Arohi Mhetre

Drama Romance Others

4.5  

Arohi Mhetre

Drama Romance Others

गंधाळलेल्या सांजवेळी : ( भाग १ )

गंधाळलेल्या सांजवेळी : ( भाग १ )

4 mins
249


रेवतीला आज ऑफिस मधून निघायला उशीर झाला होता. अचानक संध्याकाळी क्लाएंट्स आल्याने तिला मीटिंग संपवून निघावं लागलं होतं. सगळे केव्हाच गेले होते. ऑफिस मध्ये ती एकटीच होती. कॉफी पिऊन मग घरी जावं म्हणून कॅफेटेरिया मध्ये जायला निघालेली ती रेवाच्या विचाराने मध्येच थांबली. रेवा, तिची ३ वर्षांची मुलगी. तिला पाळणाघरात सोडून रेवती ऑफिसला यायची आणि पुन्हा घरी जाताना सोबत घेऊन जायची. आज आधीच उशीर झालेला. रेवा कंटाळली असेल त्यामुळे जास्त उशीर न करता सरळ निघुयात असं म्हणत तिने तिची पर्स घेतली आणि खाली आली.

पार्किंग मध्ये तिच्या एकटीचीच गाडी होती. लॉक ओपन करून ती गाडीत बसली. गाडी बाहेर गेल्याची एन्ट्री वॉचमन दादांनी केली आणि ते चहा प्यायला पुढच्या चौकातल्या टपरीवर गेले. सगळे गेल्यानंतर ते नेहमीच त्या टपरीवर चहा प्यायला जायचे. आणि मग निवांत इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पुन्हा नाईट शिफ्ट साठी पार्किंग मध्ये असलेल्या आपल्या केबिन मध्ये यायचे.

" आज रेवती मॅडमना खूपच उशीर झाला. छे! चहा प्यायलो तर आता जेवण नाही जायचं. एक काम करतो थोडावेळ नुसता बाळ्याशी बोलतो आणि नंतर थेट जेवायलाच जातो. हा हे बेस आहे. "

असं स्वतःच्याच विचारात वॉचमनदादा चालले होते.

रेवती २०-३० च्या स्पीडने जात होती. ट्रॅफिकमुळे लवकर जाताच येत नव्हतं. रात्रीचे ८ वाजलेले. ती राहायला कोथरूडला होती आणि तिचं ऑफिस विमाननगरला होतं. आणि एवढं अंतर त्यात ट्रॅफिक त्यामुळे तिला अजून २ तास तरी सहज लागणार होते. ती येरवड्यापर्यंत आली. गाडीत छान गाणी लागली होती. तिची आवडती जुनी मराठी गाणी. आणि त्यातही तिचे सगळ्यात आवडते गाणे लागले होते. लता दीदींच्या आवाजातले, वसंत बापटांनी लिहिलेले,..

' चांद मातला मातला, त्याला कशी आवरू?

अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू?

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा

गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू |

आला समुद्रही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा

वेड्या लहरींचा पिंगा बाई झाला कि सुरु |

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा

चांद अमृताचा मनी बाई लागला झरू | '

बाहेरच्या गाड्यांचे आवाज येत नव्हते. एसीचा सुखद गारवा जाणवत होता गाडीत. आणि अशात हे गाणे.

तिला श्रेयसची आठवण आली. ते दोघे नेहमी एकांतात असताना अशी जुनी छान गाणी लावून बसायचे. हातात हात गुंफून, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून कधी पर्वतीवरून तर कधी तळजाईच्या टेकडीवरून, केव्हा सिंहगडावरून तर केव्हा खडकवासल्याच्या किनाऱ्यावरून सूर्यास्त होताना पाहायचे. सगळ्या धावपळीतले ते क्षण त्यांना फार मोलाचे, निवांत आणि एनर्जेटिक वाटायचे. तो अर्धा एक तास कधी संपूच नये असं वाटायचं. पण काळ कधी थांबतो का? सूर्यास्त झाला की तिच्या घरी सिंहगड रोडवर तो तिला सोडायला जायचा. आणि मग सकाळी ते पुन्हा कॉलेज मध्ये भेटायचे. हा त्यांचा नित्यक्रम कधीच चुकायचा नाही. फक्त सुट्टीचा दिवस सोडून.

गाणं संपलं आणि ती भानावर आली. खडकवासल्याच्या पाण्यात पाय सोडून बसलेली, निवांत सूर्यास्त पाहणारी रेवती मागेच राहिली आणि वेळेकडे बघत, रेवाचा विचार करत गाडीचा स्पीड वाढवत एक आई असलेली रेवती भरभर रस्ता कापू लागली. बघता बघता ती पाळणाघरासमोर येऊन थांबली.

" निर्मला मावशी, " तिने गेटच्या बाहेरूनच हाक मारली. निर्मला मावशी म्हणजे त्याच ज्या हे पाळणाघर चालवायच्या.

" आले ग. "

" निर्मला मावशी आल्या आणि त्यांच्या मागेच त्यांचा नुकताच ४ दिवसांपूर्वी आलेला त्यांचा मुलगा शिवांश रेवाला घेऊन आला. रेवा झोपलेली होती. त्याने तिला उचलून आणलेले आणि दुसऱ्या हातात तिची वॉटरबॉटल, डब्याची पिशवी आणि खेळण्यांची बॅग होती.

" तुमची वाट पाहून, रडून शेवटी रेवा मॅडम झोपल्या " शिवांश हसत सांगत होता. रेवती ओशाळली.

" सॉरी ते अचानक क्लाएंट्स आले आणि त्यांच्याशी मीटिंग केल्याशिवाय बाहेरसुद्धा पडता आलं नाही. म्हणूनच उशीर झाला. त्यात हे ट्रॅफिक. खरच सॉरी बरं का.. "

" अगं असूदेत ग. त्याच काय ऐकतेस? तो उगाच काहीतरी सांगतोय. रेवा रडून नाही तर दमून झोपलीये. हा इथे आल्यापासून या दोघांची चांगलीच गट्टी जमलीये. भरपूर खेळत असतात दोघे. आत्तासुद्धा खेळूनच दमून झोपलीये. आणि हो तिच्या जेवणाची काळजी नको करुस. स्वतः जेवताना तिला पण भरवलंय शिवाने. "

" अहो कशाला त्रास तुम्हाला? मी केलं असत ना पटकन काहीतरी घरी जाऊन "

" त्रास कसला आलाय त्यात? मी जेवताच होतो तर सोबत तिला ४ घास चारले. तस पण चिमणी एवढं तर जेवते ती. आणि तुम्ही एवढं दमून जाणार मग बनवणार मग तिला खायला घालणार उशीर झाला असताना फारच.. "

" अं हो म्हणजे .. "

" अरे ए रेवा अवघडेल अशी. तिला गाडीत झोपव ना नीट. "

" हो आई. दार उघडाय का मिस रेवती? "

" हो उघडच आहे. थांबा मी हे सामान घेते तुमच्या हातातलं. "

शिवांश आणि निर्मला मावशींचा निरोप घेऊन रेवती निघाली. घरी पोचल्यावर तिने रेवाला बेडवर नीट झोपवलं. झोपेतच तिचे कपडे बदलले आणि स्वतः चहा करायला निघून गेली. आज फारशी भूक नव्हतीच तिला. चहासोबत काही बिस्कीट खाऊन झोपता येतील म्हणून चहा आणि बिस्कीट घेऊन ती बाल्कनी मध्ये आली. बाहेर अगदी लाईट्सचा झगमगाट होता. आकाशातला चंद्र या कृत्रिम प्रकाशात फारच फिका फिका दिसत होता.

थोड्या वेळाने तीसुद्धा रेवाशेजारी आडवी पडली. आज खूप दमली होती पण तरी डोळा मात्र लागत नव्हता. राहून राहून आज तिला श्रेयसची आठवण येत होती. अनेक दिवसांनी तिला त्याची आठवण आलेली. तिचे डोळे भरले आणि इतक्यात रेवाच्या हसण्याचा आवाज आला. तिने पाहिले तर रेवा फारच गोड हसत होती.

" बहुतेक स्वप्न बघत असावी. काय असेल पण जे एवढं हसतीये? "

तिच्या कुरळ्या काळ्या केसातून हात फिरवत असताना तिला पुन्हा जाणवलं,

" रेवाचे केस अगदी श्रेयस सारखेच आहेत. "

तिने लॅम्प बंद केला आणि झोपी गेली.

इकडे शिवांश पुस्तक वाचत बेडवर पडला होता. मध्येच तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला किचन मध्ये गेला. फ्रीझ उघडला आणि त्याला समोरच भरपूर चॉकलेट्स दिसले.

" अरे देवा, हे चॉकलेट्स तर मी काल आणलेले रेवा आणि बाकीच्या मुलांना द्यायला. विसरलोच. आईला सांगून ठेवलं पाहिजे आठवणीने द्यायला. पण खरंच काय गोड आहे रेवा... "

तिचे बोबडे बोल आठवत, स्वतःशी हसत तो केव्हा बेडवर येऊन झोपला हे त्याचं त्यालाही समजलं नाही.

क्रमशः:


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama