Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Sunita madhukar patil

Tragedy


4.5  

Sunita madhukar patil

Tragedy


अवर्षण

अवर्षण

3 mins 281 3 mins 281

अंधाऱ्या खोलीत ती एकटीच बसली होती. कोणीतरी येईल, आपल्यासंग चार प्रेमाचे सबुद बोललं, एवढीच आस होती त्या थकल्या जीवाला. आताशा तिला एका डोळ्याने दिसत नव्हतं. डोळ्यात फुल पडलं होतं तिच्या... दुसऱ्या डोळ्यांची दृष्टीही क्षीण झालेली. चाचपडत ती उठली आणि कोपऱ्यात ठेवलेली जुनी ट्रंक तिने उघडली. तिला बाहेरच्या जगाशी जोडणाऱ्या झरोक्यातून येणाऱ्या उजेडात ती ट्रंकेत काहीतरी शोधू लागली.

गावच्या जत्रेत बैलगाडीच्या शर्यतीत जिंकल्यानंतर त्याच्या आवडत्या साजऱ्या आणि गोजऱ्यासोबत काढलेला फोटो आणि मानाचा पटका ( फेटा ) हाती लागताच तिचे डोळे चमकले. त्यावरून प्रेमाने हात फिरवता फिरवता तिच्याही नकळत तिचे डोळे गळू लागले.

" लई आस लागलीया बघा तुमास्नी भेटायची, लवकर सांगावा धाडाय सांगा त्या विठूरायाला. 

भरले कांदे, भरला लसूण, पिशव्या झाल्या दोन, 

सदाशिवरावांच नाव घेते, पोहोचल्यावर करा फोन,

पण तुमचा फोन काय आलाच नाय ", म्हणत ती रडू लागली. तिला उखाणे घ्यायची भारीच हौस. चालता बोलता ती उखाणे तयार करायची. आणि रडता रडताच त्याला आवडणार जात्यावरचं गीत गुणगुणत ती भूतकाळात हरवली.

कोंबडं आरवलं, पाखरांची किलबिल कानावर पडू लागली. तांबडं फुटायच्या आत नहाण उरकून जरी काठाचं हिरवंकंच इरकली लुगडं नेसून, लालभडक उगवता सूर्य कपाळावर ठसठशीत रेखून तिचा दिवस सुरू व्हायचा. अनुभवानं आलेला शहाणपणा तिच्या डोळ्यात आपसुकच झळकायचा.

तुळशी वृंदावणाभोवती सुरेख रांगोळी रेखुन त्यावर हळदी कुंकू वाहून थोडावेळ तिला न्याहाळायची. देवपूजा आटोपली की दिवसभराच्या कामाला ती लागायची. सुरेल स्वरात जात्यावर ओव्या गात दळण, कांडण झालं की चुलीला पांढऱ्या शुभ्र शाडूचा पोत्यारा फिरवला, तिला हळदी कुंकू वाहून सकाळची न्याहरी, दुपारची जेवणं उरकली जायची. भरल्या हसत्या खेळत्या गोकुळावरून नजर फिरवताना तिचा इवलासा जीव सुपाएवढा होऊन हरकून जायचा.

सगळं आवरून शेतात जाताच तो शेताचा छोटासाच पण हक्काचा तुकडा तिला सोन्याचा तुकडा वाटायचा. त्याच तुकड्यात सुगीच्या दिवसात पांढरेशुभ्र जोंधळे पाहिले की चांदण्यांचा सडा पडल्यासारखा तिला भास व्हायचा आणि तिच्या मनाला अपार बळ देऊन जायचा. तिने आणि तिच्या कारभाऱ्याने मुलांसाठी खूप स्वप्ने पाहिली होती. सांजच्याला शेतातून परतल्यावर तिचा कारभारी पोरांना अभ्यासाला बसवे. " लई शिका रं पोरांनो, चांगलं शिकून मोठं व्हा रं, शेतीत काय नाय. शेती म्हंजी नुसता एक डाव हाय, जितलु तर आपला नाहीतर वैऱ्याचा."

तो असा बोलायला लागला की तिला वाटायचं, पुढं येऊन आपण काहीतरी बोलावं... पण ओसरीवर येऊन कधी बोलली नाही ती कारण बाईमाणसानं गड्यासमोर तोंड उघडायचं नाही आईबापाकडून हे संस्कार घेऊनच तिने या घराचं माप ओलांडलं होतं. सारं काही सरळसोट आणि चांगलंच होतं असं नाही संसारातली अनेक अवर्षण परतवली होती तिने मोठ्या हिंमतीने. धन्याच्या खांद्याला खांदा लावून पण तिने तिच्या भरल्या गोकुळाचं हिरवेपण कमी होऊ दिलं नव्हतं कधी.

हळूहळू दिवस सरले, मुलं मोठी झाली. चांगली शिकून सवरून तिच्या धन्यानं संगीतल्यासारखं मोठी झाली. त्यांचे संसार सजले, बहरले. तिच्या गोकुळाचा परीघ विस्तारतं गेला. पांगत गेला. आसमंती पसरत गेला पण ती... ती बसून असते आता... अंधाऱ्या अडगळीच्या खोलीत... एखाद्या भेगाळलेल्या, तृषार्त, पडीक जमीनीप्रमाणे... वाट पाहात प्रेमाच्या चार शब्दांची बरसात होण्याची... मायेने कोणीतरी हात फिरवण्याची...  वेळोवेळी डोकावतात तिच्या खोलीत काही चेहरे, निर्भर आकाशी कधीतरी वर्दी लावलेल्या ढगांप्रमाणे... पण ते असतात फक्त मनात मळभ दाटवणारे, मनात काळोख निर्माण करणारे... तिने फार काही बोलू नये हीच असते फक्त एक अपेक्षा त्या चेहऱ्यानां... साकडं घालतेय ती तिच्या विठुरायाकडे... वाट पाहतेय ती हे अवर्षण संपण्याची, ह्या कोरड्या दुष्काळातून मुक्त होण्याची... कायमची...!!!


© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल.


Rate this content
Log in

More marathi story from Sunita madhukar patil

Similar marathi story from Tragedy