दोन घरं
दोन घरं
निता शाळेतुन घरी आली. आज ही आई रडतच होती. आधी तर आई हसायची, छान राहायची, निताचे किती लाड करायची. पण हल्ली आई सतत नाराज का असते ? रडत का असते याचं कोडंच सात वर्षीय निताच्या बालमनाला पडलेलं. तिला मुळीच आवडायचे नाही आई रडलेली. बाबा मात्र निताचे खूप लाड करायचे. तिला फिरायला न्यायचे.तिच्यासाठी खूप खाऊ आणायचे. पण तरीही आई सतत बाबांशी भांडत असे आणि स्वतःच रडत असे. आईबाबांचे भांडण होत असले की निता खूप घाबरायची.
त्यादिवशी ही ती शाळेतुन घरी आली. एक बाई घरी आलेली होती.बाबा ही घरीच होते.निता शाळेतुन आलेली बघून तिने निताला प्रेमाने जवळ घेतले. तिचे लाड करायला लागली. तिचे हात तोंड धुवुन दिले. त्यांनी सांगितले की ती निताची मावशी आहे म्हणुन.
निताने बाबांना विचारले, आई कुठे आहे ? बाबा काहीच बोलले नाहीत फक्त स्वयंपाक घराकडे बोट दाखवले.
निता धावतच आत मधे गेली. बघते तर काय ? आई स्वयंपाकखोलीत बसलेली. तिचा चेहरा सुजलेला, ओठ सुजलेले, हाताला खरचटलेले, केस विस्कटलेले. आई कशीतरीच दिसत होती. तिला आईची खूप काळजी वाटली. निता आईजवळ गेली अन् विचारू लागली. आई काय झाले ? आई सांग ना .... काय झाले ?
आई काहीच बोलत नव्हती. मग अचानक निताला घट्ट कवटाळुन जोरजोरात रडायला लागली. निता घाबरली. बाबूजी बाबूजी करून बाबांना हाक मारायला लागली. तिचे बाबा धावतच आले आणि निताला आईच्या हातातून सोडविली. आईची अवस्था आणि रडणं बघून निताही रडायला लागली. सात वर्षांची पोरं ती, खूप घाबरली. बाबा म्हणाले आईला बरं नाही, तिला आराम करू दे. नि
ता घाबरुन रडतच होती. पहिल्यांदाच निताचा तिच्या बाबांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्या नवीन मावशीने जेवण बनविले. आई तशीच बसुन होती.
बाबांनी निताला आपल्या हातांनी भरवले पण आई जेवलीच नाही. मग ती मावशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी निता शाळेत गेलीच नाही कारण आई आजारी होती ना मग तयार कोण करणार? आई गप्पच होती. बाबा पण नव्हते. म्हणुन बाहेर जावून लागली ती खेळायला. तिच्या घराजवळच्या सर्व काकू आणि आजी तिला जवळ बोलवून खोदून खोदून काहीबाही विचारत होत्या. काल आलेली पाहुणी गेली का? तुझी आई कुठं होती? तुझे बाबा कुठं होते?
स्वयंपाक कुणी केला? तिने सर्व सांगितले.
मग धुरपता आजी बोलली, निताची तर मजाच आहे...!
तिच्या बापानी दोन घरं केलीत. हे ऐकून निता खूप आनंदी झाली. खरंच का गं... आजी..? आजी हो बोलली. निता टाळ्या वाजवत वाजवत म्हणायला लागली माझ्या बाबांचे दोन दोन घरं. तिला खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटत होते. आणि आनंदही की तिचे आता दोन घरं आहेत. ती धावतच घरी आली आणि आईला सांगू लागली, आई, आई बाबूजीने दोन घरं घेतली. हे एक आणि अजून एक आता आपण खूप श्रीमंत झालो ना..! आईने निताकडे पाहिले आणि जोरात खाडकन तिच्या गालांवर ठेवून दिली. आणि बोलली तू ही त्याचीच मुलगी... त्याच्याच वळणावर...
जोरात लागल्यामुळे निता रडायला लागली. तिला रडताना पाहून आईने तिला जवळ ओढून कुशीत घेतले आणि ती ही रडू लागली. आईच्या कुशीत शिरून निता बराच वेळ हुंदके देत राहीली आणि तिच्या बालमनात मात्र एक प्रश्न खदखदत राहिला. दोन घरं आनंदाची गोष्ट असताना आईने का मारलं? आई का रडली?