Kalyani Deshpande

Crime

4.0  

Kalyani Deshpande

Crime

चोरीचे रहस्य

चोरीचे रहस्य

16 mins
229


उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विदर्भात माझ्या काकांच्या गावी गेलो होतो. काकांना दोन अपत्ये आहेत. माझा चुलतभाऊ माझ्याच वयाचा आहे आणि माझी चुलतबहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे.

तिचे लग्न झाले आहे, तिला एक मुलगा आहे. सुट्टीमध्ये ती पण मुलाला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे काकांकडे आली होती. रोज आमचा वेळ गप्पांमध्ये,आंबे,आईस्क्रिम, कुल्फ्या खाण्यात कसा जात असे कळतही नसे.

त्या दिवशी असेच आम्ही सगळे आमरस-पुरी खाऊन दुपारी कुलर च्या गार हवेत झोपलो होतो. जेमतेम तासभर झाला असेल की मला काका-काकूंच्या बोलण्याच्या आवाजामुळे जाग आली. काकू,काकांना सांगत होती

"अहो ऐकलं का! पांडे काकूंकडे चोरी झाली!"

"ककाय!! कधी??",काका

"अहो आत्ता भरदुपारी झाली. ते तासभरासाठी बाहेर गेले होते तेव्हा कशी कोण जाणे पण चोरी झाली.",काकू

"आपण तर घरीच आहोत आपल्याला तर कोणी आलेलं दिसलं नाही किंवा काही आवाजही आला नाही.",काका

"कुलर च्या आवाजात काही कळलं नसेल आपल्याला पण आश्चर्य आहे असं कसं काय कोणी एका तासात येऊन चोरी करून जाऊ शकते? चोराला कसं काय माहीत की ते बाहेर जाणार आहे म्हणून",काकू

"लक्ष ठेवले असेल कोणीतरी",काका

अपार्टमेंट मध्ये सगळ्यात तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पांडे काकूंकडे चोरी झाली.एका तासासाठी पांडे काका व काकू बाहेर गेले असताना भरदुपारी त्यांच्या घरात चोरी झाली. मला वाटलं,कमाल आहे,दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हायला लागल्या. एका तासात चोरी करून चोर पसार, फारच फास्ट दिसतो चोर.

तेवढ्यात आमच्या वरच्या फ्लॅटमधील कुळकर्णी काकू घाईघाईने घरात शिरल्या आणि काकूंना म्हणाल्या

"बघा बाई! पांडे काकू रोज बाहेर जाताना माझ्याकडे किल्ली ठेवतात पण आज तासभरासाठीच जायचं होतं म्हणून त्यांनी किल्ली ठेवली नाही. पण त्यांना तर माझ्यावरच संशय येईल न "

"का बरं? तुमच्यावर का म्हणून संशय येईल?

"अहो म्हणजे तुम्हाला माहीत नाही का? चोराने कुलूप न फोडता चोरी केलेली आहे. बाहेरच्या दाराचे कुलूप जसे च्या तसे आहे.",कुलकर्णी काकू

"ककाय?? कमाल आहे बाई! म्हणजे चोराजवळ डुप्लिकेट किल्ली असणार!",काकू

"म्हणून तर म्हणते त्यांना असं न वाटावं की मीच चोरी केली",कुळकर्णी काकू

"नाही हो त्यांना असं कसं काय वाटेल? पांढरपेशे लोकं आपण. आपण असं करणं शक्यच नाही. तुम्ही उगीच काळजी करू नका. पोलीस काय तो तपास लावतीलच",काकू

पांडे काकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी जागेची तपासणी केली. घराच्या मुख्य दाराचे कुलूप जसे च्या तसे होते.

कुलूप न फोडता चोराने चोरी केली होती. आतलं लाकडी कपाट फोडलं होतं,एक सोन्याचा नेकलेस सेट,दोन गोफ ,२ अंगठ्या ,२ पाटल्या असा जवळपास १५० ग्राम सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.

पांडे काकुंच्या नात्यात लग्न होतं दोन दिवसानंतर म्हणून लॉकर मधून त्यांनी दागिने आणून ठेवले होते. पोलीस विचारात पडले. पांडे काका-काकू डोक्याला हात लावून बसले.

"कुलूप जसं च्या तसं आहे म्हणजे चोराजवळ घराची डुप्लिकेट किल्ली होती, असं वाटते. तुमचा कोणावर संशय आहे? तुम्ही कोणाकडे बाहेर जाताना किल्ली ठेवता का ?",पोलीस

थोडा वेळ विचार करून पांडे काका म्हणाले,"असं काही सांगता येणार नाही साहेब,कोणावर संशय घेणार,काही कळत नाही,बरं एवढे दागिने आमच्या कडे आहेत हे आम्ही कुठे बोललो पण नाही मग असं एकदम कसं झालं माझी तर बुद्धीच कुंठित झाली.

आम्ही रोज आमच्या खालच्या फ्लॅट मधील कुलकर्णींकडे किल्ली ठेवतो पण आज एक तासासाठीच जायचं होतं म्हणून आम्ही तिथेही किल्ली ठेवली नव्हती. आणि तसंही कुलकर्णी असं काही कशाला करतील?",पांडे काका

"बरं मला एक सांगा तुमच्याकडे कोण-कोण असते,घरी नेहमी कोण-कोण येते ?",पोलीस

"तसं तर कोणी फारसं येत नाही साहेब,आमच्या घरात आम्ही दोघचं राहतो,मी व माझी बायको कारण माझा मुलगा मुंबईला शिकायला आहे.",पांडे काका.

"आमच्याकडे रोज फक्त एक मोलकरीण येते भांडे घासायला आणि झाडूपोछा करायला, पण ती दोन दिवस झाले आली नाही,आजारी आहे म्हणून. ",पांडे काकू

थोड्या वेळाने पांडे काका म्हणाले,

"आम्ही मधून मधून आमच्या मुलाजवळ मुंबईला जातो तेव्हा एक माणूस आहे खंडूभाऊ म्हणून त्याला आम्ही आमच्या घराचं रक्षण करण्यासाठी हॉल मध्ये झोपायला सांगतो,तेव्हा फक्त बैठकीची खोलीच तो वापरू शकतो बाकीच्या खोल्या कुलूपबंद असतात.तो व्यवसायाने  इलेक्ट्रिशियन आहे,इलेक्ट्रिक कामांसाठी आम्ही त्याला बोलावतो,गेले चार वर्षं मी त्याला ओळखतो."

"म्हणजे तुम्हाला मोलकरीण आणि खंडूभाऊ वर संशय आहे का?",पोलीस

"तसंच काही नक्की सांगता येणार नाही",पांडे काका

"काही तरी सूत्र मिळाल्या शिवाय कसा तपास करता येणार? माझ्या मते हा खंडूभाऊ किंवा तुमच्याकडे येणारी मोलकरीण त्यांच्यापैकीच कोणीतरी चोरी केल्याची शक्यता आहे. पांडे साहेब ,त्यामुळे तुम्ही मला त्या तुमच्या खंडूभाऊ चा आणि तुमच्या कडे येणाऱ्या मोलकर्णीचा पत्ता द्या तिथे झडती घ्यावी लागेल मला,फक्त याबद्दल कुठे बोलू नका",पोलीस

पांडे काकांनी खंडूभाऊ आणि सखुबाई चा पत्ता आणि फोन नंबर पोलिसांना दिला. तो घेऊन ते पुढील तपासासाठी गेले.

सगळ्या फ्लॅट्समधील सदस्य ग्राउंड फ्लोअर ला कॉमन एरिया मध्ये जमले होते. तिथे जाता जाता पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली.

सगळ्यात आधी त्यांनी फर्स्ट फ्लोअर वरच्या फ्लॅट पासून म्हणजे माझ्या काकांपासून सुरुवात केली.

"आपलं नाव समजू शकेल का?",पोलीस

"मी जयवंत कल्याणी! ",काका

"तुम्ही कोणाला अपार्टमेंटमध्ये येताना जाताना बघितलं का ? कोणी संशयास्पद वगैरे?",पोलीस

"नाही आम्ही घरात होतो आणि दुपारची उन्हाची वेळ असल्याने कुलर सुरू होता त्यामुळे काहीच आवाज आला नाही.",काका

त्यानंतर त्यांनी 2nd फ्लोअर वरच्या श्री व सौ कुलकर्णींची चौकशी केली.

"हो तुमचं बरोबर आहे नेहमी ते आमच्याकडे किल्ली ठेवतात पण आज काही त्यांनी किल्ली ठेवली नाही. आणि आम्ही कोणालाही वर येताना बघितलं नाही",कुलकर्णी काकू

त्यानंतर त्यांनी सगळ्यात वर 4th फ्लोअर वर राहणाऱ्या भाले काकुंची चौकशी केली.

"हो मी खालून वर माझ्या घरात येताना जिन्यात एक इसम येताना बघितला होता त्याच्या हातात एक पार्सल होते मला वाटलं कोणी कुरिअर बॉय असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. बाकी मला काहीच आवाज ऐकू आला नाही.",भाले काकू

"ठीक आहे तुम्ही बघितलेल्या इसमाचे वर्णन करून सांगा हा आमचा स्केच काढणारा त्यानुसार त्या इसमाचे स्केच काढेल.",पोलीस

"बरं सांगा नाक कसं होतं?"

"पोपटासारखं!"

"डोळे कसे होते ?"

"घुबडासारखे"

"कान कसे होते?"

"माकडासारखे"

"अहो मॅडम पूर्ण प्राणिसंग्रहालय भरवता का इथे? जरा नीट सांगा. ह्या स्केच मुळेच पकडल्यागेला तर पकडल्या जाईल चोर",स्केच काढणारा

"बरं बरं आता मला जसं आठवते तसा मी नीट सांगण्याचा प्रयत्न करते.",भाले काकू

त्यानंतर भाले काकू वर्णन करू लागल्या आणि तो स्केच काढू लागला. तोपर्यंत पोलिसांनी अपार्टमेंटसमोरच्या दुकानाकडे मोर्चा वळवला.

"काहो ह्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये चोरी झालेली तुम्हाला माहीत असेलच नाही का?",पोलीस

"हो गर्दी बघून चौकशी केल्यावर कळलं मला. "

"तुम्ही कोणाला अडीच ते साडेतीन दरम्यान अपार्टमेंटमध्ये येताना बघितलं का?",

"हो साहेब! दुकानात दुपारच्या वेळेस जास्त गिर्हाईक नसतात त्यामुळे माझं लक्ष होतं. साधारण पांडे काका काकू बाहेर गेल्यावर अर्ध्या तासाने एक कळकटलेला शर्ट घातलेला इसम एक कळकटलेली थैली घेऊन आला होता.",दुकानदार

पोलीस इन्स्पेक्टरचे डोळे चमकले. त्यांनी पुढे विचारलं," तुम्ही त्याचं नीट वर्णन करून सांगू शकता का?"

"हो हो का नाही! मला स्पष्ट आठवतोय तो",दुकानदार

भाले काकूंनी सांगितलेल्या इसमाचे चित्र काढून झाल्यावर. चित्रकार दुकानदाराने वर्णन केलेल्या इसमाचे चित्र काढू लागला.

"राजेश हे स्केच काढणं झाल्यावर तू पोलीस ठाण्यात पोच तोपर्यंत मी जरा ह्या पांडेंकडे काम करणाऱ्या खंडूभाउ आणि सखूबईकडे चौकशी करून येतो.",पोलीस इंस्पे चित्रकाराला म्हणाले.

एक दोन दिवसांनी तपासाच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पांडे काका पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्यांच्यासोबत माझे काका सुद्धा गेले होते.

तिथून आल्यावर काकांनी जे सांगितलं त्यावरून मला कळलं की पोलिसांना तपासाअंती खंडूभाऊंकडे काहीच भेटले नाही तसेच मोलकर्णीकडे सुद्धा काहीच सापडलं नाही पण मोलकरणीने ती आजारी असल्याचं खोटं सांगितलं होतं. पोलिसांनी खंडूभाऊ आणि मोलकरणीला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. पोलिसांनी सर्वतोपरी खंडूभाऊ आणि मोलकरणीकडून खरं काढण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघंही आम्ही निर्दोष आहोत आणि आम्ही चोरी केली नाही असंच सांगत होते.

पांडे काकांच्या घरात सुद्धा त्यांना कोणताच क्लू, बोटांचे ठसे मिळाले नाही. पोलिसांची निराशा झाली.

दुकानदाराने सांगितलेल्या आणि भाले काकूंनी सांगितलेल्या इसमाचे स्केच घेऊन पोलिसांचा तपास सुरू होता.

एक दोन दिवसांनी पोलिसांनी एका इसमाला अपार्टमेंटमध्ये पकडून आणले. पोलिसांनी दुकानदाराला सुद्धा बोलावून घेतले.

"सांगा बरं त्यादिवशी आलेला इसम हाच होता का?",पोलीस इंस्पे

"हो हो साहेब हाच होता ह्याच्या डाव्या गालावरील चामखीळ मुळे मला हा चांगलाच लक्षात राहिला.",दुकानदार

"सांग रे कशाला आला होता तू इथे आणि कोणी बोलावलं होतं तुला?",पोलीस

सगळे कॉमन पॅसेज मध्ये जमले होते.

"मला एका मॅडम ने बोलावलं होतं साहेब! त्यांच्या कापटाची किल्ली हरवली होती म्हणून त्यांनी कापटाचे कुलूप तोडण्यासाठी मला बोलावलं होतं.",इसम

"तुझा काय लोकांचे कपाट तोडण्याचा धंदा आहे का?",पोलीस इंस्पे मोठ्या आवाजात म्हणाले.

"नाही साहेब! माझा डुप्लिकेट किल्ल्या बनवणे ह्याचा धंदा आहे. माझा काहीच दोष नाही साहेब घरमलकिणीने मला कपाट तोडायला सांगितलं म्हणून मी तोडलं",किल्लीवाला

"कोणत्या मजल्यावरच कपाट तोडलं तू?",पोलीस

"तिसऱ्या मजल्यावरच पांडेंकडंच",किल्लीवाला

"बाई बाई मी माझ्याकडचेच कपाट तुला का तोडायला लावीन? मी व माझे यजमान तर तेव्हा बाहेर गेलो होतो. हो किनई हो(पांडेंकाकांकडे बघत)",पांडे काकू आश्चर्याने किल्लीवाल्याला म्हणाल्या.

"मला ज्या महिलेने कपाट फोडायला सांगितलं त्यांनी मला त्यांचं नाव पांडे सांगितलं. त्या माझ्या दुकानात आल्या होत्या तेव्हा ह्या अपार्टमेंटचा पत्ता देऊन तिसऱ्या मजल्यावर यायला सांगितलं होतं.",किल्लीवाला

"मग तर तू त्या महिलेचे वर्णन करू शकशील",पोलीस

"चेहरा तर मी ओळखू शकत नाही सर",किल्लीवाला

"चेहरा का ओळखू शकत नाही तू?",पोलीस

"कारण त्या महिलेने तोंडाला स्कार्फ डोळ्याला गॉगल आणि हातात gloves घातले होते.",किल्लीवाला

"अच्छा मग साधारण उंची वगैरे सांगू शकतो?",पोलीस

"उंची साधारण 5 फूट दोन इंच असेल एवढं सांगू शकतो.",किल्लीवाला

"अच्छा! बरं मला सांग ती महिला एखाद्या वाहनावर आली होती की पायी पायी?",पोलीस

"नाही ती महिला पायी पायीच आली होती",किल्लीवाला

"चेहरा जरी ओळखता नाही आला तरी त्या महिलेचा आवाज तू नक्कीच ओळखू शकशील",पोलीस

"नाही साहेब मी तेपण नाही करू शकणार",किल्लीवाला हताशपणे म्हणाला.

"का???",पोलीस आश्चर्याने म्हणाले.

"कारण त्या महिलेने मला एका कागदावर सगळं लिहून दिलं होतं. तीला बोलता येत नाही असं तिने सांगितलं होतं.",किल्लीवाला

"अस्स आहे का! आत्ता म्हणतो की तिला बोलता येत नव्हतं लगेच म्हणतो की तिने सांगितलं!",पोलीस रागाने म्हणाले

"म्हणजे मला म्हणायचं आहे की तिने लिहून सांगितलं",किल्लीवाला

"ठीक आहे मग दाखव ते कागद",पोलीस

"ते तर मी काम झालं म्हणून फाडून टाकले.",किल्लीवाला

"सगळे नाटकं आहेत तुझे चल ठाण्यात तिथे तू सगळं कबूल करण्याची व्यवस्था करतो. चोरी तूच केली आहे. ह्या अपार्टमेंटजवळून थोड्याच अंतरावर तुझं दुकान आहे. तू नजर ठेवली असशील आणि पांडे कुटुंब बाहेर गेलेलं बघताच तूच केलं असेल हे कारस्थान. किल्लीवालाच तू! डुप्लिकेट किल्ली बनवणं तुझ्यासाठी काय कठीण आहे",पोलीस

"नाही साहेब मी खरं बोलतो माझा यात काहीच हात नाही. मला विनाकारण जेल मध्ये नेऊन माझा धंदापाणी बंद करू नका",किल्लीवाला गयावया करत म्हणाला.

"तुझा हात नाही तर काय? तुला काय मी असा(हाताने नाक पुसत असल्याची खुण करत) वाटलो का? न तू त्या बाईचं वर्णन करू शकत न तू तिचा आवाज ऐकला न तू तिचं हस्ताक्षर दाखवू शकत म्हणजेच ह्या सगळ्याचा अर्थ एकच निघतो की तूच चोरी केली आणि तुझ्यावर आरोप येऊ नये म्हणून एक काल्पनिक महिलेचं कॅरेक्टर उभं केलं.",पोलिस

"नाही साहेब मी खरं सांगतो आहे. माझ्या बायका पोराची शपथ घेतो ",किल्लीवाला

"खबरदार बायकपोरांची खोटी शपथ घेतली तर हरामखोर चल जेलमध्ये त्याशिवाय तुझी अक्कल ठिकाणावर येणार नाही. फक्त पाच फूट 2 इंच उंची एवढीच माहिती सांगितली तू आता एवढ्याशा माहितीवरून ती महिला कशी काय ओळखू येईल? ती सखुबाई फक्त 4 फूट 10 इंचाची आहे.,पोलीस

पोलीस असं म्हणत असताना माझी नजर सहज तिथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांवर गेली.

आश्चर्य म्हणजे माझी काकू, कुलकर्णी काकू, भाले काकू, पांडे काकू ह्या सगळ्या जवळपास 5'2" इंचाच्याच होत्या. माझी चुलत बहीण पाच फूट सात इंच होती. 

म्हणजे चोर ह्या चौघींपैकी एक??? नाही नाही मुळीच नाही असं कसं होईल? मी मनात आलेला विचार झटकला. कदाचित किल्लीवालाच चोर असणार आणि तिथल्या तिथे ह्या महिलांकडे बघून त्याने अंदाजे 5 फूट दोन इंच उंची सांगितली असणार! नक्कीच तसंच असेल.

पोलिसांनी त्या किल्लीवाल्याला पोलीस ठाण्यात नेलं.

म्हणजे आता जेलमध्ये एकूण तीन जण होते जे गुन्हा नाकबूल करत होते. खंडूभाऊ सखुबाई आणि किल्लीवाला.

तीन शक्यता होत्या:-

एक तर किल्लीवाला खोटं बोलतोय आणि तोच चोर आहे.

दुसरी शक्यता म्हणजे जर तो खरं बोलतोय तर खंडूभाऊ ने कोणातरी स्त्रीच्या साहाय्याने हे केलं किंवा

तिसरी शक्यता सखुबाईने एखाद्या नात्यातल्या किंवा ओळखीच्या स्त्रीकरवी हे केलं.

मी विचारात होतो तेवढ्यात काका मला म्हणाले,"चल आत बेटा ते पोलीस गेले."

आज अपार्टमेंटमध्ये सगळ्यांच्या घरात हाच विषय चर्चेत होता की चोर कोण असेल? कोण ती महिला असेल?

"मला तर तो किल्लीवाला बदमाश वाटतो",माझा चुलत भाऊ

"तो खंडूभाऊ काय कमी आहे? हे पांडे काका काकू महिना महिना मुंबईला जातात त्याला सहज डुप्लिकेट किल्ली न बनवायला काय झालं?",काका

"मला वाटते सखुबाई असावी महा बनेल बाई आहे ती पाहिलं खोटं आजारी आहे म्हणाली आणि चाट मारली",काकू

"मला वाटते तो कुरिअर वाला आला होता न त्याच्या ओळखीच्या बाईने केलं असावं",माझी चुलतबहीण

सगळ्यांच बोलणं झाल्यावर मी म्हंटल,"हे सगळे नसून जर कुलकर्णी काकुंच असतील तर??"

त्यावर लगेच माझी काकू कळवळून मला म्हणाली,"शु: असं बोलुही नको बाळा! (आजूबाजूला बघत ) मला माहितीय तुला हेरगिरी बरी जमतेय पण असा कोणावर संशय घेऊ नाही रे बेटा! चुकून त्यांना आपलं बोलणं ऐकू आलं तर केवढा गैरसमज व्हायचा."

तो दिवस त्याच चर्चेत पार पडला. दुसऱ्यादिवशी सकाळी पोलीस आणखी एका माणसाला घेऊन आले.

आणि त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या फ्लॅटवासीयांना कॉमन एरिया मध्ये बोलावले.

"हा बघा तुम्ही वर्णन केल्यानुसार हा व्यक्ती आम्हाला सापडला पण हा कुरिअर बॉय नसून इथून जवळच काही अंतरावर असलेल्या चौकात पाणीपुरी गाडी चालवतो. हाच आहे न तो?",पोलीस भाले काकूंना म्हणाले.

"काय माहीत ? मी त्या दिवशी ओझरता बघितला होता. साधारण असाच होता.",भाले काकू

"हाच असेल तो पाणीपुरी च्या आड लक्ष ठेवत असेल आणि मग कुरिअर बॉय म्हणून चोरी करत असेल! काय रे बरोबर बोलतो न मी",पोलीस त्या माणसाचा हात पिरघळत म्हणाले.

"मेलो मेलो साहेब हात तुटेल माझा! मी काहीच केलं नाही. ह्या अपार्टमेंटचे मला तर नावही माहीत नव्हते. मी कशाला करू चोरी?",पाणीपुरीवाला.

"इंस्पे साहेब पण काल तर तुम्ही त्या किल्लीवाल्याला नेलं होतं ना आरोपी म्हणून त्याने काबुल केलं नाही का?",पांडे काका चिंतेने म्हणाले.

"नाही न! तो *****काही कबुल करायलाच तयार नाही. आज घरून कामावर जाता जाता रस्त्यात माझं सहज पाणीपुरी गाडीकडे लक्ष गेलं आणि हा मला दिसला आणलं पकडून. आता ह्यालाही जेलची हवा खायला घालतो बघतो कबुल करतो का ते?",पोलीस

पोलीस त्यालाही जेलमध्ये घेऊन गेले. त्यांच्याकडूनही त्यांनी सर्वतोपरी कबूल करवून घेण्याचा प्रयत्न केला पण यथेच्छ झोडपून काढल्यावरही त्याने कबूल केले नाही.

त्यानंतर एक-दोन दिवसांनी पांडे काकांनी चौकशी केली असता,'तपास सुरु आहे' असा पोलिसांकडून निरोप मिळाला. पुन्हा पुन्हा पोलिसांकडून 'तपास सुरू आहे' असंच जेव्हा ऐकावं लागलं.

तेव्हा चोरी काही सापडणार नाही ही खात्री पटल्यामुळे पांडे काका-काकू नाराज झाले.

आमच्या घरी पांडे काकांकडे झालेल्या चोरीबद्दलच डिस्कशन सुरु होतं.

"कोणी केली असेल गं चोरी ? मला वाटते खंडू भाऊच काम असेल..",काका

"सखूबाई पण असू शकते. घेतली असेल किल्ली आणि साबणावर शिक्का मारून बनवली असेल डुप्लिकेट किल्ली. सिनेमात नाही दाखवत का अगदी तसं ",काकू

"काका आपण पांडे काकांकडे जाऊन यायचं का? अगदी सहज !",मी

"का रे ?",काका

"मला वाटते एकदा त्यांच्या घराची कुलूप किल्ली बघावी म्हणजे मला काहीतरी क्लू लागू शकतो ",मी

"ओ हो ! गुप्तहेर राघव कल्याणी! आम्ही तर विसरलोच होतो की गुप्तहेर आपल्याच घरी आहेत. बघ जमलं तुला काही तर बरंच होईल! ",काका

मी व माझे काका आम्ही पांडे काकांकडे त्यांची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेलो. त्या दोघांचा मूड बदलावा म्हणून माझे काका इकडल्या तिकडल्या गप्पा मारू लागले.

बोलता बोलता मी पांडे काकूंना म्हणालो,

"काकू मला तुमच्या घराच्या मेनगेट चं कुलूप-किल्ली दाखवता का"

काकूंना थोडं आश्चर्य वाटलं.

"का रे बेटा?",पांडे काकू

"अहो आपल्याला माहीत नसेल पण राघव हेरगिरी फार उत्तम पद्धतीने करतो त्याने बऱ्याच केसेस सॉल्व्ह केल्या आहेत",काका माझ्याबद्दल फार कौतुकाने सांगत होते.

"खरंच! असं असेल तर ही पण केस तू नक्कीच सोडवू शकशील!",पांडे काकूंच्या आशा पल्लवित झाल्या.

"दे त्याला कुलूप किल्ली चोरी सापडली तर देवच पावेल",पांडे काका.

पांडे काकूंनी मला कुलूप-किल्ली दिली. मी ती बघितली व त्यांना म्हंटल,

" काकू तुम्ही हे कुलूप किल्ली वापरणार नसालच तेव्हा मी हे माझ्याजवळच ठेवतो. "

त्यांनी मला कुलूप-किल्ली ठेवण्याला होकार दिला. थोड्या वेळाने मी व काका आमच्या घरी आलो.घरी आल्यावर मी ते कुलूप आणि किल्ली बारकाईने पुन्हा एकदा बघितली.

बसल्या-बसल्या मी विचार करू लागलो की कुलूप न फोडता एक तासात कोणी चोरी केली असू शकते? कोणाजवळ पांडे काकांच्या घराची डुप्लिकेट किल्ली असू शकते ? विचार करता-करता एक जब्राट कल्पना मला सुचली.

करून बघायला काय हरकत आहे असा विचार करून मी माझ्या काका,काकू चुलत भाऊ आणि बहीण ह्यांना माझी कल्पना सांगितली.

"जबरदस्त आयडिया आहे! पण चिंटूला जमेल न?",चुलतभाऊ

"न जमायला काय झालं! माझा चिंटू चांगलाच चंट आहे!",चुलतबहीण

"बाबांवर गेला तो!",चुलतभाऊ मिश्किलपणे म्हणाला.

"वा रे वा म्हणजे मी काय ढिम्म आहे असं म्हणायचं आहे की काय तुला? (चुलत भावाकडे बघत)

व्वा! राघव खूपच छान आयडिया आहे. माझा चिंटू तुला नक्की मदत करेल. हुशारच आहे तो!",चुलत बहीण चिंटूकडे कौतुकाने बघत म्हणाली.

"पण ए कोणाला सांगू नका बरं तुम्हा बायकांना बोलता बोलता भसकन सगळं सांगायची सवय असते",काका काकुला म्हणाले.

"हॅट! मी कशाला कोणाला सांगते! बिलकुल नाही!",काकू

मी माझ्या चुलतबहिणीच्या मुलाला चिंटूला बोलावलं. चिंटू खूपच चुणचुणीत मुलगा आहे. मी त्याच्या कानात सांगितलेली कल्पना त्याला लगेच समजली ५ वर्षांच्या मानाने भलताच हुषार.

'टिंग -टॉंग ', बेल वाजली.

कुलकर्णी काकूंनी दार उघडलं.

"काकू तुमच्यासाठी माझ्या काकूंनी हे भोकराचं लोणचं पाठवलं,तुम्हाला आवडते नं ", मी म्हणालो.

"हो हो , अरे ये नं बस ,अरे व्वा हा चिंटू पण आलाय वाटतं तुझ्यासोबत",कुलकर्णी काकू चिंटु कडे कौतुकाने बघत म्हणाल्या. थोड्या गप्पा झाल्यावर चिंटूने मला कानात सांगितलं तसा मी थोडं मोठ्याने त्याला म्हणालो,"अरे ,थोडं थांब बाजूलाच तर घर आहे आपलं ,येईल आई किंवा आजी बाहेर "

"का,काय झालं ,काय म्हणतो चिंटू ?",कुलकर्णी काकू

"काही नाही त्याला टॉयलेट ला जायचं आहे पण आमच्या कडचे दोन्ही बाथरूम्स व्यस्त आहेत म्हणून त्याला म्हंटल थांब थोडं ",मी

"अरे,त्यात काय,जाऊ दे न त्याला आमच्या कडच्या बाथरूममध्ये",कुलकर्णी काकू

"धन्यवाद काकू,चल रे चिंटू पट्कन जा बाथरूम मध्ये,थांब मी येतो तुझ्या मदतीला",मी असं म्हणून,चिंटूची शू झाल्यावर कुलकर्णी काकूंचा निरोप घेऊन आम्ही वरच्या मजल्यावर आधी पांडे मग भाले यांच्याकडे गेलो. तिथेही सेम सगळं भोकराचं लोणचं देणं वगैरे झालं जे कुलकर्णींकडे झालं. मग आम्ही घरी आलो.

सकाळी हे सगळं झाल्यावर दुपारपर्यंत अपार्टमेंट मध्ये पोलीस आले कारण मीच सकाळी त्यांना भेटून काही गोष्टी सांगितल्या होत्या.

पोलीस तडक चौथ्या मजल्यावर गेले,भालेंची मुलगी चपापली तिने तिच्या वडिलांना बोलावले. पोलिसांनी भाले काकांना सर्च वॉरंट दाखवला आणि घराची झडती घेणं सुरु केलं.

"अरे हे काय,हे सभ्य लोकांचं घर आहे असे अचानक झडती तुम्ही नाही घेऊ शकत.",भाले काकू ओरडायला लागल्या.

पण पोलिसांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. सगळीकडे तपासल्यावर त्यांना चोरीचा माल कुठेच सापडला नाही. इकडे-तिकडे बघत असताना माझं लक्ष त्यांच्या बाल्कनीत गेलं. तिथे मला थोडं भंगार दिसलं ज्याच्या पलीकडे एक पाण्याची टाकी होती जिचं तोंड चादरीने झाकलं होतं. मी पट्कन तिथे जाऊन त्या टाकीची चादर काढून बघितलं आणि पोलिसांना बोलावलं कारण चोरीचा माल त्यातच होता.

आता भाले कुटुंबीयांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. माझावर जळजळीत कटाक्ष टाकायला भाले काकू विसरल्या नाहीत. एव्हाना अपार्टमेंट मधले सगळेजण भाले कडे जमले.

"एवढे सभ्य,सुशिक्षित असून तुम्ही चोरी का केली सौ. भाले",पोलीस दरडावले. ते ऐकून भाले काकू रडायला लागल्या. मग त्यांनी सांगितलं की भाले काकांची नोकरी सुटली होती त्यातच त्यांना लॉटरीचे तिकिटं घेण्याचं व्यसन लागलं होतं त्यामध्येच यांच्याजवळचे राहिले साहिलेले पैसे खर्च झाले होते. त्यांना चार मुली होत्या आणि मोठी मुलगी लग्नाची झाली होती तिचं लग्न करायचं होतं या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी हा चुकीचा विचार केला.

भाले काकू पुढे सांगू लागल्या,"चोरी करण्याच्या दोन दिवसांपूर्वी जेव्हा पांडेंनी लॉकर मधून दागिने आणले तेव्हा ते दोघे त्यांच्या घरात हॉल मध्ये दागिन्यांबद्दल बोलत होते,दार बंद होतं पण बाहेरून मला सगळं ऐकू येत होत.

मी त्यांच्या कडे विरजण आणायला गेली होती. त्यांचं बोलणं थांबल्यावर मी तशीच मागे फिरली आणि घरी येऊन बसली पण डोक्यात दागिन्यांचेच विचार फिरत होते मग माझ्या डोक्यात चोरी करण्याची कल्पना आली. मी पांडे काकूंच्या दाराची बेल दाबली आणि विरजण मागितलं.

त्यानंतर त्या विरजण आणायला आत स्वयंपाकघरात गेल्या,तेवढ्या वेळात मी तिथेच हॉलमधल्या भिंतीवर लावलेल्या खिळ्यावरची किल्ली घेतली. आणि माझ्या जवळच्या साबणावर त्याचा शिक्का घेतला आणि परत ठेवून दिली व परत आपल्या जागेवर सोफ्यावर बसली. त्यांच्या हातात मी नेहमीच ती गिटार चं किचेन असलेली किल्ली बघितली होती आणि ती मेनगेट चीच आहे हे मला माहित होत.

त्या साबणाच्या शिक्क्यावरून मी एका दुसऱ्या लांबच्या किल्लीवाल्याकडून डुप्लिकेट किल्ली तयार करवून घेतली आणि पांडे दाम्पत्य कधी बाहेर जाते याची वाट पाहू लागली.

त्यांच्या बाहेर येण्या-जाण्यावर त्यांच्या नकळत मी नजर ठेवू लागली. चोरीच्या दिवशी पांडे काका कोणाशी तरी फोन वर बहुतेक त्यांच्या मुलाशी बोलत होते. त्याला ते सांगत होते की विडिओ कॉल दीड तासाने कर कारण ते बाहेर जाणार होते व परत यायला त्यांना एक-दीड तास लागणार होता. हे ऐकल्यावर मी माझं काम तेवढ्यात उरकलं.", एवढं बोलून भाले काकू थांबल्या.

“अच्छा म्हणजे किल्लीवाला म्हणत होता ते बरोबर होतं तर!",पोलीस

"हो पांडे काका काकू बाहेर गेल्या गेल्या मीच त्या अपार्टमेंट जवळच्या किल्लीवाल्याला बोलावले. माझा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून चेहऱ्याला scarf, डोळ्याला गॉगल आणि हातात gloves घातले होते. आवाज ओळखता येऊ नये म्हणून मी बोलता येत नसल्याचे नाटक केले.",भाले काकू मान खाली घालून म्हणाल्या.

"तश्या फार हुशार आहात तुम्ही. फारच शिताफीने चोरी केली तुम्ही पण हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरली. आणि चोरावर सुद्धा कोणीतरी मोर(माझ्याकडे खुण करत) होऊच शकतो हे तुम्ही सपशेल विसरल्या.",पोलीस

संपूर्ण भाले कुटुंब शरमिंदे झाले होते.

तुमच्या हातात gloves असल्यानेच तुमच्या बोटांचे ठसे कुठे आढळले नाहीत हे मला समजलं पण त्या किल्लीवाल्याचे ठसे कसे काय नाही मिळाले हे मला काही कळलं नाही",पोलीस

"मी ते किल्लीवाला गेल्यावर नीट पुसून घेतले होते",भाले काकू

"आणि पाणीपुरी वाल्याचे काय? त्याचे कुरिअर बॉय म्हणून कसे काय वर्णन केले आपण?",पोलीस इन्स्पेक्टर

"ते तर तपासामध्ये गोंधळ निर्माण व्हावा म्हणून मी असंच अंदाजे वर्णन केले होते आणि काल्पनिक कुरिअर बॉय निर्माण केला होता. मला काय माहीत त्या वर्णनाचा पाणीपुरी वाला जवळपास सापडेल म्हणून!",भाले काकू

"पण राघव बेटा तुला कसं काय कळलं भाले काकुंनीच चोरी केली म्हणून?",कुलकर्णी काकू

मी सांगू लागलो,"चोरी झाल्याच्या २-३ दिवसानंतर, पांडे काकांकडे मी व माझे काका गेलो असता,मी पांडेकाकूंना मेनगेट ची कुलूप किल्ली मागितली,जेव्हा ती किल्ली मी बारकाईने बघितली तेव्हा मला तिच्या काठावर पांढरा थर दिसला ज्याचा वास घेतल्यावर मला कळलं की तो साबणाचा थर आहे.

म्हणून मी किल्ली पांडेकाकूंच्या परवानगीने माझ्याजवळ ठेवून घेतली. मग मी विचार केला की पांडे काकांच्या घरची डुप्लिकेट किल्ली कोण तयार करू शकेल?

खंडूभाऊ आणि मोलकरीण यांच्याकडे काहीच सापडलं नाही तसेच त्यांनी शेवटपर्यंत चोरी केली नाही असंच म्हंटल किल्लीवाला आणि पाणीपुरीवाल्याची सुद्धा तीच तऱ्हा होती मग दीड तासात बेमालूम पणे कोण चोरी करू शकेल? अपार्टमेंट मधलं तर कोणी नसेल असा मला संशय आला आणि तसंही किल्लीवाल्याने त्या महिलेची उंची 5 फूट 2 इंच सांगितली होती.

योगायोगाने आपल्या अपार्टमेंट मधील सगळ्या महिलांची म्हणजे माझी काकू,कुलकर्णी काकू,पांडे काकू आणि भाले काकू ह्या सगळ्यांची उंची जवळपास 5 फूट 2 इंचच आहे. आता मला त्या किल्लीवरच्या साबणाच्या थराच्या वासावरून कोणाकडे कुठलं साबण वापरतात हे जाणून घेणं आवश्यक वाटलं जेणेकरून नेमकं कोणी किल्लीचा शिक्का घेतला हे मला कळणार होतं म्हणून मग मी अपार्टमेंट मध्ये सगळ्यांकडे कोणता साबण आहे हे बघायला प्रत्येकाच्या कडे लोणचं घेऊन गेलो सगळ्यांनाच लोणचं दिलं मग पांडे काकूंचा गैरसमज नको व्हायला म्हणून त्यांना सुद्धा लोणचं दिलं.

याच्यात मी चिंटूची मदत घेतली. त्याने शू ला जाण्याचं निमित्त करून मला सगळ्यांच्या बाथरूम पर्यंत पोहोचवलं अशा प्रकारे मी सगळ्यांकडचे साबणं तपासले. फक्त भाले कडचा साबणच या किल्लीला असलेल्या साबणाच्या थराला जुळत होता तसेच त्या साबणावर किल्ली च्या लांबीचा खड्डा पडला होता त्यावरून तर माझी खात्रीच पटली. मी त्याचा फोटो काढून पोलिसांना दाखवला व मला जे कळलं ते मी त्यांना सांगितलं आणि इथे पोलीस आल्यावर त्यांना सगळा चोरीचा माल सापडला. भाले काकूंनी सगळं कबूल केलंच आहे.

चोरीचा माल सापडला असल्याने पांडे काकांनी तक्रार वापस घेतली होती. भाले काकूंना चोरीच्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी चांगलाच दम दिला आणि ह्यापुढे असं कृत्य केलं तर नक्की अटक करेन असही सांगितलं.

लवकरच भाले कुटुंब राधेशाम अपार्टमेंट सोडून निघून गेलं. सगळ्यांचा विश्वास गमावल्यावर त्यांना तिथे राहणं मुश्किल झालं होत. एवढ्या सगळ्या प्रकरणात राहून-राहून मला चिंटू चं कौतुक वाटते. खरंच आमच्या चिंटू इतका हुशार मुलगा कोणीच नाही.



Rate this content
Log in

Similar marathi story from Crime