Neeta G

Romance Classics Inspirational

4.5  

Neeta G

Romance Classics Inspirational

चंद्रिका

चंद्रिका

11 mins
385


"चंद्रे ऊठ गं, दिवस लय उजाडला तर अंघोळीची गैरसोय होईल. नदीवर लोकांची रेलचेल वाढली की मग तिकडं जायाला नको वाटतं" हौसा चंद्रिकाला उठवत म्हणाली.


"हौशे, आधीच रातीला फडावर नाचून नाचून अंग दुखतंय, त्यात तू आता झोपू पण देईना. जा तिकडं झोपू दे मला. म्या जाईल नंतर" चंद्रिकाने तोंड फिरवून घेत म्हणलं.


"आल्यावर झोप परत. आता ऊठ!" हौसाने बळेच तिच्या अंगावरून वाकळ(रजई) ओढली तशी चंद्रिका चरफडत उठली.


चंद्रिका आणि तिच्या सोबत फडावर नाचणाऱ्या अजून पाच सहा जणी पहाटेच नदीवर अंघोळीला गेल्या. सोबतीला किसन्या होताच. एखाद्या वेळी एखादा आगाऊ गावकरी त्रास द्यायचा म्हणून मग किसन्याला अश्या लोकांना सरळ करायलाच कौशल्याबाईने म्हणजे चंद्रिकाच्या आईने कामावर ठेवलं होतं. थोडं अंतर ठेवून तोही पहारेगिरी करू लागला.


आडोशाला अंगावरचं लुगडं बदलुन साऱ्या जणी पाण्यात शिरल्या. वातावरणात गारवा असला तरी पाणी मात्र अंगाला आल्हाददायक वाटत होतं. तांबडं फुटलं होतं, कोंबडा आरवत सगळ्या गावाला उठवत होता. पलीकडच्या काठावर पण अंधुक प्रकाशात काही स्रिया अंघोळ करताना दिसत होत्या. कोण कपडे धुवत होतं तर कोण आपल्या बारक्यांना न्हाऊ घालत होतं. काही बायका घागरी भरून घरी पाणी घेऊन चालल्या होत्या. गुरा ढोरांचा आवाज पण दुरूनच कानावर येत होता. त्यांच्याकडे एक नजर टाकून चंद्रिकाने एक आवंढा गिळला आणि परत आपल्या अंगावर पाणी घेऊ लागली.


चंद्रिका म्हणजे कौशल्या तमासगिरीनची मुलगी. आईनंतर आता ती ह्या तमाशाच्या फडात नाचत होती. दिसायला सौंदर्याची खाण, तुकतुकीत कांती, निमुळते नाक, नैसर्गिक गुलाबी ओठ आणि भरीव पापण्या. जो कोणी तिला एकदा पाहिल तो तिच्याकडेच परत फिरून फिरून पाहायचा. जेव्हापासून चंद्रिका फडावर नाचू लागली, कौशल्याबाईचा तमाशा पंचक्रोशीत गाजू लागला आणि लवकरच मुघलांचा मनसबदार असलेल्या सुलेमान खानाच्या वसंतगडाच्या भोवती पडलेल्या छावणीत त्यांना बोलावणं आलं.


वसंतगडाभोवतीचा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरवाईने नटलेला असा गाव जो धान्य आणि दुभत्या जनावरांनी समृद्ध होता. एवढं सगळं असलं तरी गावच्या वरच्या अंगाला वसंतगड असल्याने नेहमीच इथे लहान मोठी युद्ध होत असायची जी गावकऱ्यांना नवीन नव्हती. आत्ताही वसंतगडाभोवती मुघलांचा वेढा पडला होता आणि त्यांचा त्रास नको म्हणून गावकऱ्यांनी काही धान्य, जनावरं आणि काही नाणी आधीच पेशकी म्हणून दिली होती. गावात खरेदीसाठी मुघलांच्या सैनिकांचीही ये जा असायची. एखाद्या वेळी गावातल्या आया बहिणींना दिवसा ढवळ्या मुघल उचलून घेऊन जायचे पण दाद कोणाला मागणार म्हणून गावकरी जीव मुठीत घेऊनच जगत होते. 


********


अंघोळ उरकून चंद्रिका आणि बाकी सगळ्याजणी बाहेर पडणार की एक माणूस वाहत येताना दिसला तशी चंद्रिका पुढे आली आणि तिने त्याला ओढुन काठावर आणलं. किसन्याला आवाज देऊन ती लुगडं बदलून आली आणि पाहिलं तर कोणी तरी तरुण जखमी होऊन पाण्यात वाहत आला होता.

किसन्याने त्याला उचलुन खांद्यावर टाकलं आणि सगळे आपल्या तंबूच्या दिशेने निघाले.


"कोण हाय हा? अगं कपड्यावरून तर महाराजांचा मावळा वाटतोय. ह्याला इथं का आणलं? इथल्या मुगलांनी पाहिलं तर ह्याच्या बरं आपला बी जीव घेत्याल"


कौशल्याबाई पुढे येत म्हणाल्या पण चंद्रिकाने त्यांचं काही एक ऐकलं नाही आणि त्या तरुणाला किसन्याला आपल्याच तंबूत घेऊन जायला सांगितलं आणि त्याच्यावर स्वतःच उपचार करायला सुरुवात केली. दोन दिवस दिवसरात्र जागून तिने त्याची सेवा केली आणि दोन दिवसाने तो तरुण शुद्धीत आला.


"कोण हाय तुम्ही? कुठं हाय म्या?" त्या तरुणाने शुद्धीत येऊन विचारलं.


"म्या चंद्रिका, तुम्ही जखमी होऊन नदीत सापडला, तवा तुम्हाला इथं आणलं." चंद्रिकाने माहिती दिली.


"धन्यवाद बाई.. तुम्ही माझा जीव वाचवला. पण आता मला गेलं पाहिजे" त्या तरुणाने घाईत उठायचा प्रयत्न केला पण पायातून एक कळ गेली आणि तो बिछान्यावर परत कलंडला.


"दम धरा वाईच. अजून पाय बरा नाही आणि छातीची जखम बी अजून भरली नाय" चंद्रिकाने त्याला नीट बसवत म्हणलं आणि उठुन परत छातीवरच्या जखमेवर औषधाचा लेप लावु लागली. तो लेप लावताना ती उगीच जवळीक साधत होती, तो तरुण मात्र अंग चोरून नजर खाली करून बसला होता.


"बस बस.. म्या लावतु आता" त्याने पटकन म्हणलं आणि चंद्रिकाने भुवया आकसल्या.


"तुम्ही कोण म्हणायचं? कनच्या गावचं?" चंद्रिकाने त्याला दुर्लक्षित करून आपलं काम सुरूच ठेवलं.


"ते महत्वाचं नाय. तुम्ही जीव वाचवला म्हणून मी कायम तुमचा ऋणी राहील, वाटलं तर जे मागाल ते देईन पण त्यापेक्षा जास्त माझ्याबद्दल जाणून घ्यायचा आणि माझ्या लय जवळ यायचा प्रयत्न करू नगा." त्या तरुणाने करारी आवाजात म्हणलं आणि तिचा हात झटकला. त्याच्या बोलण्याने आणि तिचा हात झटकल्याने चंद्रिकाला राग आला. 


"जीव वाचवलाय तुमचा. आता तुमच्यावर आणि तुमच्या जीवावर माझाच हक्क आहे" चंद्रिका थोडा आवाज वाढवत म्हणाली.


"ह्या जीवावर फकस्त महाराजांचा आणि स्वराज्याचा हक्क हाय." त्या तरुणाने तिच्या नजरेला नजर देत म्हणलं आणि ती वरमली अन गालात हसु लागली.


