Satyam Patil

Drama Tragedy

3.8  

Satyam Patil

Drama Tragedy

आलीया भोगासी...

आलीया भोगासी...

7 mins
508


मिता नुकतेच काम आवरून पलंगावर येऊन बसली. आभाळ भरून आलं होतं , पाऊस येण्याचा अंदाज दिसत होता तोच बाजूला झोपलेल्या अंशची हलकीशी चुळबुळ जाणवली. तिने उठून त्याचे पांघरून सारखे केले व हलकेच डोक्यावरून हात फिरवला. त्याची चुळबुळ थांबली व तो झोपी गेला. त्या निरागस चेहऱ्याकडे बघून नकळत तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. कदाचित हेच स्मित तिला जगण्यास ऊर्जा देत होते. 

      

मिता भूतकाळातल्या विचारचक्रात हरवली तोच ढगांचा गडगडाट झाला व ती भानावर आली .बाहेर बघितले गार वारा सुटला होता व टपोरे थेंब पडायला लागलेले. तिने लगोलग बाहेर वाळत टाकलेले कपडे काढून आणले व मागच्या खिडकीत जाऊन पावसाच्या धारा बघू लागली. तिने रेडिओ ऑन केला व हलक्या आवाजात मुसळधार सरींकडे बघत बसली. रेडिओ बोलू लागला

"आयुष्यात काही महत्वाच्या घटना विशेषतः दुःखद घटना ज्या वेळी , ज्या स्थळी घडतात ना, ती वेळ किंवा त्या जागेशी आपल्याला घृणा वाटायला लागते. एक नकारात्मक नाते निर्माण होते त्या जागेशी त्या वेळेशी अथवा एखाद्या संगीताशीसुद्धा...एखाद्या वेळी तुमच्या आयुष्यातील मोठी घटना घडत असते आणि त्यावेळेस नेमके एखादं गाणं कुठून तरी ऐकू येत असते आणि नकळत त्या घटनेसोबतच मनात ते गाणंही कोरले जाते. जेव्हा जेव्हा ते गाणं आपण ऐकू तेव्हा तेव्हा आपल्याला त्या घटनेची आठवण येते व मन पेटून उठते ....असेच एखादे आठवणीतले गाणे, स्थळ किंवा वेळ आम्हाला सांगा......."


रेडिओ जॉकीचे पुढील शब्द हवेतच विरले. हे सर्व एकूण मिताला उलगडा झाला .….का पाऊस पडताना तिला जुन्या आठवणी का आठवतात....का मन पुन्हा पुन्हा भूतकाळात डोकावते, जणू एखादा व्यसनी व्यक्ती परत परत व्यसनाकडे जातो , त्याला हे माहीत असूनही ही की त्यासाठी व्यसन नुकसान करणार आहे. अगदी त्याचप्रमाणे मिताचे व्हायचे.....भूतकाळात गेल्यावर कडू आठवणी मनाला जखमी करायच्या....पण वेड मन पुन्हा पुन्हा तिथेच जायचे व दुःखी-कष्टी होऊन परत यायचं. यावेळी सुद्धा नकळत पुन्हा मन भूतकाळात हरवले. 

      

मिताचे नवीन लग्न झाले होते. सगळीकडे नव्याची नवलाई , सगळ्यांनी केलेलं मिताचे कौतुक, नवं-नवीन लोकं, घरातल्यांची चिडवा-चिडवी यात मन रमले .अमर सतत कामानिमित्त बाहेर असायचा कधी-कधी आठवडभर घरी येत नसे पण चांगला कमवत असल्याने व स्वभावाने सरळ असल्याने तिला व कुटुंबतल्या कुणालाही अडचण नव्हती. हळूहळू दोघांमधील दुरावे वाढू लागले पण नोकरी फिरतीची असल्याने नाईलाज होता. जणू दोघेही वेगवेगळी आयुष्य जगत होते....आता अमर चे गावाकडे येणे सुद्धा कमी झाले .आल्यावर काय दोन-चार दिवस एकमेकांचा सहवास. त्यात घरचे नव्या पाहुण्याची वाट पाहत होते . यातूनच घरच्यांनीच अडचण समजून त्यांना वेगळे राहण्याचा मार्ग मोकळा केला. आता मिता आणि अमर जिल्ह्याचा ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहू लागले. त्यांच्यातील वादही कमी-जास्त प्रमाणात मिटले. यथावकाश मिताला दिवस गेले व तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सर्व काही आनंदी चालले होते. आता तिचा मुलगा अडीच वर्षांचा झाला .मुलाच्या कौतुकात व त्याच्या बाल-लीलांमध्ये दोघे रमले. सर्व काही सुरळीत चालू असतांना एक दिवस होत्याचे नव्हते झाले......जणू मन आणि शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार झाले.

     

     तो दिवस मिताला आजही जसाच्या तसा आठवत होता...पावसाळ्याचे दिवस... सकाळपासून रिपरिप चालू , दुपारी मात्र मुसळधार पाऊस सुरू झाला .मिताने अंश ला नुकतेच झोपी लावले होते तोच दरवाजा जोरात वाजला. मिताने दार उघडले, समोर अमर उभा...चिंब भिजलेला....दारूच्या नशेत कसाबसा चौकटीला धरून उभा, डोळे लालभडक कपडे विस्कटलेले आणि चेहऱ्यावर विलक्षण उदासी....अमर ड्रिंक करायचा, पण मिताला त्याचा हा अवतार नवा होता. नक्कीच काहीतरी काळंबेर झाल्याची शंका आली. ती एक शब्दही बोलली नाही तिने त्याला सांभाळत खुर्चीवर बसवले व दार लावून घेतले आणि त्याच्यासमोर प्रश्नार्थक चेहरा घेऊन उभी राहिली .अमरने खुर्चीवर अंग झोकून दिले होते व त्याचे शब्द अडखळत होते .काही वेळ शांत राहून तो कशीबशी शब्दांची जुळवणी करून बोलायला लागला.


"मिता....मिता, माझी बायको ....खूप चांगली आहेस तू ...खूप चांगली पण मी मात्र खूप वाईट आहे ग ! मला माफ कर ,मी फार चूका केल्यात.. तू मला शिक्षा दे ...मला माफ कर" 

मध्येच त्याने डोळे रागात फिरवले व तिला म्हणाला

"कुठं तोंड काळ केलंस?"


आणि तो तसाच खुर्चीवरून उठून तिच्याकडे जाणार तोच त्याचा तोल गेला आणि तो सोफ्यावर उताणा पडला. मिता काही बोलणार पण तिचे शब्द तोंडातच राहिले तिने त्याला तसेच झोपू दिले. मिताला आज अमरचा मनस्वी राग आला होता, आजच्या या असल्या प्रकाराची तिला अपेक्षा नव्हती. दारू वैगेरे पर्यंत ठीक पण आज चारित्र्यावर शंका घेतल्याने तिचा स्वाभिमान दुखावला होता. दारू पिऊन नशेत बायकोवर असले घाणेरडे आरोप लावायला जीभ कशी नाही अडकली त्याची? ती विचार करत होती. संध्याकाळ झाली. पाऊस थांबला होता. अमरला जाग आली, तो भांबावल्यासारखा उठला... नशेचा काहीसा अंमल अजूनही त्याच्यावर होता. तो धडपडत बेडरूममध्ये गेला, कपडे बदलले आणि हात पाय धुतले. त्याची ही हालचाल मिता किचनमधून टिपत होती तोच त्याचा आवाज कानी पडला 

"मिता अर्जंट आवर, आपल्याला बाहेर जायचे आहे "

त्यावर मिता उत्तरली 

"कुठे जायचे आहे? "

"तू फक्त आवर, चल पटकन" इति अमर


अंजलीने दुपारच्या कृत्यावर जाब विचारायचे ठरवले होते परंतु तिला जाणूनही घ्यायचे होते की त्याच्या या वागणुकीमागचे कारण काय? ती तयार झाली व लहानग्या अंशला घेऊन तिघेजण बाईकवर निघाले. मिताने रस्त्यात दोनवेळा विचारले की आपण कुठे जातोय? पण त्याने दोन्हीही वेळेस मौन पत्करले. अमरने त्यांची गाडी त्यांच्या नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये नेली. अमरने मिता व अंशला बसवून मध्ये गेला व काही वेळाने परत आला. त्याच्यापाठोपाठ एक नर्स आली व मिता व अंशचे ब्लड सॅम्पल घेवून गेली. मिताला नको त्या संकटाची शंका येऊ लागली. अजूनही अमर मौन होता. थोड्या वेळाने ते तिघे तेथून निघाले. यावेळी मात्र अमरचा चेहरा गंभीर वाटत होता, नैराश्य व भीतीचे मिश्र पडसाद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. रस्त्यात त्यांना पाऊस लागला... सूर्य अजून मावळला नव्हता पण काळ्या ढगांनी अंधारून आले होते अगदी मिताच्या आयुष्यासारखे.


घरी आल्यावर मात्र मिताच्या सहनशक्तीचा बांध तुटला. तिने त्याला प्रश्न विचारण्यास सुरवात केली. पण तो मात्र शून्यात नजर घालून बसला होता व राहूनराहून अंशकडे बघत होता. थोड्या वेळाने अमरने थरथरत्या हाताने खिशातून एक चुरगळलेला कागद काढला व मिताच्या हातात दिला. तो कागद मिताने व्यवस्थित केला व वाचू लागली... तो कागद वाचल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. घसा कोरडा पडला व हातपाय थरथर कापायला लागले. तो कागद तिच्या हातून पडला... तिने अमरकडे बघितले... आता त्याची मिताच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत नव्हती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते व तिच्या डोळ्यांत अंगारे फुलत होते... त्या कागदावरच्या मजकूराने त्यांच्या आयुष्याची उलथापालथ केली होती. अमर एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. त्यासाठीच त्याने त्याचे रिपोर्ट कळल्यावर तिची आणि मुलाची टेस्ट केली. तेवढ्यात अमरचा फोन वाजला, त्याने स्क्रिनवरचे नाव वाचले आणि घाबरत घाबरत फोन उचलला... काही सेकंदात त्याच्या हातून फोन पडला आणि स्पीकर ऑन झाला... तिकडून आवाज आला

"मि. अमर तुमच्या मुलाचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण, तुमच्या मिसेसचे... पॉझिटिव्ह आहेत"


फोनवरील हे काही शब्द जणु कानात गरम लाव्हा ओतल्यागत दोघांना भासत होते. ती मटकन खाली बसली. अंगातले त्राणच नाहीसे झाले... तो डोक्याला हात लावून बसलेला... ती खिडकीपाशी विचारमग्न अवस्थेत... एका क्षणात तिला भविष्यात होणारा त्रास, मानहानी, रोगी शरीर आणि साक्षात मृत्यू दिसला. आयुष्याची रंगवलेली गुलाबी स्वप्ने कुणी क्रूरपणे पायदळी तुडवल्याचा तिला भास झाला. आईबापाला पोरका झालेला अंश तिला भविष्यात दिसू लागला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. खिडकीतून काही थेंब मध्ये येऊन तिला भिजवत होते पण तिला भान नव्हते... ते पावसाचे थेंब जणू तिचे अश्रू लपवत होते.


त्यादिवशी त्याने त्याची चुकी कबूल केली, जे झाले ते त्याच्याकडून झाले होते. त्यानंतर बरीच वादावादी झाली. पण जे व्हायचे ते होऊन गेले होते. 


       ती अजून खिडकीतच होती की तिचा कसला धक्का बसला तिने मागे वळून बघितले तर अंश तिचा पदर ओढत होता. तिची तंद्री तुटली व ती भूतकाळातून वर्तमानकाळात आली. अंश तिला कागदाची होडी बनवून मागत होता. तिने गाऊनच्या बाहीला डोळे पुसले व त्याला कडेवर उचलून त्याच्याकडे कौतुकाने बघत आत घेऊन गेली. 'आता तोच तर होता की ज्याच्याकडे बघून ती आयुष्य काढत होती... ज्याच्यासाठी असाध्य रोगाशी झुंजत होती... जेवढा वेळ तिच्याकडे होता तेवढा त्याला देणार होती." तोच तर तिची जगण्याची एकमेव 'आशा' होता." अंश होडी घेवून खेळायला पळाला व ती एकटक त्याच्याकडे कौतुकाने बघत राहिली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama