गारंभीचा गाव
गारंभीचा गाव


सकाळचे दहा वाजले होते. आणि मी रविवारची सुट्टी असल्यामुळे घरीच आईने दिलेले पोहे खात बसलो होतो. समोरचा पेपर वाचता वाचता कधी पोहे संपत होते कळतही नव्हतं . इतक्यातच चार्जिंगला लावलेला माझा मोबाईल खणाणला. मोबाईलची रिंगटोन होती '' रात्रीस खेळ चाले'' या मालिकेच्या शीष॔काची . खरंतर मला लहानपणापासूनच भूत, पिशाच्च, चेटकिन या सगळ्याची आवड नाही, पण कुतूहल मात्र नक्की.
ते जाऊ द्या, मी माझा फोन बघितला तर त्यावर होतं की '' ''सौरभ वाबळे कॉलिंग................... '' सौरभ म्हणजे माझा लहानपणीचा मित्र आठवीपासून आम्ही सोबत. फोन उचलल्यावर एका वाक्यात आज्ञा देऊन सौरभने फोन खाडकन ठेवून दिला..... आज्ञा अशी होती की आज दुपारी दोन वाजता आपल्याला "कनोली" ला जायचं आहे आवरून ठेव .
कनोली म्हणजे सौरभ च मुळगाव. आम्ही तिथे कायमच जात असायचो. शहरी बाजारापासून थोडसं लांबच राहिलेलं कनोली प्रसन्न गाव होतं.
तो दुपारी दोन वाजता येणार होता माझ्याकडे आणि अगदी वेळेत तो घरी आला. त्याची Activa गाडी आमच्यासाठी Ducati Kawasaki Ninja पेक्षा कमी नव्हती. तसं कनोली फार लांब नव्हतं, आमच्या गावापासून म्हणजे संगमनेर पासून फक्त 18 किलोमीटर म्हणजे पाऊण तास . मग काय संगमनेरचे रस्ते कापत किशोरदांचं ''मुसाफिर हू यारो '' गाणं गुणगुणत आम्ही निघालो. पण एका जागेवर आम्ही थांबलो किंवा आम्हाला थांबावं लागलं ती जागा म्हणजे रस्त्यालगतच असलेलं "भंडारी पुस्तक प्रदर्शन कार्यालय". आम्हाला काही पुस्तक वाचनाची खूप आवड होती असं अजिबात नाही..... थोडासा नाद होता एवढं मात्र नक्की....त्या पुस्तक प्रदर्शनात आम्ही अगदी पुस्तके रांगेत उभं राहून "व्यवस्थित चाळली"......वाचली नाहीत. त्यानंतर मात्र आम्ही एका पुस्तका जवळ येऊन दोघेही थबकलो ते पुस्तक म्हणजे '' शं. ना. महाजनी'' लिखित ''गारंभीच गावं''. अनेक पुस्तके चाळल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कनोली च्या दिशेने प्रवास सुरु केला पण आमच्या दोघांच्याही डोक्यातून "गारंभीच गाव" काही केल्या जात नव्हतं . आतापर्यंतची गाणी आम्ही मोठ्या आवाजात म्हणजे थोडीफार तालासुरात म्हणत आलो होतो ती सुद्धा आता बंद झाली होती. कारण डोक्यात त्या पुस्तकाने थैमान घातले होते.
काही वेळातच कनोली ला पोहोचलो. तेथे शेतावरती गेलो त्याच्या नातेवाईकांना भेटलो. Natural गोष्टी हल्ली आपल्याकडे फारशा दिसत नाही. काही छोटी गावं बघितली ना असं वाटतं की "विज्ञानाची कास धरून आपण विकास साधला खरा , पण खरा आनंद हा विज्ञानापेक्षा अज्ञानातच आहे'' हे आपल्याला गाव शिकवते . गावाकडच्या वातावरणामध्ये वेळ कसा गेला समजलं पण नाही आता घड्याळात पाच वाजत आले होते आणि आमची सुद्धा परतण्याची वेळ जवळ आली होती . आकाशामध्ये पावसाचं सावट थोडसं जाणवत होतं. पाऊस पडायच्या आधी निघूया असे ठरले सुद्धा त्यानंतर पंधरा मिनिट मध्ये आम्ही संगमनेरच्या दिशेने म्हणजेच आमच्या गावाच्या दिशेने जाण्याच्या मूळ रस्त्याला लागलो. तेवढ्यात मला मागून एक कोणीतरी आवाज दिल्याचं मी ऐकलं, बघतो तर सुम्या होता. सुम्या म्हणजे माझ्या कॉलेजमधला फारसा जवळचा नाही पण ओळखी पुरता मित्र सुमित गुंजाळ .... सुम्या त्याच्या नेहमीच्या गावरान शैलीत दोन-चार शिव्या देत म्हणाला की, "काय राव तुम्ही असं करतंय, आमच्या गावाजवळुन जात्यात पण गावात येत बी न्हाई." मग काय आम्ही त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण गडी हट्टालाच पेटलेला... म्हणत होता की फक्त दहा मिनिट पुढे आहे कनोली पासून, आज कसलीतरी जत्रा पण आहे म्हणे, खरं तर खूप उशीर झाला होता, पावसाची शक्यता पण होती पण सौरभ च्या "लवकर निघायचं बर का?" या अटीवरती आम्ही सुम्या च्या पाठोपाठ निघालो .......
सुम्या खरंतर अवलिया माणूस गाडी चालवण्यात त्याचा हात कोणीच नाही धरू शकत नाही. आम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटत होती नेमकं तसंच झालं. सुम्या काही वेळातच गाडी जोरात पळवायला लागला. त्याच्या गाडीचा पाठलाग करता करता आमच्या Activaच्या "नाकीनऊ" नाही , तर चांगले "दहा बारा" आले.
पाच मिनिटांनंतर घाटाचा रस्ता आला तरीही सुम्या रंपाटच, तो तरी काय करणार त्याचा नेहमीचा रस्ता होता, अरे पण आम्ही नवीन होतो ना! काही काळानंतर सुम्या अचानक दिसेनासा झाला. वाऱ्यासारखं वेगाने गडी निघून गेला ,आम्हाला वाऱ्यावर सोडून. हळूहळू अंधार सुद्धा पडायला सुरुवात झाली होती आणि पाऊस पण सुरु झाला होता. सौरभ माझ्याकडे बघून रागात म्हणाला "आधीच हौस त्यात पडला पाऊस..."
शेवटी सुम्याला चार रसरशीत शिव्या घालून आम्ही पुन्हा कनोली मार्गे संगमनेर च्या वाटेला लागलो , पण अंधार आणि पाऊस एवढा होता ना कि गाडी चालवणं अवघड होतं. तेवढ्यातच गाडीचा आवाज अचानक बंद झाला आणि गाडी बंद पडली. एका बाजूला गाडी घेऊन बघितल्यावर आमच्या लक्षात आलं की लांबच्या प्रवासाला निघताना थोडेसे जास्त पेट्रोल भरलं तरी हरकत नसते.. आता तर पर्यायच नव्हता गाडी एका छोट्याशा मंदिरापाशी लावून आम्ही घाट उतरु लागलो. कुठून त्या सुम्याच्या पाठीमागे आलो असं झालं होतं. खूप वेळ चालल्यानंतर आमच्या असं लक्षात येत होतं की फिरून फिरून आम्ही पुन्हा त्याच जागेवर येत होतो. म्हणजे "तेच मंदिर, तेच ते झाड आणि तेच त्या झाडाखाली बसलेले आजोबा....... "
दोन-तीन चकरा झाल्यावरती आम्ही त्या झाडाखाली बसलेल्या आजोबांना विचारलं की ,संगमनेरच्या दिशेने जाणारा रस्ता कुठला? तर ते म्हणाले की, पोरांनो अरे काय बोलता तुम्ही, "तुम्ही फिरता-फिरता लय पुढे आलात इथून पुढ 20 किलोमीटर कनोली, आणि मग पुढं संगमनेर हाये"....
आता मात्र आमची चांगलीच पाचावर धारण बसली. त्यावरती ते आजोबा म्हणाले की पाऊस बघा, गाडी बंद, अंधार पडलाय. आता एक काम करा चला माझ्याबरोबर इथं घाटाखाली माझं गाव आहे. खरं तर भेदरलेल्या अवस्थेतच आम्ही होतो. प्रचंड पाऊस अंधार मोबाईलला रेंज नाही. इतर वेळेस युट्युब ला पण कधीही न अडकणारा मोबाईल आता फेकून देण्याच्या मार्गावर आला होता. अशा अवस्थेत त्यांच्यासोबत जाण्यावाचून कुठलाच पर्याय आमच्यासमोर दिसत नव्हता .
आम्ही त्या म्हातार्या आजोबांच्या पाठोपाठ घाट उतरु लागलो. आम्हाला आता एक छोटस गाव दिसू लागलं.... एक असं गाव की ज्या गावात विकास हा शब्द पोचलाच नव्हता. लाईट नाही, मोबाईल नाही अगदी बोलायचं झालं तर ट्रॅक्टर पण नव्हता फक्त बैलगाडी. गावातली लोक मोजकेच पण प्रेमळ दिसले. गावातल्या लोकांपैकी "गोदाआज्जी" आणि एक आमच्या एवढ्याच वयाचा असलेला "भिमा"शी माझी चांगलीच गट्टी जमली. सौरभ मात्र सारखा विचारत होता की "कधी निघायचं?" तिथल्या लोकांनी पण समजावलं की पहाटे निघण्या शिवाय पर्याय नाही तेव्हा तो शांत झाला .
आणखी एक भारी गोष्ट म्हणजे त्याच दिवशी त्या गावात एका देवीची पूजा होती. आमचं जेवणाचं टेन्शन तर मिटलं होतं पण घरचे लोक काळजी करत असणार याचा विचार मनात येऊन गेला. त्या देवीची पूजा झाली आणि आम्ही भरपेट जेवणाचा आनंद नवीन गावातल्या मित्रांसोबत घेतला. पोटभर जेवल्यानंतर आम्ही तिथल्या जवळच्याच एका टेकडीवरती फिरायला गेलो, कारण पाऊस बऱ्यापैकी थांबला होता. एक गोष्ट मात्र खूप वेगळी वाटत होती, सौरभ गावात आल्यापासून खूप शांत शांत वाटत होता. विचारल्यावर म्हणत होता की मी हे सगळं कुठेतरी पाहिलय. आणि मी त्याच्या या वाक्यावर ती खूप हसत होतो. सौरभ खरच खूप घाबरल्यासारखा दिसत होता. म्हणत होता ,"हे गाव, ही माणसं, हे मंदिर हे सगळं कुठेतरी पाहिलय". मी म्हटलं स्वप्न पडलं असेल तुला.
जेवण केल्यानंतर आम्ही टेकडीवर चालत होतो पाऊस पूर्णपणे थांबला होता. आमचं हसणं खिदळणं चाललं होतं. इतक्यात कसला तरी आवाज आला सौरभ आणि मी मागे वळून बघितलं तर डोंगराच्या पायथ्याशी त्याच गावात असलेल्या एका गोंधळ किंवा जागरण-गोंधळाच्या कार्यक्रम असल्याचा आम्ही अनुमान लावला. कारण तो आवाज होता पारंपारिक वाद्य "संबळ"चा.
टेकडीच्या पायथ्याशी गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की गोदाआज्जी सगळ्यांना काहीतरी सूचना करत होत्या. तर भीमा सगळ्या गावकऱ्यांना खाली बसवत होता. सर्व गावकरी गोल करून बसले बरोबर मध्यभागी एका कोणत्यातरी देवीचा फोटो ठेवला होता. आम्ही पण त्या लोकांसोबत बसलो. मनात प्रचंड भीती आणि उत्सुकता होती कि नक्की काय असेल. कार्यक्रमाला थोडा वेळ असल्याचं गोदाआज्जी म्हणाल्या तोपर्यंत या शहरातल्या आलेल्या या दोन पोरांनी काहीतरी करून दाखवावं असं त्या म्हणे, त्यामुळे आम्ही पुरते घाबरलो. आम्ही काय करून दाखवू,कारण येथे ना नकला करून चालणार होतं ना जोक. मग सौरभने एक मला आयडिया सुचवली, तो म्हणाला की "आपण आज सकाळी कसे घाबरलो होतो आता या सगळ्या गावाला घाबरव की..". मी म्हणालो " म्हणजे?". तर सौरभ म्हणाला की अरे आपण ज्या गोष्टीने घाबरलो होतो ती गोष्ट ऐकव की, "गारंभीचा गाव". मग माझ्या पण डोक्यात ट्यूबलाईट पेटली ,म्हटलं आता यांना घाबरवूंच. मी जागेवरती उभा राहिलो आणि सगळ्यांच लक्ष माझ्याकडे खेचत मोठ्या आवाजात मी कहाणी सांगायला सुरुवात केली.
"ऐका गावकऱ्यांनो, ही गोष्ट एका गावाची आहे ते गाव खरं तर खूप सुखी समाधानी होतं पण सगळं चांगलं असताना एक गोष्ट मात्र वाईट होती, ती म्हणजे दर दुर्गाष्टमीच्या दिवशी त्या गावात एक जत्रा भरायची. प्रचंड दिवसभर धामधूम, पूजा वगैरे असायची. पण ती वाईट गोष्ट म्हणजे त्या गावात दुर्गाष्टमीच्या दिवशी एका प्राण्याचा बळी देण्याची प्रथा होती. तसा त्या गावाला शाप होता, जर दुर्गाष्टमी च्या दिवशी बळी नाही दिला तर गावातली लोक सर्व लोक आधी सारखेच "अत्रुप्त आत्मा" म्हणून राहतील त्यांना मनुष्यजन्म कधीच मिळणार नाही ."
मी ही गोष्ट सांगत असताना सगळीकडे खूप शांतता पसरली सगळेच अगदी मन लावून ती कथा ऐकत होते. कथा सांगताना मी आणि सौरभ दोघेच घाबरलेलो दिसत होतो. बाकी सगळा गाव धीराने ती कथा ऐकत होता. मी माझी गोष्ट संपवून खाली बसण्यासाठी आलो तर मला दिसलं की सौरभला खूप घाम फुटला होता आणि त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता...
मला माझी कथा पूर्ण रंगवून सांगितल्या चा प्रचंड आनंद झाला होता आणि मी माझ्या शेजारीच बसलेला गोदाआज्जी ना विचारलं "काय आज्जी कशी वाटली गोष्ट?" आजी म्हणाल्या "मस्त, पण बाळा या गोष्टीचे लेखक शं. ना. महाजनी का?" मी म्हणालो "हो! तुम्हाला कसं माहिती". तर त्या म्हणाल्या की ते याच गावचे आहेत. मला चक्करच आल्यासारखं झालं मी आज्जींना विचारलं की, "एवढे मोठे लेखक या गावचे आहेत तरी गावाचा विकास नाही. बस स्टॅन्ड नाही, सोयीसुविधा नाही. अहो गावाच्या नावाची पाटी पण नाही गावाचं नाव काय आहे नक्की? "मी हा प्रश्न विचारल्यावर ते सगळं गाव मोठमोठ्याने हसू लागलं. आणि एका सुरात सर्व गावकऱ्यांनी उत्तर दिलं" गारंभी". मी आणि सौरभ एकमेकांकडे बघत राहिलो, तेवढ्यातच त्या आज्जी आमच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "आता तरी आम्हाला मुक्ती मिळवून द्या. मनुष्यजन्म मिळू द्या". सगळं गाव मोठमोठ्याने हसत होतं आणि आमच्या डोक्यात पाणी आलं होतं.
तेवढ्यात मी मोठ्याने ओरडलो आणि आईने मला झोपेतून जागं केलं. शांत झाल्यावरती समजलं की ते फक्त माझं स्वप्न होतं...