Amruta Shukla-Dohole

Inspirational

4  

Amruta Shukla-Dohole

Inspirational

बहिर्जी नाईक..

बहिर्जी नाईक..

6 mins
511


   बहिर्जीबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. एखाद्या धार्मिक ग्रंथाच्या अवतरणिकेत जसा संपूर्ण आढावा थोडक्यात घेतला जातो : तशाच प्रकारची ही सांगता असली तरी ; बहिर्जी-कथानकाची ही भैरवी म्हणायला हरकत नाही.मैफिलीत जसा तंबोरा निनादत राहतो ; तसे शिवचरित्रात बहिर्जी निनादत राहतात -- तेही अगदी चुपचापपणे !!! 

  दौलतराव जाधव ऊर्फ दौलत रामोशी ; ऊर्फ बहिर्जी नाईक --- कितीतरी नांवे ! एकाच व्यक्तीची !! पण प्रत्येक भूमिका चोख !!! संपूर्ण गुप्तता हेच बहिर्जी आणि हेर पथकाचं यशाचं रहस्य*** अगदी विजापूरचा आदिलशाह किंवा दिल्लीचा बादशाह -- यांच्याही महालात वेशांतर करून प्रवेश करणारे आणि अचूक खबरा काढणारे बहिर्जी !! विशेष म्हणजे कोणीही त्यांना ओळखूच शकत नसत. याला फक्त एकच अपवाद ठरला तो -- सुरतेच्या लुटीच्या वेळी इंग्रज वखारीतील जॉर्ज ऑगझेंडन याचाच. पण ओळखलं असलं तरी त्याचा काडीचाही उपयोग नव्हता. 

  या बहिर्जी नाईकांची कमाल काय वर्णावी ? गुप्तहेरांची सांकेतिक भाषा त्यांनीच बनवली.ती आजही कोणीही डीकोड करू शकलेलं नाही.यामध्ये पशुपक्षांचे आवाज ; वाऱ्याचे आवाज ; वस्तूमधून विशिष्ट पद्धतीने आघात करून काढायचे आवाज -- त्यांचे अर्थ --सगळं सगळं कसं चोख बसवलं होतं !! आणि त्याच भाषेतून संदेश दिला जाई ; तो दूरदूर जात जात राजेंपर्यन्त पोचत असे. *** 

  फक्त खबरा काढणेच नव्हे तर ते शत्रूच्या गुप्त हेरांची पण माहिती ठेवीत असत. आणि अशा हेरांपर्यन्त चुकीची माहिती शत्रूस दिली जाऊन ; शत्रूगोटात अफवा पेरून -- राजेंचे विजय निश्चित होत असायचे.आजच्या भाषेत ही म्हणजे " प्रति हेरगिरी " च !* पण मूळ दिसतं ते शिवकाळात ; बहिर्जी पथकात !! **  

  याचमुळे फंदफितुरीच्या काळात देखील राजेंना एकदाही दगा-फटका झाला नाही. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे लाल महालावरील छाप्याच्या अगोदर उंबरखिंडीतला विजय -- जो फक्त दोनतीन हजार मावळ्यांनी फाजलच्या २० ००० सैन्यावर मिळवला होता. *** राजेंच्या विजयांची जी कारणे आहेत त्यांत या हेर पथकाच्या माहितीचे संकलन ; विश्लेषण ; आणि नियोजन अत्यन्त अचूकपणे होई. बहिर्जीना भौगोलिक माहिती पण खडा न खडा होती. थोडक्यात " माहिती आणि तंत्रज्ञानाची " एक अद्ययावत यंत्रणा बहिर्जीनी आणि शिवरायांनी निर्माण केलेली होती. आज याचा अभ्यास केला जातोय. आणखी काही उदाहरणे बघू. 

        राजेंना विजापूरच्या मोहिमेबद्दल मोलाची माहिती बहिर्जींनी पुरवली होती. शिवाजीराजेंचे आग्र्याला जाण्याचे ठरल्यावर, आग्र्यामधे बहिर्जींनी आपले हेर आधीपासून आग्र्यात वेगवेगळ्या वेशांमधे वाटेवाटेवर पेरुन ठेवले होते. त्यामुळेच राजे स्वतःची सुटका करून घेऊन स्वराज्यात सुखरुप पोहोचू शकले. हे नाईकांचे किंवा हेरांचे पडद्यामागचे कार्य जगासमोर कधी आलेच नाही. हेच तर गुप्तहेरांचे यश !! 

      शिवाजीराजेंचा राज्याभिषेक सुरु होता आणि राजेंचा जिवाभावाचा हा मित्र बहिर्जी नाईक, याचकांच्या रांगेत वेशांतर करुन, बसून, राजेंचा सोहळा पाहत होता. त्यांना उघडपणे समोर येता येत नव्हते. ते दुःख राजेंना फार झाले. याचकांच्या रांगेत बहिर्जींना बघून आपले अश्रू पापण्याआड दडवावे लागले होते त्यांना. कारण गुप्तहेरांचा सन्मान उघडपणे करता येत नसतो कधीच !!! 

      त्यानंतर दक्षिण दिग्विजय व जालना मोहिमेत बहिर्जी व त्यांच्या पथकाने अति मोलाची कामगिरी केल्यामुळे राजेंना यश प्राप्त झाले. याचा अर्थ असा नाही की, मोहीम फत्ते झालीच नसती, पण बहिर्जींमुळे, राजनीती व डावपेच आखायला योग्य माहितीचा योग्यवेळी अतिशय उपयोग झाला.अत्याधुनिक शास्त्रानुसार यश कधी मिळतं ? याचा सिद्धांत असा --- 

" Right man ; doing the right job ; in right time ; with right means ; at right place."  हे सगळंच बहिर्जी पथकाने आणि राजेंनी प्रत्यक्षात उतरवलं होतं. 

      संभाजीराजेंबरोबरही बहिर्जी नाईकांनी व्यवस्थित असे खूप काम केले होते.

       अशाच एका मोहिमेवर बहिर्जी खूप दिवस अडकून पडले होते. बराच काळ ते स्वराज्याकडे फिरकू शकले नव्हते. त्या कालावधीत इकडे स्वराज्यात बर्‍याच घडामोडी घडल्या. शंभूराजे मुघलांकडे गेले. भूपाळगडी झालेला संहार पाहून संभाजींचे मन विदीर्ण झाले. शिवाजीराजेंनी प्रयत्नांची शिकस्त करुन शंभूराजेंना पुन्हा स्वराज्यात परत आणवले. राजारामांना राज्यावर बसवण्यासाठी सोयराबाईंनी केलेले राजकारण, ज्यांनी राजेंच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य स्थापन करण्यात साथ दिली होती त्या सर्व मुख्य अधिकार्‍यांच्या कटात सामील झालेल्या सोयराबाई, शंभूराजेंचा त्या अधिकार्‍यांच्या कार्यांला असणारा विरोध या सर्वाचा परिणाम नाही म्हटले तरी, शिवाजी राजेंवर झालाच. शंभूराजेंच्या अनुपस्थित राजारामचा विवाह झाला. आणि लग्नानंतर कांही दिवसांतच शिवाजीराजेंचा मृत्यु झाला.


इतके सर्व बहिर्जींच्या अनुपस्थितीत झाले.


ते दूर असले तरी, त्यांचे हेर सर्व बातम्या त्यांना कळवत होतेच.

         पण शिवाजीराजेंच्या मृत्युची खबर ऐकल्यावर मात्र , त्यांचे चित्त विचलित झाले. नेहमीच्या एकाग्रतेने मोहीमा राबवू शकणे त्यांना कठीण होऊ लागले होते. आणि अशाच एका बेसावध क्षणी ते भूपाळगडावर असताना त्यांचे पाठीवर जबरदस्त खोल वार झाला. अंगावर कांबळी घेऊन अतिशय कष्टाने ते भूपाळगडच्या बाणूरलिंग असलेल्या महादेवाच्या मंदिराच्या गाभार्‍यात पोहोचून ग्लानीने धाडकन कोसळले. कितीतरी वेळ ते तसेच एकटे पडून होते. संध्याकाळच्या दिवाबत्तीला बराच वेळ असल्यामुळे पुजारी यायला अवधी होता. नाईकांचा श्वासोश्वास वाढला होता. पायाला झालेल्या जुन्या जखमेनेही डोके वर काढले होते. पायातूनही रक्तस्राव होत होता. अंगात ज्वर चांगलाच भरला होता. त्याही अवस्थेत त्यांचे ओठ पुटपुटत होते, महादेवाच्या नामस्मरणाबरोबरच 

" छत्रपती शिवाजी राजे...!छत्रपती संभाजीराजे..., भोला शंकर कैलासपती महादेव..." असे नामस्मरण सुरु होते,

 ते म्हणत होते ---

" हे महादेवा... अशा जखमी अवस्थेत अपार कष्ट करुन तुझ्या गाभार्‍यात पोहोचलो. खरं तर रायरेश्वराला पोहोचायचं होतं. पण तेवढं सामर्थ्य या देहात आता उरलं नाही. हे प्राण देहाला सोडून जाण्यास उतावीळ झाले आहेत. कारण, हा देह आता स्वराज्यकामासाठी योग्य राहिला नाही. हे महादेवा... माझ्या राजेचं दर्शन घेण्यास या सेवकाला त्यांच्या दर्शनासाठी त्यांचेजवळ लवकर पाठवण्याची तुला प्रार्थना करण्यासाठी कसा बसा तुझ्याजवळ पोचलोय . हेच माझं तुला अंतिम मागणे आहे. तूच माझ्या कर्तव्याचा , निष्ठेचा साक्षीदार आहेस. तुला तर सारंच माहीत आहे की, या देहात, नसानसात शिवाजी नावाची ऊर्जा प्रवाहित आहे. तुला अखेरची विनंती करतो, या उर्जेचा प्रमुख स्रोत असलेल्या शिवाजी नावाच्या सागरात, या प्राणाला विलीन कर, बुडवून टाक !!! " 

 " ही शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुला माझ्या रक्ताचा अभिषेक करतो. " 


असे म्हणून शिवाजी राजेंनी दिलेली रामतीर्थ कट्यार त्यांनी मोठ्या कष्टाने बाहेर काढली. तिला मस्तकी लावून पुटपुटले,

" राजे, तुम्ही दिलेल्या या कट्यारीने आजपर्यंत अगणित गनिमांचे गळे चिरले. तुमचा हस्तस्पर्श झालेल्या या कट्यारीत काय ताकद आहे हे फक्त मीच जाणून आहे !! तुम्हालाही हे माहीत होते की ; तलवारीपेक्षा प्रत्येक वळणावर या कट्यारीचीच जास्त गरज भासणार. म्हणूनच आपण ही कट्यार मला दिली होती. " 

नाईकांनी पुन्हा एकदा कट्यार कपाळाला लावली आणि हाताच्या अंगठ्यावर वार केला. अंगठ्यातून उडालेल्या रक्ताची धार त्यांनी शिवलिंगावर धरली. वेदनेचा लवलेशही त्यांच्या मुखावर नव्हता. ओठ पुटपुटतच होते..."शंभो राजे...शिवाजी...शंभो..." त्यांचा पंजा शिवलिंगावर होता. अंगठ्यातून निघणाऱ्या रक्ताचा अभिषेक शिवलिंगावर सुरु होता. बोलतांना धाप लागली होती.. ओठ हळूच पुटपुटले...,


" राजे, खंत एकच आहे, स्वराज्यासाठी लढत मरण्याची इच्छा होती,.... वीरमरण प्राप्त नाही होऊ शकले..." 

नाईकांच्या अंगठ्यातून वाहणार्‍या रक्ताने शिवलिंग पूर्ण लाल भडक झाले होते. श्वासाचा वेग वाढला होता. वादळ शांत होण्यापूर्वीची ती शांतता असावी. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. आणि बहिर्जी स्वगत बोलू लागले ---

"आश्चर्य आहे, राजे, रायरेश्वराच्या गाभार्‍यात तुमची तेजस्वी मूर्ती समोर उभी दिसत आहे. राजे, हा भास की, पुनर्जन्म? तुमच्या सोबतच स्वराज्याचे प्रमुख स्तंभ तानाजी मालुसरे, तुमचे जिवलग नेताजी पालकर व असे जिव्हाळ्याचे कितीतरी सवंगडी दिसत आहेत. राजे...राजे.. तुमचे शब्द ऐकण्यास कान आतुर झाले आहेत... या..राजे...या... तुमच्या या हनुमंताला अलिंगन द्या..... शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक सुरुच आहे पण हा रक्ताचा अभिषेक नसून या रक्ताच्या थेंबा थेंबात सामावलेल्या शिवाजी नामाचा अभिषेक आहे." 

        शेवटच्या क्षणी त्यांना राजेंना गमावण्या व्यतिरिक्त कोणतेही दुःख नाही. की कोणाचीच चिंता नाही. राजेंच्या मृत्युची बातमी समजल्या क्षणी फक्त तेव्हाच डोळ्यातून अश्रू वाहिले होते. नंतर मात्र या डोळ्यांना अश्रू ठावूक नाही.श्वास मंदावला आणि हा दौलतराव रामोशी राजेंच्या भेटीस निघून गेला.

 अशा प्रकारे या महान त्यागी, बुध्दीमान आणि लढवैय्या देखील असलेल्या बहिर्जी नाईकांनी सन् १६८५ ला भूपाळगड किल्ल्यात देह ठेवला.( भूपाळगड म्हणजेच बाणूरगड ) 

   सांगली जिल्ह्यात पूर्वेकडे खानापूर तालुक्यात बाणूरगड किल्ला आहे. तिथे या महान शिवभक्ताची समाधी आहे. मुद्दाम जाऊन या तिथे !! बहिर्जीना मुजरा करा. तिथली माती भाळी लावा. मातीतून तुम्हाला शब्द ऐकू येतील -- तुकोबांचा अभंगच जणू बहिर्जी जगले होते ---


" तुका म्हणे आम्ही । मरोनि जन्मलो । आपुले पावलो । अधिष्ठान ।। 

   अशा या महान स्वराज्यभक्ताला आमचे कोटी कोटी प्रणाम!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational