गावातील एक भयावय रात्र
गावातील एक भयावय रात्र
माझे मुळ गाव कोकण पण माझा जन्म शहरातील. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव असे नाही, पण आजीने सांगितलेली एक अंगावर शहारे उठवणारी कथा मी आज तुम्हाला सांगत आहें. ती किती भयानक आहे ती वाचल्यावरच तुम्हाला कळेल.
माझे आजोबा शिक्षक होते. त्यांची बदली होत असायची. अशीच एकदा बदली एका गावात झाली. ते गाव तसे सुंदर अतिशय लोभनीय असे जसे कोकणातील इतर गावे असतात तसें निसर्गाने नटलेले. सुंदर झाडे आणि छान कौलरू घरे. असा सुंदर देखावा. पाहतच रहाल असा. पण हे सारे दृश्य सुर्य मावळेपर्यंत नंतर मिट्ट अंधार आणि भयावह शांतता.
आजोबांना जी खोली राहायला मिळाली होती ती तशी तीन खोल्यांची होती. आजोबा, आजी, आई आणि तिची तीन लहान भावंडे. आई तेव्हा 9 वर्षाची होती आणि बाकी भावंडे 2 ते 3 वर्षाच्या अंतराची होती. त्या घराच्या आसपास कोणतेही घर नाही एक पडके घर होते त्यात बरेच वर्षांपूर्वी एक बारा लोकांचे कुटुंब राहत होते काहीतरी आग लागली आणि सारे कुटुंब जळून राख झाले.
शाळा ही घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. एक विहीर होती घरापासून काही अंतरावर. बाकी सारे सामसूम. रात्र झाली की घरा बाहेर पडायला नको एवधी भीती निर्माण करणारे वातावरण.
आजोबांनी आल्यावर ते घर आणि त्याघराभोंवती साफसफाई करून घेतलेली. त्यामुळे साप किंवा सरपटणारे प्राणी येणे शक्य नव्हते. आता येऊन त्यांना दहा दिवस झालेले सारे काही सुरळीत चाललेले. अधून मधून कसले तरी आवाज यायचे कोणाच्या तरी ओरडण्याचे, रडण्याचे, लहान मुलांचे. पण ते भास असतील म्हणून आजी आजोबानी सोडून दिले.
त्यादिवशी ना अमावस्या होती ना पूर्णिमा होती, शाळेत अधिकारी आले होते वार्षिक तपासणी करायला त्यामुळे त्यांच्या जेवणाची जबाबदारी आजोबांच्या कुटुंबावर आली. त्याकाळात कोणी मोठा अधिकारी आला की मस्त चांगले चमचमीत जेवण असायचे. कोकण म्हटले की वडे कोंबडा हा बेत आलाच.
आजोबानी मस्त गावठी कोंबडी आजीला आणून दिली आजीने सर्व तयारी केली. त्या घरात जे स्वयंपाकघर होते त्याला एक खिडकी होती ती खिडकी बरोबर चुलीच्या बाजूला होती त्या खिडकीला एक गज होता कोणीही आरामशीर बाहेरून आत हात घालू शकत होता. आई आणि तिची भावंडे खेळत होती आणि आजी मस्त कोंबडी चा झनझणीत रस्सा करत होती. सारे करून झाले आता फक्त वडे करायचे होते संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले सुर्य मावळलेला आणि कुंट काळोख पसरलेला कारण जानेवारी महिना आणि त्यात पौष मराठी महिना. म्हणजे रात्र मोठी दिवस लहान.
आजीने वडे करायला घेतले आजोबा बाहेर बाकी तय्यारी करत होते आणि बाकी मुले सारी खेळत होती. तेवढ्यात आई आत आली आणि स्वयंपाक घराच्या उंच भागावर जाऊन बसली. वडे खायचे होते ना तिला. सारे काही ठीक चाललेले एवढ्यात कोणाचा तरी आवाज आला. आईचे आणि आजीचे लक्ष त्या खिडकी कडे गेले मिट्ट काळोख त्यामुळे काहीही दिसत नव्हते. एका स्त्री चा आवाज आला, "ताई माका भूक लागली असा एक वडा दे ". आजीच्या काहीहीं डोक्यात आले नाही तिला वाटले आले असेल कोणीतरी भुकेलेली. म्हणून तिने सांगितले की, "थांब हा देते हा" असे म्हणून आजीने आजोबांना हाक मारली आणि सांगितले कोणी बाहेर उभे राहून वडा मागत आहे तुम्ही जरा हे 4 वडे तिला देऊन या.
आजोबा विचार करू लागले की आसपास कोणते घर नाही आणि यावेळी कोणी स्त्री येथे कशी आली. मग काही विचार करून बॅटरी घेऊन ते वडे द्यायला बाहेर खिडकी कडे गेले तेव्हा एक स्त्री पळत जात होती. तिने हिरवीगार नऊवारी साडी घातलेली, केस सोडलेले, शृंगार केलेली आणि हिरव्या बागडया घातलेली अशी ती, धावत जाऊन विहिरत उडी मारली. आजोबांना काही कळले नाही ते पुढे जाऊन विहिरीमध्ये बॅटरी मारून पाहिले तर कोणी नाही. आजोबांना काही गडबड वाटली. ते परत पाठी आले तेव्हा आजीने विचारले की, दिलात का हो वडे. आजोबानी तेव्हा काही सांगितले नाही कारण घरात लहान मुले घाबरतील म्हणून. त्यांनी सांगितले की, मी गेलो तेव्हा ती तिकडे कोणी नव्हते कदाचित निघून गेली असेल.
आजोबानी ती रात्र कोणालाही काहीहीं सांगितले नाही आणि जेवण लवकर शाळेत देऊन घरी आले आणि झोपले. सकाळी आजीला सारे काही सांगितले त्यांनी गावात चौकशी केली तेव्हा कळले की पन्नास वर्षांपूर्वी पुरे कुटुंब जळून खाक झाले फक्त त्यातील एक व्यक्ती वाचली. ती व्यक्ती दुसरी तिसरी नसून ती त्यारात्री दिसलेली स्त्री होती. ती त्यादिवशी गावात गेलेली काही तरी सभारंभ होता आणि ती मदत करायला थांबलेली कारण दुसऱ्या दिवशी सभारंभ होता आणि त्यारात्री त्यांच्या घरात आग लागली आणि तिला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ती जेवत होती आणि वडे होते जेवणात. पण जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात कोणी धावत येऊन हे सांगितले ती तशीच उठली आणि धावत घराकडे धावली आणि बाकी गावातले लोक पण धावत गेले पण फार उशीर झाला सारे जळून गेलेले तिला एवढा धक्का लागला की तिने बाजूच्या विहिरीत उडी मारून जीव दिला.
हे सारे कल्यावर आजी आजोबानी ब्राह्माणाला बोलवून तिची शांती करून घेतली कारण दुसरे घर अचानक मिळणे शक्य नव्हते म्हणून त्यानंतर कोणालाही तिचा त्रास झाला नाही आणि आवाजही बंद झाले. हे ऐकायला सोप्पे वाटत असेल पण त्यारात्री आजोबांनी घेतलेला तो अनुभव प्रत्यक्ष कोणी घेतला असता तर त्याला कळले असतें काय त्यावेळी त्यांनी अनुभवले ते.
कथा : सुनंदा ठाकूर ( माझी आजी )

