तिची प्रतीक्षा
तिची प्रतीक्षा


पाखरांची मंजुळ गाणी ऐकत राम बागेत बाकावर बसलेला होता. त्याच्या हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ होता. तो तिची वाट पाहत होता. परंतु तो असा आजच बसलेला नव्हता. तो तिची येण्याची वाट पाहत रोज तेथे बसत असतो.
बारावीमध्ये शिकत असताना शितल नावाच्या मुलीशी त्याची मैत्री झाली. पुढे ती मैत्री प्रेमात बदलली. ती दोघं रोज बागेत भेटायची. गप्पा मारायची. बारावी संपल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी शहरात शिकायला गेले. पदवी प्राप्त करुन ती दोघं गावात आली. त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या
आपल्या प्रेमाला विवाहात रुपांतर करावं असे त्यांना वाटू लागले. पण हा विवाह घरचे मान्य करणार नव्हते. कारण त्यांची मोठी अडचण म्हणजे जात. त्यामुळे त्यांना मोठा विरोध होणार होता. त्यासाठी त्यांनी आपला संसार शहरात थाटायचे ठरवले.
दोघेही शहरात आले. आपल्या संसारासाठी प्रयत्न करु लागले. मित्रांच्या मदतीने त्यांनी लग्न केले. त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला.
आज शितलचा वाढदिवस होता. विशेष म्हणजे याच दिवशी त्याला प्रेमाचा होकार मिळाला होता. म्हणून त्याने अॉफीसमधून येताना बागेत येण्यास सांगितले. तो पुष्पगुच्छ घेऊन बागेत आला आणि बाकावर बसून तिची वाट पाहू लागला.
तितक्यात त्याला मित्रांचा फोन आला आणि बातमी ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. बागेत येताना शितलचा अपघात झाला होता. तेथेच तिचा मृत्यू झाला. या बातमीने मात्र रामचे मानसिक संतुलन बिघडले.
तो अजूनही बागेत येतो आणि तिची वाट पाहत राहतो. कारण तिचा आज वाढदिवस आहे.भेटीसाठी फुले आणली आहेत. खूप वाट पाहतो आहे.
तिची प्रतीक्षा करत त्याच्या हातातली ती गुलाबाची फुले मात्र केव्हाची सुकली आहे