दिवाळी
दिवाळी


दिवाळीचा सण असल्याने घराची साफसफाई, रंग देणे, फराळ बनविणे अशी कामे चालली होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले होते.
रमेशही आपल्या कामात व्यस्त होता. रमेशच्या कुटुंबामध्ये तो, त्याची बायको आणि पंधरा वर्षाचा मुलगा वैभव. कुटुंब लहान असलं तरी समाधानी होतं.
रमेशचे घर सजवण्याचे काम चालू होते. त्याच्या बायकोचे पदार्थ कोणकोणते बनवावे याची तयारी चालू होती.
वैभव मध्येच येऊन रडत होता. तो फट्याक्यांची मागणी करत होता. रमेश त्याला समजावत होता की, घराची सजावट झाल्यावर फटाके घेऊन देतो. वैभव मात्र त्याची रडारड काही थांबवत नव्हता.
वैभवची समजूत घालून त्याला खेळायला पाठविले. तो मुलांबरोबर खेळू लागला. त्याचे मित्र फटाके फोडून मजा करु लागले. त्याचे मित्र मजा करत वैभवला चिडवू लागले. कारण वैभवकडे चा
ंगले फटाके नव्हते.
वैभव पुन्हा रडत घरी आला आणि फटाक्यासाठी हट्ट करु लागला. अखेर शेवटी कंटाळून रमेश त्याला दुकानात घेऊन गेला. तो लाडका असल्याने त्याला मोठ्या आवाजाची फटाके घेऊन दिली.
संध्याकाळ झाली होती. सर्वत्र फट्याक्यांचा आवाज घुमत होता. वैभवही फटाके फोडू लागला. अंधार पडू लागला होता. तरीही मुलांनी फटाके फोडणे बंद केले नाही.
वैभवने एका फटाक्याची थोडी वात काढून पेटवला. परंतू तो फटाका फुटला नाही. तो फटाका का फुटत नाही, हे पाहण्यासाठी तो फटाक्याजवळ गेला. फटाका हातात घेऊन पाहू लागला.
तेवढ्यात.... तो फटाका फुटला.... हातातून रक्त वाहू लागले..... त्याचे मित्र घाबरले.... सगळा गोंधळ उडाला.
त्याला दवाखान्यात नेण्यात आले. त्याचा जीव वाचला परंतु या फटाक्याने मात्र त्याचा हात गमावला.