अपूर्ण राहिलेली कहाणी
अपूर्ण राहिलेली कहाणी


राम यंदा बारावीला होता. बारावी म्हणजे आयुष्यातील टर्निंग पॉईंटचं होय. राम हा कला शाखेत शिकत होता. हुशार असलेल्या मुलांनी दहावीनंतर विज्ञान शाखा निवडल्या होत्या. त्यामुळे वर्गातील स्पर्धा कमी झाली होती. तेव्हा चांगला अभ्यास करून वर्गात नंबर आणायचा असा निश्चय रामने केला.
रामला त्याच्या गावापासून दोन - तीन कि. मी अंतरावर असलेल्या गावाला शिकण्यासाठी जावे लागत होते. मित्राच्या आग्रहाखातर कॉलेजच्या गावाला रुम घेतली. तेथे त्याने अभ्यास सुरू केला. सकाळचे कॉलेज असल्यामुळे दुपारपासून अभ्यासासाठी वेळ असायचा. अभ्यास करण्यासाठी गावच्या धरणावर जाऊ लागला.
प्रबळ इच्छेने अभ्यास तो करु लागला. काही दिवसातच हुशार मुलगा म्हणून समोर आला. प्रथम पाचवा, चौथा, तिसरा अशी त्याची क्रमवारी वाढत गेली. प्रथम सत्रात चांगले गुण मिळवून सर्वांच्या मनामध्ये जागा निर्माण केली. दिवाळी संपल्यावर बोर्डाच्या परीक्षेचे वेध लागले.
अशातच एका मुलीशी त्याची नजरानजर झाली. ती त्याला आवडू लागली आणि तो थेट तिच्या गावाला अभ्यासाच्या निमित्ताने मित्राच्या घरी जाऊ लागला. त्याला ती इतकी आवडू लागली, की त्याला काही सुचेना.
ती त्याच्या रुमसमोरून रोज जात असे. तो तिला खिडकीतून चोरुन पाहू लागला तर कधी सायकलची चैन पाडून बसवण्याचा प्रयत्न करत तिला पाहू लागला. परंतू त्याची कधी बोलण्याची हिंमत झाली नाही.
अगदी जवळचा मित्र असलेला श्याम याच्या ती गोष्ट लक्षात आली आणि त्याने परीस्थितीची जाणीव करुन देऊन अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले.
भानावर येऊन तो पुन्हा अभ्यासाला लागला. बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. शेवटच्या पेपर दिवशी त्याने बोलायचे ठरविले. शेवटचा पेपर संपला. तो वर्गाच्या बाहेर आला. तो तिला शोधू लागला. परंतू ती भेटली नाही.
बोर्डाचा निकाल लागला. आतातरी भेटल्यावर बोलू. ती मात्र त्या दिवशी कॉलेजला आलीच नाही. पुढे त्याचा डीएडला नंबर लागला. तिचाही डीएडला नंबर लागला हे मित्रांकडून कळाले. आतातरी आपण भेटू या इच्छेने तिच्या कॉलेजजवळ थांबू लागला. तरीही ती भेटली नाही.
बोर्डाच्या पेपरला तिचं भेटणं शेवटचं ठरलं. त्यानंतर ती कधीही त्याला भेटली नाही. आजही तो तिची वाट पाहत आहे. कधी ती त्याला भेटेल.......
मनातलं सारं काही बोलेल याची उत्सुकता लागली आहे. अपूर्ण राहिलेली कहाणी ती कधी पूर्ण होईल याची तो आजही वाट पाहत आहे.