एक रात्र पौर्णिमेची
एक रात्र पौर्णिमेची
संध्याकाळचे 7 वाजले होते. रामने लगबगीने ऑफिसचे काम आटपलं आणि कंटाळून घरी निघाला. रस्त्याने डोक्यात एकच विचार गेलं की पटकन जेवायचे आणि शांत झोपायचे.
पण झाले उलटेच! घरी गेल्या गेल्या आईने बोलायला सुरुवात केली.
मला काम होत नाही तू आज काय ते ठरव. या पत्रिका आणि फोटो बघ आणि यातली एक मुलगी पसंत कर त्याशिवाय मी उद्या तुला ऑफिसला जाऊ देणार नाही.
एवढे बोलून तिने फोटोंचा ढिगच पुढे टाकला. ते पाहून राम वैतागून आला तसाच बाहेर निघाला.
अरे जेवण कर मग जा कुठे जायचे... तिकडे आईने आवाज दिला पण राम दुर्लक्ष करून तसाच चालत चालत नदीवर गेला.
शांत पाणी आणि त्यात पडलेले चांदण्यांचे प्रतिबिंब काजव्याचा सुंदर प्रकाश रातकिड्यांचा आवाज ऐकून त्याचे मन प्रसन्न झाले. इतक्यात त्याची नजर एका खडकावर बसलेल्या तरुणीकडे गेली.
तिचे सुंदर रूप लांबसडक मोकळे केस आणि डोळ्यातले तेज बघून तो मोहरून गेला. त्यात तिने त्याच्याकडे बघून स्मित हास्य करत खुणावले...
एकटेच आलात का? तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर थोडावेळ माझ्याशी बोलू शकता? मी पण घरातून रागाने निघून आलेय. इथे बसले की मन कसं शांत झालंय...
त्याची पावले आपोआप तिच्या दिशेने वळली. दोघांनी खूप गप्पा मारल्या. पौर्णिमेचा चंद्र कसा पूर्ण व्हायला लागला. तसे तसे दोघांचे पहिल्याच भेटीत मन जुळले, प्रेम झाले, व्यक्त केले आणि एकमेकांना जन्मभर साथ देण्याचे वचनही दिले.
रामने ठरवले आता आईला सांगायचे की, मुलगी पसंत आणि उद्याच तिच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घालायची.
मनातले तिला न सांगताच तो तिला म्हणाला, चल खूप रात्र झालीय थोड्या वेळात पहाट होईल. मी तुला घरी सोडतो. आपण उद्या भेटू.
तिने एकटक बघत म्हणाली, तू जा. मी जाईन नंतर आई-बाबांना माहितीय मी कुठे आहे. ते काळजी करणार नाहीत.
अगं तुझ्या बाबांचा नंबर दे, मी उद्या फोन करून घरी येतो. तुला कायमचे न्यायला...
हो देते... पण आधी मला वचन दे तू परत आलास तर तू मला नाही तर मीच तुला कायमचे घेऊन जाईन...
हसत हसत वचन देऊन राम खूप खुशीत घरी आला. मनात म्हणत होता, ही पौर्णिमेची रात्र आयुष्यभर विसरणार नाही.
दुसऱ्या दिवशी सगळी कामे सोडून आईला घेऊन फोनवरून पत्ता विचारून तिच्या घरी गेला आणि सरळ सरळ लग्नाची मागणी घातली.
नेहाचे आई-बाबा चकित होऊन म्हणाले, काल पौर्णिमा होती. नदीवर गेला होता का? परत तिकडे फिरकू पण नका. आमच्या नेहाने 7 वर्षांपूर्वी आम्ही पसंत केलेल्या मुलाबरोबर लग्न करण्याऐवजी नदीत आत्महत्त्या केलीय. प्रत्येक पौर्णिमेला ती कोणाला ना कोणाला दिसते.
एवढे ऐकून राम त्याची आई लगबगीने घरी गेले. खूप प्रयत्न करून रामच्या डोळ्यापुढून तिचा चेहरा गेला. पण प्रत्येक पौर्णिमेची रात्र त्याच्यासाठी कधी संपेल असे होते.