हक्क
हक्क


खोलीतला दिवा मालवून, बिछाण्यात अंग टाकले तीने.
पाठ जमिनीला लागताच किती बरं वाटलं तिला.
खूप दमली होती ती. कामावरून घरी येऊन, स्वयंपाक भांडी,पाणी सर्वांचे जेवणखाणं आवरता आवरता साढ़े अकरा वाजलेले. सकाळी लवकर उठून 9 वाजताच सर्व आवरुन जायचं असते तीला.
बाजुला नजर टाकली. तो गाढ झोपला होता.
आज ही तो पेऊनच आलेला. अन् नशेतच दोन चार घास खाऊन झोपलेला. याला बरी झोप येते ती विचार करायला लागली. खाणे, पिणे आणि झोपणे याव्यतिरिक्त तो करतो तरी काय ? अरे हो अजून एक काम तो खूप मुत्सद्दीपणाने करतो. स्वतःचे वर्चस्व गाजविण्याचे. कर्तव्य, जबाबदारी शब्द तर माहीतच नाही पण अधिकारवाणी मात्र अंगात मुरलेली.
स्वतःशीच विचार करता तीला झोप यायला लागली.
ती गाढ झोपेतच होती तरी तीला स्वतःवर त्याचे अस्तित्व जाणवले.आधीच तिचं शरीर ठणकत होतं. ती कळवळली, अहो, आत्ता नको मला बरं वाटत नाही. हम्म ... आता काय झाले ?जवळ आलो की आपोआप बरं वाटेल.
नाही आता नको . मला खूप थकवा वाटतोय. झोप येतेय. सकाळी पण लवकर जायचे आहे
बस ...! पुरे झाली तुझी नाटकं, नवरा आहे तुझा ....
यासाठी लग्न करून आणली का तुला.
अन् ओढली तीला स्वतःकडे. ती निमुटपणे पडुन राहीली.
ए ... असं नकोय मला, जरा प्रतिसाद दे,
काही बळजबरी नाही करत तुझ्यावर , हक्काची बायको आहेस माझी.
ती कसंनुस हसली अन् त्याच्या मर्जीनुसार त्याच्या सोबत रमली. पण डोळ्याच्या कड़ा मात्र ओलावल्या.
तो पुन्हा घोरायला लागला. तिची मात्र झोप उडाली.
स्वतःशीच बोलली, तुला तुझ्या हक्काची बायको मिळाली पण सुखदुःखात साथ देणारा माझा हक्काचा नवरा कुठाय?
कुठं .....!!!!