Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational

4.2  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational

दृष्टिकोन

दृष्टिकोन

4 mins
205


दृष्टिकोन म्हणजे डोळस भान... जीवन जगण्याची सकारात्मक जाण.

अश्याच काही समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या अति लघु कथा ( अलक )

१. वेड्या आईची ही वेडी माया

केसांच्या जटा झालेली, फाटक्या, मळकट कपड्यातली ती वेडी रोजच दवाखान्यातील आवारात फिरायची. तिथल्या लोकांनाही तिची सवय झाली होती.

एक दिवस तिच्या तीक्ष्ण नजरेनी काही विचित्र हालचाली टिपल्या आणि एक जोरदार काठीचा वार तिने गेटमधून बाहेर पडणाऱ्या जोडप्यापैकी बाईच्या पायावर केला आणि तिच्या कुशीतलं बाळ हिसकावून दवाखान्याच्या दिशेने पळाली. ते दोघेपण तिच्या पाठीमागे धावले. ती थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसली... तिने बाळ डॉक्टरांच्या पुढ्यात ठेवून तिथून पळ काढला आणि आपला मोर्चा त्या जोडप्याकडे वळवला.

इतक्यात बाळ चोरीला गेल्याचा गोंधळ दवाखान्यात उडाला. पकडल्या जाण्याच्या भीतीने दोघे तिथून पळणार... तोच चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे तिने त्यांच्यावर झडप घातली.

मुलं पळवणारी मोठी टोळी तिच्या चाणाक्ष बुद्धीमुळे पकडली गेली. काही वर्षांपूर्वी याच दवाखान्यातून तीच बाळ चोरीला गेलं होतं.

२. तो किंवा ती काय फरक पडतो... माणूस आहे इतकंच महत्वाचं नाही का?

"तुम्ही काहीही करा, डॉक्टर!!! पण बाळ आणि आई दोघांनाही वाचवा. पैशाची चिंता अजिबात करू नका". रमेश डॉक्टरांना विनवत होता.

"आम्ही आमचे शर्थीचे प्रयत्न करतोय. शहरातील सगळ्यात मोठया स्त्रीरोगतज्ञाशी बोलणं झालंय, त्या येतच असतील." डॉक्टर म्हणाले.

डॉक्टर बाहेर येऊन बाळ आणि आई सुखरूप असल्याचं सांगताच तो त्यांचे आभार मानतो.

"आभार माझे नको, डॉक्टर रश्मीचे माना.

"डॉक्टर रश्मी त्याच्यासमोर येताच तो दचकतो.

सकाळी वेणूला दवाखान्यात घेऊन येताना सिग्नलवर गाडी थांबताच त्याचं लक्ष शेजारच्या गाडीत बसलेल्या व्यक्तीवर जाताच तो तुच्छतेने हसून, "अरे, असली लोकंसुद्धा गाडीतून फिरायला लागली की... "म्हणत त्याने त्याची टर उडवली होती. हे मात्र वेणूला अजिबात आवडलं नव्हतं. आता तीच व्यक्ती त्याच्यासमोर डॉक्टर रश्मी म्हणून उभी होती.

हो!!!रश्मी एक तृतीयपंथी होती.

३. डर के आगे जीत हैं।

स्वातीने पर्स उचलली आणि स्टेशनवर पोहचली. थोडी द्विधा मनस्थितीतच होती. तिकीट काउंटरवर तिकीट घेताना तिचे हात थरथरत होते.

पाच-सहा वर्षानंतर लोकलचा प्रवास एकटी करणार होती. मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता... नवरा त्याच्या सोबतीला दवाखान्यातच होता. मुलीसाठी ती घरी... थोडी गंभीर परिस्थिती असल्यामुळे तिला जावं लागणारच होतं.

मुंबईमध्ये नवीन असताना नवऱ्यासोबत केलेला लोकल प्रवास आठवला आणि तिच्या अंगावर काटा आला.

गर्दीचा फायदा घेऊन तिच्या शरीराला जाणीवपूर्वक केलेले सहेतुक स्पर्श... तेंव्हापासून तिने लोकलच्या प्रवासाची धास्तीच घेतली पण आज काहीही करून भीतीवर मात करत तिला हा प्रवास करायचा होता तिच्या लेकरासाठी...

वाशी स्टेशनवर उतरल्यानंतर हिरकणीने गड सर केल्यानंतर जितका आनंद तिला झाला असेल तितकाच आनंद स्वातीलाही झाला होता. आज तिने तिच्या भीतीवर मात केली होती.

४. पान्हा फुटावा तिलाही वाटत असेलच ना!!!....वांझ

सुगंधा आपल्या सुनेला, तेजश्रीला घेऊन "मातोश्री" अनाथाश्रमात आली. "आई आपण इथे का आलोय?" तेजश्रीने विचारलं.

आपण बाळ दत्तक घेतोय. "मी काल तुझं आणि विक्रांतच बोलणं ऐकलंय, खूप झाला त्याचा स्वतःच बाळ असण्याचा हट्ट. बाईच्या वेदना पुरुषांना कधी कळणारच नाहीत". तेजश्री सासुकडे आश्चर्याने पाहत होती. अगं, अशी काय पाहतेस. वांझ हा शब्द किती लागतो, आतून तोडतो हे माझ्याशिवाय जास्त कोणाला कळणार.

बाईच्या मनाचा विचार इथे करतोच कोण? तिला नकोय का मातृत्त्व? तिला नकोय का इवल्याश्या शरीराची उब? तिलाही पान्हा फुटावा वाटत असेलच ना? पण जाऊदे... थोड्या वर्षांनी का होईना पण माझी कूस उजवली अन विक्रांत जन्मला पण तुला मातृत्वाच्या सुखापासून मी वंचित राहू देणार नाही. सासुचं बोलणं ऐकताच तेजश्रीने त्यांना घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू राहू लागले.

५. गोदाक्का

कपाळावर लालभडक कुंकू लावत गोदाक्का विचार करत होती, "जमल का मला हे समदं?" पाठीमागून गौरीने त्यांच्या सुनेने खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर दिला. गोदाक्काला आज जात्यावरची गीतं, ओव्या गायला रेडिओ स्टेशनवर आमंत्रित केलं होतं.

गौरी काही महिन्यांपूर्वीच या घरात सून म्हणून आली होती. गौरी नेहमी नवीन, तिला आवडणाऱ्या गोष्टी मोबाईलमध्ये कैद करायची.

एक दिवस सासूला गीतं गुणगुणताना ऐकलं आणि ते तिने त्यांच्या नकळत रेकॉर्ड केलं आणि सोशल मीडियावर व्हायरल केली. एक दिवस तिला रेडिओ स्टेशनवरून फोन आला, त्यांनी गोदाक्काला रेडिओवर गीतं गाण्यासाठी आमंत्रीत केलं होतं.

एका धूळ खात पडलेल्या रत्नाला गौरीने नवीन झळाळी दिली. गौरीने गोदाक्काला लेकीच्या मायेने एक नवी उमेद आणि ओळख मिळवून दिली.

६. हाऊस हजबंड... ( त्याच्यातील आई )

चिनूला घेऊन अन्वेष रोजच्याप्रमाणे संध्याकाळी बागेत गेला. त्याला पाहून बायका आपआपसात कुजबुजत होत्या. त्यातल्या एकीने त्याला विचारलं, "तुम्ही रोजच बागेत येता. तुमची बायको..."

"ती ऑफिसला जाते."अन्वेषने सांगितलं.

"म्हणजे घर आणि मुलगी तुम्ही सांभाळता," तिने आश्चर्याने विचारलं.

"हो मी हाऊस हजबंड आहे, मी सगळं करतो जी एक हाऊस वाईफ करते. आईच्या मायेने मुलीला, घराला सांभाळतो, सकाळी उठून बायकोला डबा बनवून देतो. त्यात इतकं आश्चर्य करण्यासारखं काय?" त्याने हसत उत्तर दिले.

"मग तुम्ही नोकरी..." तिने परत प्रश्न केला.

"मी घरूनच काम करतो. मी एक लेखक आहे. माझी पुस्तक प्रसिद्ध झालेली आहेत. माझे छंद जोपासत मी काम करतो." त्याला मज्जा येत होती.

"नशीबवान आहे हो तुमची बायको... "तिने कौतुक केलं.

मातृत्व अनुभवायला बाई असणं गरजेचं नसून मनात मातृभाव असायला हवा.

७. कोण म्हणतं मला मुलगी नाही.

सकाळची आन्हिके उरकून गोमती आंघोळीला जाणार इतक्यात, "आई इथे या पाटावर बसा ". गौरी तिची सून तिला म्हणाली.

"का गं," म्हणताच गौरीने त्यांना जबरदस्ती पाटावर बसवलं आणि त्यांच्या डोक्यावर तेल ओतून छान हलक्या हाताने चोळून मालिश केली गरम पाण्याने त्यांना न्हाऊ म्हाकू घातलं. त्यांची देवपूजा आटोपेपर्यंत तिने त्यांना आवडतात तश्या मऊसूत शेवाळ्या शिजवून त्यावर गरम दूध, साखर आणि वर कडकडीत कडवलेल्या साजूक तुपाची धार... जेवून गोमतीचा आत्मा तृप्त झाला.

गौरीला या घरात आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती, ती म्हणजे सासूचे कष्ट... दोन मुलं आणि नवरा यांचं करताना त्यांना स्वतःचा पडलेला विसर... आपल्या पोटी मुलगी नसल्याची खंत गोमतीला वेळोवेळी जाणवायची पण आज देवाने गौरीच्या रुपात ती इच्छाही पूर्ण केली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy