Gauri Ekbote

Tragedy

2  

Gauri Ekbote

Tragedy

घुसमट

घुसमट

6 mins
9.3K


परी घरातली सगळ्या लहान. दोन भावांच्या पाठीवर झालेली. मुलीची हौस होतीच बापटांना. परी झाल्यावर तर आकाश ठेंगण होतं त्याना. त्या छोट्याश्या परीला जेव्हा त्यांनी हातात घेतलं. डोळे पाण्याने भरून आले होते. देवाने जगातलं खूप मोठ्ठं सुख पदरात टाकलं. परीला परी सारखंच ठेवेन. हे तेव्हापासूनच त्यांनी मनात पक्क ठरवलं. गोरी गोरी, गोबऱ्या गालाची, निळ्या डोळ्याची आणि हसली की तिच्या उजव्या गालावर सुंदर खळी, अशी होती परी बापट. हो तिचं नाव त्यांनी परीच ठेवलं.

शाळेत जाताना दोघे भाऊ तिला तिचं शाळेचं दप्तरसुद्धा उचलू देत नसत. तिघेही शाळेत बरोबर जात, परीला अगदी वर्गात सोडून हे दोघे त्यांच्या वर्गात जात. शाळा सुटल्यावर पण तिला घेऊन मगच निघत. खूप जीव होता सगळ्यांचा परीमध्ये. आई बाबांसाठी तर ते शेंडेफळ होतं. ती जे म्हणेल ते तिला ते देत.

परी जशी जशी मोठी होऊ लागली तशी ती अजूनच सुंदर दिसायला लागली. तिचे निळे डोळे, गालावरची खळी मोहून टाकायची समोरच्याला. तिच्या भावाना आणि वडिलांना तर तिचा खूप अभिमान होता. पण आईला खूप काळजी वाटे. पोर दिसायला चांगली. लोक नाहीत ना पण तशी. त्या रोज तिची दुष्ट काढायच्या, त्यावर तिचे दोन्ही भाऊ आईला समजावत. आम्ही आहोत ना नको काळजी करू. परीला रूपाचा गर्व नव्हता.

एक दिवस तिचे वडील ऑफिसमधून घरी आले, चहा घेतला आणि अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. तिचा मोठा भाऊ घरी होताच. त्यांनी त्याला जोरात आवाज दिला आणि खाली कोसळले. अॅम्ब्युलन्स बोलावून दवाखान्यात नेईपर्यंत खूप उशीर झाला होता. पहिलाच अटॅक इतका जोरात होता की त्यात ते गेले. घरातला मोठा आधार गेला. ह्यातून सावरायला सगळ्या घराला दोन वर्ष लागली.

मोठ्या भावाला जॉब होता त्यावरच आता घराची जबाबदारी होती. छोटा भाऊ लास्ट इयरला होता आणि परीफर्स्ट इयरला. कॉलेज संपलं आणि नात्यातल्यानी एक स्थळ तिच्यासाठी सुचवलं. चौकशी केली आणि मुलगा चांगला आहे कळलं. पाच वर्षांपूर्वीच त्याचे वडील वारले होते आणि तेव्हापासूनच तो घर सांभाळत होता. घरात आई आणि तो. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. स्थळ थोडं लांबचं होतं. पण मुलगा चांगला होता.

लग्न ठरलं. खूप धुमधडाक्यात परीच शरदबरोबर लग्न झालं.

शरद एका private कंपनीमध्ये कामाला होता. पगारही चांगला होता त्याला. परी त्याला पाहताच आवडली होती. शरद एक चांगला मुलगा होता पण वाईट संगतीमुळे दारूचं अतिशय व्यसन लागलं होतं. हे लग्नानंतर थोड्याच दिवसात परीला कळलं. पण चौकशी केली तेव्हा कोणी का सांगितलं नाही? हे कायम परीच्या मनात येई. शरद रोज पिऊनच घरी येत. घरी त्याची आई आणि त्यांच्या शेजारीच त्याची मोठी बहीण राहत. शरद सगळा पगार आईला देत आणि शरदचा पगार मिळाल्या मिळाल्या आई पहिले त्यांच्या बहिणीच्या घरी सगळं सामान भरून, बिल भरून मग उरलेल्या पैश्यात घराचं. तसं बघितलं तर तिच्या नणंदेची परिस्थिती चांगली होती. त्यांचे मिस्टर एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होते. पण कायम बाहेर फिरती. त्यामुळे परीची नणंद कायम परीकडेच असे. आता ही आलीय मग आपल्याला आता ह्या घरात येणं जाण कमी होईल. पैसेपण नाही मिळणार शिवाय परी ही दिसायला छान. त्यांच्यापेक्षा तर कितीतरी पटीने छान होती. ह्याविचारामुळे आणि द्वेषामुळे तिच्या नणंदेने सासूच्या मनात परीविषयी वाईट मन करायला सुरुवात केली.

तसं त्यांच्या मनातसुद्धा परीमुळे आता शरद आपल्याला पैसे देईल की नाही ही एक गोष्ट होतीच आणि तिच्या नणंदेने त्याला अजून खतपाणी घालायला सुरुवात केली होती. त्या दोघी सतत परीला टोमणे मारणे, काम काढून स्वतः निघून जात, तिला त्या शेजारीसुद्धा कोणाशी बोलू देत नसत, परी ही गोष्ट घरी सांगू शकत नव्हती. आईला वाईट वाटेल, दोघे भाऊ भांडायला येतील. उगाच वाद कशाला ह्यामुळे परी माहेरी जात नव्हती.

भावना ह्या स्त्री पुरुष फरक करत नाहीत. त्या जशा एका स्त्रीला असतात तशा त्या एका पुरुषालासुद्धा असतात. परीला शरदचा सहवास आवडत होता. तो आपल्याबरोबर असावा, त्याने आपलं कौतुक करावं, जवळ घ्यावं असं तिला नेहमी वाटे. एक नवरा म्हणून तोही खूप चांगला होता. जरी पिऊन घरी यायचा, तरी तो परीला कधी त्रास देत नसे. त्याला परी खूप आवडत होती. हे जसं शरदच्या आईला आणि बहिणीला कळलं तसं त्या रोज काही ही कारणावरून परीशी भांडू लागल्या. शरद तर नेहमी नशेतच घरी येत असे. त्यामुळे परी तिची बाजू कोणापुढे मांडणार. माहेरी सांगता येत नव्हतं की शरद जवळ मन मोकळं करता येत नव्हतं. तिच्या सासू आणि नणंदेचा राग इतका पराकोटीला गेला की त्या आता शरद आणि परीमध्ये भांडण लावू लागल्या. इतकंच काय की त्या दोघांना कसलाच एकांत मिळू देत नव्हत्या. जर ह्यांना चुकून मुलं झालंच तर परत पैशात वाटा होईल. ह्या हेतूने तिची नणंद कायम तिचा मुलगा शरद आणि परीच्या मध्ये पाठवत. रात्रीसुद्धा त्याला शरद आणि परी जवळ झोपवी. लग्नानंतर सुख तिच्यापासून पळूनच गेलं. ना कुठले सणवार ना कुठली हौस. शरद आणि परीमध्ये सुखाचा असा फक्त एकच क्षण होता. लग्नाच्या रात्रीचा. त्यानंतर ती दोघे कधीच एकत्र आली नाहीत किंवा येऊ दिली नाहीत. लग्नाचं पाहिलं वर्ष संपत ना संपत तोच एक दिवस शरद घरी खाली कोसळून बेशुद्ध झाला. दवाखान्यात अॅडमिट केल्यावर कळलं की त्याच्या लिव्हरने आता काम कारण बंद केलाय आणि आता जर त्याने पिणं सोडलं नाही तर डॉक्टरसुद्धा काही करू शकणार नाही.

हे ऐकूनसुद्धा शरदच्या आईचं आणि बहिणीचं मन कळवळलं नाही. त्यादिवशीसुद्धा त्या परीशी खूप भांडल्या. शरदला दवाखान्यातून घरी आणलं. पण त्याची सवय काही सुटली नाही. घरी ठेवलेली बाटली घेऊन तो परत सुरु झाला आणि व्हायचं तेच झालं. एका वर्षात शरद गेला. परीवर तर आभाळच कोसळलं. हा कधी तरी सुधरेल, आपलं सगळं नीट होईल ह्या आशेवर ती सगळं सहन करत होती. शक्य होईल तितकं शरदला दारूपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करी. पण जे नको तेच झालं.

हिच्यामुळेच माझा मुलगा गेला. पांढऱ्या पायाची अवदसा म्हणून त्याच्या आईने परीलाच दोषी ठरवलं.

शरद गेल्याच कळताच परीचे भाऊ आणि आई तिच्या घरी आले. तेव्हासुद्धा तिच्या सासूने आणि नणंदेने त्यांच्याशी खूप भांडण केलं. ह्या दोघी असं का बोलता हे त्यांना कळेच ना. परीने त्यांना कधीच काही सांगितलं नव्हतं .

दहाव्या दिवशी परीला इथून घेऊन जा तुमच्याबरोबर, मी नाही सांभाळणार हिला असं तिच्या सासूने तिच्या भावाना सांगितलं. ह्या असं का बोलतात हे त्या दिवशी परीने सगळं अगदी पहिल्या दिवसापासूनच सांगितलं, शेजाऱ्यांनी तिच्या भावांना सांगितलं की जेव्हा तुम्ही लग्न ठरवायच्या वेळेला चौकशी करायला आलात तेव्हा आदल्या दिवशी शरदच्या आईने आणि बहिणीने सगळ्यांना भांडून धमकावलं होतं की शरदबद्दल सगळं चांगलंच सांगायचं. ऐकल्यावर सगळ्यांना खूप वाईट वाटलं आणि राग पण आला. तू आम्हाला का नाही सांगितलं. पण आता बोलून काही उपयोग नव्हता.

परीच्या भावानी तिच्या सासूला ठणकावून सांगितलं आमची बहीण काही आम्हाला ओझं नाही. सगळं आयुष्य आम्ही तिला सांभाळू. पण ह्यापुढे तुमचा आमचा संबंध संपला. कुठल्याही प्रकारे केव्हाही परीला कॉन्टॅक्ट करायचा नाही आणि ते परीला घेऊन घरी आले.

दोन वर्ष परी भांबावलेल्या अवस्थेत होती, ना कोणाशी बोलत ना धड खात पित. आपण परीचं नुकसान केलं ही भावना तिच्या भावांना वाटे.

आता तिचं परत लग्न नाही करायचं, आपण तिला सांभाळू. परत तिला कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं. तिला थोडं मोकळं वाटेल, थोडं बाहेर पडली तर विचार बदलतील मोकळी होईल, म्हणून घराजवळच एका कंपनीमध्ये ती जॉब करू लागली. भावांची लग्न झाली , त्यांना मुलं झाली, त्या मुलांमध्ये परी रमली पण ती शरदला विसरू शकली नाही.

तो एका दिवसाचा त्याचा सहवास ती कायम मनात साठवून होती. तिने कितीही ती आठवण दडपण्याचा प्रयत्न केला तरी तिला त्यात हवं तसं यश येत नसे. भावना दाबून ठेवणं तिच्यासाठी कठीण होतं. सणावाराला, लग्नकार्यात तिच्या भावजया, मैत्रिणी नटून थटून मुलांसोबत मिरवत, तेव्हा परीला ही उणीव जास्त जाणवत. रमणीचे जीवन म्हणजेच रती आणि वत्सलता ! ह्या दोन्ही जीवन प्रवृती तिच्या जीवनातून वजा झाल्या होत्या, मनातल्या मनात ती कुढत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy