Haresh Magar

Drama Romance Fantasy

4.2  

Haresh Magar

Drama Romance Fantasy

भेटली ती पुन्हा

भेटली ती पुन्हा

4 mins
294


       मान्सूनला नुकतीच सुरूवात झाली होती, पहिला पाऊस पडून गेला होता. रस्ते आता कोरडे सुद्धा झाले होते. रस्त्याच्या कडेला बारिक बारिक हिरवळ उगवली होती. ‘कभी धूप तो कभी छाॅंव’ याप्रमाणे वातावरण होतं. शेतीकामांना सुरूवात झाली होती त्यामुळे रस्त्यावर तेवढी वर्दळही नव्हती. संध्याकाळची वेळ होती, मी जाॅबवरून घरी येत होतो. रिक्षावाल्याने नाक्यावर सोडल्यानंतर घराच्या दिशेने चालतंच चाललो होतो. प्रवासामुळे थकवा आलेला त्यात पावसाळ्यासाठी आजच खरेदी केल्यामुळे पाठीवर जड झालेली बॅग. पाय उचलायला सुद्धा अक्षरश: कंटाळा आलेला. इतक्यात माझ्या नजरेसमोर एक मुलगी आली. तिचा चेहरा पाहणार तोच वाऱ्याचा झोंझावात आला. एकाएकी असा एवढा वारा सुटला त्यामुळे उडालेल्या धुळीमुळे समोरचं अस्पष्ट झालं होतं. त्यातही माझे डोळे तिचा चेहरा शोधत होते. हवेमुळे विस्कटलेले तिचे केस चेहऱ्यावर आले होते. तिच्या डोळ्यांत काहीतरी गेलं असावं कदाचित तिच्या हावभावावरुन कळलं. तिची चाललेली घालमेल मी एकटक पाहत होतो आणि अचानक ढगांचा गडगडाट झाला. ती तर घाबरलीच पण मी ही भानावर आलो. तेव्हा समजलं पावसाच्या ढगांनी आकाशात अंधार केला होता. ते असे जमा झाले होते जसे काही ते सुद्धा तिलाच बघायला आले आहेत. विज चमकली आणि मला तिचा चेहरा दिसला. चमकलेल्या विजेच्या प्रकाशात तिचे निस्सीम सौंदर्य आणखीनच खुळून दिसलं. चेहरा पाहताक्षणीच ओळखीचा वाटला. कारण तो चेहरा मी कधी विसरू शकत नव्हतोच. हो बरोबर ही तिच आहे. नक्कीच. 


     अगदी तसेच लांब केस, कपाळावर झलकणारी ती केसांची बट, साध्या मुद्रेत सुद्धा दिसणारी गाळावरची खळी, ओठाच्या जरा वर असलेला तील तिच्या सौंदर्यात भरच घालत होता. समुद्रासारख्या निळ्या डोळ्यात आजही तीच चमक होती. अगदी जशीच्या तशीच आहे अजुन ती. हो तीच ती माझी बालमैत्रिण. जरा पण नाही बदलली ती. आज किती वर्षानंतर पाहतोय. एवढीशी होती शाळेत भेट झाली होती. तिच्यामुळेच तर शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय गेला होता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच शाळा सुरू झाली होती. तिची आणि माझी भेट वर्गातच झाली होती. मी मित्राला माझ्या वाढदिवसाबद्दल सांगत असताना तिने ऐकलं होतं कदाचित. तिच्या आईने तिच्यासाठी दिलेला चाॅकलेट तिने मला दिला वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून. माझ्या आयुष्यातला तो पहिला गिफ्ट होता. माझ्या वाढदिवसाला आतापर्यंत मला मिळालेल्या सगळ्या गिफ्ट पेक्षा मला ते चाॅकलेट खुप मौल्यवान वाटतं. तेव्हापासुन झालेल्या आमच्या मैत्रीत तिच्या बाबांमुळे खंड पडला. ५-६ वर्षातच तिच्या बाबांची बदली झाली तशी हिची शाळा सुटली. त्या दिवसानंतर ती आता दिसते. तिला ओळखायला कसा चुकेन मी. 


     तिचा विचार करत होतोच इतक्यात चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडू लागले तसा मी पुन्हा भानावर आलो. तिची पावलेही आता जलदरित्या चालत होती. छत्री नसल्यामुळे ती आसरा शोधत होती. मी ही विसरून गेलो होतो की माझ्या बॅगेत आजच खरेदी केलेली छत्री आहे तसाच तिच्यामागे पळत होतो. बॅगेतून छत्री काढली अन् मी तिच्या जवळ पोहचलो. पावसाने आतापर्यंत चांगलीच सुरूवात केली होती. मी थोडी घाबरतंच छत्री पुढे केली. ती अर्धी भिजलेली होती आणि मी ही आता अर्धा भिजत होतो. थोडंसं संकोचूनच ती छत्रीत आली. रस्त्याला काहीच आसरा न मिळाल्याने नाईलाजाने तिला माझ्या छत्रीत यावं लागलं होतं. काही वेळापुर्वी पहिल्या नजरेने पाहण्यासाठी जिला आतुर झालो होतो तिच आता माझ्या सोबत एकाच छत्रीत चालत आहे यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. मनात विचार चालू होता, बोलावसं वाटत होतं पण सुरूवात कशी करावी काही सुचत नव्हतं. मी ओळखलंय तिला पण ती कशी ओळखेल इतक्या वर्षांनी मला. बोलू का तिच्याशी? आणि जर काही गैरसमज करून घेतला तर; नको नको जी सोबत लाभले ती पण गेली तर? भर पावसात ती रागावून एकटीच गेली तर? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात घर केलं.


      “ओळखलं नाहीस का रे खडूस” असा आवाज माझ्या कानावर आला.चालणारे पाय एकाएकी स्तब्ध झाले. मनात चाललेल्या सर्व प्रश्नांची एकदाच उत्तरे मिळाली. डोळ्यात पाणी आणि ओठांवर स्मितहास्य एकाच वेळी आलं. मी नेहमीच कल्पनेमध्ये तिचा विचार करत असतो म्हणून मी तिला ओळखणं स्वभाविक होतं; पण तिने ही मला ओळखावं ? माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी इतका वेळ शांतच असलेला पाहून पुन्हा तिनेच बोलायला सुरूवात केली. अजुनही तसाच आहेस रे. कुठे हरवलेला असतोस काय माहिती. मनातल्या आठवणींना ताजं करुन पाऊसही आता गेला होता. चालत चालत आम्हीही आता माझ्या घरांपर्यंत पोहचलो होतो. मला आता जावं लागणार तिच्या पासुन वेगळं व्हावं लागणार ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. शेवटी तिनेच बाय केलं, मी नुसतीच मान डोलावली. इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर तिचं जाणं मनाला पटतंच नव्हतं. तरीही जड अंत:करणाने मी तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळत होतो इतक्यात तिला ठेच लागली आणि ती पडली. हे पाहून मी तिला उचलायला जाण्यासाठी धावलो आणि धबकन अंथरुणावरुन पडलो. खऱ्या अर्थाने मी आता भानावर आलो होतो जागा झालो होतो. झोपेतून उठलो होतो तरी स्वप्नातून बाहेर आलो नव्हतो. डोळे अजुनही तिलाच शोधत होते. स्वप्नभंग झाल्याचं दु:ख होतंच पण स्वप्नात का होईना ती भेटल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama