The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Neha Sankhe

Drama

4.0  

Neha Sankhe

Drama

"धक्का"

"धक्का"

9 mins
598


सदाशिव सकाळी लवकरच उठला. कारण रोजच्या दैनंदिन कामात उशिरा उठून सर्वकाही आटपून ही वेळ कसा घालवायचा हे कळत नसे. परंतु, आज त्याला घरी जायचे होते, वहिनीच्या हाताचे जेवण व दादांचे आपुलकीचे दोन शब्द यासाठी तो आसुसलेला होता. परिस्थितीने गरीब असूनही दादांनी त्याला शिक्षण देऊन नोकरीला लावले आता तो एमए करीत होता. परंतु, हल्ली त्याला घरची ओढ जास्त जाणवत होती कारण या भाड्याच्या खोलीत कोळीवाड्यात राहुन त्याला अक्षरशः कंटाळा आला होता. जेवण वैगरे व्यवस्थित मिळायचे. तसेच कोळीवाडयातील माणसेही प्रेमळच परंतु, त्याचा बौद्धीक कोंडमारा होत होता. कारण चर्चा, गप्पा मारण्यासारखं साहित्यिक कोणीच नव्हते. सगळेच अशिक्षित लोक त्यांच्याशी जुळवून घेणेही त्याला जमत नसे आकर्षण होते ते फक्त घरमालकांची मुलगी सुशीला होय. ती खरंतर त्याच्याशी साहित्यिक गप्पा मारायला, चर्चा करायला येत असे परंतू याचं त्यावेळेस तिच्या बांधेसूद शरिराकडेच जास्त लक्ष असायचे. काळी सावळी, बसके नाक, चष्मा व भडक रंगांचे ड्रेस व मोगऱ्याचा एखादा गजराही माळून यायची तशी त्याच्या मनामध्ये जी स्त्रीच्या सौदर्याची जी व्याख्या होती त्यात ती बसतही नव्हती. परंतु, एकाकीपणा व वय यामुळे तो तिच्याकडे आकर्षित होत होता. तिचा विचार करीत असतानाच त्याने मुखमार्जन व इतर सर्व प्रातर्विधी उरकले व झटपट कपडे इस्त्री करून सामानाची बांधाबांध करू लागला कारण चार दिवस सुट्टी होती त्यामुळे मस्त धामणगावला घरी जायचे व चार दिवस पोहणे व मनसोक्त हुंदडणे या गोष्टी त्याला करता आल्या असत्या. इतक्यात हाताला सिगारेटचे पाकीट लागले ते लपवावे की घेऊन जावं म्हणजे रस्त्यात पिता येईल, अशा संभ्रमात तो होता परंतु, तरीही त्याने ते पाकीट बॅगेच्या वरच्या कप्यात टाकले. सर्व आवराआवर करता करता त्याला १० वाजले. तसा तो शाळेत जायच्या तयारीला लागला. आजचा दिवस भरला नाही तर जोडून रजा गेली असती पटकन शर्टपॅन्ट व पायात शूज घालून तो जोरातच लाकडी जिन्यावरून उतरला त्याचा बुटांचा आवाज ऐकून सुशिला रोज बाहेर येत असे व त्यांची नजरानजर होत असे हा रोजचा सवयीचा भाग झाला होता आज तो खाली उतरून थोडा थबकलाच सुशिला आज बाहेरच आली होती.


संध्याकाळी मी निघतोय चार दिवसांसाठी घरी... घोगऱ्या आवाजात तो म्हणाला.


अच्छा, मग संध्याकाळी जाताना मला भेटून जा, मला काही सांगायचं आहे.


त्याला क्षणभर वाटले की आताच थाबावं व तिला विचारून घ्यावे की काय आहे तुझ्या मनात माझ्याविषयी पण त्याने मनाला संयमित केले. ती गोड हसली कारण तीही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचीत होती. तिचं हसणं त्याला आकर्षित करून गेले व त्याला वाटले की सौंदर्य नसले म्हणून काय झाले, हुशार आहे अंगाबांध्याने आकर्षक आहे. मला जोडीदारीण म्हणून खरंतर ही योग्य आहे.


जाताना जी.ए.ची "काजळमाया" ठेऊन जा बघू माझी अपूर्ण राहिली वाचायची व येताना "दळविंची" 'सारे प्रवासी घडीचे' घेऊन या बरे.


बरंय ठीक आहे. घाईघाईने घड्याळात पाहिले त्याला उशीर झाला होता. शाळेतील मुख्याध्यापक हा थोडा बायस असल्यामुळे व शिंदे मॅडम जर जास्तच सलगीने वागत असल्याने ते नेहमीच याचा पाणउतारा करण्याचे निमित्त शोधीत असे. त्यामुळे तो लगबगीने सायकलवर टांग मारून शाळेच्या दिशेने निघाला. धापा टाकीतच तो शाळेत प्रवेशला मस्टरवर सही केली व वर्गात गेला. परंतु, आज त्याचं शिकवण्यात विशेष लक्ष नव्हते त्याचं मन सारखं धामणगावला धाव घेत होते.


मधल्या सुट्टीत शिंदे मॅडम हसतच त्याला म्हणाल्या, काय सदाशिवराव या वेळेस गावाला मुलगी पाहूनच या बरं का?


शिंदे मॅडम या पस्तिशीच्या वयाच्या पण नवऱ्यापासून विभक्त राहत होत्या. त्यामुळे ती सलगीने सदाशिवशी बोलू लागली की इतर शिक्षकांच्या नजरा व पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच होत असे. वास्तविक इतर शिक्षक तिच्याशी बोलताना त्या दृष्टीकोनातून पाहत असे व तिच्या ते लक्षातही येत असे परंतु सदाशिव त्याच्याशी बोलताना नेहमी अदबीने बोलत वागत असे त्यामुळेच त्या विश्वासाने त्याच्याशी जास्त बोलत असे.


शिंदे मॅडमच्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले, नाही हो मॅडम अजून अवकाश आहे.


सदाशिव आजूबाजूला पाहतच बोलला कारण सुट्टी असल्यामुळे विध्यार्थी आजूबाजूने जात होते. बरं चहा घेऊयात का?


कटींग घेऊ या.


शिंदे मॅडमनी शिपायाला बोलाविले व दोन कटींग चहा घेऊन येण्यास सांगितले. टीचर रूममध्ये कोणीही नव्हते त्यामुळे सदाशिवने सुस्कारा सोडला. बरं झाले कोणीही नाही. घरच्या गावच्या आठवणी सांगता सांगताच सदाशिवने चहा संपविला. घंटा होताच मॅडम निरोप घेऊन निघून गेल्या व तो तडक मुख्याध्यापकांच्या कक्षात गेला.


सर मला थोडं लवकर निघायचं आहे गावी जावयाचे आहे. दुपारची 3 ची एसटी मिळाली तर रात्री अकरा वाजेपर्यंत पोहचता येईल.


ठीक आहे जा तुम्ही आज वाणी सर विशेष चांगल्या मूडमध्ये होते, त्यामुळे लगेचच त्यांनी परवानगी दिली.


तो खुशीने "थँक्स सर" म्हणत निघाला.


आपले सामान झटपट लॉकरमध्ये ठेवून त्याने सायकलवर टांग मारून तो रूमवर गेला. जिना चढता चढता त्याची नजर भिरभिरत होती, सुशिला कुठे दिसते का? परंतु, हा संध्याकाळी येईल असं वाटल्यामुळे ती मैत्रिणीकडे गेली होती. त्याने झपझप बॅगेत सामान भरले व पैशाचं पाकीट घेतले. यावेळेस वहिनीला १००० रुपये तिच्या आवडीच्या वस्तूच्या खरेदीसाठी देईन, असे मनाशी मांडत त्याने पाकीट खिशात ठेवले व घड्याळ पाहिले. अजून २० मिनिटे बाकी होती. बाहेरून कुलूप लावले. जी.ए.ची काजळमाया सुशिलाला वाचण्यासाठी खालच्या काकूकडे ठेवली व सायकलला व्यवस्थित लॉक करून बॅग खांद्याला लटकवून तो निघाला.


रस्त्यावर येताच मजेत शिटी वाजवत तो मनावरचे दडपण दूर झाल्यासारखा चालू लागला. बसस्टँडवर येऊन चौकशी केली. बस लागली होती. जागासुद्धा मस्त मिळाली. तो वर्तमानपत्र घेऊन खिडकीपाशी वाचत बसला. बसचा खडखडाट मध्येच वाचनात अडथळा आणीत होता. त्याच्या शेजारी एक मध्यमवर्गीय महिला बसली होती. त्यामुळे त्याला थोडे अवघडल्यासारखे बसावं लागले होते. हळूच त्याने चोरून तिचे निरीक्षण केले, सुंदर होती ती. मनातल्यामनात तो सुशिलाचा विचार करू लागला.


संध्याकाळी सुशिला त्याच्यासमोर आपलं मन उघड करणार होती. का? तिने नाही विचारले, तर आपण पुढाकार घ्यावा असा तो विचार करीत होता. आता चार दिवसानंतर परतल्यावर तिचा होकार मिळवायचाच असे त्याने मनाशी ठरविले. त्याने पाकीटच्या चोर कप्प्यात सुशिलाचा एक फोटो ठेवला होता. तो काढला. खरं म्हणजे मागे एकदा गोल्डिंग यांच्या "लॉर्ड ऑफ द फ्लाईज" या पुस्तकात मधल्या पानांमध्ये मिळाला होता. कादंबरी परत करताना फोटो दिला असता ती गोड हसून म्हणाली "राहू द्या तुमच्याकडे" जादा कॉपी आहे. त्यानेही तो मग ठेवून दिला. त्याने फोटो बाहेर घेऊन व्यवस्थीत निरीक्षण केलं. शेजारच्या महिलेने एक चोरटा कटाक्ष टाकून त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यांने तो फोटो शर्टाच्या वरच्या खिशात ठेवून दिला. थोड्यावेळाने त्याला वाऱ्यावर डुलकी लागली व बाजूची महिलासुद्धा आरामात त्याच्या अंगावर कलुन झोपली होती. गंगाधार आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे लवकर उठला, बैलजोडी पाहुन आला. पिक यंदा व्यवस्थित आलं होतं. आला तसं त्याला टेन्शन नव्हतं. धाकटा सदा सुद्धा आता स्वतःच्या पायावर उभा होता. बैलांना पेंढा टाकून तो खळ्यावर जायच्या तयारीला लागला. नर्मदाने भाकरी व चटणी केली होती ती त्याने खाल्ली व घोटभर थंड पाणी पिऊन विडी शिलगावत जायच्या तयारीला लागला. तोच मनू धावतच त्याच्याकडे आला.


अरे गंग्या सीताकाकीला अस्वस्थ वाटतंय चल कदाचित डॉक्टरकडे न्यावे लागेल. तसाच तो मनू बरोबर सीताकाकीकडे गेला.


सीताकाकी वयाने साठीच्या घरात पण धडधाकट परंतु स्वभावाने खाष्ट् कोणाला आपल्या शेताच्या कुंपणाला हातही लावू देणार नाही. मध्यंतरी गंगाधरला तिने व तिच्या मुलाने विष्णुने नांगरणीच्या वेळेस खूप शिव्या देऊन धमकावले होते. परंतु, एकाच घरातील असल्यामुळे तो तिला बघायला गेला. मनुसुद्धा त्याचा चुलतभाऊ. दोघेही घरात गेले विष्णु चिंतेत बसला होता. विष्णुशी त्याने मागच्या प्रसंगापासून बोलणे कमी केले होते. हळूच जाऊन त्याने विष्णुच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, डॉक्टरला बोलाव या का?


गंग्या, अचानक छातीत कळ आली व अंथरुणावर कोसळली. आता बरी आहे तशी, पण मीच घाबरलो. त्याने सीताकाकूकडे पाहिले तशी ती मंद हसली. थोड्यावेळ बसल्यानंतर गंग्या व मनू दोघेही निघाले. शेतात सगळी कामे खोळंबली म्हणून तो लगेच येऊन शेतावर गेला. शेतावर पोहचतो ना तोच बोंब आली सीता काकी गेली. परत पाऊली सर्व माघारी फिरले.


संध्याकाळचे साडेसात वाजले होते. आता दोन अडीच प्रवासानंतर मी पोहचणार या कल्पनेने सदा खुशीत होता. त्याने बाजूच्या महिलेकडे पाहिले ती आरामात त्याच्या अंगावर सगळं ओझं टाकून रेलून झोपली होती. तो काही हालचाल न करता तसाच बसून राहिला. थोड्यावेळाने ती महिला उठली व शरमल्यासारखे वाटून कसंनुसं हसली त्याला क्षणभर वाटलं की हिला विचारावं, बाई तुम्ही एकट्यानं कशा व कुठे चाललायत परंतु नुसती आफत नको या विचाराने त्याने तो विचार सोडून दिला.


रात्री १० वाजता गाडी कालीपुराला पोहचली. तो आळसावलेला होता तरी लगबगीने उतरला व तिथून झपाझप पावले टाकीत चालू लागला. रस्त्यात एका स्टॉलवर मॅचबॉक्स घेऊन हळूच एक सिगारेट शिलगावली व चालू लागला. चार किमी अंतर त्याला पायी जायचे होते. पूर्वीच्या त्याच्या हा रोजचा रस्ता होता. पहिल्या पाच एक मिनिटात वस्ती संपली व आता निर्जन रस्ता सुरू झाला. हळूहळू कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाजही कमी कमी होत गेले. पुढे काही पावले गेल्यावर एक ग्रामदेवतेचे मंदिर लागले. तिथे नेहमी प्रमाणे त्याने मनोभावे नमस्कार केला. वाटसरू या मातेला नमस्कार करून या रस्त्यावरून जाताना बळ मिळवीत असत. हळूहळू खाजणाचा परिसर येऊ लागला. रातकिड्यांचा आवाज व स्वतःच्या पावलांचा आवाज त्याला भीती घालू पाहत होता.तसा बालपणापासून तो थोडा भित्राच होता. जे नारायण धारप व रत्नाकर मतकरी यांच्या भयकथा वाचतात त्यांच्या छातीत धडधडू लागायचंच. परंतु, घराकडे जायाची ओढ त्याला बळ देत होती. थोड्याच वेळात स्मशानाचे खांब दिसू लागले तेथे बघण्याचे त्याने टाळले व खाडीवरचा ब्रिज पार केला.


सिगारेट ओढून तो ते टाळण्यासाठी सुशिलाचा विचार मनात आणीत आजूबाजूचे भयकारी वातावरण विसरण्याचा प्रयत्न करीत होता. सुशिलाची आज भेट होऊ शकली नाही. खरंतर रात्रीचीच गाडी पकडली असती तर सकाळी पोहचलो असतो. हळूहळू त्याचे खाडी पलिकडचे शेत येऊ लागले तसे पिकाच्या कापणीचा वास जाणवू लागला. आता झोडणीचा हंगाम असल्यामुळे खळ्यावर रात्री माणसे झोपायला येत असे त्यामुळे आता त्याला धीर येऊ लागला. रस्त्यावर मनुदादाच्या शेतावरच्या खळ्याकडे त्याने पाहिले भाताचे उडवे दिसले परंतु कंदिलाच्या प्रकाश कुठेही दिसला नाही.


खरंतर कुणीतरी तिथे असायला हवे होते. त्याने सिगारेटचे पाकीट फेकून दिले कारण दादा वहिनीला समजायला नको. आता गाव अवघ्या एक दिड किमी वर होतं. पुढे त्याला चालत असताना सीताकाकूंच्या खळ्यावर कंदिलाच्या प्रकाश दिसला. आपसूकच त्याचे पाय तिथे वळले. सीताकाकू तशी खाष्ट् पण त्यांच्याशी प्रेमाने वागे कारण सदा पूर्वीपासून मृदू स्वभावाचा मात्र विष्णुशी तिचे पटत नसे कारण तो स्वभावाने तापट होता, म्हणून त्याला फक्त हाक मारून गावाची खबरबात विचारावं. पण जवळ जाताच त्याला दिसली लुगडे नेसलेली सीताकाकू.


नेहमी रात्री विष्णु खळ्यावर असायचा कधी रात्री सीताकाकू आली नव्हती. त्याने जवळ जाऊन खाकरात विचारले, काय काकू आज विष्णुदादा नाही आला, खळ्यावर?


त्यावर तिने सदा ला विचारले, आलास का सदा. बस बाबा, कसं चाललंय तुझे. अरे विष्णूला बरे नाही व आज झोडणी झाली. हल्ली चोरांचा भरोसा नाही म्हणून स्वतःच आले राखायला. पुढे मनूदादाच्या शेतावरही कोणी नाही. आमचा गंग्यादादाही आलाय की नाही. अरे येतील थोडे उशिरा झोडणीमुळे थकले असतील मी जेवून पुढे आले. अरे बस तरी...


तो तसाच गोणपाटावर बसला. त्याला बरे वाटले कारण प्रवासाचा शीण होता. यंदा काय लग्नाबिग्नाचं विचार आहे की नाही करून टाक बाबा लवकर, दादा वहिनीला आधार होईल कामाला.


काकू विचार तर आहे पण... तो अडखळला त्याला वाटले, दुसऱ्या जातीच्या मुलीबद्दल म्हणजे सुशिलाबद्दल काकूंकडे मन मोकळे करावे, असा विचार त्याने मनाशी केला व म्हणाला काकू आपल्या घरात दुसऱ्या जातीची मुलगी चालेल का गं? म्हणजे एकदम हलक्या जातीची नाही पण शिकलेली.


अरे का नाही चालणार चालेल की आता कोण जातपात बघतोय कोण आहे की काय रे सदा जुळवलंस वाटतं तिकडे... त्याला काकूंच्या मोकळ्या विचारांचे कौतुक वाटले.


विडी वाळून देऊ का? सिगारेट पितोस वाटतं... तो दचकला. त्याला वाटलं काकुला कसे कळलं. काकू हसली जवळ बसला तेव्हा सिगारेटच्या वास जाणवला म्हणून म्हटलं, सदा कसनुसं हसला वं म्हणाला दे वाळून काकू पण दादाला नको सांगूस हं. काकूने मस्त तंबाखू टाकून विडी वाळली व सदाला दिली. सदाला काकूंचे हात एकदम थंड लागले शेतावर थंडी होती व काकू घोंगडीसुद्धा घेऊन आली नव्हती. त्यामुळे काकुला थंडी लागलेली दिसते. हळूहळू झुरके मारता मारता सदाने आपले मन काकूंकडे मोकळे करायला सुरुवात केली.


सुशिला कशी चांगली मुलगी आहे समजूतदार आहे.


मी सांगीन समजावून गंग्या व नर्मदेला. मनात इच्छा असेल तर टाकू उरकून एकदाचे? होईल सगळं व्यवस्थित गावाची खबरबात घेऊन सदा काकूंचा निरोप घेण्यासाठी उठला.


काकू निघतो आता कदाचित दादा व मनुदादा रस्त्यातच भेटतील वाटतं...


बरं निघतोस म्हणतो, निघ बरं. त्याने काकुकडे पाहिलं काकूंच्या डोळ्यांत खिन्नता होती. काकूंचा निरोप घेऊन निघाला सहज वळून पाहिले त्याच्याकडे वळून पाहत होती. त्याने पुन्हा हात केला.


काकू येतो गं व तो झपाझप पावले टाकीत चालू लागला. दोन चार मिनिटात त्याने गावच्या दंडात प्रवेश केला. दुतर्फा झाडे असलेला तो दंड तसा दुपारी सुद्धा अंधारलेला असायचा पण सदाला आता गावचे दिवे दिसू लागल्यामुळे धीर आला होता. तो गावच्या वेशीत प्रवेश करता झाला. कुत्र्यांच्या रडण्याचा आवाजामुळे त्यांच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. पुढे तुकारामाचे घर व नंतर मनुदादाच्या अशी घर लागली. सगळीकडे सामसूम दिसली पुढे आपले घर व समोर सीताकाकूचे घर. सीताकाकूंच्या घरी ओट्यावर बरीच माणसे बसलेली होती. त्यात मनुदादा, गंग्यादादा, सित्याकाका तसेच माजघरात वहिनी व इतर गावातील महिला ही दिसत होत्या. तसा तो तिथेच वळला. ओट्यावर बॅग ठेवून पायऱ्या चढला व त्याने गंग्या दादाला हाक मारली व बसला सर्वजण दुःखात दिसत होते.


सदा तुला कसे कळले? मनुदादाने विचारले.


त्याला नाही कळवलं तो आज येणारच होता, असे गंग्यादादा म्हणाला.


अरे, काय झालं की तुम्ही सर्व असे दुःखात आहात?


अरे सदा आपली सीताकाकू सकाळी अचानक छातीत दुखू लागले. डॉक्टरकडे ही जाणार होतो इतक्यात अचानक पुन्हा छातीत जोराची कळ आली आणि ती आपल्याला सोडून अनंतात विलीन झाली. सर्व सोपस्कार करताना खूप कालावधी लागला त्यामुळे तुला कळवळा आले नाही. हे ऐकताच छातीत धडधडू लागायचं त्याच्या हातातली बॅग खाली पडली. त्याच्या डोळ्यासमोर खळ्यावरील प्रसंग उभा राहिला. त्याच्या छातीतील धडधड वाढली त्याचे डोळे विस्फारले गेले आणि तो क्षणार्धात धाडकन खाली कोसळला. गंगाधर व नर्मदा धावतच त्याच्याकडे झेपावले.


सदा sssसदाsss काय झाले?


गंगाधरने सदाची नाडी पाहिली पण नाडी तर सोडाच ठोकेही लागत नव्हते. त्यांचा श्वासही बंद झाला होता. नर्मदा व गंगाधरने हंबरडा फोडला. सदाsss सदाsss सदा विस्फारलेल्या डोळ्यांनीच गतप्राण होऊन पडला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama