Neena Gaikwad

Romance Action

3  

Neena Gaikwad

Romance Action

द्वंद्व

द्वंद्व

21 mins
1.2K


                

          मंचावर संचालक आले . प्रास्ताविक झाल्यावर सर्व मान्यवर मंचावर स्थानापन्न झाले . शची मॅम पण आसनस्थ झाल्या . आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती त्याच होत्या . त्यांनी केलेल्या क्लोनींगवरच्या संशोधनामुळे अमेरिकेतपण नुकताच त्यांचा सत्कार झाला होता . त्याचाच एक भाग म्हणून आज इथे त्यांचा सत्कार होणार होता .

          काल जवळजवळ पाच वर्षांनी मी त्यांचा आवाज ऐकला . जेव्हा मी फोन कानाला लावला आणि त्यांचा आवाज ऐकला .... माझ्या काळजाचा ठोका चुकला . इतक्या वर्षांनीही त्यांचा नुसता आवाज ऐकून माझे शरीर शहारले . मी अडखळत म्हणालो ,'हलो ,sss '...

'कोण ,समीर ना ,मी डॉक्टर शची बोलतेय . ' पलीकडून मंजूळ तारा झंकारल्या गेल्या .

'हो ,हो, मी समीरच बोलतोय ... बोला ना मॅम .... 'मी सर्व बळ एकवटून म्हणालो .

            'अरे काय हे समीर ,सॉरी ,सॉरी ... डॉक्टर समीर ,अजूनही तू तसाच आहेस तर पूर्वीसारखा .... लाजरा ? बर मी अशा साठी फोन केला होता ,उद्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात माझा सत्कार आहे . माझी अशी इच्छा आहे की तू सुद्धा या कार्यक्रमाला हजर रहावेस ,'मॅम म्हणाल्या .

   'हो ,हो ,मॅम ,मी जरूर येईन आणि congratulations mam 'मी एवढे कसेबसे म्हणून फोन ठेवून दिला .

         इतक्या वर्षात मी जाणून बुजून मॅमशी संपर्क ठेवला नव्हता ,परंतु मॅम मला विसरल्या नाहीत . मनात चलबिचल सुरु झाली . कशा असतील शची मॅम ,अजूनही तशाच खूप सुंदर दिसत असतील का ?एक ना दोन खूप साऱ्या प्रश्नांची धुमःश्चक्री अंतरंगात सुरु झाली . हॉल मध्ये येउन माझ्या सीटवर बसे पर्यंत डोळे मॅम ना शोधत होते आणि आत्ता समोर मॅम दिसत होत्या .... तशाच सुंदर ,हसतमुख ,शांत ....

            स्वागत समारंभ झाल्यावर मॅम भाषणासाठी उभ्या राहिल्या . 'Hello everybody ,मी नुकत्याच केलेल्या क्लोनींग वरच्या एका संशोधनाचा पेपर अमेरिकेत पब्लीश्ड झाला व त्यासाठी आजचा हा समारंभ माझ्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेला आहे. त्या बद्दल मी त्यांचे आभार मानते . क्लोनींग बद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नसते ,तर आज आपण त्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया . मॅम समजावू लागल्या ,'क्लोनींग म्हणजे एकसारखा दिसणारा प्राणी वा वनस्पती बनवणे . म्हणजेच copies of same . क्लोनींगचा उच्चार करताना ओ ला लांबवले पाहिजे तर कलो ss निंग असा उच्चार होतो . हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे . '

            मी मॅम कडे बघत होतो ,त्यांचे शब्द कानावर पडत होते परंतु मेंदूपर्यंत घुसत नव्हते . पहाता पहाता मी आठ वर्ष कधी मागे गेलो मला समजले नाही . मला आठवतेय तो जुलैचा महिना होता . धो sss धो पाऊस कोसळत होता . डॉक्टर काळेनी सुचवल्या प्रमाणे मी जेनेटिक्स डिपार्टमेंट मध्ये डॉक्टर गोडबोलेंना भेटायला गेलो होतो . दिलेल्या वेळेवर पोहोचण्यासाठी मी जीवाचा आटापिटा केला होता . तिथेच मी डॉक्टर शची मॅमना प्रथम पहिले आणि पहिल्या नजरेनेच त्यांनी माझ्या हृदयाचा ताबा मिळवला . माझा Ph. D चा विषय होता ,Features of Inheritence .,आणि मॅम क्लोनींग मध्ये एक्सपर्ट होत्या . स्टेम सेल वर त्यांनी खास संशोधन करून वैदक जगताला अजून प्रगत करण्यात मोलाची भर घातली होती . डॉक्टर गोडबोलेना प्रकृती अस्वास्थामुळे मला गाईड करता येणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी मला शची मॅम कडे सुपूर्द केले . त्यामुळे रोजच मॅमशी भेट होत होती . मॅमचा स्वभाव हसतमुख होता . त्यात सौंदर्य व बुद्धिमत्तेचा सुंदर मिलाप याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शची मॅम होत्या .

             मला मॅम खूप आवडू लागल्या होत्या . मी हळू हळू मॅमकडे खेचला जात होतो . मला मॅम भेटल्या नाही तर माझी बैचेनी वाढत असे . मी त्यांच्या बरोबर बोललो नाही तर माझा दिवस खराब जात असे . मला कळत नव्हते हे मला काय होत आहे ते . पण काही तरी माझ्या आयुष्यात घडत होते हे निश्चित . दिवस रात्र मी फक्त मॅमचा विचार करायचो ,वेडा झालो होतो मी त्या दिवसात ..... एक दिवस आम्हाला कॉलेजमध्ये रिसर्चच्या कामामुळे खूपच उशीर झाला होता . बरोबरचे प्यून व दोन विद्यार्थी निघून गेले . मॅमची गाडी स्टार्ट होईना . इतक्या रात्री मॅम घरी एकट्या कशा जाणार म्हणून मी त्यांना म्हणालो ,'मॅम तुमची हरकत नसेल तर मी येऊ का तुम्हाला सोडायला ?'

 मॅम नी घड्याळाकडे पहिले ,उशीर तर झालाच होता . मॅम ने होकार दिला ,त्या म्हणाल्या ,'वेळ कसा गेला समजले नाही ,चल ,निघूया आपण .... '

            मी मनोमन खूष होऊन मॅमला बाईकवर बसवून घरी सोडायला गेलो . त्या दिवशी माझ्या विचारांचा वारू जणू बेभान सुटला होता . ग्रेट फिलिंग येत होते. माझी अतिशय आवडती व्यक्ती माझ्या सोबत होती . वाटत होते हा प्रवास असाच चालू रहावा ,कधी संपूच नये . परंतु ... मॅमचे घर आले आणि माझ्या स्वप्नाळू विचारांना माझ्या पासून दूर जावे लागले .

 'thank you ,समीर ,'मॅम म्हणाल्या .

'इट्स माय प्लेजर मॅम ',म्हणत मी मॅम कडे एक कटाक्ष टाकला .

'ओके ,चल खूप उशीर झालाय ,जा पटकन ,घरी वाट बघत असतील तुझी . and drive safely ,' मॅम ने म्हणत माझ्या हातावर थोपटले व त्या निघून गेल्या . बराच वेळ मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो . त्या दिसेनाशा झाल्यावर मी भानावर आलो . हळुवारपणे मी माझ्या हातावरून हात फिरवला व खूष होऊन बाईक स्टार्ट केली .

          मॅमच्या सहवासात दिवस फुलपाखरासारखे रंगीबेरंगी होऊन जात होते . मॅमचं माझ्या आयुष्यात असणे मला सुखावत होते . परंतु माझ्या मनातले भाव मॅमला कळले तर ... याची सतत भीती वाटत राहायची . त्या जर रागवल्या ,मला दूर लोटले तर मी कोलमडून जाईन . नाही .... नाही मला मॅमला गमावून चालणार नाही .शची sss माझीच आहे ,फक्त माझी sss माझे अंतरमन म्हणाले आणि मी दचकलो . मी मॅम वरून शची वर आलो होतो . नाही ... नाही असे झाले तर घोटाळा होईल . माझ्या भावना सध्या तरी शची मॅमला कळता कामा नये ,मी मनाला समजावले .

         माझ्या या मनःस्थितीमुळे कधी कधी मी मॅमकडे बघायचे टाळू लागलो . मला भीती वाटत असे की माझ्या डोळ्यात मॅमला जर प्रेम दिसले तर कदाचित ते मॅमला नाही आवडणार .... दोन दिवस मी लायब्ररीत बसून नोट्स काढायचे काम केले परंतु मॅमला भेटलो नाही . माझे हृदय आक्रंदत होते मॅमला भेटण्यासाठी ;पण मेंदू सांगत होता स्वतःवर ताबा ठेवायला शिक . या द्वंद्वमध्ये दोन दिवस निघून गेले . तिसऱ्या दिवशी मी नोट्स दाखवायला डिपार्टमेंट मध्ये गेलो तेव्हा समजले मॅम अचानक रजेवर गेल्या आहेत . मी हिरमुसला होऊन परत आलो . त्या दिवशी मला खूप बचैन वाटत होते. शेवटी दुसऱ्या दिवशी मी हिम्मत करून मॅमना फोन केला .

'मॅम कशा आहात तुम्ही ?अचानक रजा घेतलीत ,सगळे ठीक आहे ना ?'मी एका दमात बोलून मोकळा झालो .

'हो ,हो ,समीर सगळे ठीक आहे . अचानक काही काम निघाले ,माझ्या रजा पण खूप शिल्लक होत्या म्हणून रजा घेतली . दोन दिवसांनी मी येते आहे . तू कसा काय फोन केला होतास ?'मॅम म्हणाल्या .

'मॅम आपण चर्चा केल्याप्रमाणे मी काही नोट्स तयार केल्या होत्या त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या . बरोबर आहेत कि नाहीत की काही सुधारणा कराव्या लागतील ते पहायचे होते . शिवाय त्या पेशंट नंबर १च्या somatic cells चे कल्चर केले होते ,त्याचे पण रिझल्ट्स नोट डाऊन केले आहेत ते दाखवायचे होते. 'मी म्हणालो ......

'ओ हो sss ते तर महत्वाचे आहे . तू असे कर ते रिझल्ट्स व नोट्स घेऊन घरी ये . मी बघून घेते एकदा म्हणजे तुझे काम नको खोळंबून रहायला ,'मॅम ने असे म्हणताच माझा चेहरा खुलला .

'ठीक आहे मॅम ,मी लगेच येतो ,'मी जवळ जवळ उडी मारतच म्हंटले व लगेच मॅम कडे गेलो .

               उतावीळपणे मी दारावरची बेल दाबली . दार मॅमनेच उघडले . 'ये ,ये ,बस ... थांब ह पाणी देते ,'म्हणत मॅम आत गेल्या . त्यांच्या सारखेच त्यांचे घर ही खूप छान होते. सगळ्या वस्तू विचारपूर्वक घेऊन व्यवस्थित मांडणी करून ठेवल्या होत्या . यावरून मॅम चा चोखंदळपणा लक्षात येत होता . इतक्यात मॅम पाणी व थंडगार पन्हं घेऊन बाहेर आल्या . मी आणलेल्या नोट्स व कल्चरचे रिपोर्ट्स त्या मन लाऊन वाचू लागल्या व मी पन्ह्याचे घुटके घेत पुन्हा मॅम चे व त्यांच्या कलासक्त अभिरुचीचे निरीक्षण करण्यात मग्न झालो . इतक्यात मॅमनी मला हाक मारल्यामुळे माझी समाधी भंग पावली .

  त्या म्हणाल्या ,'समीर नोट्स अगदी परफेक्ट आहेत . कल्चरचे रिझल्टस पण अचूक आहेत . आता पुढची स्टेप ... आता Somatic cell चा न्युक्लिअस आपण या दुसऱ्या अंड्यात घालू ज्याचा न्युक्लिअस आपण काढून घेतला आहे . आणि नंतर पुढची रीडिंग नोट डाऊन करून घे ,'

मी मानेनेच होकार दिला . चला समीर आता उठायला हवे मी मनाला इशारा दिला . इतक्यात मॅम म्हणाल्या ,'थांब ह मी आलेच .'असे म्हणत त्या परत आत गेल्या . मी माझ्या विचारात हरवून गेलो होतो इतक्यात त्यांच्या आवाजाने मी चक्रावलो .

त्या मोठ्याने म्हणाल्या ,'डार्लिंग जरा इकडे येतोस का ????' मी धडधडत्या अन्तःकरणाने उठायचा प्रयत्न करतच होतो तोच दुसरा आवाज कानावर आदळला ,'येस हनी कमिंग !!!'

हनी sss ??? हा मी तर नव्हतो ,मग कोण माझ्या शचीला हनी म्हणू शकतो ? मी अर्धवट उठलेला जोरात सोफ्यात कोसळलो . राग ,चिडचिड ,उत्सुकता संमिश्र भावनांनी माझ्या मनाची घालमेल होत होती . मी अस्वस्थपणे चुळबूळ करत होतो पण उठून आत डोकावण्याचे धाडस माझ्यात नव्हते . इतक्यात मॅम हातात ट्रे घेऊन बाहेर आल्या . मागोमाग एक देखण्या व्यक्तिमत्वाचा माणूस पण हजर झाला . मॅम ने ट्रे खाली ठेवत त्या अनाहूत माणसाकडे पहिले . गोड हसत त्या म्हणाल्या ,'राज ,हा समीर माझा Ph. D चा विद्यार्थी आणि समीर हा राज माझा beloved नवरा .... '

नवरा ??? माझ्या डोक्यात घण पडला . मी स्वतःला सावरत त्यांच्याशी हस्तांदोलन केले . खळकन माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला . मी बधिर झालो होतो ,त्यांचा आवाज माझ्या कानी पडत होता ,पण मला काही समजत नव्हते .

             जवळ जवळ दिड वर्ष नव्हे तर ५५० दिवस मी शची मॅम च्या प्रेमात होतो . Ph. D पूर्ण झाल्यावर मी त्यांच्या समोर माझ्या प्रेमाची कबुली देणार होतो . परंतु त्या आधीच जणू माझ्या प्रेमाची शवयात्रा निघाली होती . मी खूप अस्वस्थ झालो होतो . मला मॅम व त्यांच्या नवऱ्यासमोर बसवत नव्हते . मी काही तरी बहाणा करून तिथून सटकलो . बाईकवरून वेड्यासारखा रस्ता मिळेल तिकडे भटकत राहिलो क़ेव्हा सी -फेसला येउन पोहोचलो समजले नाही . विमनस्क मनःस्थितीत मी कठड्यावर जाऊन बसलो . विचारांचे महायुद्ध मनात चालू होते. माझी शची क्षणार्धात माझी राहिली नव्हती . वेडेपिसे मन आक्रंदत होते. बऱ्याच वेळाने थोडे मन स्थिरावले . माझी शची ,माझी शची हा जप चालू होता मनात .... वीज चमकावी तसा मी चमकलो . माझी शची ? पण

कशावरून माझ्या प्रेमाला शचीनेही प्रतिसाद दिला असता ?हा तर निव्वळ माझ्या मनाचा खेळ होता ना ,मीच पक्के ठरवले होते की शची माझी आहे . परंतु मी तिच्या बाजूने विचारच केला नव्हता . बस .... तिचे वागणे ,बोलणे ,हसणे ,सुंदरता .विद्वत्ता याने मी भारावून गेलो होतो . यात मी हे विसरलो की शची मॅम माझ्या गुरु आहेत . माझ्याहून वयाने मोठ्या आहेत ,प्रगल्भ स्त्री आहेत आणि आता तर हेही समजले की त्या विवाहित आहेत . वास्तविक त्या विवाहित असू शकतात ;त्या सुखी सहजीवन अनुभवत असतील हे माझ्या मनात कधीच आले नाही . मला त्या आवडल्या नी मी त्यांच्या प्रेमात पडलो .

 'अचपल मन माझे नावरे आवरिता ' असेच काहीसे माझे झाले होते. बराच वेळ माझे माझ्या विचारांशी द्वंद्व चालू होते.

             शेवटी उध्वस्थ मनाने नी थिजलेल्या चेहऱ्याने ,एखाद्या हरलेल्या वीरासारखा मी घरी परतलो .

'आज उशीर झाला ,जेवायला वाढू ना रे sss ,'आईच्या प्रश्नांना काहीही उत्तर न देता मी बेडरूमचा दरवाजा धाडकन लावून घेऊन बेडवर अंग सोडून दिले . रात्रभर मी झोपू शकलो नाही . माझ्या खचलेल्या मनाची तीव्रता इतकी भयंकर होती की वाटत होते जणू आयुष्यच संपले आहे . सगळे सगळे ढासळून गेले आहे . मला नेहमी वाटत असे ,शची मॅमशी बोलत रहावे ,त्यांच्याकडे नुसते पहात रहावे ,त्यांच्या हातात हात गुंफून नुकत्याच पावसाचा शिडकावा झाल्याने ,ओल्या मातीच्या सुगंधाने धुंद झालेल्या लांबच लांब वाटेवरून चालत रहावे ..... माझ्या मनाने पूर्ण हमी भरली होती की शची माझीच आहे . मला वाटले होते मावळत्या सूर्याला साक्ष ठेऊन मी शचीला सांगेन ,'तू फक्त माझी आहेस ,मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही . ' मी माझ्या प्रेमाची कबुली देईन . ती माझ्या प्रेमाचा अव्हेर नाही करणार ,उलट लाजून चूर होऊन ती माझा हात सोडून पळून जाईल . मावळत्या सूर्याचा लालीमा तिच्या चेहऱ्यावर फुललेला पाहून मी तिला माझ्या बाहुपाशात अडकवून टाकेन .

हळूच स्वतःला सोडवण्याचा लटका प्रयत्न करत शची म्हणेल ,'हो समीर मी तुझीच आहे . मला ही तू खूप खूप आवडतोस ,'.....

बस sss .... हेच ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले होते .

            मोबाईलच्या रिंग ने मी दचकलो . पाहतो तो काय माझे हात खाली होते. आजूबाजूलाही शची दिसत नव्हती . ओ ... हो ... म्हणजे हा भास होता तर .... हे स्वप्न होते ज्याला मी अनुभवत होतो . परंतु हे जे काही होते ते हवे हवेसे होते . या सुंदर अनुभवातून बाहेर काढणाऱ्या त्या मोबाईलचा मला भयंकर राग आला . न बघतच मी फोन कट करून टाकला . स्वप्न भंगाचे दुःख खोलवर रुतलेले होते आणि त्यातच माझा मेंदू मला सत्याच्या आरशात डोकावायला सांगत होता . माझे चुकार मन मेंदूशी असहकार करू इच्छित होते. परंतु मेंदूने ग्वाही दिली होती की असे काहीही घडणार नाही ,घडणारही नव्हते .... मला माझाच राग येत होता .....

दुसऱ्या दिवशी आईच्याही लक्षात आले की काही तरी बिनसले आहे . त्यामुळे तिनेही गप्प राहणे पसंत केले असावे . कॉलेजवर जायचा मूड नव्हता ,दिवसभर स्वतःला   खोलीत कोंडून घेतले . घरातही कशातच मन लागत नव्हते . दुसऱ्या दिवशी मात्र जेवून कॉलेजवर गेलो . कामात लक्ष लागत नव्हते . इतक्यात शची मॅम lab मध्ये आल्या ,'काय समीर ,कुठवर आलय काम ?'म्हणत त्या माझ्या शेजारी येउन बसल्या . पुन्हा माझं शरीर शहारलं . यापूर्वी त्या अशा शेजारी बसल्या की कोण आनंद व्हायचा . स्लाईड बनवताना ,मायक्रोस्कोप खाली बघताना कधी हळुवार स्पर्श झाला की मी सुखावून जायचो . पण आता सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या ......

'समीर ,कुठे हरवलास ,काय झाले ? काय रिझल्ट्स मिळाले आहेत ? cell division सुरु झाले आहे का ,ते पाहिलेस ना .... आधीच्या स्याम्पलचे रिझल्ट्स नोट डाऊन केलेस ना ?' मॅम बोलत होत्या पण माझे मन थाऱ्यावर नव्हते . अर्धवट शब्द कानावर पडत होते ,पण मेंदू पर्यंत पोहोचत नव्हते . मॅम उठल्या ,माझ्या खांद्यावर हात ठेऊन त्यांनी आस्थेने विचारले ,' समीर आर यू ओके ?'

त्याच क्षणी वाटले मॅमला मिठी मारून खूप रडावे . सांगावे माझ्या प्रेमाचा खुलण्या आधीच अंत झाला आहे . पण मी स्वतःला सावरले . माझ्या शरीरातील कंपन मॅमला जाणवले असावे . मॅम ने माझा खांदा हळूच दाबून मला थोपटले .

   ' रिल्याक्स समीर ,शांत हो .' एवढे बोलून त्या निघून गेल्या .

मी हताश मानाने त्यांना जाताना पहात राहिलो . 

                मॅम अतिशय विद्वान होत्या . त्यांच्या अफाट विद्वत्तेच्या जोरावर त्या लहान वयात रिसर्च गाईड झाल्या होत्या . मला वाटते माझ्या पेक्षा फार तर दहा बारा वर्षे त्या मोठ्या असाव्यात . पण त्या तशा वाटायच्या नाहीत . त्यांचे बोलके डोळे त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालायचे . मला त्यांच्या शिवाय काहीही सुचत नव्हते . मेंदूला कळत होते पण मन मानायला तयार नव्हते . शची ने माझ्या मनाचा पूर्णपणे ताबा घेतला होता . ती मला कधीच मिळणार नाही ,माझा मेंदू मला सांगत होता ;पण बिचारे मन याच मृगजळाच्या मागे लागले होते . सतत मन तिचाच पाठलाग करत होते. हे द्वंद्व कधी व कसे संपणार मला काहीही समजत नव्हते . माझ्या हृदयाच्या कोर्टातला हा प्रेमाचा दावा होता ,जिथे आरोपी मीच ,साक्षीदार ही मीच व जजपण मीच होतो . मनाप्रमाणे निकाल लागणे अशक्य होते पण .... माझ्या मनातले भाव कुणालाही कळू नयेत याची सतत मला धडपड करावी लागत होती . ही तारेवरची कसरत करता करता मी थकून जात असे . कसे तरी पुढचे वर्ष माझे रिसर्च करता करता संपले . Synopsis ,viva पूर्ण होऊन एकदाची Ph . D ची डिग्री माझ्या हातात पडली .

                   'अभिनंदन डॉक्टर समीर ,' मॅम ने हस्तांदोलन करत म्हंटले . त्याही क्षणी वाटले हा हात असाच हातात कायम रहावा ;कधी सोडूच नये . मी अगतिकतेने मॅमकडे पहिले . मॅम ने माझ्या हातावर थोपटत स्वतःचा हात सोडवून घेतला .

त्या म्हणाल्या ,'cheer up .... समीर ,आज तुझी डिग्री मिळाली आहे ;तेव्हा आता पार्टी व्हायला पाहिजे ह !'

हो ssss हो sss ,नक्की ,परवा रविवारीच पार्टी करूयात . मी कळवतो कुठे व किती वाजता ते ,' एवढे बोलून मी तिथून पळ काढला .

                 कॉलेज पासून जवळच एक गार्डन रेस्टोरंट होते. तिथे रविवारी संध्याकाळी ७ वाजता मी पार्टी ठेवली . माझे खास दोस्त ,प्रोफेसर्स ,माझ्या शची मॅम अशा निवडक लोकांना मी आमंत्रित केले होते. ठरल्या प्रमाणे सर्व मंडळी जमली होती . बस ... शची मॅम यायच्या होत्या . माझे लक्ष पुन्हा पुन्हा गेटकडे जात होते. इतक्यात माझे डोळे चमकले .... हो ... कारण माझी शची काळ्या सिल्क साडीमध्ये समोरून येत होती . इतकी अप्रतिम दिसत होती शची ,जणू स्वर्गलोकीची अप्सरा अवतरली आहे असे वाटत होते. मी भान हरपून पहातच राहिलो .... आणि तो समोर आला व मी भानावर आलो . राजने शचीचा हात हातात घेऊन माझ्याच दिशेने पावले टाकायला सुरुवात केली . भयंकर राग आला होता मला राजचा ,पण मी स्वतःला सावरले .

'हाय समीर ,अभिनंदन !'राजने माझ्याशी हस्तांदोलन करत म्हंटले .

'ओहो sss ,धन्यवाद सर ,बरे झाले तुम्ही पण आलात ... ' मी कसनुसं हसत म्हणालो .

'अरे तुझी पार्टी आणि मी एकटीच कशी येणार ? राजला पण सवड होती ,म्हणून त्यालाही घेऊन आले ,' असे शची म्हणत असतानाच राजने तिला आपल्या जवळ घेत प्रेमाने तिच्याकडे पाहिले . मॅम ने ही हसत हसत राजचा हात हातात घेतला . हे असे माझ्या प्रेमाचे तीन तेरा वाजताना पाहून माझे मन मात्र घायाळ होत होते.

                 माझ्या भावनांची कदर इथे कोणालाच नव्हती . सगळे माझ्या प्रीतीचे दुश्मन आहेत असेच मला वाटत होते. इतक्यात तिथे डॉक्टर नारायणन आले . मी माझ्या चेहऱ्यावर हसू आणत त्यांचे स्वागत केले . मला ज्या रिसर्च सेंटर मधून जॉब ऑफर झाला होता तिथले हे C.E.O. होते. अगत्याने मी त्यांना आत घेऊन आलो व त्यांची ओळख करून दिली .

डॉक्टर नारायणन शची मॅमला म्हणाले ,' गूड जॉब मॅम ,तुम्ही तराशलेला हिरा आता आम्ही मिळवला आहे . तुमचेही अभिनदन मॅम .'

शची मॅमने हसून माझ्याकडे पहिले व 'वेल डन 'म्हणाल्या .

हास्य ,विनोद ,जेनेटिक्सवर थोडी फार चर्चा असे करत पार्टी संपली व सर्व आपापल्या घरी परतले .

माझ्या आयुष्यातला पहिला अध्याय संपून दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली . नवीन जॉब ,नवीनं माणसे ,नवीन दिनचर्या .... पण यात कुठेही शची नव्हती . अर्थात असणार पण नव्हती . माझ्या वेड्या मानाने केलेले हे एकतर्फी प्रेम होते हे .... जाणीवपूर्वक ,अथक प्रयत्नाने मला या पासून दूर व्हायचे होते. नव्हे व्हावेच लागणार होते. दिवसामागून दिवस जात होते. या जॉब मध्ये मी स्वतःला गुंतवून घेतले होते. जवळ जवळ वर्ष कधी संपले ते समजले नाही . हळू हळू मी माझ्या कामात रुळू लागलो होतो . मात्र आईचा तगादा आताशा जोम धरू लागला होता .

'अरे ,Ph.D झाली ,चांगला जॉब आहे ,आता तरी लग्नाला होकार दे . इतके दिवस मी त्या देशमुखांना सांगत होते Ph.D झाल्याशिवाय समीर लग्नाला तयार नाही म्हणून . आता त्यालाही वर्ष उलटून गेले . '

मी हे ऐकून ऐकून वैतागलो होतो . मी काहीच प्रतिक्रिया देत नाही म्हंटल्यावर आईचा सूर आणखी वाढला ,'अरे ,काय म्हणतेय मी sss ? देशमुखांची राधा मला खूप आवडली आहे . नक्षत्रासारखी सुंदर आहे . नुकतीच M.Sc झाली आहे .'......... आईची अखंड बडबड चालू राही .

'ऐकतोयस ना ... काय सांगू मग त्यांना ... कधी जाऊयात मुलगी पहायला ?' आई थांबायचे नाव घेत नव्हती .

'काय घाई आहे ग ? उगाच रोज रोज माझं डोकं खाऊ नको ... मला नाही लग्न करायचे .... ' मी वैतागून अक्षरशः फुत्कारलो .

'अरे व्वा sss लग्न नाही करायचे तर काय असाच रहाणार आहेस का ? ते काही नाही ,येत्या रविवारी आम्ही येत आहोत असा निरोप धाडतेय मी . तेव्हा काहीही सबब न सांगता आमच्या बरोबर तुला यायचे आहे हे लक्षात ठेव .'आईने फर्मान सोडले .

                  मला हे मुलगी बघणे वगैरे आवडत नव्हते . शिवाय शची अजूनही माझ्या मनात कुठे तरी दडलेलीच होती . परंतु आई बाबांच्या पुढे नतमस्तक होऊन शेवटी मुसक्या बांधून नेतात तसे त्यांच्या बरोबर मी देशमुखांकडे ठरल्या वेळेला पोहोचलो . दोन्ही कडची मंडळी मुळातच एकमेकांवर खूष होती . हि फक्त एक औपचारिकता होती .

घरी आल्यावर बाबांनी विचारले ,'काय मग समीर ,कशी वाटली मुलगी ? आम्हाला तर मुलगी व घराणे दोन्ही पसंत आहे . तुझे मत सांग म्हणजे पुढची बोलणी करू व बार उडवून देऊ .'

'काय हे बाबा आता तुम्हीही आई सारखे बोलायला लागलात .' मी नाराजीने म्हणालो .

'असं नाही बाळा ,आता लग्नाचे वय आहे ,तेव्हा वेळच्या वेळी गोष्टी झालेल्या बऱ्या असतात . शिवाय तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस . तुला एकदा संसारात रमलेला पाहिला की आम्हालाही समाधान वाटेल . तू तुझा वेळ घे हवे तर विचार करायला पण लवकरात लवकर सांग हो .... 'असे म्हणून बाबा झोपायला गेले .

               दोन तीन दिवस शांततेत गेले . पुन्हा आईने जेवताना विषय काढला ....

'समीर ,देशमुखांना कळवायला हवे . होकार कळवू या ना त्यांना ?'आईने अधीरतेने विचारले .

मला समजत नव्हते मी काय करू ते . माझे पहिले प्रेम शची होती ,जी मला कधीच मिळणार नव्हती . शेवटी मी मानेनेच होकार दिला . आई बाबा खूष झाले व यथावकाश मी एकदाचा बोहल्यावर चढलो .

                  राधा खरच चांगली मुलगी होती . सुंदर ,लाघवी ,मनमिळावू ,सगळ्यांना आपलेसे केले होते तिने . मात्र मी अजूनही थोडा तुटकच वागत होतो तिच्याशी . माझ्या प्रत्येक इच्छेचा ती मन ठेवत होती ,परंतु मीच राधाला मनापासून स्वीकारू शकत नव्हतो . आत कुठे तरी शचीचा विचार मला राधाला पूर्णपणे स्वीकारण्याच्या आड येत होता . राधा खरच खूप समजुतदार होती ,त्यामुळे वरवर पाहता आमचा संसार सुरळीत चालला होता .

             सुरुवातीला राधाचं दिसण ,हसणं ,वागणं सगळं मी शचीच्या बरोबर तुलना करून बघायचो . प्रत्येक वेळी शची वरचढ ठरायची नी मग मी राधाचा हातात घेतलेला हात सोडून पटकन तिथून उठून निघून जायचो .

राधा कावरीबावरी व्हायची ,'माझं काही चुकले का ?' म्हणून विचारायची .

काय सांगणार होतो मी तिला . काळ हेच औषध असते ,त्याप्रमाणे हळू हळू आमचा संसार सुरळीत चालू झाला . राधाच्या येण्याने माझे आई बाबा खूष होते. मीही नोकरी व संसारात रुळू लागलो . मागच्या तारुण्यसुलभ झालेल्या चुकांचा मला विसर पडत गेला ... आणि अचानक काल शची मॅमचा फोन आला आणि पुन्हा माझी अस्वस्थता वाढली .

               इतक्यात टाळ्यांच्या कडकडाटाने माझी विचार शृंखला तुटली व मी चमकून आजूबाजूला पाहिले . सर्व टाळ्या वाजवून मॅमचे अभिनंदन करत होते. मॅमचे भाषण संपून त्यांचा सत्कार समारंभही पार पडला होता . मला लाजल्यासारखे वाटले . मी भाषण ऐकायला आलो होतो आणि भूतकाळात कधी रमलो हे मलाही कळले नाही . कार्यक्रम संपल्यावर मी शची मॅमला भेटायला गेलो . मॅम मला बघून खूप आनंदित झाल्या .

'समीर ,हाऊ आर यू ?' म्हणत त्यांनी हस्तांदोलन केले .

'I am fine mam ,& glad to see you ..... खूप वर्षांनी आपण भेटतो आहोत ,' म्हणत मी हस्तांदोलनाचा स्वीकार केला ,पण या वेळी माझ्या हातांना कंप नव्हता . मी मॅमचा हात धरून ठेवला नव्हता तर हात सोडून मी शांतपणे मॅमकडे पहात बोलत होतो . हसत होतो . राज बरोबरही बोलताना मला कुठेही कडवटपणा जाणवत नव्हता . मॅमनी माझ्याकडे पाहून सुंदरसे स्मित केले .

त्या म्हणाल्या ,' गुड समीर ,वादळ शमलय तर !'

'वादळ ? म्हणजे मॅम ?' मी चाचरत विचारले .

'चाल जाता जाता बोलू या ,'असं म्हणत शची मॅमने सर्वांचा निरोप घेतला व आम्ही पार्किंगकडे वळलो . मॅमने त्यांच्या ड्रायव्हरला काही तरी सांगितले व त्या व राज माझ्या गाडीत येऊन बसले .


   'हं तर समीर बरे वाटले तुझ्यातले वादळ शमलेले पाहून ,नाही तर तुझ्या त्या घालमेलीचा मलाही त्रास होत होता .' मॅम बोलल्या . मॅमचे हे वाक्य ऐकून मी गारच पडलो . इतका आटापिटा करूनही मॅमला माझे मन कसे समजले ते मला कळत नव्हते . मी दचकून करकचून ब्रेक दाबला .

'हळू हळू समीर ,टेक इट इझीली ,' राज म्हणाला .

म्हणजे राजला पण ठाऊक होते ? माझी मलाच खूप लाज वाटली .

'एक काम करू या ,आपण त्या समोरच्या हॉटेल मध्ये बसून कॉफी घेत घेत गप्पा मारूयात . चालेल ना समीर ?' मॅम म्हणाल्या .

मी अजून या धक्क्यातून बाहेर पडू शकलो नव्हतो . यंत्रवत मी गाडी पार्किंग मधे लावली व खाली उतरलो . कोपऱ्यातले टेबल पाहून आम्ही कॉफी व स्यान्डवीचची ऑर्डर देऊन बसलो . मला गप्प बसलेले पाहून शची मॅम ना राहवले नाही .

त्या म्हणाल्या ,'समीर वाईट वाटून घेऊ नकोस . अरे मी तुझी गुरु आहे . आपल्या विद्यार्थ्याच्या मनात काय चालले आहे हे गुरु म्हणून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक स्त्री म्हणून माझ्या लक्षात आले होते. '

मॅमना अडवत मी मधेच म्हणालो ,'मग मॅम .तुम्ही तेव्हाच मला ओरडला नाहीत किंवा मला धिक्कारले सुद्धा नाहीत ….'

' हो समीर ,मला हे कळून सुद्धा मी तुला काहीही बोलले नाही ,कारण मी जर बोलले असते तर कदाचित तू Ph.D अर्धवट सोडली असतीस मॅम म्हणाल्या ,आणि एकदा का त्यातला इंटरेस्ट गेला कि पुन्हा तुझ्या हातून Ph.D पूर्ण झाली असती कि नाही अशी शंका शचीच्या मनात आली होती .' राज म्हणाला .

'आठवते का तुला ,मी एकदा तुला माझ्या घरी बोलावले होते. तेव्हा राजला बाहेर जायचे होते . परंतु तुझी भेट व्हावी म्हणून मी त्याला थांबवून ठेवले होते. त्या नंतर तुला या सगळ्याचा धक्का बसला होता . तू रडकुंडीला आला होतास ,मला कळत होते ते परंतु तुला सत्त्याला सामोरे नेणे गरजेचे होते . मला खात्री होती एक दिवस तू या परिस्थितीतून सहीसलामत बाहेर येशील .'

मी पुन्हा मधेच म्हणालो ,'पण मॅम तुम्हाला माझा राग नाही आला का ? आणि सर ,तुम्हाला तर मला दोन सणसणीत ठेवून द्याव्याशा नाही वाटल्या का ?'

' नाही समीर ,जेव्हा मला शचीने याबद्दल सांगितले तेव्हा मीही यावर विचार केला . पहिली गोष्ट माझी शची आहेच इतकी चांगली की कुणीही तिच्या प्रेमात पडावे . विनोदाचा भाग जाऊ दे ,पण हे तुला वाटणारे तारुण्यसुलभ आकर्षण होते. शची तुझी गुरु होती ,तुझ्या पेक्षा वयाने बरीच मोठी होती . तरीही तू तिच्याकडे आकर्षित झाला होतास . इथे तुला ओरडून किंवा तुझ्यावर चिडून काहीच साध्य झाले नसते ,' राज म्हणाला .

यावर शची मॅम म्हणाल्या ,' म्हणून आम्ही दोघांनी तुझ्या समोर यायचे व आमचे सहजीवन तुझ्या निदर्शनास आणून द्यायचे ठरवले . म्हणून मी राजला घेऊन तुझ्या समोर येत होते. तुला राजचा राग येत होता हे कळत असून सुद्धा …'

' शची मॅम ,सॉरी ... सॉरी सर , खरच माझ्या हातून चूक झाली . तुम्ही मला किंवा माझ्या प्रेमाला कधीही स्वीकारणार नाही हे मला कळत होते. पण माझे वेडे मन मानायला तयार नव्हते . तुम्ही होतात म्हणून माझी Ph.D पूर्ण झाली . Thank you .... thank you ... very much ,'मी थरथरत्या आवाजात म्हणालो ....

                म्हणूनच आम्ही तुझ्या या अस्थिर मनाबद्दल जाणतो हे तुला कळू दिले नाही व तुझी डिग्री तुला मिळावी यासाठी तुझ्याकडून सर्व ते प्रयत्न

करवून घेतले , मॅम म्हणाल्या .

'तरुण वयात असे कधी कधी घडते ,एखादी व्यक्ती मनाला भावून जाते . या वयात मुले सर्व बाजूने विचार करत नाहीत आणि मग चुकीच्या दिशेने वाहवत जातात . हा मनुष्य स्वभाव आहे . एखादी गोष्ट करू नको म्हंटले की मन तेच करण्यासाठी ओढ घेते ,'मॅम सांगत होत्या . ऐकत रहावेसे वाटत होते.

' खरंच तुम्ही मला खूप सांभाळून घेतलेत . तुम्ही दोघेही ग्रेट आहात ,'मी कबूली दिली .

' नाही रे ग्रेट वगैरे काही नाही ,चुकलेल्या वासराला आम्ही फक्त वाट दाखवली .बर ते जाऊ दे ,लग्न केलेस की नाही ?' मॅम ने उत्सुकतेने विचारले .

'हो , केले ना ,राधा ..... माझी बायको .... तुम्हाला भेटून खूप खूष होईल ती . कधी याल माझ्याकडे .... ' मी दोघांकडे पाहत विचारले .

'मी परवा यू . एस . ला चाललोय ,कॉन्फरन्ससाठी . तिथून मी आठवड्याभरात परत येईन . मग आपण नक्की तुझ्या घरी येण्याचा कार्यक्रम ठरवू या ,' राज म्हणाला .' ओ के सर ,नक्की भेटू या आपण तेंव्हा ,' मी समाधानाने बोललो .

आम्ही हॉटेल मधून बाहेर आलो . राज ने केव्हा ड्रायव्हरला बोलावून घेतले होते ,माझ्या लक्षात नाही आले . मॅम व सर गाडीत बसून निघून गेले . मीही शिळ वाजवत माझी गाडी चालू केली . घरी पोहोचलो ते आंतरिक समाधानानेच .

               बेडरूम मधे राधा फ्लॉवर पॉटमध्ये ताजी फुले सजवीत होती . मी पटकन राधाला उचलून घेऊन गोल गोल फिरवू लागलो ,' राधा sss राधा sss ,मी आज खूप खूष आहे .'

'अरे हो ss हो sss स ss मीर ,मला खाली ठेव ... सामी sss र .... ' राधा ओरडत होती .

मी अलगद राधाला खाली ठेवून तिच्याकडे पहात राहिलो . आज मला राधा खूप सुंदर दिसत होती . तिचा नितळ ,सुंदर चेहरा मला आकर्षित करत होता . खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिच्या भुरू भुरू उडणाऱ्या बटा तिच्या चेहऱ्याशी आगळीक करत होत्या . ते पाहून मला त्यांचा मत्सर वाटत होता . मी पटकन राधाला माझ्या जवळ घेतले व त्या आगावू बटांना मी मागे सारू लागलो . तिच्या मऊ रेशमी केसांमधून माझी बोटं फिरू लागली . तिच्या सुंदर डोळ्यात बघता बघता मी हरवून गेलो .

'आय लव्ह यू राधा ss ,' मी तिच्या कानात पुटपुटलो .

हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या व धुंद करणारे संगीत मनात गुंजू लागले . वाटले असेच राधाला जवळ घेवून नृत्य करत रहावे . राधाशी समरूप होण्याचे समाधान माझ्या चेहऱ्यावर खुलले होते. हा परमोच्च आनंदाचा क्षण राधाचा चेहराही लपवू शकत नव्हता .

' ती म्हणाली ,' समीर मला वाटते आहे जणू आज नव्याने मला तुझी ओळख होते आहे . किती लोभस दिसतो आहेस तू आज ... अगदी हवा ... हवासा वाटणारा . '

' तुला नाही आवडला का माझ्यातला हा कायापालट ,' मी मधेच अडवून तिला विचारले .

' नाही sss ना ssss ही ,' राधा पटकन म्हणाली .

जणू तिच्या हातातून हा क्षण निसटून जाणार होता . त्या निसटत्या क्षणाला घट्ट पकडावे तसे तिने मला घट्ट पकडून ठेवले व म्हणाली ....... ,

'याच समीरची मी कित्येक वर्षे वाट बघत होते. तो मला मिळाला आहे. मी अतिशय खूष आहे समीर ..... आय लव्ह यू डियर .....

              खोलीत ताज्या फुलांचा सुगंध दरवळत होता आणि स्वच्छ मनाला राधाची साथ होती . माझे हे नवे रूप पाहून राधाही सुखावली होती . हळूच ती माझ्या मिठीत विसावली . माझ्या ही मनातले वादळ शमले होते. राधाच्या साथीने मी माझ्या संसाररुपी खेळाचा डाव नव्याने मांडायला सज्ज झालो होतो....

शांत ,निर्मळ मनाने ...... करण मी फक्त राधाचा होतो आणि राधा माझी .... फक्त माझी ....


                                                                                      

       



Rate this content
Log in

More marathi story from Neena Gaikwad

Similar marathi story from Romance