Suresh Patil

Horror

4.1  

Suresh Patil

Horror

चकवा

चकवा

4 mins
1.5K


कोकणातील गणेशोत्सव म्हणजे आनंदाची मांदयाळी. वर्षभर सारेजण आतुरतेने वाट पाहत असतात तो हर्ष उल्हासाचा सण. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात. बाकीच्या वेळी बंद असणारी वाडीतील सर्व घरे माणसांनी फुलून गेलेली असतात. मुंबईतून चाकरमानी आलेले असतात. वाडीत माणसांची रेलचेल असते. पावसाळा सुरू असल्यामुळे पाणी मुबलक उपलब्ध असते. धरती हिरवीगार शालू नेसलेली असते, हवेत गारवा असतो आणि मने प्रफुल्लित असतात. सगळीकडे मृदंग आणि टाळांचा आवाज ऐकू येत असतात. भजने आणि आरत्यांनी वातावरण भक्तीमय झालेले असते. भजन म्हणजे कोकणी माणसाच्या श्रद्धेची गोष्ट. भजन करणे आणि भजन ऐकणे दोन्ही गोष्टी कोकणी मनाला फार आनंद देतात. भजनासाठी लोक पंधरा ते वीस किलोमीटर अंतर चालून जायला ही तयार असतं.


त्याकाळात आजुबाजुच्या गावात आमच्या वाडीतील भजनमंडळ बऱ्या पैकी प्रसिद्ध होते. तसं आमचं पंधरा लोकांचं भजन. पार मोठी माणसं आणि आम्ही दहाजणं बारा ते सोळा वर्ष वयाचे बालगोपाळ, भजनाची आवड मात्र शंभर टक्के, म्हणून आमचं भजन नावाजलेले. वारकरी आणि संगीत भजनाचा योग्य समन्वय आमच्या भजनात साधलेला होता त्यामुळे गणपती उत्सवा निमित्ताने आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक आम्हाला भजन करण्यासाठी बोलवतं असतं. आणि आम्ही सुद्धा शक्यतो सर्व ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असू. 

त्या दिवशी आम्हाला सहा भजने होती, आणि त्यातील एक भजन होते बाजूच्या कुंभवडे गावातील. कुंभवडे आमच्या कुसूर गावापासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले गाव. त्याकाळात रस्ते सुधारलेले नव्हते, ना कोणत्या वाहतुकीच्या सुविधा होत्या. त्यामुळे चालतचं सारा प्रवास करावा लागत असे. म्हणून आम्ही ठरवलेले होते की संध्याकाळी लवकर पाच वाजता भजन सुरू करायचं आणि वाडीतील पाच भजने आठ वाजेपर्यंत संपवून मग कुंभवडे गावाला चालत जायचे, कारण आमच्या जेवणाची व्यवस्था ही तिथे करण्यात येणार होती. त्या दिवशी संध्याकाळी आमचे भजन पाच वाजता सुरू झाले मात्र संपेपर्यंत साडेदहा वाजले. उशीर झाला असल्याने घाई घाईत आम्ही कुंभवड्याला जायला निघालो, वाटेत जाता जाता धनगरवाडा लागला, तिथल्या जोतिबा धनगरांने आम्हाला पाहिले, 'त्यांच्या गणपती पुढे दोन आरती म्हणा' अशी त्यांनी गळ घातली. शेवटी आम्ही आरती करायचं मान्य केलं. तिथून परत निघायला साडे अकरा वाजले. कंदील आणि गँसबत्तीच्या उजेडात आम्ही पंधरा जण व्हाळ ओलांडून पुढे चालतं, डुऱ्या जवळून पूढे जात बोरीच्या माळावर आलो, पांढरा धोंडा ओलांडून, पूढे वडाचा माळ पार केला की कुंभवड्याची सीमा लागणार म्हणून आम्ही अजून घाईघाईने जात होतो. लवकर पोचायची इच्छा आणि काही न खाल्ल्यामुळे पोटात पडलेला आगीचा गोळा त्यामुळे प्रत्येक जण वाटेकडे डोळे लावून चालला होता. वडाचा माळ हा पूर्ण भाग दाट जंगलाने वेढलेला होता. मोठं मोठे आयन, किंजळ, नान्या आणि वडाची झाडे, करवंदाच्या जाळ्या, लाबलंचक, माणसा एवढे उंच गवत आणि काळ्याकुट्ट दगडांनी भरलेला ह्या प्रदेशातून जाताना मनात थोडी भिती वाटत होती. सर्वत्र पसरलेला अंधार, रातकिड्यांची किरकिर, गवताची सळसळ आणि आमच्या पावलांचा आवाज यामुळे प्रत्येकजण दबक्या चालीने सावधपणे चालत होता. एक भयाण शांतता पसरली होती, कोणीही कोणाशी बोलत नव्हता. कधी एकदा इच्छित स्थळी पोहचतो आहोत असं मनाशी वाटतं होतं. आमच्या हातात मात्र चालत राहणे हेच होतं आणि आणि आम्ही चालत होतो. किती वेळ झाला महिती नाही, किती वाजले याची काही नक्की कल्पना नव्हती. आम्ही भारावल्या सारखे जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा प्रयत्न करत होतो एवढंच त्यावेळी कळतं होतं. 

तेवढ्यात आमचा आण्णा ओरडला, "थांबा, आहे तिथेचं थांबा!" आम्ही यंत्रागत लगेच थांबलो. आण्णाने सर्वांना बोलू नका आणि काही विचारू नका असे इशाऱ्यानेचं सांगितले. वेगात त्याच्या हालचाली सुरू झाल्या. आण्णाने पिशवीतून नारळ, पान आणि सुपारी काढली. रस्त्याच्या बाजूला थोडी जागा साफ सफाई केली त्यावर नारळ, पानाचा विडा आणि आंब्याची पाच सहा पाने ठेवली. आण्णाने हात जोडताच आम्ही सर्वांनी हात जोडले. आण्णा तोंडाने काहीतरी पुटपुटला. त्याने नारळ तिथल्या दगडावर फोडून समोरच्या बाजूला तसाचं फेकला. एक मिनिटात त्याने चलण्याचा इशारा केला आम्ही परत चालू लागलो. कोणालाच काही कळलं नव्हते. पण त्यानंतर पुढच्या अर्धा तासात आम्ही कुंभवड्यात पोहचलो, तिथले लोक आमची वाट पाहून, चिंतेत होते. लगेच पंगत वाढली गेली, आमचे जेवण झाले, आमचे भजन झाले. आम्ही परत सकाळी पाच वाजता घरी यायला निघालो. सात वाजता आम्ही घरी पोहचलो. 


सर्वजण स्थिर झाल्यावर, आण्णाने सर्वांना एकत्र बसवून सांगितले की रात्री आपल्याला चकवा लागला होता. जवळपास एक तास आपण सारे वडाच्या माळावर एकाच वाटेवर भारावल्यासारखे गोलाकार फिरत होतो. खूप वेळाने आण्णाच्या लक्षात आले की आपण एकाच रस्त्याने फिरतोय, त्याचं करवंदाच्या जाळ्या, तोच काळा दगड आणि तेच वडाचे झाड आपण सतत पार करून जातोय, असं दोन तीन वेळा झाल्यावर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. आण्णा हा जूना जाणता माणूस, त्यांनी अशा अनेक गोष्टी ऐकलेल्या होत्या. त्याला त्याचे उतारे ही माहीत असतं. त्याने आमच्या ग्रामदेवतेला नारळ, पानांचा विडा ठेऊन गाऱ्हाने घातले आणि आम्हाला योग्य रस्ता दाखवण्याची विनंती केली. आमच्या सुदैवाने त्यानंतर आमची त्या चकव्यातून सुटका झाली आणि आम्ही योग्य मार्गाला लागून कुंभवडे गावात पोहचलो.


आजसुद्धा जेव्हा ही त्या रात्रीची घटना आठवते तेव्हा अंगावर भितीने शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. Rate this content
Log in

More marathi story from Suresh Patil

Similar marathi story from Horror