"महाराजांच्या मावळ्याबद्दल ऐकलं होतं की ते स्वराज्यासाठी जीवावर उदार होऊन लढत्यात आणि आज पाहिलं बीss. बरं नका सांगू काही. हे धरा दोन घास खाऊन घ्या." तिने जेवणाचं ताट पुढं केलं तसा तो संशयाने पाहू लागला.


"घाबरू नका. इश(विष) नाय त्यात. मारायचं असतं तर तीन दिस इथं लपवून नसतं ठेवलं." तिने हसत त्यातला एक घास खाल्ला आणि ताट त्याच्यापुढे ठेवलं. त्यानेही मग गप्प खाऊन घेतलं. 


असेच एक दोन दिवस गेले, तिने परत काहीच विचारलं नाही पण ती त्याची काळजी घेत होती. दवा पाणी वेळेवर देत होती. तिची त्याच्याकडे पाहायची नजर आणि स्पर्श बदलला होता. तो आल्यापासून तमाशाचा फड पुन्हा रंगला नव्हता म्हणून कौशल्याबाई नाराज होत्या पण तिला फिकीर नव्हती.


एक दिवस जवळच नदीच्या काठावर ती बसली असताना तो लांबूनच तिला पाहत होता, काही विचार करून तो तिच्यापासून काही अंतरावर बसला आणि बोलु लागला, "म्या सुभेदार धनाजी पाटील. वसंतगडाचा किल्लेदार हाय. सुलेमान खानाने वसतंगडाला घातलेला वेढा मोडून काढायचा म्हणून रात्रीचं गडावरून खाली काही मावळ्यांना घेऊन छावणीवर हल्ला करायला आलो हुतो, त्यांची एक तुकडी एकट्यानेच हाणून पाडली पण माझ्यावर बी वार झाला होता. त्यांची दुसरी तुकडी आली आणि मला जखमी झाल्याने वर माघारी फिरता आलं नाही मग तिथूनच नदीत उडी घेतली."


तो सांगत होता आणि ती कौतुकाने ऐकत होती. आज पर्यत त्याच्यासारखा रांगडा, रुबाबदार तरुण तिने कधी पाहिला नव्हता आणि आता त्याची शौर्यगाथा ऐकून तो अजूनच मनात घर करून गेला.

त्यात ह्या चार दिवसात ती सतत आजूबाजूला होती तरी त्याने कधी वाईट नजरेने तिला पाहिलं नव्हतं. त्याच्यातला सभ्यपणा पाहून तिला तो तरुण मनापासून आवडला होता.


सुभेदार धनाजीने विचार केला, गडावर तर जायचं हाय पण वेढा पार करून जायला लागल, जीवाची पर्वा नव्हती पण किल्लेदार धारातीर्थी पडले कळलं तर सैनिकांत हाहाकार माजेल त्यापेक्षा इथं राहून मुघलांवर पाळत ठेवता येईल. ह्या फडामध्ये लपायला चांगली जागा व्हती त्यामुळे इथंच राहायचं आणि पन्हाळगडावरून मदत येऊ पर्यत वाट पाहायची. हेराकरवी महाराजांना एक खलिता पाठवून सुभेदार तिथेच राहू लागला. छुप्या मार्गाने तो सुरक्षित असल्याची बातमीही गडावर पोहचली होती.


कौशल्याबाईने फारच हट्ट केला म्हणून चंद्रिकाने आपली तयारी केली. रात्री गावात परत तमाशा रंगणार होता. नेहमीप्रमाणे जरीचं लुगडं, हातभर बांगड्या, अंगावर आभूषणे चढवून ती नखशिखांत नटली होती. तो ही वेषांतर करून अंगावर घोंगडी घेऊन गर्दीत बसला होता. ढोलकीवर थाप पडली, किसन्याने तुणतुणे वाजवायला सुरुवात केली आणि हौसाने सूर छेडला तशी घुंगराचा नाद करत चंद्रिका पुढे येऊन नाचु लागली. धनाजीने एक नजर तिच्याकडे टाकली, दोघांची नजरानजर झाली पण त्याने लगेच आपली नजर खाली झुकवली. तिने नेहमीप्रमाणे आपल्या मनमोहक दिलखेचक अदांनी तिथल्या सगळ्यांना वेड लावलं होतं. लोक फेटे उडवत होते, मुघलांची माणसंही नाणी आणि काही आभूषणे तिच्यावर ओवाळून टाकत होती.


काही वेळाने तमाशा संपला आणि लोकांची पांगापांग झाली. तिनेही आपल्या तंबूत येऊन लुगडं बदललं. त्याच्या तंबूत अजून दिवा तेवत असताना दिसला तशी तिची पावलं आपोआप तिकडं वळाली.


तो आपल्या तंबूत तयार होऊन रात्रीच्या अंधारात निघण्याची तयारी करत होता की ती स्वतःच लगबगीने आत येताना दिसली.


"सुभेदार! काय झालं? आमचा नाच तुम्हाला आवडला नाही वाटतं?" तिने उगीच मोकळ्या केसांसोबत चाळा करत म्हणलं. तो मात्र काहीच बोलला नाही की तिच्याकडे एक नजर पाहिलं नाही.


"आता आमच्याकडं बघणार बी नाय व्हय?" तिने लडिवाळपणे जवळ येत विचारलं.


"नाही आवडलाss आम्हाला बायका डोक्यावर पदर घेऊन घराची शान जपताना चांगल्या दिसतात, शेतामधी काम करून घाम गाळताना चांगल्या दिसतात. एकवेळ तिच्या हातात समशेर चांगली दिसती पण पायात घुंगरू बांधून सगळ्यांसमोर नाचणाऱ्या बाईकडं पाहणं जमत नाय आम्हाला. आमचं संस्कार आणि आऊसाहेबांची शिकवण असं करू देत नाय आम्हाला" आत्ताही त्याने करारी आवाजात म्हणलं आणि तो तिच्यापासून काही पावलं मागे सरकला. त्याच्या शब्दाने तिच्या अहंकाराला ठेच लागली. आज पर्यत सगळी माणसं तिच्या सौंदर्याच्या पुढे पुढे करायची आणि हा आहे की तिच्याकडे नजर वर करून पाहत नव्हता.


"असंss? लय पाहिलं तुमच्यासारखं. माझ्या रूपासमोर भल्याभल्यांचं इमान ढासळलंय." तिने हळूच आपला पदर खाली सरकवला. शेवटी तिने आपलं शेवटचं शस्त्र बाहेर काढलं होतं, काही करून त्याला आज मिळवायचंच तिने मनाशी पक्क ठरवलं होतं.


धनाजीने एकवार तिच्याकडे पाहिलं, आजपर्यत एवढी सुंदर स्त्री त्यानेही कधी पाहिली नव्हती, हळूहळू तो तिच्या दिशेने चालू लागला. तिही जिंकल्याच्या अविर्भात गालात हसु लागली पण त्याने येऊन तो पदर फिरवून तिच्या डोक्यावरून खांद्यावर ठेवला. 


"हा मावळा शिवबाच्या तालमीत तयार झालाय. बाईच्या पदराबरोबर आमचं इमान ढळण्याइतपत पोकळ नाय" त्याने म्हणलं आणि ती वरमली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं, कोणीतरी पहिल्यांदा तिला नाकारत होतं.


"काय कमी हाय माझ्यात? आज पातूर इतक्या लोकांसमोर नाचले पण आज फकस्त तुमच्या समोर माझा पदर ढळला. जीव जडलाय तुमच्यावर म्हणून स्वतःहुन तुमच्या हवाली व्हायला तयार हाय आणि तुम्ही माझ्यापासून नजर फिरवताय" ती दुःखी होत म्हणाली.


"ते कळलं मला बी. इतक्या दिस तुझ्या डोळ्यातली माझ्यासाठी असलेली काळजी, माझी ओळख बाहेर येऊ नये म्हणून तू करत असलेली धडपड, समदं दिसतय मला बी पण म्या तुला माझं नाय करू शकत. तुझा हात नाय धरू शकत" त्यानेही एक उसासा सोडत म्हणलं.


आज पर्यत कधी कोणती स्त्री इतक्या जवळ आली नव्हती, लहान असताना मुघलांच्या हल्ल्यात आई आणि बा गेला. त्यानंतर महाराजांच्या छत्रछायेत मोठा झाला आणि स्वराज्याला स्वतःला अर्पण केलं. कोणी आपली अशी काळजी घेणं, प्रेमाने विचारपूस करणं, हळवं होऊन आपल्यासाठी कोणी अश्रू ढाळणं त्यानेही पाहिलं नव्हतं आणि आज जेव्हा कोणी इतकं जीव लावत होतं तेव्हा त्याच्यासारखा पहाडी माणूस कसा नाही वितळणार? पण कर्तव्य समोर उभं दिसत होतं म्हणूनच त्याने आपल्या सुखाला मुरड घातली.


"हो! माहिती हाय. तमासगिरीन लोकांना मिठीत तर हवी असती पण आपल्या घरात बायको म्हणून चालत नाय. तुमीबी कसा हात धरचाल म्हणा?" तिने डोळे पुसत हताशपणे म्हणलं.


"नाय तसं नाय. आम्ही शिवबांची माणसं! कधी इथं तर कधी तिथं! मृत्यू डोक्यावर घेऊन फिरतोय आम्ही! ह्या सगळ्यात तुझा हात कसा हातात घेऊ मी?" तो कळकळीने म्हणाला. तिला दुखवायचं नव्हतं पण ती जे मागतेय ते देणंही शक्य नव्हतं.


"म्हणूनच एक दिसासाठी तरी मला आपलं करा. म्या कायम तुमची होऊन राहील. ह्या जन्मात कोणाला ह्या अंगाला हात बी लावून द्यायची नाय" ती त्याच्या पायाशी झुकत म्हणाली.


"नाय चंद्रिका. तुझ्या डोळ्यात संसाराची स्वप्न हाय. तुलाही बाकी बायासारखं आयुष्य जगायचं हाय, पोरांना कौतुकानं मोठं करायचं हाय. तू बोलली नसली तरी तुझ्या डोळ्यात पाहून मला कळलं. पण म्या ते सुख तुझ्या पदरात टाकू शकत नाय. एक चांगला माणूस बघ, त्याच्या सोबत लगीन करून सुखी संसार कर." धनाजीने तिला उठवत म्हणलं.


"आधी फकस्त तुमच्या ह्या रांगड्या देहाकडं पाहुन भुलले होते पण या काही दिसात तुमच्यातल्या चांगुलपणाच्या पेरमात पडले. आज पर्यत समद्यानी फकस्त माझ्या ह्या शरीराकडं पाहिलं पण तुम्ही माझं मन जाणलं. तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी वासना नाय तर आदर हाय. जिथं नाचणारी म्हणून लोक तोंड फिरवतात तिथं तुम्ही माणूस म्हणून मला मान दिला हाय. आता मला फकस्त तुमची बनुन राहायचं हाय. बायकोचा दर्जा नाय मागत म्या फकस्त एक दासी बनुन मला सोबत ठेवा." तिने मान खाली घालत म्हणलं.


"चंद्रिका sss" त्याच्या तोंडुन इतकंच निघालं. तो तिच्या समोर निशब्द झाला होता. तिने कसलीही पर्वा न करता त्याला स्वतःला समर्पित केलं होतं. तिला मात्र पहिल्यांदा त्याच्या तोंडुन आपलं नाव ऐकून कान तृप्त झाल्यागत वाटलं.


"चंद्रिका.. माझं आयुष्य स्वराज्यासाठी हाय गं.. म्या तुला काहीच देऊ शकत नाय." त्याने परत एकदा चेहरा फिरवत म्हणलं. पहिल्यांदा असं मन भरून आलं होतं.


"आणि ह्या चंद्रिकाचं आयुष्य आता तुमचं हाय. बाकी काय नग मला तुमच्याकडून फकस्त एकदा तुमच्या मिठीत घ्या." तिने म्हणलं आणि त्याला तिला नाही म्हणता आलंच नाही.


ती रात्र आपलं कर्तव्य काही क्षणांसाठी बाजूला ठेवून त्याने तिला मिठीत घेतलं आणि कायमचं आपलं बनवलं. त्या काही क्षणात दोघेही आपलं आयुष्य भरभरून जगले होते.


"मला तुझी मदत लागेल, करशील?" पहाटे निरोप घेताना त्याने वळून विचारलं.


"तुमच्यासाठी जीव बी देईल" तिने हसतच म्हणलं.


*********


दोन दिवसाने छावणीत जश्न रंगला होता. मागे झालेल्या हल्ल्यात जखमी होऊन किल्लेदार मेला अशी पक्की खबर सुलेमानला मिळाली होती खरंतर ती खोटी खबर धनाजीनेच पोहचवली होती. आता किल्लेदारच नाही तर दोन दिवसात किल्ला आपला समजून सुलेमानने छावणीला शाही दावत दिली होती. नृत्य, मद्य आणि शाही जेवणाचा आस्वाद घेत फौज आनंद साजरा करत होती. सुलेमान खान स्वतः आपल्या शामियान्यात चंद्रिकाचे नृत्य पाहत मद्यपान करत होता. समोर चंद्रिका नाचत होती आणि सुलेमान "सुभान अल्लाह, सुभान अल्लाह!" म्हणत दाद देत होता. चंद्रिका मद्याचे पेल्यावर पेले भरून देत होती आणि सुलेमान खान जिंकल्याच्या धुंदीत ते पेले रिकामे करत होता आणि इतक्यात मराठ्यांच्या तुकडीने चारही बाजूने छावणीवर हल्ला केला. समोर येणारा प्रत्येक जण कापला जात होता. कोणाला काहीच कळत नव्हते, मुघल जीव वाचवायला सैरावैरा पळत होते. मुघलांची बायका मुले आपापल्या शामियान्यात सुखरूप राहतील याची काळजी धनाजीने घेतली होती. बाकी शामियाने आणि तंबू मराठ्यांनी पेटवून दिले. सगळीकडे हाहाकार उडाला होता मुघल फक्त "या अली मदत" म्हणत ओरडत पळत होते. 


बऱ्याच वेळ चंद्रिका आणि मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सुलेमान खानला बाहेर काय सुरू आहे कळले नाही पण जेव्हा कळले त्याने स्वतःच युद्धाचा पोशाख चढवून मैदानात यायचे ठरवले. 


त्याने शामियानाबाहेर येऊन पाहिलं मुघलांची अर्धी फौज रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर अर्धी घाबरून वाट दिसेल तिकडे पळत होती. ते पाहून त्याची सगळी नशा झटक्यात उतरली. एवढा रक्तपात पाहिला तरी सुलेमान धीटपणे उभा होता. त्यानेही आपली समशेर घेऊन मराठ्यांवर हल्ला केला. सुलेमानही बहादूर होता, काही मराठ्यांना धारातीर्थी पाडून तो धनाजीच्या समोर आला. आता मैदानात दोन दिग्गज योद्धे उभे होते. दोघांच्या नंग्या तलवारी एकमेकांवर तुटून पडल्या. प्रत्येक वारासोबत दोघेही जखमी होत होते, दोघांची चिलखतं कधीच अंगावेगळी झाली होती. अंगावर ठिकठिकाणी रक्त दिसत होते पण दोघेही आपल्या राजासाठी लढत होते. अखेरीस धनाजीने बाजी मारली आणि तलवार सुलेमानच्या छातीतून आरपार केली. दुष्मन संपला होता. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. इतक्या वेळ हात जोडून प्रार्थना करणारी चंद्रिका जवळ पोहचणार की धनाजीही खाली कोसळला आणि सगळेच जागी स्तब्ध झाले. 


या युद्धात धनाजी गंभीर जखमी झाला होता, त्याला कोसळलेलं पाहून खंडोजी म्हणजे मराठयांचा अजून एक सुभेदार आणि धनाजीचा मित्र समोर आला. 


"किल्लेदार डोळं बंद नका करू. काय होणार नाय बघा तुम्हाला" खंडोजी


"नाय खंडोजी, आता वेळ जवळ आली हाय. महाराजांना सांग म्या गड मोघलांना जावु दिला नाय" धनाजीने एकदा दूर उभ्या असणाऱ्या चंद्रिकाला मन भरून पाहिलं आणि डोळे बंद केले.


चंद्रिका मात्र त्याच्या जवळ जाऊन रडु पण शकत नव्हती. आपल्यामुळे तिला किल्लेदाराच्या नावाला कलंक नको होता. पण खंडोजीला सत्य माहीत होतं, आजच्या योजेनेतला चंद्रिकाचा सहभाग आणि दोघांचे अबोल प्रेमही माहीत होते.


महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांनीही तिला योग्य तो सन्मान दिला. तिला धनाजीची बायको होण्याचं सौभाग्य तर नाही मिळालं पण त्याची वीरपत्नी म्हणून मान मिळाला.


"तुझ्यासाठी अजून काय करू पोरी?" महाराजांनी विचारल्यावर, "मला बी किल्लेदारासारखी स्वराज्याची सेवा करायची हाय. त्यांचं नाव माझ्या नावपुढं लावून त्यांचं कर्तव्य पूरं करायचं हाय." म्हणत तिने स्वराज्याच्या कामात आपलं आयुष्य समर्पित करायचं ठरवलं.


तिच्या इच्छेचा मान राखत महाराजांनी बहिर्जी नाईकांच्या हेरखात्यात तिला प्रशिक्षणासाठी पाठवलं. काहीच दिवसात ती लोककलाकार बनुन मुघलांच्या दरबारात मराठ्यांची हेर बनुन काम करु लागली.


आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र ती पुन्हा त्याच ठिकाणी आली जिथे धनाजीने शेवटचा श्वास घेतला होता.


"कोणी पेरमात जीव देतं तर कोणी जीव घेतं पण तुमच्या पेरमात मी माझं आयुष्य स्वराजाच्या सेवेला समर्पित केलं. तुमच्याकडुन स्वतःपेक्षा कर्तव्य मोठं हे कळलं मला.. ह्या जन्मात आपण एक नाय झालो, तुमच्या पाठी तुमची कर्तव्य म्या प्रामाणिकपणे पार पाडली पण आता मला तुमच्या मिठीत कायमचं सुखानं झोपायच हाय. ह्या जगात नाय पण दुसऱ्या जगात मला तुमचं बनुन राहायचं हाय" हळूहळू तिने डोळे मिटले आणि आपले प्राण त्यागले.


स्वतःच्या सुखापुढे धनाजीने कर्तव्याला महत्त्व दिले होते आणि त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या चंद्रिकाने त्याच्या ध्येयाला अंगिकारून आजन्म त्याला साथ दिली होती. 


समाप्त


काही खरी तर काही काल्पनिक पात्र तयार करून काल्पनिक कथा लिहिली आहे याचा कोणत्याही सत्य घटनेशी संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा.


Rate this content
Log in

More marathi story from Neeta G

Similar marathi story from Romance