Neha Sankhe

Others

2  

Neha Sankhe

Others

खट्याळ नाटाळ बालपण

खट्याळ नाटाळ बालपण

7 mins
557


जीवन,सदा ,अनु,विष्णु, मनू ही गॅंग शाळेत जाण्याच्या वाटेवर धमाल करतच जात असे. प्राथमिक शिक्षणासाठी ते खारगावच्या शाळेत जात असे .खरतरं ही गरीब शेतकर्यांची पोरं फक्त जीवनच्या वडिलांचे दुकान होते पण चालायचे कमी परंतु सगळ्या गोष्टींमध्ये आनंद मानायची सवय, काहीही गोष्ट असली तरीही त्यात आनंद मिळवायचा. खेळायला चेंडू नसेल तर रबराचे नरसाळे घेऊन त्याला फडकी गुंडाळून त्याला चेंडू बनवून खेळायचे. यात नेता होता जीवन सडसडीत बांधा,डोक्यावर कधीही न वळणारे केस, सावळा वर्ण व चेहऱ्यावर कायम कुतुहलयुक्त हावभाव असा हा अवली यांचा नेता. शाळेची वेळ ११.३० ची परंतु हे सगळे १० वाजता घरातून निघायचे चालण्याचे अंतर तीस पस्तीस मिनिटांचे होते, परंतु हे टवाळखोर टवाळकी टवल्या करीत जात असे त्यात ह्यांना वेळ होत असे.आज दासगावच्या मुख्य रस्त्यावरून ते हरिजन वाड्यापर्यन्त पोहेचले तोच त्यांना बाबु दिसला. बाबू त्यांच्या गावचाच वयाने थोराड पण लहान मुलांमध्ये मिसळणारा त्यांचे केस कानावर असायचे.कारण मागे एकदा त्यांचे त्यांच्या चुलत भावाशी कडाक्याचे भांडण झाले .दोघांची जबरदस्त हाणामारी झाली तेव्हा त्याचा चुलतभाऊ त्याच्या कानाला चावला त्यांच्या कानाचा तुकडा पडला एवढा कडकडीत चावा त्याने घेतला होता . तिथे जीवन होता सहज गंमत म्हणून मारामारी बघणारे अनेकजण होते.त्याने धावत येऊन सगळ्या गावात वेगवेगळी बातमी पसरवली होती. पण एवढ्या गोष्टीत तथ्य होते की बाबू चा कान तुटला होता.त्यामुळेच आता बाबू कानावर केस वाढवीत असे.हा बाबू जीवनला रस्त्यात भेटल्याने जीवनने त्याला विचारले “ काय बाबुदादा कुठे चाललास न्हाव्याकडे का? आज मुहूर्त खूप चांगल आहे केस कापून घे.” यावर बाबू चिडला,थांब तुझी चांगलीच खोड मोडतो, असे म्हणताच जीवन धूम पळाला. बाकीची मुलेही हसतच पुढे पळाली. थोडं अंतर गेल्यावर हनुमानाचे मंदिर लागायचे तिथे थोडीशी मुले बसायची व नंतरच शाळेत जायची.नेहमीप्रमाणे ते हनुमान मंदिरात गप्पा मारीत बसले व नंतर शाळेत प्रार्थनेच्या वेळापर्यन्त हजर झाले.सगळ्याचे वय १२ ते १५ वर्ष त्यात विष्णूला तर मिसरूडही होती म्हणून सगळेजण त्याला मिशीवर पीळ मारून दाखवून “काय हो पाटील बरं हाय का?”असे विचारायचे व विष्णू खूप चिडायचा व सगळ्यांना अस्सल गावरान शिव्यांची लाखोली वाहायचा.शेवटी कंटाळुन विष्णूने एके दिवशी वडिलांच दाढीच सामान घेऊन मिशीच साफ केली.धीटपणे त्याने मिशी साफ केली खरी पण आरशात पाहिल्यानंतर त्याच्या लगेच लक्षात आलं की चेहरा वेगळाच दिसतो.तरीही त्यादिवशी तो शाळेत गेला ,पण रस्त्यात सगळी मुलं त्याला बघून हसू लागली.विशेषतः जीवन तर त्याला खूपच हिणवू लागला.शेवटी विष्णू परत घरी जायला निघाला.पण जीवनने त्याला थांबवल व म्हणाला “अरे विष्णू वेड्या परत जाऊ नकोस त्यापेक्षा एक काम कर मिशीवर रुमाल ठेव व दाढ दुखतेय म्हणून सरांना सांग म्हणजे कुणाला संशय येणार नाही.”असे म्हणताच विष्णूला धीर आला व तो शाळेत गेला तरी वर्गात त्याला सावे सरांनी विचारलंच काय रे विष्णू रुमाल का नाकावर झाकून बसलायस. “सर दाढ खूप दुखतेय माझी असे विष्णू बोलला.

“अरे मगं घरी थांबायचं पण रुमाल ठेवुन काय दाढ दुखायची थांबणार आहे का?” काढ तो रुमाल .सरांची आज्ञा आता काय करणार. विष्णूने रुमाल काढताच वर्गातली सर्व मुले विशेषतः मुली सुद्धा फिदीफिदी हसू लागल्या. ते पाहून विष्णू खूपच चरफडला पण काय करावे त्याला सुचेना.सावे सर सुद्धा हसू लागले. ,”काय रे विष्णू काय एवढ्यातच साफसफाईची काय गरज नव्हती.” नाय सर तसं नाही असे म्हणून तो ओशाळला.एवढ्यावर प्रकरण संपल असतं पण अशा प्रसंगी जीवन शांत बसतो कसला, सर त्याच काय झालं माहिती आहे का हा आरशाच्या वरचा पावडरचा डबा काढत होता तेवढ्यात वरची त्याच्या वडिलांची दाढीची ब्लेड पडली व नेमकी मिशीवर त्याने वरचे केस कापले गेले मग ते खराब दिसत होते म्हणून त्याने सर्व मिशी काढली.सर्व वर्ग खो-खो हसू लागला.विष्णू बिचारा अजून वरमला. सरांनाही हसू आलं. पण त्याने जीवनला दटावल, “चूप बस रे.” नेहमी तुझी टवाळकी चालू असते. आज अश्या वातावरणात सावे गुरुजींनाही शिकवण्याचा कंटाळा आला व त्यांनी फळ्यावर “ मूक वाचन” असे लिहिले व छानपैकी बाबा कदमांची कादंबरी वाचत आरामात खुर्चीत बसले. सरांनी “मुकवाचन “ असे लिहताच ‘म’ हा ‘भ’ सारखा दिसत होता. ते पाहून जीवन आणखीन चेकाळला मध्येच उठला व म्हणाला , “सर विष्णूला एक लघुशंका आहे.” सर्व मुले हसू लागली.सॉरी सर , म्हणजे छोटीशी शंका आहे. सरांनी त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले.सरांनी पुढे काही बोलायच्या आतच तो म्हणाला सरयाच म्हणणं असे आहे की भुकवाचन म्हणजे नेमके काय?म्हणजे “ वाचनाची भूक वाढवायची की भूक लागल्यावर वाचावे.”सरांचा चेहरा लालबुंद झाला त्यांनी फळ्याकडे पाहिले तेव्हा त्यांना उलगडा झाला परंतु स्वतःची चूक कबुल करणार मग ते सर कसले.

ये इकडे तुला मुकवाचन म्हणजे काय ते समजावून सांगतो.त्यांनी विष्णूला बोलावले तो घाबरतच गेला बिचारा.आधीच मिशीकातरल्याने लाजला होता त्यात जीवनने संकटात टाकले होते. तो म्हणाला मी नाही विचारले जीवनने विचारले.पण ते ऐकून घेण्याच्या आत सरांनी त्याच्या पाठीत जाडजूड रुळाचा फटका हाणला.विष्णू कळवळला सर तरातरा खुर्चीत जाऊन बसले. विष्णू कळवळतच बाकांवर येऊन बसला तसा हळूच जीवन त्याच्या कानाशी येऊन बोलू लागला, “किती जोरात मारलं रे सरांनी.”विष्णूने रागाने त्यांच्याकडे पाहिलं व दुर्लक्ष केले. “अरे ठणकन आवाज आला बहूतेक तुझ्या मणक्यावर बसलेलं दिसतं, हाड मोडले असल्याची शक्यता आहे.” असं म्हणून जीवन त्याची पाठ हाताने चाचपू लागला त्याला जिथे मार बसला तिथे लागताच विष्णू कळवळला.बघ नक्कीच हाड मोडलेल दिसत. विष्णू खरोखरच घाबरला त्याने चाचरत अन्याला विचारले,” अरे अन्या खरचं काय रे ठणकन आवाज आला का?” “ हो अरे नक्की तुझे हाड मोडले असेल बघ.” अन्याने जिवनची री पुढे ओढली. तू आता मुख्याध्यापकाकडे तक्रार कर कदाचित हाड वैगरे मोडलं असेल तर औषधाचा खर्च करतील नाय तर घरुनही तुलाच मार पडेल.

विष्णू विचारात पडला खरेच आपली चूक नसताना आपल्याला मार पडला. तक्रार तर केलीच पहिजे. ती खरोखर मुख्याध्यापकाकडे जायचा विचार करू लागला. तास संपला तसा तो उठला व तडक मुख्याध्यापकांच्या दालनात जाऊन उभा राहिला.त्यांचे मुख्याध्यापक चौधरी सर तसे कडक शिस्तीचे, “ सर आत येऊ का?” हो ये.” काय रे काय हवंय तुला?” सर माझी एक तक्रार आहे. काय तक्रार व कुण्याविषयी. सर सावे सरांनी मला एवढे बोलून विष्णू अडखळला….. व पुन्हा धीर एकवटून म्हणाला सावे सरांनी मला मोठ्या रुळांनी मारलं व माझ्या पाठीचे हाड मोडलेलं दिसतंय.” खरंच की काय , दाखव शर्ट काढून. का रे पण का मारलं? सर पण माझी काही चूक नाही. सर तिथून चालले होते त्यांनी ऐकले व त्यांचे पाय आपसूक तिथे वळले. शर्ट काढल्यावर लालभडक वळ उठून दिसूं लागले.चौधरी सरांनी सावें सरांकडे तीव्र कटाक्ष टाकला. सावे सरांची मान आपसुक खाली गेली. त्यांनीही हात लावून पहिलं.हाड काय मोडल्यासारखं दिसतं नव्हतं पण मार बराच लागला होता. त्यानंतर अर्धा तास चौधरी सरांचे बोलण्याचे मोठयाने आवाज येत होते.मग खाली मानेने सावे सर दालनाबाहेर आले तेव्हा भिंतीला कान लावून जीवन ,अन्या व इतर मंडळी उभी होती.सरांनी रागाने पहिलं व थांबा पुन्हा बघीन कधीतरी असं काहीतरी पुटपुटत ते आपल्यावर्गाकडे वळले.असा हा अवखळ जीवन याच्या गंमतीजमती शारीरिक शिक्षणाच्या तासालाही सुरू असायच्या. पी.टी.तासाला पाटील सरांनी मुलांना ओळींत उभे केले तर जीवन उंच असल्याने मागे उभा असायचा.कारण क्रमवारी उंचीनुसार असायची मुलांना एक, दोन ,तीन या प्रमाणे कवायत प्रकार करावे लागत त्यात ही एक, दोन,तीन व चार असे मोजत असे यात चार नंबरवर खाली वाकायची कृती होती यात अन्याची पॅन्ट फाटली जीवनच लगेचच लक्ष गेले. कवायत प्रकार संपताच जीवनने लगेचच सरांना सांगितलं सर, अन्या” एक चांगला मल्लखांब पट्टू आहे की

काही सांगू नका.” हे ऐकताच सरांनी लगेचच अन्याला बोलावले.मुलींची रांग बाजुलाच असल्यानें व चड्डी फाटल्याने अन्या आधीच धास्तावला होता.तेवढ्यात पाटील सरांनी त्याला खांबाजवळ बोलावलं अन्याला काही सुचेना काय करावे ते .तरीपण सरांची आज्ञा पाळावी तर लागणारच.तो कसाबसा वाकडया चालीने पुढे गेला सरांना म्हणाला,”माझी तब्येत बरी नाही आहे आज सर तेव्हा मी आज काही मल्लखांब करू शकणार नाही.” पण जीवन अजूनही सरांना अन्या ने मल्लखांब करून दाखवावे म्हणून उकसवीत होता.शेवटी अन्या कंटाळला व सरांच्या कानाकडे जाऊन हळु

आवाजात म्हणाला सर माझी चड्डी फाटली आहे. मी मल्लखांब करायला गेलो तर माझी इज्जत जाईल.सरांनाही हसू आवरेना त्यांनी जीवनकडे पाहिलं. जीवन साळसूदपणे उभा होता एवढयात शाळा सुटल्याची घंटा झाली त्यामुळे जीवन सुटला.

दररोज दुपारच्या सुट्टीच्या वेळेस ही मंडळी खाण्यासाठी मारुती मंदिरात नेहमी जात असे .नेहमीप्रमाणे आजही ही सर्व मंडळी डबा खाण्यासाठी मारुती मंदिरात गेली .मारुती मंदिरात दुपारच्या वेळेस नीरव शांतता असे . मोठी शेंदूर फासलेली मारुतीची मूर्ती म्हणजे गावच्या लोकांसाठी मोठं श्रध्दास्थान होतं.पण फक्त शनिवारीच तिथे गर्दी असायची इतर दिवशी शुकशुकाट असायचा.त्यादिवशी मुलं मंदिराच्या आवारात शिरली व नेहमीप्रमाणे आपआपले डबे खोलून घोळका करून खाण्यास सुरवात करणार होते. कुणाकडे बटाट्याची भाजी तर कुणाकडे नुसती लसुणाची चटणी तर कुणाकडे वांगी टोमॅटो अश्या भाज्या होत्या.मात्र जीवनकडे आज मांसाहारी भाजी म्हणजे करंदीची भाजी होती .सगळ्यांना आज कडकडून भूक लागली होती.तेवढ्यात जीवन बोलला आपण सर्वजण रोज इथे जेवतो .मारुतीच्या समोर त्याला नैवद्य न दाखवता खातो त्यामुळे आपल्याकडे मारुती कसा रागावून बघतोय आपण मोठी चूक करतोय आपण सर्वानी रोज मारुतीला नैवैद्य दाखवायलाच हवा. सगळ्यांनी थोडी थोडी भाजी घेतली व पेपरच्या तुकड्यावर टाकली.जीवनने थोडी करंदी पण टाकली व मारुतीच्या पुढ्यात ठेवली पण त्याला पुन्हा काय वाटलं त्याने थोडी भाजी घेतली व मारुतीच्या उघड्या तोंडाच्या भागात लावली.अरे आपण जेवणार व मारुती उपाशी असं करून कसं चालेल असे म्हणत सगळी मंडळी जेवली.

 दुसऱ्या दिवशी शनिवार होता. नेहमीप्रमाणे जोशी भटजी शनिवारी सकाळी लवकरच मंदिरात आले व पाहतो तो काय मारुतीच्या पुढ्यात मच्छी व तोंडाजवळही करंदी लागलेली .तात्काळ भटजींनी गावांत धूम ठोकली.मारुतीच्या मंदिराची विटंबना ही बातमी गावात हा हा म्हणता वणव्यासारखी पसरली सगळा गाव मंदिराच्या बाहेर जमा झाला. गावात काही मुसलमान लोकांची घरे होती त्यांना या प्रकरणामुळे धास्ती वाटू लागली, की या प्रकरणाच्या रोख आपल्यावर येईल की काय? त्यात गंमतीचा भाग असाही होता की जीवनच्या वडिलांचे किराणा दुकान होत , व त्याचा पुढच्याच गल्लीत महंमदचे दुकान होत परंतु महंमदचं स्वभाव लाघवी असल्याने त्याच दुकान खूप चालायचं पण जीवनच दुकान काही विशेष चालायचं नाही.आता ह्या प्रकारांमुळे जीवनच्या वडिलांना उत्तम संधी मिळाली व त्याने गावकऱ्यांना चेतवायला सुरुवात केली. आज मंदिर बाटवलय उद्या अजून काही करतील .यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे .लोकांचे मनही आता त्यांच्या बाजूने झाले होते ,कारण वातावरण तसं होतं.शेवटी सगळ्यांनी या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी मुलांची चौकशी केली, काय रे मुलांनो शुक्रवारी कुणाला बघितलं का इथे? खरतरं मुले प्रथम घाबरली होती.पण जीवन वस्ताद होता त्याने ही संधी घ्यायची ठरवून सांगितले की शुक्रवारी नमाज असल्याने बरींच मुस्लिम मंडळी दुपारी इकडन जाताना व काहींना मंदिराच्या आवारात घुटमळताना आम्ही पाहिलं.त्यामुळे लोकं अजून चिडली व संशय बळावला व शेवटी सगळया प्रकरणाची परिणीती मुस्लिमांवर बहिष्कार रुपात क्साली व जीवनच्या वडिलांची दुकानांची बरकतही चालू झाली.


Rate this content
Log in