Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Ajinkya Jadhav

Drama Tragedy Crime


4  

Ajinkya Jadhav

Drama Tragedy Crime


असूर

असूर

13 mins 616 13 mins 616

मुसळधार पावसाचा आवाज हॉस्पिटलभोवती घुमत होता. तो धुमशानच घालत होता. पण इथे आत आशिष त्या पावसाकडे अगदी समाधानाने पाहात होता. अर्ध्या तासापूर्वी त्याला शुद्ध आली होती. शुद्धीवर येताच त्याच्या लक्षातही आले होते की आपले दोन्ही पाय गुडघ्या खाली निकामी झाले आहेत.पण तो कोणत्याही दडपणाखाली दिसत नव्हता. किंवा त्याला धक्का बसला आहे, तो नाराज आहे असेही जाणवत नव्हतं. आशिषचे हे वागणे भयंकर चमत्कारीक वाटावे असेच होते. इतक्या शांतपणे तो खिडकीच्या काचेतून त्या पावसाकडे पाहत बसला होता त्याचा आनंद घेत होता जसा की तो पाऊस त्याच्याचसाठी पडत आहे. नर्स आशिषच्या खोलीत येते.


"सर are you ok?" नर्स विचारते.

आशिष फक्त डोळे झापडून होकारार्थी उत्तर देतो.

"डॉक्टर येतीलच थोड्या वेळात..... " 

असे म्हणून नर्स जाते.

नर्स गेल्या गेल्या आशिषचा मित्र समाधान आत येतो.


"आशिष शुद्धीवर आलास. बरं झाले. खूप काळजी वाटत होती रे. पोलिस येतील थोड्या वेळात.. जबाब नोंदवायचा आहे. अरे पण हे असे घडले कसे? तुझ्याकडून इतकी मोठी चूक? मला तर यात काय तरी गडबड वाटते. तूच तर."


आशिष त्याला थांबवत विचारतो.

"डॉक्टर काय म्हणाले? आता मी कधीच चालू शकणार नाही का?"


"नाही... तसं पूर्ण बोलणे झाले नाही अजून माझे. पण तू इतका फ्री कसा आहेस आणि चेहऱ्यावर हे जे बारीक हसू आणून बोलतो आहेस ते नेमक कशासाठी? कसला आनंद झाला आहे तुला?"


"संध्या?" आशिष विचारतो.


"कोमात आहे ती. कंडीशन क्रीटीकल आहे. पण तू काळजी करू नकोस," असे बोलून समाधान त्याला आधार देतो.


"कंडीशन आधीपासूनच क्रिटीकल आहे. झालीय. केलीय. बाहेर पाऊस बघ किती धुमाकुळ घालतोय.सिगार पेटवून दे मला." असे बोलून आशिष सिगारसाठी हात पुढे करतो. 


समाधान त्याला स्वतः पेटवून देतो. ती माथेरी रंगाची जाड सिगार ओठांच्या कोपऱ्यात ठेऊन एक एक कश सोडत असतो.

आणि त्या धुरासोबत आपल्या कालच्या आठवणी. तो भयानक अपघात. सिगारच्या आधारे तो पुसण्याचा अगतिक प्रयत्न असतो. समोर पडणाऱ्या पावसाच्या साक्षीने. समाधानला आपल्याच मनात न्यायाधीश ठरवुन संपवू पहात असतो हे सर्व जे घडून गेले आहे.


पण आशिषला चांगलीच जाणीव होती की हे इतक्या साध्या पद्धतीने संपणार नाही आहे.आपली सिगार तो समाधानला देतो आणि संपवायला सांगतो. समाधान ती घेऊन विझवतो आणि आशिषला म्हणतो,

"आशिष मी तुला लहानपणापासुन ओळखतोय. तू लपवत आहेस काही तरी. तुझ्या चेहऱ्यावरील समाधानाची मला भीती वाटते आहे. कसा झाला नक्की अपघात? कंट्रोल सुटला का गाडीवरचा? की कुणी ठोकली?"

 

"तू तुझे फालतू प्रश्न बंद करणार आहेस? निर्लज्ज माणसा मित्र आपले दोन पाय गमवून बसलाय त्याला आधार द्यायचा टाकून चौकशी कसली करतोयस?" आशिष चिडला समाधानवर. 


"अरे बरोबर आहे तुझं? पण तुझे दोन पाय गेल्याचे दु:ख तुला स्वतःलाही जाणवत नाही आहे मला."

इतक्यात डॉक्टर आणि PSI पाटील आणि कॉन्स्टेबल आत येतात. 


आता मात्र आशिषचा चेहरा एकदम बदलतो. दुःखी नाराज एकटक कुठे तरी पाहात बसलेला.

“हॅल्लो आशिष..” डॉक्टर हाक मारतात.


आशिष डॉक्टरकडे फक्त पाहतो. 

“काळजी करू नका. सर्व ठिक होईल. आणि तुमची बॉडी मेडिसिनला चांगला रिस्पॉन्स देते आहे. देव सोबत आहे तुमच्या. दैव बलवत्तर तुमचे. अपघात मोठा झाला.”


"सिगरेट ओढली का कोणी?" पाटील विचारतात.


"हो! मी." समाधान उत्तर देतो.


आशिष खूप काळजीने विचारतो, "डॉक्टर संध्या कशी आहे. कुठे आहे ती?"


"त्यांच्या मेंदूला जबर मार बसला आहे. त्या कोमात आहेत.आमचे प्रयत्न चालू आहेत.पण....."


"पण डॉक्टर?" आशिष खूप कळवळून डोळ्यात पाणी आणून विचारतो.


"जोवर त्या कोमातून बाहेर येत नाहीत तोवर आम्ही काहीच करू शकत नाही."


डॉक्टरांचे हे शब्द ऐकून आशिष जोरात ओक्साबोक्शी रडू लागतो.हे सर्व पाहुन समाधान बुचकळ्यात पडलेला असतो.पण तो बोलेल काय? 

डॉक्टर आशिषला आधार देतात. समजूत काढतात. 

इतक्यात आशिषचा दुसरा प्रश्न येतो.

"डॉक्टर मी कधीच चालू शकणार नाही का? "


"अगदीच असे काही नाही. आम्ही प्रयत्न करतो आहोत. थोडे प्रॉब्लेम आहेत. ऑपरेशन नंतर ठिक होईल सर्व.पण मी आताच खात्री देत नाही. मनाने खंबीर राहा."


डॉक्टरांचे हे शब्द ऐकून तो डॉक्टरांचा हात पकडून रडू लागतो.

इतक्यात PSI पाटील बोलू लागतात.

"माफ करा मिस्टर आशिष. मला माहिती आहे ही वेळ नाही पण मला माझं काम करणे भाग आहे."


डॉक्टर आशिषला सांगतात. 

"हे PSI पाटील. जबाब नोंदवावा लागेल. ते विचारतात तेवढी माहिती द्या. पाटील साहेब लवकर आवरा. मी येतोय round ला जायचे आहे. काळजी घ्या आशिष." असे बोलून डॉक्टर निघतात.


"आशिष नेमके काय घडले मला सांगू शकाल.? म्हणजे समोरून कोणत्या गाडीने हूल दिली का?" पाटील म्हणाले.


"नाही साहेब. माझ्याच मुर्खपणामुळे हे घडले.गाडीचा स्पीड 80 च्या दरम्यान होता. आणि मी सर्रास या स्पीडला गाडी चालवतो अगदी घाटातही. त्या दिवशी घाटातील एक खड्डा चुकवत होतो. इतक्यात समोरून एक ट्रक आला.वळणामुळे माझ्या लक्षात आला नाही.मी घाबरलो गाडीवरचा कंट्रोल सुटला गाडी रस्त्याच्या बाहेर घातली आणि ती थेट घाटातून खाली दरीत कोसळली." आशिषने संपूर्ण जबाब दिला.


"तुमचे नशीब थोर आहे. मी कैक अपघात पाहिले.पण इतक्या मोठ्या अपघातातून वाचलेला माणूस पहिल्यांदा पाहतोय.जीवावरचे पायावर निभावले. काळजी घ्या येतो मी.काही वाटले तर हे माझे कार्ड ठेवा." पाटीलांनी ते कार्ड समाधानकडे दिले.आणि निघाले. आशिषच्या डोळ्यात पाणी होते. ते त्याने पटपट फूसले.आणि पुन्हा तो पाऊस अनुभवू लागला.. आणि तो पडतच होता.खूप काही तरी साठवून.

मघापासून आशिषचे जे वागणे चालू होते ते समाधान पाहात होता.त्याला ते नवीन नव्हते. तो आशिषला ओळखत होता. न राहवून तो आशिषला म्हणाला. 


"मला खरं ऐकायचे आहे."

आशिष त्याच्याकडे पाहुन हसू लागला.

"न राहवून माझ्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. आशिष. खरं सांग. काय घडले आहे? गाडीवरचा तुझा कंट्रोल जाऊच शकत नाही.किती मोठी किंमत मोजावी लागली तूला याची. बघतोयस ना?"


"कधीपासून ओळखतोस मला?" आशिष विचारू लागला. "तुझ्या मनातील भीती खरी आहे."

आशिषचे हे वाक्य ऐकून त्याला धक्का बसला. 

समाधान आपल्या खुर्चीवरून उठला. हळूहळू चालत खिडकी कडे गेला. पावसाचा जोर वाढला होता. खिडकीतून त्या पावसाकडे पहात समाधानने विचारले. 


"असे काय घडले? की ही वेळ आली?"


"वेळ आली नाही मित्रा. वेळ चुकली. चुकवली आणि तिने चुकवली मी नाही."

आशिष पुढे बोलू लागतो.

"तुलाही एकदा मी बोललो होतो. मला संध्याचे वागणे बदलले असे वाटते आहे. मझ्याकडे दुर्लक्ष करते आहे ती.त्यावर तूच म्हटलं होतस असे काही नाही. अति प्रेमामुळे तूला तस वाटते आहे. पण तू चुकीचा ठरलास सम्या. संध्या मला फसवत होती."


"काय?" समाधानने आशिषकडे पाहिले त्यालाच धक्का बसला होता या गोष्टीचा.


पुढे आशिष बोलू लागतो.

"सहा महिने झाले. तिचे वागणे फार बदलले होते. ऑफीस नंतरच्या पार्ट्या वाढल्या होत्या. कोण तर अनंत नावाचा कलिग आहे तिचा."


"अरे पण तू इतक्या ठामपणे कसे सांगतोयस?" समाधानने विचारले.


"मला बोलू दे." असे म्हणत आशिषने त्याला थांबवले.

"रोज रात्री तिचे बाल्कनीतून वाढलेले फ़ोन कॉल. खुश होऊन बोलणे. कधी रात्री अपरात्री कॉल येणे. गुपचूप room च्या बाहेर जाऊन बोलणे. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. सकाळीच ती आंघोळीला गेली असताना तिच्या मोबाईलवर silent notification पडत असायचे whats app चे. इतकी भयंकर तळपायाची आग मस्तकात जायची ना.."


"पण कधी विचारले नाहीस का तिला?" समाधान काळजीने विचारू लागला.


"विचारले ना? कुठल्या तरी मैत्रिणीचे नाव तोंडावर मारायची. बोललो तर संशय घेऊन बोलतोस तू असे उलटे बोलायची."

समाधानात आशिषला तोडत बोलला....


"पण काल मग तुम्ही दोघे एकत्र?"


"माझा एक क्लाइंट येणार होता त्या दिवशी.त्याची फ्लाईट होती.आणि आमच्याकडे वेळ कमी होता.म्हणून मी माझा एक पार्ट्नर त्याला airport जवळच्याच एका हॉटेलला भेटायचे ठरवले.ठरल्या वेळेत मीटिंग सुरू झाली. आणि अचानक माझे लक्ष हॉटेलच्या लॉबीमध्ये गेले."

इतकं बोलून आशिष थांबला.


समाधानने त्याच्याकडे पाहिले.त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तरी समाधान त्याला म्हणाला, "काय झाले आशिष ?"


आशिष पुढे बोलू लागला. "लॉबीमध्ये मी संध्याला पाहिले. तिच्या त्या ऑफिस कलिग बरोबर. आणि माझी तळपायाची आग मस्तकात गेली."


"अरे पण तीही तिच्या ऑफीस मीटिंगसाठी आली असेल तर?"


समाधानच्या या प्रश्नानंतर न थांबता आशिष बोलला,

"त्या दोघांनी रिसेप्शन काऊंटरवरून एका रूमची चावी घेतली. अनंतच्या हातात चावी होती. distance maintain होता दोघांमध्ये. दोघांच्या नजरा चारही बाजूंना गरगर फिरत होत्या. पावले पटापटा उचलत दोघेही पुढच्या लॉबीमध्येच घुसले. मी तसाच माझ्या खुर्चीवरून उठलो. मित्राला म्हणलो "मीटिंग पुढे चालू ठेव मी येतो." इतके सांगुन मी तिथून निघालो. त्यांचा पाठलाग केला. दोघेही एका रूम मध्ये गेलेत. ते बघून तूला सांगतो सम्या मला काय वाटत होते मी तूला शब्दात सांगुच शकत नाही. माझ्या आयुष्यातील तिच्या सोबतचे सर्व चांगले वाईट क्षण, आठवणी सर्व एका क्षणात डोळ्यासमोरून गेले. कसा तरी भिंतीचा आधार घेऊन उभा राहिलो तिकडे. माझे डोळे भरून येऊ लगले. हुंदके फुटू लगले. ते थांबवताही येत नाही होते मला. लग्नाला तीन वर्ष झाली. त्या अगोदरचे 4-5 वर्षांचे relation अरे असे काहीच कमी केले नाही रे तिला.उलट कधीही तिचा विचार पहिला केला.मुलाचे म्हटले तर ती अजुन तयार नाही अशी सांगायची. अरे सर्व सर्व डोळ्यांसमोरुन जाऊ लगले सम्या. ओक्साबोक्शी रडू लागलो भिंतीला डोके टेकवून.काय बोलू ? काय सांगु ? काय करू ? त्याला जाऊन मारू ? मी माझे काही करून घेऊ की हिचा जीव घेऊ हेच समजत नव्हते ? तरीही कशी तरी हिंम्मत एकवटून आता या परिस्थितीला सामोर जायचे असेच ठरवले आणि त्या खोलीच्या दिशेने माझी पावले सरकू लागली. प्रत्येक पावलागणीक मला तिचा चेहरा आठवत होता.ती मला फसवू शकते का ? खरेच? हेच प्रश्न मन खात होते. आणि मी दराच्या समोर येऊन उभा राहिलो. डोळे पुसले. आणि थरथरत्या हातांनी मी दार ठोकवले.दार उघडायला उशीर होत होता. तसा माझ्या मनातील राग उसळ्या घेत होता.आणि दार उघडले गेले.दार अनंतने उघडले. फुल पँट आणि बॉडीवर तो माझ्या समोर उभा होता.माझे डोळे रागाने लाल झाले होते.मला बघून तो बुचकळ्यात पडला. घाबरला त्याला काही समजत नाही होते.त्याला त्या अवतारात पाहुन त्याच्या कानाखाली एक ठेऊन द्यावी असाच पहिला विचार मनात आला. पण तितक्यात मागून आवाज आला. "अरे कोण आहे अनंत?" तो आवाज संध्याचा होता. मी अनंतला धक्का मरून बाजूला केले.पाठीमागे बेड वर संध्या गळ्यातील ओढणी बाजूला ठेवून बेडवर बिनधास्त पहुडली होती. तिला असे पाहुन माझ्या डोळ्यातून अश्रू पडू लागले. मला पाहुन ती तडकन बेडवरून उठली.ओढणी घेतली आणि माझ्याकडे धावत आली.

"आशिष तू...... तू..... तू... इथे ? इथे कसा ? तू समजतोस तसं काही नाही आहे.अरे आमची मीटिंग होती इथे. Client येईल इतक्यात..." 

असली फालतू बडबड ती माझ्यासमोर करू लागली.मी अनंतकडे पाहिले.तो खाली मान घालून एका कोपऱ्यात उभा होता.आता हे सर्व माझ्या हाताच्या बाहेर निघून गेले होते.मी एक क्षणही आता तिथे थांबलो नाही.मी तसाच तिथून निघालो.माझी पावले आगीच्या वेगाने चालत होती.मागून ही धावत येत होती. हॉटेलभर माझ्या नावाने बोंबलत होती. मी खाली उतरलो आणि गाडीत येऊन बसलो.मला रडू फुटत होते. हुंदके देऊन ओक्साबोक्शी रडून मोकळा झालो.गाडीच्या स्टेरींगवर डोके ठेऊन रडून घेतले. आणि इतक्यात फ्रंट डॊअरच्या काचेवर क्णॉक झाले. बाहेर संध्या होती. मी डोळे पुसले. चेहऱ्यावर हात फिरवला. दोन मिनिट शांत बसून राहिलो.ती बाहेरून काचेवर हात मारतच होती.मी दाराचे lock open केले.काच खाली केली. आणि तिला आत येऊन बस म्हटले.ती आत येऊन बसली.मी काचा वर केल्या. "आशिष तुझी प्रॉमिस तू समजतोयस तसे काही नाही. अरे खरंच मीटिंग होती. त्याला अस्वस्थ वाटत होते. ac पण बंद होता म्हणुन त्याने शर्ट काढला. please मनातून सर्व काढ आशिष. खरं बोलतेय मी. विश्वास ठेवा राजा माझ्यावर. पाया पडते तूझ्या नको असा मनात विचार आणू नकोस..." सम्या तिचे हे शब्द ऐकून आता माझा माझ्यावरचा ताबा सुटला. तिचा चेहरा मी दोन्ही हातात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून मी बघून तिला म्हटले, "हे बघ संध्या, माझ्या डोक्यावर चुतीया लिहिलेले नाही आहे.माणसे बघून मी ओळखतो.तुला काय वाटते तूझ्यावर लक्ष नाही होते का माझे.सर्व लक्ष होते.फक्त दाखवले नाही.पण हा आजचा दिवस माझ्या आयुष्यात येईल असे मला वाटले नाही होते.प्रेम केलेलेस ना गं. संपले. नवीन माणुस पाहुन संपले की माझी जागा दुसऱ्याला दिलीस.ही जी काही फालतू वटवट चालली आहे ना, ती थांबव. आणि मला खरं काय आहे ते सांग.नाही तर मला तू चांगलीच ओळखतेस.मला चिखलात हात घालायला लावू नकोस." असे काही तरी मी रागात बोललो आणि तिचा चेहरा सोडला मी.तिचा चेहरा इतक्या जोरात धरला होता मी की तिचे गाल लाल झाले होते. ती निःशब्द झाली होती. तिच्या कोरड्या चेहऱ्यावरून ओघळू लागणारे तिचे अश्रू हे ही आता मला कोरडे वाटू लगले होते. सम्या मी तलवारीचे वार सहन करीन पण जवळच्या माणसाने केलेला घात . नाही. ती बोलू लागली, "मी चुकली. हो मी चुकली. सहवासात अडकली मी त्याच्या.त्याच्या काळजीच्या.समजत होते मला मी चुकतेय.कित्येकदा मागे वळून येण्याचा प्रयत्न केला पण नाही जमले."


मी गाडी सुरू केली आणि घरी यायला निघालो. ती बोलतच होती.मी शांत ऐकत होतो.

"माफ कर मला.पाया पडते परत मी असे नाही वागणार."


"मी लाख माफ करीन.पण पुढे आपले नाते टिकेल असे वाटते का ?" मी विचारले.


"हो टिकेल. मी टीकवेन. तू फक्त माफ कर आता." ती म्हणली.


गाडीचा स्पीड 100 पार होता. माझ्या डोक्यावर तिचे शब्द जड होत जात होते.पण मला हा विषय कुठे तरी संपवायचा होता. मी तिला विचारले की, "तुमचे काही तरी ठरले असेलच ना ?"


त्यावर ती शांत राहिली. मी मोठ्याने ओरडलो.

"संध्या मी काय तरी विचारतोय."


संध्याने पुढचे उत्तर दिले ते धक्कादायक होते. ती म्हणली.

"हो.. मी काही तरी कारण काढून तुला divorce देणार होते. आणि मग त्याच्याशी लग्न करणार होते."


"इतके सोपे वाटले होते तुला ? पण त्याचे लग्न झालेले आहे ना ? तो काय करणार होता ?" मी विचारले.


"तो ही बायकोला सोड चिट्ठी देणार होता.”

तिचे उत्तर मला अगदीच पोरकट वाटू लगले. पण हे ऐकून जी काही आग डोक्यात पेटत होती ती वणवा लागल्या सारखी वाढतच जात होती. मी तिला म्हणालो, "ठिक आहे. तुम्हाला मदत करतो मी."


इतक्यात गाडी वेळवनी घाटात आली होती. उताराला मी अजिबात गाडीचा वेग कमी केला नाही.

तिने विचारले, "कसली मदत?"


“मी देतो सोडचिट्ठी तुला. माझ्यासोबत नाही पण त्याच्यासोबत खुश राहा.."

माझे उत्तर ऐकून ती चकित झाली. आणि म्हणाली 

"काय बडबडतोयस. मला माझी चूक मान्य आहे. माफ कर मला please..."


"विचार कर हे संशयाचे वार मनात घेऊन आपलें नाते किती टिकेल किती पुढे जाईल.? तू गिल्टी रहावीस नात्यात अशी मझी अजिबात इच्छा नाही. तुझ्या या नव्या नात्याला माझी परवानगी आहे. विचार कर."

इतक्यात मला त्या पार्ट्नर मित्राचा फ़ोन आला.मी फ़ोन स्विच ऑफ केला.

"तू राहू शकतोस माझ्याशिवाय.माझं प्रेम विसरू शकतोस आशिष?" 

तिचा हां प्रश्न मला हास्यास्पद वाटला.

"अगं पण तू तरी राहू शकतेस ना? विसरू शकतेस ना? थांबवूया नाते. तू तुझे नवीन नाते सुरू कर. मी उद्याच. वकील दीक्षित सोबत बोलून घेतो. पण तू तूझा निर्णय अजुन नाही सांगितलास..." 


मी पूर्ण तयारी दाखवली सोडण्याची.

"ठिक आहे आशिष. तूझ्यासारखा समजूतदार नवरा मला मिळाला हे भाग्य माझे. खूप गोड आहेस तू. पण मला खरंच माफ कर. मी खूप मोठी गुन्हेगार आहे तुझी. तरी तू माझ्यासाठी इतके करतोयस." ती आभार मानत होती.

"अगं पण सोडचिठ्ठी अनंतने पण त्याच्या बायकोला दिली पाहिजे.देईल ना तो ?" मी विचारले.


"देणार तो. उलट त्यांच्यात प्रॉब्लेम सुरूच आहेत. ते सोड चिट्ठी देणार आहेत. आम्हाला प्रॉब्लेम तुझाच होता. sorry म्हणजे तसं होतं."


तिने हे उत्तर दिले.

"संध्या पण मी कमी कुठे पडलो ? फक्त सहज विचारतोय."


“तू कमी नाही पडलास. कमी मीच पडले. त्याच्या सहवासात अडकली. तुझा विसर पडला मला. मी तुझी गुन्हेगार आहे. पण तू आज जसा वागतोयस मला इतक्या समजुतीने घेतलेस. माझे नाते स्वीकारलेस. मीच कमनशिबी आहे."

"पण गुन्ह्याची शिक्षा तर भेटायला हवी ना तुला?"


"तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे."

ती माझ्याकडे बघून खूप विश्वसाने बोलत होती.

तिचे हे वाक्य संपायला आणि तोच मी गाडीचे स्टेरींग पूर्ण फिरवले. आणि गाडी रस्त्यावरून खाली घाटात उडाली.

ती जोरात ओरडली, “आशिष..” तिने मला घट्ट धरले आणि मी फक्त तिच्याकडे पाहत होतो.

काही सेकंदात गाडी खाली जाऊन आदळली air bag उघडल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

तिचं डोक जोरात आपटले रक्त खूप वेगाने निघत होते शेवटचे तिचे शब्द आठवतात मला, “ सॉरी आशिष...”

आणि मी बेशुद्ध पडलो. 


हे सर्व ऐकून समाधानच्या अंगावर काटा आला.

"म्हणजे तू खून घडवून आणलास? हो ना ? बरोबर ना ? तू खून केलास? तसाच प्रयत्न होता तुझा..." 

समाधान आशिषला विचारू लागला.


आशिष शांतपणे त्याच्याकडे पाहुन बोलला, "तू जे समजशील तसं खून किंवा आत्महत्या पण अजुन तरी प्राण आहे ना खरं तर आम्ही वाचू याची मला शाश्वती नव्हती पण.. सम्या विश्वासघात झाला माझा. काय करायला हवं होते रे मी ? तू काय केलं असतंस तुझी बायको अशी वागली असती तर ?"


"आशिष.. थांब." समाधान मोठ्याने ओरडला. "लिमिट सोडून बोलतोयस. प्रश्न बोलून ही सुटतात."


"सॉरी सम्या वेळ निघून गेलेली आणि कुठले प्रश्न रे ? ज्या प्रश्नांची उत्तरे तिनेच ठरवली होती असे प्रश्न. काय करायला हवं होते मी ? तिला जाऊ द्यायला हवे होते की नव्याने पुन्हा नातं सुरू करायला हवं होत. राहिलो असतो खुश मी ? तीच ठाऊक नाही मी माझं बोलतोय. लोकं काय म्हणाली असती?"


"म्हणजे तूझा इगो आडवा आला आशिष ?"

"तसं समज ?"

 आशिष उडवा उडवीची उत्तरे द्यायला लागला.


समाधान पुढे म्हणाला, “तुला बायकोने फसवले हे तूला सहन झाले नाही. वर परत ती तुला सोडायलाही तयार होती ते तुला जास्त लागले. तुझ्यातील पुरुष जागा झाला. तुला तिला मारायचेच होते. पण फक्त तिला मारून तू स्वतः त्या पापा खाली दाबला जाणार होतास म्हणून तू ही मरणाचा मार्ग निवडलास. पण मग तिला विश्वास का दिलास ? तिला सहकार्य करशील असे ?"


समाधानचा हां प्रश्न प्रचंड ताकदीचा होता. त्यावर आशिष म्हणाला, "मला ही विश्वासघात करायचा होता ?"


"मूर्ख झाला आहेस तू. माणसातून उठला आहेस राक्षस झाला आहेस.. राक्षस ही असुरी वृत्ती आहे तुझी..तुला शरमही वाटत नाही.. ना पाप केल्याची भीती. विचार कर उद्या ती कोमातून बाहेर आल्यावर. पोलिसांना सांगणार सर्व अटक होईल तुला.."

 

आशिष रागारागाने बोलू लागला.

समाधान शांत पणे त्याच्या कडे बघून बोलला, "अरे पण ती जगली तर ना ?"

हे उत्तर ऐकून समाधान क्षणभरही तिथे थांबला नाही. तो निघून गेला. आशिषची खिडकी बाहेर पुन्हा तंद्री लागली. पण पाऊस थांबला होता. आकाश उघडले होते.


दुसऱ्या दिवशी समाधान आला. आशिष व्हीलचेअरवर बसला होता. समाधानची चाहूल त्याला लागली. समाधानकडे ना बघता आशिष बोलला, "मला संध्याकडे घेऊन चल."


समाधान काहीही न बोलता 2 मिनिटे तसाच उभा राहिला पण नंतर तो त्याला घेऊन गेला. संध्या ICU मध्ये होती.


गोरीपान संध्या. त्या हॉस्पिटल रूमच्या लाईटमध्येही ती अगदी उजळून दिसत होती. खूप साऱ्या सलाईन बाजूला moniter गळ्याभोवती प्लास्टिक pad चा आधार. ती कोमात होती पण तिचे डोळे उघडे होते. डॉक्टरांचे म्हणणे होते की तिची हालचाल होत नसली तरी तिला सर्व समजतंय दिसतंय. समाधान आशिषला घेऊन आत गेला.


संध्याला पाहुन आशिषच्या डोळ्यात पाणी आले.तिचे ते सताड उघडे डोळे त्याला प्रश्न करत होते.तू असा का वागलास ? आशिषने संध्याच्या हातावर हात ठेवला. आणि संध्याच्या डोळ्यातून अश्रू पडू लगले. आशिष बोलू लागला,

“संध्या माफ कर मला. तू करणार नाहीसच. तो सर्वस्वी तुझा अधिकार आहे. पण हो मी सहन नाही करू शकत माझं प्रेम माझं माणुस दुसऱ्या कोणासोबत."


आशिषचे हे सर्व सुर रडव्या स्वरात होते. आशिष संध्याच्या हातावर हात चोळू लागला, “संध्या मी ही तुझा विश्वासघात केला..”


“समाधान खरंच मित्रा माझ्यातील असूर माझ्या वरचढ ठरला संध्या मला तुझा खूप राग आहे. कदाचित राहिल ही तसाच पण तू लवकर बरी हो मी वाट पाहतोय." संध्याच्या डोळ्यातून पाणी वाहतच होते. आशिष बोलला, "आय लव यू संध्या."

 

आणि moniter वाजू लागला अचानक स्क्रीन वरचे आकडे बदलू लगले. त्यांचे स्पीड खूप होते. समाधान आणि आशिषला काही समजत नव्हते. आशिषने समाधानला डॉक्टरला बोलवायला सांगितले.समाधान धावत गेला. आशिष संध्याला हाका मारत होता. तुला काही होणार नाही हा विश्वास देत होता.इतक्यात डॉक्टर आत आले.आणि moniter वर फक्त आडव्या रेषा उरल्या होत्या. सताड डोळे उघडे ठेऊन संध्या निघून गेली होती.


"सम्या संध्या गेली रे मला सोडून "

हां करून सुर होता आशिषचा. यानंतर आशिष ढसा ढसा रडू लागला. पण आता त्याचा काही उपयोग नाही होता.तो उध्वस्त झला होता.


या कथेत नेमका असूर कोण ? आशिष ? हो तोच. कारण त्याने ठरवले असते तर हे प्रकरण तो वेगळ्या पद्धतीने हाताळू शकला असता.पण त्याने जो मार्ग निवडला त्याने संध्या तर गेलीच पण त्याने त्याचे दोन्ही पाय ही गमावले. त्याच्यातलं असूरी समाधान हे काही काळापुरते होते. पण त्याचे परिणाम त्याला एका मोठ्या शापिताप्रमाणे आयुष्यभर राहणार होते. संध्या ही देखील एक असूरच. मोहाचे जाळे तिला ओळखता आले नाही. आणि ती आशिषला गृहीत धरू लागली आणि इथेच तिची असूरी वृत्ती चुकली. त्याचे परिणाम तिला ही भोगावे लागले. चूक एकाची होती पण त्याने दोघांचीही आयुष्य उद्ध्वस्त झाली. नात्यामध्ये कधीही चूक होत असेल तर ती वेळीच सावरायला शिका. सोबतच्या माणसावर विश्वास ठेवायला शिका. बोला मोकळे व्हा. कारण नात्यातील एक लहानशी चूक हि मोठ मोठी आयुष्य बरबाद करते. आणि मग नाते हे स्वतः देखील असूर होऊ शकते. म्हणून नात्यातील असूर किंवा नात्याला असूर होण्यापासून वाचवा त्याला विश्वासाच्या दोरीने घट्ट बांधून ठेवा.  


Rate this content
Log in

More marathi story from Ajinkya Jadhav

Similar marathi story from Drama