Sheetal Ishi

Inspirational Others

4.5  

Sheetal Ishi

Inspirational Others

द्वारका - कृष्ण नगरी

द्वारका - कृष्ण नगरी

2 mins
208


भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र म्हणजे द्वारका. द्वारकाधीशाचे मंदिर देवभूमी द्वारका जिल्ह्यामध्ये आहे.

      जामनगर पासून द्वारका 150 किलोमीटर असल्याने अनेकदा जाण्याचा योग आला. प्रत्येक वेळेस द्वारका एक वेगळ्याच रूपात अनुभवास आली. अशाच एका वेळी घेतलेली अनुभूती.

    सकाळी लवकर घरून निघालो होतो. बरोबर साडे आठ वाजता मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत पोचलो. आठ ते नऊ अभिषेक पूजेची वेळ असल्यामुळे मंदिराचे पट बंद करण्यात आले होते. साधारणपणे शंभर सव्वाशे दर्शनार्थी गाभाऱ्यात रांगेत उभे होतो. जो तो द्वारकाधीशाचे दर्शन होते का याचा प्रयत्न करत होते. पट उघडण्यास वेळ होता. सर्वजण उभे राहून कंटाळले होते. अचानक एक सुमधुर आवाज कानावर पडला. सर्वांचे कान उंचावले , डोळे त्या आवाजाला शोधू लागले. तेव्हा लक्षात आले की पुरुषांच्या रांगेतून आवाज येतोय नजर त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत होती. पण दिसत नव्हते. तेवढ्यात एका माणसाने एका छोट्या सहा सात वर्षाच्या मुलाला खांद्यावर बसवले. पाहिले तर काय गाणारा तोच मुलगा होता तल्लीनतेने सुमधुर आवाजात भजन गात होता.... "कृष्णा पट खोलो रे ......., छोटी छोटी गईया......, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो........."अश्याच अनेक भजनांच्या माळेत अर्धा तास कधी निघून गेला कळलेच नाही. भक्तीरसात त्याने आम्हाला पूर्ण चिंब भिजवले होते. खऱ्या अर्थाने भक्ती काय असते हे आज कळले होते. नकळत हात जोडले गेले. पाच सहा वर्षाच्या मुलाला कृष्ण कळला होता. त्याच्या भजनांनी प्रसन्न होऊन जणू कृष्णाने आपले पट उघडले होते आणि आम्हाला दर्शन झाले. मंदिरातल्या मूर्तीची तेज आज वेगळेच भासले. जणू लहानग्याचे शब्द कृष्णापर्यंत पोचले होते.       दर्शन झाल्यावर बाहेर येऊन प्रसाद घेतला. जातांना गोमतीघाटाचे दर्शन घेऊन मग जावे असा विचार मनात आला आणि पुन्हा पाय मग गोमती घाटाकडे वळले. जात असताना दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकाने आहेत. त्या दुकानांमध्ये अनेक पूजे साहित्याच्या वस्तू मिळतात. एका दुकानाच्या बाजूला छोटीशी रिकामी जागा होती. त्या छोट्याशा रिकाम्या जागेवर एक चार पाच वर्षाचा मुलगा शंकराचा रूप घेऊन बसला होता अगदी हुबेहूब...... एका हातात त्रिशूळडमरू , गळ्यामध्ये नाग डोक्यावरती जटा आणि त्यातून वाहणारी गंगा अंगावर व्याघ्रजिन. पायाजवळ पडलेले एक छोटेसे भांडे त्यात येणार्‍या भक्तांनी दिलेले पैसे होते. जवळच एक पिशवी होती त्या पिशवीवर पुस्तक होते. शंकराचे बालरूप पाहून मनमोहून गेले. नकळतपणे पाय त्या मुलाकडे वळले. एक वेगळेच हास्य त्याच्या चेहऱ्यावर झळकले. काही पैसे त्यास दिले. बोलण्यातून कळले...त्याचे नाव कान्हा. आई छोट्या मोठ्या वस्तू मंदिराजवळ विकून पैसे कमवत होती. शिकण्याची जिद्द होती पण पैसे नव्हते. कान्हा मंदिराजवळ कधी कृष्णाचे तर कधी शंकराचे रूप घेऊन बसत असे व भक्तांनी दिलेल्या पैशातून आई-वडिलांना मदत करत होता. पैसे जमवून त्याला आपल्या वडिलांची पायाची शस्त्रक्रिया करायची होती. त्याचे बाल वयातील विचार पाहून मन भारावून गेले होते. जवळच असलेल्या दही विकणाऱ्या कडून त्याच्यासाठी दही घेतले व त्यास दिले.पटकन कान्हा धावत आपल्या आईकडे गेला व त्यातले अर्धे दही आपल्या आईस दिले, अर्धे त्याने खाल्ले. 

नकळत त्या चिमुकल्याने मातृ-पितृ भक्तीचे आज दर्शन घडवले होते.

आज खऱ्याअर्थाने द्वारकाधीशाचे दर्शन झाले होते. खऱ्या अर्थाने भक्ती कळली होती.

एक अविस्मरणीय अनुभूती घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational