देवशोध
देवशोध
गोंडस चेहरा, गोरा वर्ण, काळेभोर केस, बोलके डोळे, सुंदर शरीरयष्टी असा हा वीस वर्षांचा मुलगा विजय खेळण्या-बागडण्याच्या दिवसात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असे. का कुणास ठाऊक पण विचार करायला लागल्यापासून त्याने देवावर कधी विश्वासच ठेवला नाही, कारणही कदाचित तसंच असावं. पण त्या दिवशी त्याच्या आयुष्यात घडलेल्या त्या तीन घटनांनी त्याची विचारसरणीच बदलली, त्याला त्याच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळाली. आजही तो दिवस आठवला की त्याला त्या दिवसाच्या सुरुवातीपासून सर्वच्या सर्व घटना डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात. साधारण आठ वर्षांपूर्वी उगवलेला तो रोजच्या सारखा दिवस. सकाळच्या कोवळ्या उन्हात पावले टाकीत विजय वाट तुडवत निघाला होता. समोरचा डोंगराकडे जाणारी ती वाट चालत, कोकिळेच्या मंजुळ स्वरांचा आस्वाद घेत, जसजशी पावले टाकीत होता तस तसा डोंगर एक एक पाऊल दूर जातोय असा भास त्याला होत होता. रस्त्याच्या कडेला सुंदर झाडांची रांगच रांग होती त्यावर बसलेल्या पक्षांनी सकाळ झाली म्हणूनच की काय किलबिल सुरू केली होती.त्या मोहक वातावरणात एखादी मंद,थंड झुळूक अंगाला स्पर्शून जाई. निसर्गाचं रूप न्याहाळत त्याच धुंदीत तो चालत होता. आज शनिवार होता आणि आईने त्याला मंदिरात जायला सांगितलं होतं त्याची इच्छा नसताना, कारण त्याला मंदिरातल्या त्या देवाचं इतरांप्रमाणे अजिबात आकर्षण वाटत नव्हतं.
मंदिरातल्या त्या देवाचं दर्शन घेण्यात त्याला काहीएक रस नव्हता. तो लहान असतानाच बाबा वारले त्याच्या आईने त्याला खूप प्रेम दिल, वाढवलं, तो आईला जेव्हा-जेव्हा विचारायचं कि बाबा कुठे आहेत तेव्हा तेव्हा आईने देवाघरी गेले असंच उत्तर दिलं. देवाघरी जाऊन बाबांना परत आणायचा विचार यायचा. पण कुठे आहे घर. सगळ्या छोट्या-मोठ्या मंदिरात जाऊन आला. त्या दगडाच्या मूर्तीकडे बघून, तिच्याशी बोलून, विनवणी करून बाबांना परत करण्याची विनंती केली पण ना कोणी बोलले ना त्या मूर्तीने कधी त्याला उत्तर दिलं. तेव्हापासून त्याचा आणि देवाचा वादच निर्माण झाला. त्या देवाला त्यांन कधी मानलच नाही कारण त्याला कधी देव भेटलाच नाही मग म्हणणार तरी कसं की देव आहे म्हणून,पण त्याचा त्याच्या आईवर खूप विश्वास होता, तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. म्हणूनच तिच्या आग्रहाखातर त्यानं मंदिरात जायचं ठरवलं. हार नारळासाठी पन्नास रुपये घेऊन आईने सकाळीच त्याला मंदिरात जाण्याचा घाट घातला होता. आणि त्याचसाठी तो ही मोहक वाट चालत होता. रस्ता कच्चा असल्यामुळे छोटे छोटे दगड होते, लहान खड्डे होते, कुठेतरी एखादा ठेच लागावी म्हणून समोरच्याची वाट पाहत डोकं वर करून उभा होता.
पण निसर्गाची किमया आणि ते सुंदर चित्र पाहण्यात गुंग असलेले डोळे त्या रस्त्याची दुरावस्था पाहायला तयार नव्हते. म्हणूनच की काय, त्या रस्त्याने त्याचा सूड घेतला आणि त्याच्या पायाला जोराची ठेच लागली. वेदना जशी अचानक डोक्यात गेली त्याचवेळी क्षणभर सुंदर दिसणारा तो नजारा अस्पष्ट दिसू लागला,डोकं गरगरलं,पक्षांची किलबिल, पानांची सळसळ,वाऱ्याची मंद झुळूक, कोकिळे चा मंजुळ स्वर, सारं काही क्षणभर थांबलं असच वाटलं. सगळच सुन्न झालं इतक्या जोरात त्याच्या पायाला ठेच लागली होती तो मटकन खालीच बसला. भोवतालच सगळ गोल गोल फिरतय असं वाटत होत. डोळ्यांवर अंधारी आली होती, घशाला कोरड पडली होती आणि त्याला पाणी प्यावंस वाटत होतं पण आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं अर्धी वाट चालून आला होता थोडावेळ खालीच बसून राहिला पण पायाच्या अंगठ्यातून अजूनही रक्त वाहत होतं. खिशात हात घालून रुमाल काढण्याचा प्रयत्न करत होताच इतक्यात त्याच्या पाठीवर कुणीतरी स्पर्श केल्याचं त्याला जाणवलं त्यांन खाली बसूनच मागे मान वळवली, तर एक पन्नास पंचावन्न वर्षांचे आजोबा होते. त्यांनी त्यांच्याकडे असलेली पाण्याची बाटली त्याच्याकडे दिली,त्यांनही बाटली घेऊन लगेचच एक पाण्याचा घोट घेतला तेव्हा कुठे त्याला तरी तरी आली.
रस्ता बघून चालायचं ना पोरा.
बघ किती रगत गेल !
दाखव बघू जरा,
कुठे चालला वता रं ?
अंगठा फुटला नारं,
कसली घाई व्हती रं ?
बोलता बोलता त्या वृद्धाने आपल्या धोतराची किनार फाडली आणि त्याच्या पायाला बांधली सुद्धा. तो बघतच बसला ना ओळख ना पाळख कोण कुठला माणूस त्याला इतकी काळजी का वाटावी?
आई कुठे गेला तुझा देव?
आला का माझ्या मदतीला, त्यानं मनाशीच म्हटलं.
लोक का त्या देवाचा धावा करतात कुणास ठाऊक. त्या वृद्ध आजोबांनी बांधलेल्या कापडाच्या तुकड्यावर हळूच बोट लावत, वेदनेचा अंदाज घेत विजय उठला, बाबांना नमस्कार करत आभार व्यक्त केले.
त्यांनी पुन्हा विचारलं, कुणीकडे निघालाय पोरा?
मी मंदिरात चाललोय. सावकाश जावा रस्ता खड्ड्याचा हाय ना. तुम्ही कुठं चालले बाबा?
शेतावर जातोया लय येळ झाली, जावा हळूहळू अन् तो वृद्ध निघूनही गेला.
पण विजय मात्र विचार करत बसला त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत, क्षणात ती व्यक्ती चालता चालता दिसेनाशी झाली विजयही देवाला दोष देत पावले टाकत पुढे निघाला. अजूनही वेदना होत होत्या चालता चालताच अंगठा जमेल तसा वर करण्याचा प्रयत्न करत लंगडत लंगडत चालण्याचा प्रयत्न करत होता पण त्या वृद्ध बाबां च्या आपुलकीच्या बोलण्याने दुखणं थोडं हलकं झालं होतं मनाशीच म्हटलं आई ज्या देवाच्या दर्शनाला चाललोय त्याच्या वाटेत बघ कसं घडलं पण तुझा देव नाही आला मदतीला तो भला माणूस कुठून आला कोण जाणे, मनातल्या मनात त्याची बडबड सुरू होती आणि त्या वेळेत तो मंदिराच्या परिसरात पोहोचला.
समोरच मंदिराचा कळस दिसत होता. त्यावर फडकणारा भगवा झेंडा बघून अंगात चैतन्य भरल्यासारख वाटत होतं. लोकांची ये-जा सुरू होती काही लहान मुले-मुली तिथल्या मातीमध्ये खेळत बागडत होती, आजूबाजूला नारळ, हा , फुलं, अगरबत्ती यांची दुकाने सजली होती. त्याला कधी न भेटलेला देव या लोकांना रोजच भेटून जातो की काय असे त्यांची लगबग बघून वाटत होतं. दोन-चार भिकारी मंदिराच्या पायरीवर उपडी मांडी घालून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे केविलवाण्या नजरेने बघत होती. विजयला थकवा जाणवत होता म्हणून त्यानं आधी काहीतरी खायचं ठरवलं आणि मग मंदिरात जायचं. बाजूलाच एक चहाचं हॉटेल दिसलं आधी पोटोबा करावा हा रोजच्यासारखा विचार आजही त्याच्या मनात आला आणि त्याने हॉटेलात जाण्याचा निर्णय घेतला.
हॉटेलात शिरुन चहा आणि बिस्कीटची ऑर्डर देऊन तो समोरच्या खुर्चीवर बसला. पाच मिनिटांत एक सात-आठ वर्षांचा मुलगा चहा-बिस्कीट घेऊन त्याच्यासमोर उभा राहिला. विजयने इशाऱ्यानेच त्याला टेबलावर चहा ठेवायला सांगितला. त्यांनही मान हलवून, गोड हसून टेबलावर चहा ठेवला. चहात बिस्कीट टाकतो न टाकतोच समोर कपबशी फुटल्याचा आवाज झाला. तसं काऊंटरवरचा माणूस काउंटरवर असलेल्या माणसाच्या बिलाचे पैसे न घेता तावातावाने त्या मुलाजवळ गेला. दोन-तीन शिव्या त्याच्याजवळ जाण्याआधी झाडल्या होत्या. तिथे जाऊन त्याने अजून बडबड केली ती थांबायचं नावच घेत नव्हती. मात्र तो लहान गोंडस मुलगा अगदी शांत होता. डोळे भरून आले होते पण तरीसुद्धा डोळ्यांवर हात न फिरवता दोन्ही मुठी दाबून तो सरळ उभा होता. सगळ्या शिव्यांचा साठा संपल्यावर त्या माणसाने त्या लहान मुलावर हात उचलला तो त्या मुलाला मारण्याच्या तयारीत असताना त्याचा वर गेलेला हात त्या टेबलावर असलेल्या माणसाने वरच्यावर पकडला.
अहो कशाला मारतय त्याला?
हे काय वय आहे का त्याच कामाचं?
आणि हे घ्या त्या फुटलेल्या कप बशीचे पैसे. जाऊ द्या त्याला नका मारू.
विजय क्षणभर त्या मुलाकडे बघत होता त्याच्या डोळ्यात पाणी होत त्याला खूप वाईट वाटलं विजय निघाला पण त्या मुलाचा हिरमुसलेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता पुन्हा एकदा त्या निर्दयी देवाची आठवण झाली. आज असं काही घडत होतं की प्रत्येक गोष्ट त्या देवाच्या विरुद्ध
घडत होती आणि आज विजय ला देवावर आगपाखड करायला पुरेपूर संधी मिळाली होती. चेहऱ्यावर हात फिरवून तो मंदिराच्या दिशेला निघाला लंगडत लंगडत मंदिराच्या पायऱ्या चढत होता. आईने दिलेले पन्नास रुपायांमधून पंधरा रुपये संपले होते पस्तीस रुपये मध्ये हार-नारळ घेऊन मंदिरात प्रवेश करायचा विचार होता. त्याच्या समोरच पायरीवर दुकान थाटून बसलेल्या एका माणसाजवळ गेला आणि नारळ-हार घेण्याच्या तयारीत होता तेवढ्यात त्याला एक हाक ऐकू आली. एक भिकारी पायरीवर बसून भीक मागत होता पण कोणीही त्याला भीक घालत नव्हते. आजूबाजूचे तीन-चार भिकारी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे केविलवाण्या नजरेने बघत होते पण कोणालाही त्यांची दया येत नव्हती. सगळेच बोलतात देवानं माणूस बनवला मग त्याला माणूसपण द्यायला विसरला की काय? काय फायदा त्यांना स्वतःला माणूस म्हनवून घेण्याचा. जर दुसर्याचं दुःख दिसतं, नाही वेदना कळत, नाही एखाद्याची गरज दिसत नाही तो कसला माणूस.
देवाला सोन्याचे दागिने महागडे, हार, पेढे देणारे हे श्रीमंत लोक भिकाऱ्यांकडे मात्र पाठ फिरवत होते. मंदिरात येताना आपल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर थोडासाही डाग लागता कामा नये अशी अपेक्षा ठेवून येणारे खोटी प्रतिष्ठा कुठपर्यंत जपणार? जगण्याचं महत्त्व कधी कळणार या लोकांना आणि तो देव या सगळ्या नाटकाच्या तालमी रोज पाहतो मग त्याला नाही का वाटत? त्यांचे मनपरिवर्तन नाही का करता येत?
हजारो-लाखो गरजू लोकांना ज्यांना मदतीची गरज आहे ते उपाशी मरतात आणि आपली खोटी प्रतिष्ठा जपणारे हे इज्जतदार श्रीमंत लोक मात्र हजारो लाखो रुपये आपल्या मौजमजेसाठी उधळतात आणि त्या देवाला महागडे दागिने देत असतात म्हणूनच की काय तो देवही लाच घेतल्यासारखा गप्प राहतो.
काय गूढ आहे हे कळायला मार्ग नाही पण आज या देवाकडे एकच मागणे मागायचे त्याने ठरवलं. तो रागातच त्या नारळाच्या दुकानातून बाजूला झाला त्या भीकाऱ्यांकडे बघायला लागला आता मात्र त्याला मात्र खुपच वाईट वाटलं त्यांन पुन्हा एकदा मान वळवून नारळ हार बघितला हातातले पैसे बघितले आणि दुसऱ्याच क्षणी त्या भिकाऱ्यांचे केविलवाणे चेहरे. नारळ घेण्यापेक्षा समोर असलेल्या उपाशी आणि गरजू लोकांना ज्यांना एका रुपयाच मूल्यही किती मोठं वाटतं त्यांना मदत केलेली काय वाईट! म्हणून त्याने त्याच्याकडे असलेले ते पस्तीस रुपये त्या भिकाऱ्यांमध्ये वाटून टाकले, त्यांनाही पैसे मिळाल्याबरोबर खूप आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर त्याला बघायला मिळाली. त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिला, त्यालाही समाधान मिळालं, आपल्याला होईल तितकी मदत गरजवंतांना करायची असं मनोमन त्याने ठरवलं आणि मंदिराच्या आत प्रवेश केला.
रिकाम्या हातानच देवाजवळ जाऊन उभा राहिला. आठ-दहा माणस हार पेढे नारळ ठेवून हात जोडून देवाकडे काहीतरी मागत होती त्यांनही थोड्या वेळापूर्वी देवाकडे काहीतरी मागायचं ठरवलं होतं आणि रिकाम्या हातानं त्यान मनाशीच हात जोडून म्हटलं देवा काय रे तुझा खेळ? कोणावर किती संकट येतात किती दुःख असतं त्यांना मदत करायची सोडून इथं कारे बसलाय? ज्यांना गरज आहे त्यांचा विचार का नाही करत? सांग ना? गप्प का आहेस? बरं तू खरचं असशील ना तर मला तुझ्याकडे एक मागणं मागायचे आत्ता या क्षणाला मला तुझं रूप दाखव फक्त एकदाच यानंतर काही मागणार नाही मी, कसा दिसतोस तू नेमकं काय रूप आहे तुझं, एवढंच बघायचे मला. माझं हे एकच मागणं पुरं कर असं म्हणून त्याने डोळे मिटले आणि हात जोडून देवापुढे उभा राहिला आणि काय आश्चर्य त्याच्या बंद डोळ्यांसमोर वेगळीच चित्रं उभी राहिली.
सकाळी त्याचं दुःख हलकं करणारा तो वृद्ध माणूस त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता. मंदस्मित करत त्याच्याकडे बघत होता. पुढच्याच क्षणाला त्या तुटलेल्या कपबशीचे पैसे देणारा तो भला माणूस त्याला दिसला आणि तिसरं चित्र बघून तो स्वतः थक्क झाला कारण तिसरं चित्र त्याच स्वतःचं होतं त्या भिकाऱ्यांना पैसे देणारा तो स्वतःलाच स्वतःच्या डोळ्यासमोर पाहत होता. त्याने झटकन डोळे उघडले कारण आता त्याचे डोळे खऱ्या अर्थाने उघडले होते आणि खऱ्या देवाचं दर्शन त्याला झालं होतं. त्यानं पुन्हा एकदा देवाला नमस्कार केला आणि समाधानाने परतीचं पाऊल टाकलं कारण त्याला देव दिसला होता. तो कुठे राहतो, काय करतो, कशाप्रकारे आपल्यासमोर येतो ते सारंच काही त्याला त्या तीन घटनांनी दाखवलं होतं. पण खऱ्या अर्थाने देव दिसायला, त्याला समजून घ्यायला थोडा वेळ मात्र लागला होता. पण आता त्याला जे कळायचं होत ते कळलं. देवातला माणूस आणि माणसातला देव त्याने प्रत्यक्ष पाहिला.
