एक नूर आदमी दस नूर कपडा
एक नूर आदमी दस नूर कपडा
"ऐक ना राज, सोनू च्या लग्नात मी कोणती साडी नेसू? '' चंदा ने इतक्या निरागसपणे विचारले आणि कपाट उघडून माझ्या कडे तिरप्या नजरेने पाहिले... आत्ता आत्ता असा प्रेमळ सूर, तिरपे कटाक्ष हे जणू इतिहास जमा झाले होते. मुन्ना च्या जन्मा नंतर हे असे प्रेम? नक्कीच माझ्या खिशावर डल्ला असणारे.
मी स्थितप्रज्ञता ढळू न देता म्हंटल "अरे हो! पुढच्या महिन्यात आहे नाही का लग्न? तू.. ती ही आपल्या लग्नातली बनारस सिल्क, नाहीतर ती आपली...!"
खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे पहात तिने कपाटातील साड्यांची चळत दाखवून म्हटले... बघ एक तरी साडी ढंगात आहे का? स्वतःच्या लग्नातली साडी कोणी दुसर्याच्या लग्नात नेसत का?, ही ditto ताई सारखी आहे आम्ही दोघी bandwale दिसू! ही पण मुन्ना च्या बारशाला नेसून झाली. मम्मी ने दिलेली काळी चंद्रकला नेसू? पण तुझ्या आईला आधीच माझ्या पेहरावात प्रॉब्लेम त्यात मी अपशकुनी काळी नेसली तर उगाच बडबड करतील. सांग ना राज काय करू? "
'' डार्लिंग आज मुन्ना तुझ्या मम्मी कडे गेलाय आपण दोघेच घरत आहोत तू हे साड्या साड्या काय करत बसलीये. नेसून कोणाला मलाच दाखविणार ना? मला कोणत्याही कपड्यात तू छान दिसतेस. कम ऑन..! ''
झालं क्षणार्धात डोळे भरून आले, आणि आदळआपट सुरू झाली. आम्ही मेल राबराब राबायचे पण माणसासारखी मेली एक साडी काय मागितली जणू जहागीर मागितली. त्या कुंदा कडे पहा तिने मागायची पण गरजच नाही. प्रत्येक वेळी नवीन... कपडा, साडी म्हणु नका, ड्रेस म्हणु नका, त्या प्रधान भाऊजी कडे पहा बायकोला चक्क मिनी स्कर्ट घेऊन आले (आता प्रधान चि मृणाल कित्ती figure maintained आहे तिला तो स्कर्ट शोभेल हे म्हटले तर आमच्याकडे तिसरे महायुद्ध पेटेल
तिला गोडी गुलाबी मध्ये घेण्यासाठी मी आपला कपाटात घुसून म्हंटल... अग मी कुठे तुला नाही म्हटलं घे की नविन ती काय पेशवाई की पैठणी.. शेवटी काय राज ची चंदा लग्नात झळकली पाहिजे. मला आपलं वाटतं तुझ्या बर्याच साड्यांना हवा लागली नाही तर... ''
कळतात बर असली बोलणी आहेत कुठे सांग मला एवढ्या साड्या?.. 'आक्रमक होत तिने हात मागे घ्यायला आणि किमान पंचवीस साड्या माझ्या पायावर पडायला एक वेळ झाली. पण माघार घेतली तर ती चंदा कसली'
'हो हो आहेत मला थोड्या फार साड्या पण.. मला पापा नेहमी रिपीट कपडे घातले की ओरडत असत so.. मी त्याच त्याच साड्या नेसून तुझ्या नावाला बट्टा का म्हणून लावू. खरं ना राज? 'पुन्हा तिरप्या कटाक्षाने असे काही पाहिले की मागच्या मागे तिला माझ्याकडे ओढून घेत थेट तिच्या डोळ्यात पाहत म्हटले... "चंदा अग अख्खा राज तुझाच आहे. साडी काय चीज आहे. हे घे क्रेडिट कार्ड. जाऊ संध्याकाळी खरेदीला.. पण आत्ता मात्र मला ह्या मधाळ डोळ्यात एक डुबकी मारून घेऊ दे ''
'' तू पण ना राज.. अरे ह्या साड्यांचा ढीग आवरू दे मला."
बघितले ज्या कारणासाठी एवढा आकांत तांडव केला.. मला साड्या नाहीत... त्याचा आता मागमूसही नव्हता. एक नूर आदमी दस नूर कपडा. हेच खरं.