एक गोष्ट स्वप्नाची
एक गोष्ट स्वप्नाची


एक मध्यमवर्गीय कुटुंब
वेळ : संध्याकाळी ७-७:३०
टिव्हीवर एका प्रसिद्ध वाहिनीवर नृत्याचा कार्यक्रम चालू असतो
मुलगी : आई, हे किती छान नाचतात न ते टिव्हीतले.
आई (भाजी निवडत) : हो.
मुलगी : मी पण मोठी झाल्यावर तशीच होणार. पाहा मला पण नाचता येते. (ती टिव्हीवरचे पाहून नाचून दाखवते.)
आई : बाई, आपल्यासारख्या माणसाचे काम नाही हे. उगं काही बी स्वप्न पाहू नाही. ते पैसेवाले लोकांचं काम हाय.
भाऊ (मोबाईल खेळत) : हाहाहा. डान्सर बनायचे म्हणे. आली मोठी शहाणी. हाहा...
एक दोन दिवसांनी
वेळ : सकाळी ९:३०
वडिल ऑफिसात जायच्या घाईगडबडीत असतात.
मुलगी : बाबा, बाबा, ऐका ना.
वडिल : हा... लवकर बोल काय ते.
मुलगी : आमच्या शाळेत चित्रकलेची परीक्षा होणार आहे. Madam म्हणे तू त्यात भाग घे, तुला चित्र छान जमतात.
वडिल : ते काही नाही. रिकामे धंदे नुसते.
मुलगी : मी घेणार. मला घ्यायचंय. (रडत रडतच.)
वडिल : चित्रकलेची परीक्षा दिल्याने कोण नोकरी देणार आहे का तुला. सरळ उलट्या गोल तिरप्या रेष्या काढा न घाला दोन-चार रंग. त्यात काय नवल. गुपचाप अभ्यास कर. (रागातच)
काही वर्षांनंतर ...
रस्त्यावरून भंगारवाला जात असतो, "चलो भंगार दो, भंगार रद्दी लोहा लोखंड टिन टप्पर.. भंगारss"
आई : बेटा, ती जुनी रद्दी काढ बरं. खूप दिवसांची तशीच पडलीया. मागच्या वेळी भंगारवाला आला पण लक्षातच नाही राहीलं बाई माझ्या.
मुलगी : हो हो काढते.
मुलगी रद्दीचे गठ्ठे उचलून भंगारवाल्याच्या हातात देते.
मुलगी : कसा चालू आहे धंदा.
भंगारवाला - चांगला चालू आहे.
मुलगी : रद्दी व्यवस्थित मोज.
भंगारवाला : हो madam, आपण धंद्यात कधी खोटी (बेइमानी) नाही करत.
मुलगी : काही स्वप्नं होती माझी. विकायची होती. खूप जुनी झाली होती. घरात रद्दीसारखीच धुळखात पडली होती. पाहा घेतो का विकत. दोन-चार रु. कमी भावाने घे. नाहीतर फुकट पण घेतली तरी आपले काही म्हणणे नाही.
भंगारवाला : काय madam येडा समजलात का मले. स्वप्न विकत घेतं का कुणी. रद्दी होती २ किलो आणि हे घ्या त्याचे पैसे पकडा... घ्या...
तो पैसे हातात ठेवून निघून जातो. मुलगी घरात निघून जाते.
शेवटी एकच प्रश्न सतावतो धुळखात पडलेल्या स्वप्नांना (आवडी-निवडी, ईच्छा-आकांक्षा) या कुणी तरी विकत घेईल का. माणसांना मारल्यावर कारावास वा मृत्युदंड होतो पण स्वप्नांचा गळा घोटल्यावर, त्यांना जखमा केल्यावर काही शिक्षेची तरतूद कुठे तरी आहे का.