Ramesh Sawant

Horror

3  

Ramesh Sawant

Horror

अंधारमग्न

अंधारमग्न

7 mins
174


       शाळेतील काम आटोपून बाबू घरी निघाला तेव्हा सायंकाळचे सात वाजले होते. लवकरच अंधारून येईल म्हणून काटकुळया अंगाचा बाबू झपाझप पावले टाकत शाळेशेजारी असलेल्या पडक्या वाड्यासमोर आला. या वाड्यात गेली कित्येक वर्षे कुणी रहात नव्हते. त्यामुळे गावातले लोक या वाड्याला ‘भुताचा वाडा’ म्हणून ओळखायचे. या वाड्याबद्दल आणखी बरंच काही बोललं जायचं ते बाबूला आठवायला लागलं. लहानपणी गावातले लोक जे थरारक किस्से सांगायचे ते आठवून बाबूच्या काळजात भीतीची एक तीव्र लहर उमटून गेली. कुणी म्हणायचं की पांढऱ्या केसाची आणि काळी कुळकुळीत असलेली एक बेवारशी म्हातारी शांताबाई या वाड्यात एकटीच राहत असे. मुलांना शाळेतून जेवणाची सुट्टी मिळाली की जेवून झाल्यावर ती सगळी या वाड्यात खेळायला यायची. शांताबाई शाळेतील मुलांशिवाय इतर कुणालाही वाड्यात घेत नसे. तिचा स्वभाव तसा तिरसट आणि कटकटी होता. परंतु मुले आली की त्यांना ती चॉकलेट किंवा टॉफी वगैरे दिल्याशिवाय जाऊ द्यायची नाही. कुणी म्हणायचं की तिचा नवरा एका गूढ आजाराने अकाली मरण पावला पण परंतु शांताबाईंने आपल्या लहान मुलीकडे पाहून आपले दुःख मुकाट्याने गिळले. काही दिवसांनी तिची मुलगी शाळेतून येताना एका ट्रकने तिच्या सायकलला ठोकले आणि ती तिथेच गतप्राण झाली. इकडे शांताबाईने तिच्या मृत्यूचा धसका घेतला आणि स्वतःला वाड्यात कोंडून घेतले. मुलं जेव्हा खेळायला येत तेव्हा शांताबाई बाहेर येऊन मुलांना विचारायची, “ बाळांनो , माझी मुलगी कुंदा आली का ? ” मुलं विचारात पडायची आणि घरी जाऊन सांगायची की शांताबाई वेडी झाली आहे. गावात आवई उठली की शांताबाईला मुलीच्या भुताने झपाटले आहे.

      भुताचा वाडा नजरेआड झाल्यावर बाबूने ‘ हुश्श ’ केले आणि श्वास टाकला. रात्रीचा अंधार पडल्यामुळे त्या निर्जन रस्त्यावर अंगावर रोमांच उभे करणारा मिट्ट काळोखाचा जबडा आ वासून पसरला होता. बाबूला वाटले की काळोखाच्या या भयाण गुहेत आपण हरवून जातो की काय ? बाबूच्या मनात लहानपणीचे भूताटकीचे अनेक ऐकीव किस्से शांताबाईच्या पांढऱ्या केसांच्या गुंत्यासारखे फेर धरून नाचू लागले होते. लहानपणी गावातील मोठी माणसे सांगायची की शाळेच्या निर्जन रस्त्यावर रात्रीच्या वेळी ‘ मानकाप्या ‘ भूत येते आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची मान हातानं लावलेल्या चाकूने कापायचा प्रयत्न करते. मोठं झाल्यावर ही सगळी अफवा होती असे समजल्यावर बाबूची भीती गेली होती. तरीही अबोध मनात दडून राहिलेले ते किस्से बाबूला एखाद्या रहस्यपटातील भयग्रस्त कथानकाप्रमाणे छळत होते. कधी कधी झोपेत असताना त्याला या मानकाप्याची स्वप्ने पडत तेव्हा तो झोपेतच ओरडायचा तेव्हा घरातली सगळी माणसे जागी व्हायची. बाबुने मनातले सगळे विवेकशून्य विचार बाजूला सारून आपल्या भ्रमिष्ट मनाला जागं करायचा प्रयत्न केला. तेवढ्यात रस्त्याशेजारच्या काळपट झाडीतून काहीतरी खसखसल्या सारखा आवाज आला. अचानक ऐकू आलेल्या या आवाजाने अबोध मनात दडून राहिलेली ‘भुते’ पटकन जागी झाली आणि बाबूची बोबडी वळायची तेवढी बाकी राहिली होती. बाबूने तिरप्या डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा समोरून एक काळं कुत्रं लगबगीने शेपूट सावरत झुडुपातून बाहेर पडताना दिसलं. त्याच्या मागोमाग अंधारातून एक अस्पष्ट मानवी आकृति झपकन आपल्या अंगावर येते की काय असे वाटून बाबू चपापला आणि झटकन बाजूला झाला. तेव्हा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि तो जोरात ओरडला. बाबूच्या आवाजाने झाडातली सळसळ क्षणभर थांबली आणि काळ्या कुत्र्‍याच्या वाटेने एक हाडकुळा माणूस बाहेर येताना दिसला. बाबू पुन्हा एकदा शहारला आणि त्याच्या घशाला कोरड पडली. भूतखेताची भीती घालविण्यासाठी लहानपणी आईने शिकविलेली आणि पाठ करून घेतलेली रामरक्षा तोंडाने पुटपुटत बाबू त्या भटक्या माणसाकडे बघून त्यांच्या मागे मागे चालू लागला. 

       “ राम राम पाव्हनं, कुटं निघाला म्हणायचं ”  बाबूने त्याला हाक मारली.

“ इथंच बाजूच्या बांबुळी गावात जातोय. हे काळं कुत्रं बघा कसं माझ्या मागं मागं येतंय ? ” तो करवादत पुटपुटला .

      थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्या माणसाने बाबूला करंगळी दाखवली आणि तो रस्त्याच्या कडेला जाऊन लघवीला बसला. इकडे बाबू त्याच्या कुत्र्‍याबरोबर पुढे चालू लागला. त्याच्या मागोमाग तो काळा कुत्रा शेपटी हलवत कुरकुर करीत येत होता. आजूबाजूची झाडेझुडुपे भूतांसारखी माना हलवत वाऱ्याबरोबर डोलत होती. मधूनच एका घुबडाचा भेसूर आवाज येत होता. बाबूला वाटले की निदान तो माणूस सोबत होता तेव्हा जिवात जीव आला होता. पण त्याला मध्येच ‘लागली’ , मग काय करणार म्हणा ? एकट्याने पुढे जावे की मागे फिरावे ? असा गहन प्रश्न त्याला पडला आणि त्याने मान वळवून मागे पाहिले, तर तो काळाकुट्ट माणूस अंधाराच्या खोल विवरात जणू बुडून गेल्यासारखा अदृश्य झाला होता. बाबूला वाटले की आपल्याला काहीच दिसेनासे झाले की काय म्हणावं ? म्हणून डोळ्यांच्या खोबणीत बोटे चोळून तो पुनः पुन्हा इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा फक्त कुत्र्‍याच्या केकाटण्याचा आवाज येत होता. बाकी सगळं वातावरण नीरव शांततेत बुडून गेलेलं दिसत होतं. इकडे बाबूच्या अंगाचा थरथराट वाढला, कारण कुत्र्‍याचा मालक रस्त्याच्या बाजूला लघवीला गेला होता तिथे कुणीच दिसत नव्हतं. हनुमान मंदिर असलेला पिंपळाचा पार त्याच्या दृष्टीपथात होता पण तिथे पोचेपर्यंत धीर सुटू द्यायचा नाही असे ठरवून बाबू पुनः एकदा लांब लांब पावले टाकीत त्या दिशेने चालू लागला. मधूनच त्याला भुताच्या वाड्याची आणि त्यातील पांढऱ्या केसांच्या म्हातारीची आठवण झाली. ती म्हातारी आपला पाठलाग करीत असावी असे भास त्याला होऊ लागले. परंतु हे मनाचे भ्रम असावेत असा विचार करून तो धीर करून पुढची वाट चालू लागला. हनुमान मंदिर असलेल्या पिंपळाचा पार जवळ आला तेव्हा त्याच्याबरोबर आलेल्या अनोळखी माणसाला बाबू विसरून गेला होता. दुसऱ्या बाजूने त्या माणसाचा कुत्रा मात्र बाबूला सोडायला तयार नव्हता. या भयाण वातावरणातील एकटेपणात कुत्र्‍याची सोबत लाभल्याने बाबूला तेव्हढेच समाधान वाटले आणि तो गायब झालेल्या माणसाला विसरून जाण्याचा प्रयत्न करू लागला.

      पिंपळाच्या पाराजवळ आल्यावर बाबूला हायसे वाटले, कारण येथून त्याचे गाव जवळ होते. रात्रीचे आठ वाजले असले तरी त्या दिवशी अमावास्या असल्याने काळोख खूप घनदाट होता. रस्ता जंगलातून जात होता की जंगलात रस्ता, हेच कळेनासे झाले होते. त्यातून पोटात भुकेने कावळे ओरडत होते आणि बाबूच्या घशाला भीतीने कोरड पडली होती. पिशवीतील पाण्याची बाटली काढून बाबूने पाण्याचा घोट घेतला तेव्हा ते पाणी ‘गुडगुड’ आवाज करीत पोटात गेले. शेजारी चालत असलेल्या कुत्र्‍याचा आवाज येईना म्हणून बाबूने मान वळवून मागे पाहिले तर तो कुत्राही कुठे दिसेनासा झालेला. आता मात्र बाबूचे उरले सुरले अवसान गळून पडले. अंगावर आलेला काटा त्याच्या कातडीला हजारो भोके पाडील की काय असे त्याला वाटले आणि त्याचे हात- पाय थरथर कापू लागले. आईने भीती घालविण्यासाठी पाठ करून दिलेली रामरक्षासुद्धा कामी येईना, तेव्हा बाबू काहीतरी वेड्यासारखे बरळू लागला. त्याच्या मेंदूच्या आठवणींच्या कप्प्यात घट्ट बसलेली लहानपणची ‘ मानकाप्या’ भुताची गोष्ट त्याला सतावू लागली. वाड्यातील म्हातारीचे बोलणे त्याच्या कानात घुमू लागले. तो निर्जन रस्ता, शाळेपुढील वडाचे झाड , हनुमानाचा पिंपळाचा पार, तो अनोळखी माणूस , रस्त्याच्या कडेचे जंगल , झाडझुडुपात गडप झालेली वाट, विचित्र आवाज काढीत चित्कारणारे घुबड, शेपूट हलवित कुरकुर करीत चालणारे कुत्रे हे सगळे त्याला जणू वेडावून दाखवीत होते. डोके गच्च धरून रस्त्यात कुठेतरी गप्पगार झोपून जावे असे त्याला वाटले. निदान झोपेत तरी मनाला शांती मिळेल आणि भीती निघून जाईल ही आशा त्याला वाटू लागली. 

      बाबूला अचानक त्याच्या बापूची म्हणजे वडिलांची आठवण आली. भूतांचा विषय निघाला की बापू त्याला नेहमी एक गंमतीचा प्रसंग सांगायचे. त्यांच्या तरूणपणात काही मित्रांनी एक पैज लावली होती. जो कुणी गावच्या स्मशानात मध्यरात्री एकट्याने जाऊन खुंटी ठोकून सहीसलामत येईल त्याला सर्वांकडून शंभर रुपयाचे बक्षीस लावले होते. गावात त्याकाळी भुताटकीचे अनेक किस्से रंगवून सांगितले जायचे. त्यामुळे हे धाडस करण्याचे आव्हान बहुतेक मित्रांनी सोईस्कररित्या नाकारले होते. त्यातल्या त्यात एक जण धीर करून तिथे जायला तयार झाला. बापूंच्या काळी तरुण मुले धोतर नेसायची. तर झाले काय की जो तरुण स्मशानात खुंटी ठोकायला गेला तो परत येताना जोरात ओरडत ओरडत पळत सुटला होता. तो मित्रांच्या जवळ आला तेव्हा त्याने सांगितले की खुंटी ठोकल्यावर तो परत यायला निघाला तेव्हा कुणीतरी त्याचे धोतर घट्ट पकडून ठेवले असे त्याला वाटले. म्हणून मागे वळून न पाहता धोतर फाटले तरी तो जीव घेऊन पळत सुटला होता. त्याचा हा गर्भगळीत अवतार बघून सगळे मित्र खो -खो करून हसत सुटले होते. मात्र बापूंना कळले होते की त्याचे धोतर खुंटीत अडकले असावे. भूताटकीबाबतचा हा विनोद आठवून बाबू हसण्याऐवजी गर्भगळीत झाला कारण या प्रसंगाने त्याला पुन्हा भूताची आठवण करून दिली होती. त्याच्या अंगावर पुन्हा रोमांच उभे राहिले आणि तो कपाळावरचा घाम पुसत गावाकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर एकटाच चालू लागला. गावाच्या चौकात असलेली दाजीचे दुकान अंधारलेल्या रस्त्यात भुतासारखे दिसू लागले होते. बाबूला मात्र ती गाव जवळ आल्याची निशाणी असल्याने हायसे वाटले. बाबू कसाबसा दुकानाजवळ पोचला आणि तिथल्या बाकावर बसायचे म्हणून जवळची पिशवी बाजूला ठेवू लागला. तेवढ्यात दुकानाजवळ एक कुत्रा केकाटू लागला होता. हा कुत्रा तर गावातील दिसत नाही या शंकेने बाबूने त्याला ‘ हाड हाड’ म्हणत हाकलण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो काही गप्प बसेना. थोड्या वेळाने तो कुत्रा त्याच्या जवळ यायला लागला तेव्हा मात्र बाबूने ओळखले की हा तर मघाशी वाटेत भेटलेला काळा कुत्राच होता. आता मात्र बाबूला त्या कुत्र्याच्या गायब होण्याचे रहस्य कळाले होते. बाकी राहिला तो अनोळखी माणूस. गावात पोचल्यामुळे बाबूला थोडा धीर आला होता. तो आपल्या ग्रामदेवतेचे स्मरण करू लागला. मग तो त्या अनोळखी माणसाची आठवण नको म्हणून त्या कुत्र्‍याला बरोबर घेऊन आपल्या घराकडे जायला निघाला. त्याचवेळी दुकानाशेजारी असलेल्या विहीरीच्या कठड्यावर एक किडकिडीत माणूस अंधाराची शाल ओढून बसलेला दिसला. गावात असून सुद्धा बाबूचे हात पाय पुन्हा एकदा लटपटू लागले. काळयाकुट्ट अंधारात गडप झालेल्या त्या माणसाच्या जवळ जाण्याची सुद्धा बाबूला शुद्ध राहिली नव्हती. एवढ्यात तो माणूसच खरबरीत आवाजात बोलला, “ काय पाव्हनं, वळाखलं नाही का? आपण वाटेत अगुदर भेटलेलो ? मग मला लघवी लागली म्हणून बाजूला गेलो .. ”

बाबूला वाटले की आता पुढे काय सांगणार हा ? म्हणून गावात असून सुद्धा बाबूने त्याला घाईघाईने विचारले, “ मग पुढे काय? ..सांगा की राव ?” 

तो अनोळखी माणूस जे काही म्हणाला ते ऐकून बाबूला हसावे की रडावे की ओरडावे हेच कळेना. तो माणूस म्हणाला, “काय सांगावं राव ! मी परत येताना अंधारात वाट चुकलो आणि रानातून भरकटत भलत्या दिशेला गेलो. पुढे माझ्या कुत्र्‍याचा आवाज आला म्हणून मी त्या दिशेला वळलो. आणि आता इथे तुम्हाला भेटतोय. आहे की नाही मज्जा ! दुनिया गोल आहे म्हणतात ते खरंय की !”

इकडे बाबूच्या अंगातले भूताटकीचे ‘ भूत ’ पळून गेले होते आणि गावात पसरलेली स्मशानशांतता देखिल अमावास्येच्या काळोखाच्या पदराआड थिजून गेली होती. बाबूचे भय सुद्धा रात्रीच्या काळोखात गडप होऊन गेले. तो अनोळखी माणूस आणि त्याच्याबरोबर गावात आलेला तो काळाकुट्ट कुत्रा मात्र बाबूला आजही आठवतो आहे आणि त्याच्या मेंदूत घर करून बसला आहे.  

**********


Rate this content
Log in

More marathi story from Ramesh Sawant

Similar marathi story from Horror