Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Others

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Others

बोन्साय

बोन्साय

3 mins
192


तो तिला नेहमीच एखाद्या वटवृक्षा सारखा वाटायचा. त्याचं ते भारदस्त रूप नेहमी तिला मोहिनी घालायचं. त्याच्या पारंब्या आकाशातून खाली येणारी मुळं जणू आकाशात स्वैर विहार करणाऱ्या स्वप्नांची मातीशी उराउरी भेट घडवून आणणारा मार्गचं तिला वाटायचा. पहिल्याच नजरेत ती त्याच्या प्रेमात पडली. त्याला पाहिल्या पासून त्याच्या सावलीत आयुष्य कंठाव असं तिला वाटू लागलं. 


तशी ती लहानपणापासूनच जिद्दी आणि महत्वकांक्षी. काहीही करून त्याला मिळवायचंच तिच्या मनाने चंग बांधला आणि ते तिनं करूनही दाखवलं.


त्याचंच प्रतिबिंब म्हणून तिनं एक वटवृक्षाचं रोपटं घरी आणलं. घरातल्या कुंडीत प्रेमाने लावलं. रोज त्याला पाणी घालू लागली. त्याची निगा राखू लागली. त्याची मुळं मातीत घट्ट रुजली, ती खुश झाली. हळूहळू तो वटवृक्ष वाढीस लागला. फांद्या बहरू लागल्या. तिने त्यांची छाटणी सुरू केली. मुळं आत खोलवर वेगाने वाढू लागली होती. तिने मुळांना ही छाटून विशिष्ट तारा गुंडाळल्या. त्याला काचणाऱ्या तारांनी त्याची वाढ खुंटली आणि तो वटवृक्ष तिथेच कुंडीतच वाढू लागला.


त्या वटवृक्षाचं छोटेसं खोड, छोटासा घेर अन छोट्याछोट्या पारंब्या... त्याची वाढ सोयीस्कररित्या खुंटलेली की खुंटवण्यात आलेली असा तो देखणा, शोभिवंत वटवृक्ष. सर्वांना भावू लागला सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागला पण एक शोभेची वस्तू म्हणून, एक बोन्साय बनून...


त्याचंही काही वेगळं नव्हतं, तिने त्यालाही सोबत चालताना अनेक अटी, अपेक्षांच्या तारांनी गुंडाळून टाकलं. त्याच्या मनात मोकळ्या आभाळाचं स्वप्न रुजलेलं होतं पण उखडलेली मुळं आणि दुखरे सल विसरून तो सहजच गेला होता तिच्यात मिसळून पण...


पण तिला भावलेली अन हवी असलेली त्याची भव्यता दिव्यता, भारदास्तपणा, घनदाट सावली, झुलण्या इतपत मजबूत पारंब्या ह्यापैकी काहीच तिला मिळालं नाही. तिच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. अपेक्षाभंगाचा अग्नी तिला आतल्या आत जाळत होता. अपेक्षाभंगाने हळूहळू तिचे प्रेम घृणेत बदलले, ती कोलमडून गेली. विदीर्ण होवून रडू लागली.


तिला रडताना पाहून तो कासावीस झाला, त्याला काय करावे समजेना. त्याने प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि बोन्साय झालेल्या वटवृक्षकडे बोट करून म्हणाला,


" तू मोठ्या जिद्दीनं आणि प्रेमाने मला जिंकलस. 

तुझ्या आयुष्यात मला स्थान दिलंस.

तुझं माझं आयुष्य एकत्र गुंफलं गेलं.

माझ्या मनात मोकळ्या आभाळाचं

स्वप्न होतं रुजलेलं!

पण तुला हव्यास होता बद्ध सिमेतच

स्वतःचं प्रभुत्व गाजवण्याचा.

मग आपले दुखरे सल विसरून

अनोळखी उबदार मातीत मीही सहज गेलो मिसळून.

असं म्हणतात ना गं, उखडलेल्या रोपट्याचं

पुन्हा मातीत रुजणं अवघड असतं

पण हे रोपच खुळ, वेडं, मुळात अगदीच चिवट.

तू स्तब्ध, निश्चल होतीस आणि मी प्रतीक्षेत.

तुझ्या प्रत्येक नकारात आपले रंग ओतले

तुझ्या अपेक्षांचे ओझे झेलले

तुझ्या मनातल्या वेदनेचे तणही तुझ्या नकळत अलगद खुडले.

सारंच तर करत होतो तुझ्यासाठी,

तुझ्या प्रेमात वाढत होतो, बहरत होतो

पण तुला तर हवं होता फक्त एक बोन्साय..

सगळं बदललं.

काचणाऱ्या अटींच्या तारांनी वाढ होऊ द्यायचं खुंटवलं.

हे काप, ते काप, हे नको, ते नको, असंच कर, तसंच कर, हे हवं, ते हवं.

वरवर सुबक दिसण्यासाठी अंतरी घाव, काळजावर वार

हवा तो आकार देऊन एक सुबक मांडणी

सुंदर दिसण्यासाठीच केलेली सजण्याची सक्ती.

आणि

एक स्वयंपूर्ण झाड नव्याने सजलं

नव्या रूपात बहरलं

आपल्यालाही होते पंख आणि

घ्यायची होती गगनभरारी

हेच ते विसरूनच गेलं!

अग वेडूबाई, आता रडून काय उपयोग

तुझ्या प्रेमात मी वाढत असतांना 

जागोजागी अटी तूच तर घातल्यास 

अपेक्षाभंगाने पुन्हा आता तूच रडते आहेस.

मी तुझ्या प्रेमापोटी सर्व अटी मान्य करत गेलो 

मग आता हे फुलण्याचं नवं वेड कशाला

जरा बघ माझ्या कडे  

काय अवस्था झाली आहे माझी 

पुरता खुंटलोय गं मी 

आयुष्यभरासाठी 

फक्त आणि फक्त तुझ्यासाठी


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy