ताई...कथा आठवणींच्या
ताई...कथा आठवणींच्या


माझ्या आयुष्यातली एक सोनेरी आठवण.... एक सोनेरी दिवस.....
ताई...….
ताई येणार होती आज .तिला अमेरिकेला जाऊन आज सहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता . तो दिवस आजही आठवतो मला .....
आई आणि ताई गळ्यात गळे घालून रडत होते. आसवांच्या धारा थांबत नव्हत्या. दुसऱ्या बहिणीला तर तिला निरोप द्यायला ही येता आले नव्हते. मी तेव्हा अकरावी बारावी ला असेन परिस्थिती चे गांभीर्य नव्हते कदाचित मला ....कदाचित होते ही ...कुठे तरी मनात काहीतरी तुटल्याची भावना मनात होती . मलाही ताई चालल्याचे दुःख होते पण सातासमुद्रापार चाललेल्या बहिणीशी पुन्हा भेट लवकरच होईल ही वेडी आशा मनात . मलाही त्यावेळी वाटत होते आपणही व्यक्त व्हावे....तिला मिठी मारून म्हणावे ,
' खूप आठवण येईल ग तुझी '
पण शब्द मनातच राहीले नेहमीसारखे.... मी असाच होतो मनातल्या मनात कुढत राहायचो ...जखम उराशी कवटाळून एकटाच स्वतः ला खात बसायचो . म्हणतात ना .....'व्यक्त व्हावे, कधीतरी कुणापाशी तरी मन मोकळे करावे ' तसे कधीतरी झालेले मला आठवत नाही. जातांना तीच माझ्याजवळ येऊन भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली
' आई-बाबांची काळजी घे ' दाटून आलेल्या कंठाने मी फक्त 'हो' म्हणालो . ताई माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती जणू दुसरी आईच . रडवेल्या डोळयांनी व शेवट उसने हसू आणत ' काळजी घे ' म्हणत सर्वानी तिला निरोप दिला .
त्या दिवसानंतर मला कळले आई का रडत होती. ताईचे सासर आमच्या घरापासून पंधरा-वीस किलोमीटर वर होते वरच्या वर भेटी गाठी व्हायच्या..... लग्ना-कार्याला भेट व्हायची. आता तिचे साता समुद्रापार असणे मला प्रकर्षाने जाणवू लागले आणि जरी कधी भेट नाही झाली तरी मनाला एक दिलासा होता की जवळच आहे होईल भेट .....कधीही जाऊन भेटू शकतो ......पण आता....येणार येणार म्हणून बोलता बोलता वर्ष लोटले ....तिथून सुट्टी घेऊन इथे भेटायला येणे त्यांना नोकरीमुळे शक्यही नव्हते व परवडणारे ही नव्हते. तिची आठवण कधी कधी फार मनाला छळायची . इथे असताना जेव्हा केव्हा तिला कळायचे की आईचे दुखतंय तेव्हा तेव्हा ती लगेच हजर व्हायची ...तिची मायेची सावली हरवली होती...ताई मला खूप जीव लावायची, प्रसंगी ओरडायची शिक्षा करायची पण जेव्हा जेव्हा आई मला बोलायची तेव्हा नेहमी ती माझीच बाजू घ्यायची . मी जेव्हा केव्हा उदास असायचो तेव्हा तिला लगेच कळायचे ........माझ्या मनातली घालमेल लगेच तिला कळायची.....अगदी आदल्या दिवशी आमचे कडाक्याचे भांडण का झाले असेना पण मला उदास बघून प्रेमाने विचारपूस करायची . जे तिने केले ते मला का जमले नाही हा प्रश्न मला आज पडतोय ..
" मी का तिला विचारले नाही , तू कशी आहेस?? "
" तुला सासरी काही त्रास आहे का ? "
लग्नानंतर तिचे न दाजीचे बऱ्याच वेळा भांडण झाले , मिटवा-मिटवी झाली पण मी का तिला कधी प्रेमाने विचारपूस केली नाही .....का तिला मायेने प्रेमाचा आधार दिला नाही?? ....मी का या घटनांचा मूक साक्षीदार झालो ?? का एकटाच रडत राहिलो .....मी लाडाने तिला "ताऊ" म्हणायचो . मी का माझ्या ताऊ चे दुःख समजून घेतले नाही . लग्नानंतर जेव्हा तिला सासरी बराच त्रास व्हायचा पण कधीही तिने आई-बाबांना सांगितले नाही जेव्हा बिचारीच्या सहनशक्तीच्या पलीकडे जायचे तेव्हा ती केविलवाण्या चेहऱ्याने आईजवळ मन मोकळे करायची . नंतर तिला एक सुंदर मुलगी झाली . तिच्या बाललीलामध्ये सर्व रमले .....त्यानंतर मी नेहमी भाचीलाच भेटायला जायचो .तेव्हा कधी मी तिला विचारले नाही तू कशी आहेस ?? आज या गोष्टी मला खायला उठतात .या आठवणींच्या हिंदोळ्यात हे प्रश्न माझ्यासमोर फेर धरून नाचतात. तेवढ्यात मला बायकोने आवाज दिला..... व मी भूतकाळातुन वर्तमानकाळात आलो . मला असे विचारांत गढलेले पाहून बायको ने विचारले
'काय झाले ? '
"काही नाही बस , तयारी कर... ताईला घ्यायला जायचे आहे आपल्याला "
दुपारी मी आणि बायको निघालो ताईला आणायला आजच्या दिवस ते इथे थांबून मग उद्या गावाकडे निघणार होते . मी गाडी काढली व आम्ही विमानतळाकडे निघालो. तिची फ्लाईट आली.... माझे डोळे तिला बघण्यास आतुरलेले व मन उत्साहाने भरून वाहत होते . काही वेळाने ते चौघे आले .मी अगदी लहानमुलासारखे तिला लांबूनच आवाज देऊन हात दाखवला .तिने उत्तरादाखल एक स्मित केले व ते आमच्यादिशेने चालत निघाले तिच्या मोठ्या मुलीने तर धावत येऊन मिठीच मारली ....
" मामा ....भेटलास एकदाचा...नुसते खोटे बोलायचा... मी येईन येईन म्हणून "
तिच्या या प्रेमाने मी सुखावलो ....व वाईट ही वाटले की एवढे दिवस तिला आशेवर ठेवले ...
तेवढ्यात ताई आली, मी दाजींना नमस्कार घातला . मन करत होते तेव्हाच तिच्या गळ्यात पडून रडावे....आपल्या चुका कबुल करावे पण त्या भावना औपचारिक बोलण्यात विरल्या..
"कसा झाला प्रवास वैगेरे "
सगळे थकलेले असल्याने आम्ही लवकर घरी आलो . बायकोही तिचे सर्व काही आनंदाने करत होती .ताई सुद्धा वाहिनीचे प्रेम कौतुक करत स्वीकारत होती, लग्नाला ती नव्हती व नंतर ही तिच्याशी जास्त बोलणे नव्हते....
चहा-नाश्ता झाल्यावर सगळ्यांनी आराम केला मी मात्र जागीच राहिलो .....मला ताईसाठी काय करू आणि काय नाही असे झाले होते.
संध्याकाळी मग सगळ्यांच्या गप्पा रंगल्या .मी भाचीसोबत गप्पा मारत-मारत त्यांचे तिकडचे जीवनमान जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो...रात्री जेवण झाल्यावर तिला काही मेडिसिन्स हवे होते मग मी तिला म्हटले
'चल ताई जाऊ आपण फिरत फिरत "
मग आम्ही दोघेही पायी पायी निघालो.....
मी तिला विचारले....
" कशी आहेस ताई आता ? "
माझ्या प्रश्नावर ती नेहमी सारखे हसत म्हणाली
' ठीक आहे रे , तू कसा आहेस ?? वहिनी छान आहे बाकी '
त्यावर मी हलकेसे स्मित देत म्हटलो
" हो....बाकी अमेरिका कशी आहे? "
" बस छान आहे रे सगळं तिथे , फक्त ...."
ती काहीशी गंभीर झाली...
" आपले लोकं ....., आपले लोकं च नाहीये बस तिथे "
त्यावर मला राहवले गेले नाही मी म्हणालो
" आम्हालाही खूप आठवण यायची ताई तुझी , खरं सांगू का तू लांब गेल्यावर मला कळले की जवळ असलेल्या माणसाची किंमत काय असते, तू गेल्यावर कळले की आयुष्यात सगळे काही मनासारखे होत नाही "
माझे डोळे पाणावले...व तिचे ही....तेवढ्यात मेडिकल आले संवाद थांबला....मी आवंढा गिळला व मध्ये जाऊन सामान घेतले . पण आज मी स्वत वर खुश होतो...आजपर्यंत जे मी बोलू शकलो नाही ...जे बोलायचे होते ते आज मी बोललो .....
मी सामान घेऊन वळलो ...ताई माझ्याकडे कौतुकाने बघत होती . जणू तिला मी नव्याने गवसलो होतो ...
आम्ही परत फिरलो बोलत बोलत...
" ताई तुला आठवते, आपण जेव्हा सरकारी क्वार्टर मध्ये राहायचो तेव्हा आपल्या घराजवळ एक छोटे गार्डन होते व तिथे एकच झोका होता...आपण नंबर लावून खेळायचो "
ती उत्तरली
" हो....आपले शेजारच्या सोनी व गायत्री सोबत भांडण व्हायचे....आणि एकदा तू झोक्यावरून पडला पण होता....तुझा हलणारा दात पडला होता "
आणि दोघेही मनमोकळं हसलो...
ती म्हणाली
" तुला आठवते का आपण चंफुल पाणी खेळायचो.… आपण दोघे मिळून भैया आणि पियू ला हरवायचो...."
" हो मग , आणि हरल्यावर ती भांडण करायची ."
बोलता बोलता सोसायटी खालच्या बागेत बेंच वर आम्ही बसलो ...बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या केल्या.. ज्या काळाच्या व जवाबदारीच्या ओझ्यात हरवल्या होत्या....तो आनंद , ते दिवस पुन्हा जगलो..….
मनमुराद हसलो ...ती मोकळ्या मनाने आठवणींच्या लाटांत हरवली .तिने माझ्याकडे बघितले ...माझ्या डोळ्यातून आसवांचा धारा सुरू झाल्या होत्या....
तिने विचारले....काय झाले भैया ??
मी एवढ्या वेळ रोखून धरलेला बांध सोडला....
तिने विचारले....काय झालं भैया बोला ना .
मी म्हणालो
" मला माफ कर ताई , मी आजपर्यंत कधीही तुझी काळजी केली नाही.....कधी प्रेमाने विचारपूस केली नाही... सासरी गेल्यावर तू उदास असताना मी कधी विचारले नाही
तुला काही त्रास आहे का ?? जेव्हा तुझा सासरी छळ व्हायचा तेव्हा तुला आधार देऊ शकलो नाही....सासरहुन घरी आल्यावर तुझ्या हसऱ्या चेहऱ्या मागच्या वेदना मला कळल्या ग ....पण मी कधी तुला सावरू नाही शकलो ग ....मला माफ कर....ज्यावेळेस बहीण दुःखात असते तेव्हा भावाने भक्कमपणे पाठीशी उभे राहायचे असते.... मी तेव्हा मूक साक्षीदार झालो ग.....तू माझी नेहमी काळजी घेतलीस.... मी का नाही घेऊ शकलो ग.....ताऊ ........
तू गेल्यानंतर मला तुझी किंमत कळली ......तुझे माझ्या आयुष्यातले महत्व उमगले मला....तूझी आठवण मला अपराधीपणाची जाणीव करून द्यायची.....
मला माफ कर.....
मी शांत झालो.....तिच्या डोळ्यांत अखंड आसवांचा धारा चालू होत्या...
तिने माझे डोके तिच्या खांद्यावर टेकवले .....व म्हणाली
नाही रे भैया .....तू माफी कशाला मागतोस....वेड्या... कुणी सांगितलं फक्त व्यक्त होणेच समोरच्या ला समजून घेणे असते..... मला दुःखात बघून तू सुद्धा दुःखी व्हायचास हे बघितलंय मी......मला होणाऱ्या त्रासाच्या वेदना तुझ्या डोळ्यात बघितल्या आहे मी...... तुझे त्यावेळी माझ्या सोबत असणेच मला आधार होता.....आणि मलाही तुझी फार आठवण यायची.....दर रक्षाबंधन ला तुझा हसरा चेहरा समोर यायचा.... भाऊबीज ला सजवलेले ताट .....आणि तिचे शब्द थांबले.....तिला पुढे बोलवेना....
दोघे नंतर बराच वेळ मनसोक्त रडलो.... आज मी खुश होतो की मी आज खऱ्या अर्थाने व्यक्त झालो होतो....खूप दिवसांपासून असलेली इच्छा आज पूर्ण झाली होती..माझ्या भावना तिच्यासमोर मांडल्या होत्या.
आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता.....आजच्या दिवसाची आठवण मनात सोनेरी अक्षरांनी लिहिली गेली होती......
ही कथा माझ्या ताई ला समर्पित.