गाडीत आल्यावर तिला भूतकाळ आठवला. पहिल्यांदा तिने ड्रिंक केली तो दिवस आठवला. पहिली ड्रिंक तेसुद्धा श्रेयस सोबत...
त्यादिवशी खास असं काही नव्हतं. श्रेयसचा आदल्या रात्री मेसेज आलेला की स्टॉपवर भेट आपण कात्रजला जातोय.
पहिल्यांदाच ती कुणासोबत तरी बाहेर जाणार होती. श्रेयस आणि ती यापूर्वी एकदाच बाहेर भेटलेले. पण हाईकवर भरपूर चॅटिंग व्हायची. पहिल्यांदा रात्रभर जागून कुणाशीतरी बोलत होती ती. ते दोघे एकाच बिल्डिंगमध्ये राहायचे. अगदी सख्खे शेजारी होते. एकच भिंत होती दोघांच्या घरामध्ये. पण तरी समोरासमोर कधी बोलायचे नाहीत. कारण आजूबाजूचे लोक उगाच नाहींनाही ती चर्चा करायचे. आणि आज ते दोघे कुठेतरी बाहेर भेटणार होते. कात्रज म्हणजे प्राणी संग्रहालय.. तिथले प्राणीसुद्धा आता पाठ झालेले तिचे. पण श्रेयस सोबत आहे म्हणून तिला कसलाच कंटाळा येणार नव्हता.
ब्लॅक जीन्स, ब्लू ३/४ स्लीव्जचा व्हाईट डॉटेड टॉप आणि क्लच केलेले केस. अशी ती निघाली. घरी कॉलेजला जाते असं सांगितलेलं. रेवती कधीच मेकअप करायची नाही. साधं काजळसुद्धा नाही. तिला आवडायचं की नाही माहित नाही पण तिच्या घरच्यांना मात्र अजिबात आवडायचं नाही.
स्टॉपवर पोचली तेव्हा तो आधीच तिथे उभा होता. व्हाईट टीशर्ट आणि ब्लू जीन्स मध्ये. १०३ नंबरची बस आली. ते दोघे बसमध्ये चढले. राईट साईडला बरीच जागा रिकामी होती. पुढे जाऊन ते एका रिकाम्या सीटवर बसले. श्रेयसने त्याच्या आवडीचं गाणं लावलं होतं. नवीनच रिलीज झालेलं. त्याने एक कॉड त्याच्या कानात आणि दुसरी रेवतीला दिलेली.
बाहेरच्या हॉर्नच्या, गाड्यांच्या आवाजात आणि आतमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांच्या आवाजात तिला ते गाणं फारसं समजलं नाही. पण श्रेयसची आवड म्हणून तिने ते पुन्हा नक्की ऐकायचं ठरवलेलं.
कात्रज दूध डेअरी जवळ ते उतरले. आता रस्ता क्रॉस करावा लागेल म्हणून तयारीत असलेल्या तिला घेऊन तो डेअरीच्या बाजूने आतल्या रस्त्याने घेऊन गेला. तिथे लस्सी पिऊन त्याने कॅब बुक केली आणि ते दोघे त्यांच्या मित्राच्या घरी गेले. तिला आश्चर्य वाटलेलं. पण श्रेयस सोबत ती खूप कंफर्टेबल होती म्हणून काही भीती वाटली नाही.
दरवाजा उघडल्यावर लगेच उजव्या बाजूला एक मोठं कपाट कम शोकेस होतं. त्याला लागूनच पलीकडे एक छोटासा बेड होता. लहान चणीची २ माणसे मावतील नाहीतर एकच.. एवढाच होता तो. समोर एक चाकांची खुर्ची आणि एक साधी खुर्ची होती. दरवाज्याच्या समोरच्या बाजूला एक स्टडी टेबल होतं. त्यावर अनेक पुस्तकं, वह्या दिसत होती. समोरची संपूर्ण भिंत वेगेवेगळ्या स्टिकीनोट्स ने भरलेली होती. आणि डाव्या बाजूला बाथरूमचा दरवाजा.
बस एवढीच रूम होती. निःसंशय एका लोकसेवा परीक्षेच्या विद्यार्थ्याची ही खोली होती. ती जाऊन बेडवर बसली. त्याने तिला बॅग मधून टॅब काढून दिला आणि लगेच येतो सांगून खाली गेला. ती टॅबवर मूवी बघत होती. २० एक मिनिटांनी श्रेयस आला आणि समोरच्या खुर्चीवर बसला.
" सो... क्या करनेका है? "
श्रेयस आणि रेवती नेहमीच हिंदीमधून बोलायचे. कारण काही नव्हतं पण त्यांना तीच सवय होती.
" जैसा हमने तय किया था गेम्स खेलेंगे... "
" ग्रेट.. ट्रुथ & डेअर राईट? "
" येस.. "
" तो कैसे खेलना है दोनो मे ही? "
" गूगलसे मैने १०० ट्रुथ & डेअर की लिस्ट डाउनलोड की है. हम एक कोईभी बुक लेंगे और रॅन्डमली कोईभी पेज ओपन करेंगे. उसका जो भी नंबर होगा उस नंबर की डेअर परफॉर्म करनी होगी.. "
" So let's start then... But before that, I have a surprise for you. "
" surprise? "
"yes.. "
"आँखे बंद कर.. "
" ओके "
जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा समोर एका खुर्चीवर सी ग्रॅम व्हिस्कीची एक बॉटल, कोको कोलाची एक बॉटल, बिसलेरी, आणि वेफर्सची पाकिटे आणि चकली होती.
" तुझे अपनी जिंदगी में एक बार तो ड्रिंक करनी थी ना? "
"पागल है तू? घरपे पापा है मेरे। मैं ड्रिंक करके जाउंगी घर ? और मैंने कभी पी नहीं है।"
" इसलिए तो पिला रहा हूँ। भरोसा है मुझपे? "
" हा "
" तो बस भरोसा रख देख तू किसी और के साथ पिएगी फिर कुछ प्रॉब्लम होगा | "
" इसलिए तेरी जोभी ख्वाइश है मुझे बता। मैं पूरा करूँगा जो भी हो लेकिन तू बाहर कभी कुछ ऐसावैसा नहीं करेगी। और हा कभी ड्रिंक करनी हो तो सिर्फ मेरे साथ.... ओके ? "
" हा बिलकुल "
' जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्।
डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम .... '
फोनच्या रिंगटोनने ती एकदम त्या खोलीतून आपल्या कारमध्ये आली. डॅशबोर्डवरचा फोन वाजत होता. अभिषेकचा कॉल येत होता.
" हॅलो? "
" काय ग पोचलीस का घरी? "
" हो पोचले नुकतीच. पार्किंगमध्येच आहे. तुमचा कार्यक्रम कसा सुरुये? "
" काही नाही पिऊन सगळ्यांची नाटकी सुरुयेत.. गप घरी जायला पाहिजे होतं मी पण.. "
" हाहाहा बेटर लक नेक्स्ट टाइम.. "
" हाहाहा बरं चल तेवढंच विचारायला कॉल केलेला. "
" हो.. काळजी घे आता सगळ्यांची तिथे. चल बाय. "
" हो नक्कीच.. बाय. "
रेवती घरी आली. फ्रेश होऊन आरशासमोर उभी असताना तिथली एक फोटोफ्रेम दिसली. श्रेयस आणि तिची.. तो फोटो हातात घेऊन ती बेडवर आडवी पडली. त्याच्या आठवणी अश्रू बनून डोळ्यांतून वाहत होत्या. तिला आत्ता तो तिथे तिच्याजवळ हवा होता. पण तो आता फक्त एक आठवण बनून राहिलेला.
तिला पुढे काय झालं होतं ते आठवलं.. तिच्यासाठी ते अगदीच अनपेक्षित होतं....
(क्रमश:)
(मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक असते. इथे फक्त कथेची गरज म्हणून याचा उल्लेख आहे. मद्यपान करू नका त्याने लिव्हर खराब होतं.)

