आजीची मैत्रीण
आजीची मैत्रीण
धड धड करत आणि इंजिन चा घर घर आवाज करत एस टी नान्नज कडे धावत होती. दुपारचे बारा वाजत आले होते बाहेर कडाक्याचे ऊन पडले होते. एस टी मध्ये गरम हवेचा झोत येत होता. खिडकीच्या काचा खड खड आवाज करत आदळत होत्या. तरी आतील प्रवासी पेंगळलेले दिसत होते. एस टी मध्ये जरा दाटी असल्याने काही लोक गरमी ने हाश हुश्श करत खिडकीतून येणारा वारा अंगावर घेण्याचा प्रयत्न करत होते. एसटी त एवढी लोकं असताना सुद्धा बरीच शांतता होती एकट्या एसटी चा आवाज आणि कंडक्टर च्या बेलचा आवाजच काय तो होता. जशी एसटी डुलकी घेई लोक ही तसे डुलत होते. एकंदरीत प्रवासाचा सगळ्यांनाच त्रास होत असताना माझी आऊ मात्र डोक्यावर पदर घेऊन शांतपणे खिडकीतून बाहेर दूर कुठे तरी भूतकाळात हरवली होती..
आऊ म्हणजे राणू बाई सोनावणे. तिला आम्ही सर्व आऊच म्हणत असू.. तपकीरी डोळे सरळ बांधा दिसायला काटकसर. उन्हं तान्हात घेतलेले कष्ट तिच्या रब रबीत त्वचेला पाहूनच अंदाज येत होता. वय 75 तरी चालणे बोलणे धीट होते पण काना ने जरा बहिरी झाली होती...म्हणजे तिला ऐकू जावावे म्हणून जरा मोठ्याने बोलावे लागत असे. अशिक्षित होती पण तिच्या बोलण्याने वागण्याने विचाराने मला कधी अशिक्षित वाटली नाही..तीचं संपुर्ण जीवनच तिच्या अनुभवाची शाळा झाली होती. आम्ही मुंबईत राहणारे गाव तसे नान्नज पण गावात कुणी नातेवाईक राहिले नव्हते. आज्याचा वाडा होता...पण तो त्यांनी वडील लहान असतानाच विकून टाकला होता. काही नातेवाईक सोलापूर मध्ये होते. वडील कधी गावाला जत्रेला क्वचित जात. मुंबईला आल्यापासून आऊ सोलापूरला क्वचितच गेली पण नान्नज ला मात्र कुणी ही जात नसल्याने तिला गावी जायला मिळत नसे. एकदा घरी माझा खूप जुना मित्र मला भेटायला आला. मी त्याला आनंदाने भेटत .."अरे मेल्या कुठे होतास इतके दिवस ..ना फोन.. ना व्हाट्सअप्प सोशल मीडिया च्या जमान्यात पण गायब झालास.." मी उत्साहात बोलून गेलो होतो..आऊ ला नेहमीच घरात कोपऱ्यात बसून सारखच एकटक दारातून बाहेर बघत असलेलं पाहिलं होतं. तो पर्यंत मी कधीच विचार नव्हता केला की ही कुणाची वाट बघत असेल. वाटायचं की म्हातारं माणूस..पूर्ण दिवस मोकळाच असल्याने करमत नसेल म्हणून बाहेर बघत असेल तसे आपण म्हाताऱ्या माणसांना निवांत एकटक बघत बसलेले पाहिले आहे पण कधी असा विचार नाही आला की ते काय विचार करत असतील ..किती खोल गहिवर डोहात भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देत असतील .. चांगलं वाईट घडलेले ..सोडून गेलेल्या जवळच्या माणसाचा प्रेमाने सुखाने आणि वेदनेने भरलेल्या क्षणाचे अस्पष्ट चित्र हवेत काढून त्याला बुझलेल्या डोळ्यातून पाहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतील. एक वीज चमकून जावी तसा मला एक प्रश्न पडला..की आऊ च्या वेळी सोशल यॅप काय साधा फोन ही नव्हता मग आपल्या पासून लांब गेलेल्या हरवलेल्या मित्रांना मैत्रिणीला हे लोक कसे भेटत असतील ..म्हणून आऊ ला सहज बोलून गेलो की.. आऊ तुला मित्र मैत्रिणी आहेत का ग!.. त्यावेळी आऊच्या चेहऱ्यावर अचानक स्मित हास्य आले दारात असलेली नजर तसेच ठेवत म्हणाली,
" मैत्रीण !!... हाय एक मैत्रीण जीवा भावाची. "
आऊ ला मैत्रीण आहे हे ऐकूनच मी नवल झालो खरंतर मला वाटलं होत की ती लगेच म्हणेल की "नाय बा" पण तिच्या चेहऱ्यावरील आनंद मला कुतूहल निर्माण करत होता. मी तिच्या जवळ बसलो आणि तिला विचारलं.
"आऊ... खरच तुला अशी मैत्रीण आहे.. कोण आहे? कुठे असते?"
" रखमा...रखमा नाव हाय तीचं...नान्नजलाच असतीया..लै मैत्री होती आमची .."
"होती म्हणजे, वारली का ती."
"अजून मेल्याची खबर तर आली न्हाय बा, हाय का गेली कुणास ठाऊक आन कोन सांगावं हित येऊन..तुझा बाप एकुलाच जातो गावी कुणी भेटलं नान्नज कडच तर कळतं कशी हाय ती ते... "
"तू कधी भेटलीस की नाही तिला आता..ती येति का मुंबई ला कधी"
""आरं तिला कोण घेऊन येणार... अनं आणली तरी हिकडं कोण आणणार हाय तिला.."
लेखक-- सुभाष सोनवणे
"आऊ...मागच्या वेळेस कधी भेटली होतीस तिला."मी गहिवरून विचारलं.
"लै वर्ष झाले बघ.. आता कधी भेट होतीय देवालाच ठाऊक.." पुन्हा ती दारा वर खोल नजर देत म्हणत होती. मी म्हणालो,
"आता तर मोबाईल पण आलेत...तिचा किंवा तिच्या नातेवाईक पैकी कुणाचा एखादा नंबर मिळेल का म्हणजे तुला फोन वर तरी बोलायला मिळेल "
आऊ ने काहीच उत्तर दिलं नाही ..आणि का देईल ती तिला ते अशक्य वाटणारी गोष्ट वाटत होती.. आणि मला ही कारण मुंबईतच खूप कमी लोकांकडे फोन होता.. ज्याच्या कडे फोन तो श्रीमंत समजला जाई आणि लोक मोबाईलवर मोठ्या मोठ्या ने बोलत कदाचित त्यांना माझ्या कडे फोन आहे हे दाखवायचे असेल. आऊ ला कदाचित नीट ऐकू गेले नसेल
मी मनात विचार केला की कधी आऊ ला रखमा माई ला भेटता आले तर...काश मी ती भेट घडवून आणली असती तर ..पण ते शक्यच नव्हतं. 20 21 वर्षाचा असेल घरात मी सगळ्यात लहान होतो .वडील बोलल्या शिवाय घरातील पान सुद्धा हलत नसे त्यामुळे मी गप्प झालो..
पुढे 2 वर्षात वडिलांनी सोलापूर ला त्यांच्या लांबच्या नातेवाईक जे बिल्डर होते त्याच्या बिल्डिंग मध्ये 1 BHK घेतला.. आणि मला व आईला घेऊन ते सोलापूर आले बिल्डींग च्या खाली एक गाळा सुद्धा घेतला होता पण त्याचे पैसे मात्र हळू हळू थोडे थोडे करून भरणार होते. अशात च बाबा मुंबईला गेले आणि येताना आऊ ला घेऊन आले पण मी मात्र सगळ्या गोष्टी विसरून गेलो होतो. 4था माळा असल्याने आऊ घरातच हिंडत असे. तिला पायऱ्या उतरणे चढणे जास्त जमत नसे .जमिनीवर बसण्याची सवय त्यामुळे शक्यतो बेड वर बसत नसे..पुन्हा ती दोन्ही पाय समोर पसरून दारात टकमक पाहत असे. अचानक कुठले तरी जुने पाहुणे घरी आले की आऊ आनंदी असे मग पुन्हा तीच पोकळी घर करून राही.आऊ ने मला कित्येकदा तिच्या आणि राखमच्या गोष्टी सांगितल्या होत्या .
आऊ नान्नज ला राहायला आली त्याच्या 1 का 2 वर्षाने रखमा सुद्धा त्यांच्या ढोर गल्लीत तिच्या नवऱ्याच्या घरी लग्न होऊन आली होती. लग्न तसे त्यावेळी लहान वयातच होत. शेतात एकत्र कामावर जाणे तरवट तोडायला रानात एकत्र जाणे.. दोघीच्या घरी दारिद्र्य असल्याने त्यांना मेहनतीची कामे करावी लागत असे. हे काम करत असतानाच त्या दोघी च चांगलं जमलं होत. एकमेकांची सुख दुःख सारखीच असल्याने आणि समवयस्क असल्याने दोघीची मैत्री निर्माण झाली होती. दोघीही तरण्या आणि सुरेख देखण्या होत्या. राणू आऊ चे डोळे तपकिरी तर रखमा माईचे डोळे हलके निळे होते. त्यामुळे दोघीही सुंदरतेत कमी नव्हत्या. कामावर एकत्र जाणे येणे तर होतेच पण बाहेर कुठेही जायचे असले की दोघी एकत्रच निघत. तासन तास त्यांच्या गप्पा चालत. त्यांचं हसणं खिदळण एकत्र सण साजरा करण एकीच्या दुःखात दुसरीच्या डोळ्यात पाणी असे हे सगळं गाव पाही. सगळ्यांनाच त्याच्या मैत्रीचं कुतूहल राही. दोघी आता जिवाभावाच्या मैत्रीणी झाल्या होत्या. जणू काही त्यांची लहान पणा पासूनचीच गट्टी असावी. अश्या मैत्रीच झाड वर्षा मागे वर्ष उलटून त्याची मूळे मनाच्या जमिनीत खोल रुतले जातात. पंधरा वीस वर्षांत राणू आणि रखमा गरिबीच्या तापत्या तव्या वरती एकमेकाला सांभाळून सावरून होत्या. पण नियती कधीतरी खेळ खेळतेच आणि हातावरच्या रेषा बदलू लागतात. मुंबईला गेलेला तिचा मोठा मुलगा शंकरने तार करून आईला व सगळ्या कुटुंबाला मुंबईला बोलावून घेतले. इथूनच त्यांची ताटातूट सुरू झाली . त्याच्या काही वर्षात एक दोन वेळा राणू आऊ नान्नज ला जाऊन राखमची भेट घेतली होती. नंतर मात्र दोन्ही मुलं कामात गुंतल्याने तीचं गावी जाणे बंदच झाले होते आणि नंतर गावात नातेवाईक ही कुणीच उरलं नव्हत. जी थोडे होते ते सोलापूर ला स्थायिक झाले होते. पण आता तब्बल 30 वर्षे उलटली होती तरी आऊ ला तिची कसलीच खबर नव्हती. ती स्वतः 75 च्या वर झाली होती आणि रखमा 80 च्या आसपास गेली होती. पिकलेल्या वयाला जगाची कल्पना चढत्या वयातच झाली होती. जीवनाचे सार तिच्या अंगी आले होते तरी मैत्रीचा धागा मात्र काही केल्या पिकत नव्हता. त्याची ऊब अजून ही मनात होती. त्याची दोरी अजून ही म्हाताऱ्या आऊला नान्नज कडे खेचत होती आणि म्हणूनच आऊ या वयात ही मला नान्नज ला घेऊन चल म्हणून विनंती करत होती. पण माझा नाइलाज होता. मी वडिलांना विचारल्या शिवाय कुठे ही बाहेर जाऊ शकत नव्हतो. म्हणून आऊला बाबांनाच विचार म्हणून सांगितले होते. पण बाबांनी सरळ "आता कोण आहे तिथं आपलं जायला" असे बोलून नान्नज ला जायला नकार दिला होता. त्यामुळे आऊ थोडीशी हिरमुसली होती. बाबांचे एक जुने मित्र मुंबईला वारले म्हणून वडील मुंबईला गेले. का कुणास ठाऊक पण मला वाटले की आऊला नान्नज ला घेऊन जायची हीच वेळ आहे. वडील 2 ते 3 दिवसांनी परत येतील आपण एका दिवसात नान्नजला जाऊन येऊ. आणि तशी ही आऊ सोलापूर ला आमच्या कडे फक्त पंधरा दिवसच राहणार होती करण तिला चोथा माळा चढणे उतरणे जमणार नव्हतं. 1 हफ्ता तर तर गेला होता. मला सतत ये सुब्या चल की रं नान्नज ला जाऊ.
मुंबईला गेले की परत काय येत नसते मी सोलापूरला...तिथूनच मातीत जाईन. शेवटी मी ठरवलं आणि आऊला सांगितले की चल उद्या जाऊ नान्नज ला तर आऊ ला आधी विश्वासच होईना. खूप खुश झाली आऊ पक्कं ना पक्कं ना असे तीन चार वेळा विचारून तिने खात्री करून घेतलं माझी आई उमा ही म्हणाली चल तर सुभाष म्हातारी भेटेल तरी एकदाची रखमा माईला.. लईच आठवण काढतीया...आणि आपण पण गाव बघू. तुझ्या वडिलांचं लहान पण गेलं आहे तिकडे आणि त्यांचा वाडा ही पाहू. .. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आऊ ने तिचा नवीन पैठणीतली साडी नेसून तयार झाली. आई मी तिला सोबतीला घेऊन एसटी स्थानका कडे निघालो.. रिक्षात बसल्यावर मात्र एक प्रश्न सतत मला खात होता तो म्हणजे रखमा माई अजून जिवंत असेल काय असली तरी ती त्या गावात राहत असेल काय...कारण आऊ ला तिची आता काहीही माहिती नव्हती. पण मी पाहिलं आऊ खूप खुश होती. ती येस टी मध्ये बसल्या पासून भूतकाळातल्या आठवणींना उजाळा देत होती. भान हरपून ती खिडकीतून बाहेर बघत भूतकाळात हरवली होती.
एका झटक्याने एस टी ड्रायव्हर ने ब्रेक मारला कदाचित स्पीड ब्रेक होता मधे. तशी गाडीतली पेंगलेली मंडळी भानावर आली. कंडकटर ही मोठ्याने ओरडला. नान्नज नान्नज ..आणि बेल वाजवली. त्या बरोबर आऊ सुद्धा वर डोके करून बघू लागली .. थोड्या वेळात गाडी प्रॉपर गावात येऊन थांबली. आणि आम्ही ही एकदाचे गाडीतुन उतरलो. गाडीतून खाली उतरल्यावर मी आऊला विचारलं गाव नक्की कोणत्या बाजूला आहे आऊ खूप काळजीपूर्वक दोन्ही बाजूला बघून म्हणाली की गाव डाव्या बाजूला आहे चल चल म्हणून घाईघाईने तिकडे निघाली मी आणि आई ही तिच्या मागोमाग निघालो. माझ्या थोड्याच वेळात लक्षात आले की खरेतर गाव डावीकडे नव्हतंच डावीकडे स्मशानभुमी होती. मुळात गाव उजवीकडच्या बाजूला होतं. तसे मी आऊला सांगितले ते लक्षात येताच ती म्हणाली नाय या बाजुलाच असेल म्हणून मी एका माणसाला विचारले गाव कोणत्या बाजूला आहे त्याने मला गाव उजवीकडे असल्याचे सांगितलं बरेच वर्ष झाली गाव आता थोडेसे प्रगत झाले होते छोट्या झोपड्याना पक्क्या घराचे रूप आले होते. त्यामुळे आता आऊच्या काही लक्षात येत नव्हते. पण मला मात्र थोडी काळजी होती की आऊला जर गावचे रस्तेच नीट नाही कळले तर आऊला राखमामाईचे घर कसे सापडणार होते. तरी आम्ही गावात जाऊ लागलो गावच्या वेशिवरच एक जुने हनुमानाचे मंदिर होते ते पाहताच आऊ आनंदाने म्हणाली,
" व्हय ..व्हय याच बाजूला हाय..हे बघ हे उजवीकडून आत जायचं मोठी गल्ली लागतीया.. "
तरी मी मंदिरात बसलेल्या काही लोकांना रखमा माई बद्दल विचारले पण कुणीच काही नीट उत्तर देत नव्हते. मग मी आऊ ने सांगितलेल्या रस्त्यावर जाऊ लागलो कधी आऊ या गल्लीत घेऊन जाई तर कधी त्या गल्लीत मेंदूवर जोर देऊन ती आठवून आठवून गल्ली सांगू लागली बराच वेळ चालल्यावर मात्र आऊ म्हणाली,
" नाय बा ..ही गल्ली नव्ह ..माझ्या म्हातारीच्या आता काय लक्षात राहतेय."
असे म्हटल्यावर माझी आई मटकन एका दगडावर बसली आणि कपाळावर हात ठेवून म्हणाली,
"अरे देवा, आता आली का पंचाईत.. हिला तर काय बी आठवना.. उग दुपारचं उन्हात इकडून तिकडे नि तिकडून इकडं चालवलीय..चालून चालून पाय दुखायला लागलेत."
मी तिकडून चाललेल्या एक माणसाला विचारले की इथे राखमामाई कुठे राहतात. यावर तो काय माहीत नाय बुवा असे म्हणून तो पुढे निघून गेला. गावात कुणीच रखमा माई बद्दल सांगत नव्हतं. भर दुपार असल्याने रखरखीत ऊन पडलं होतं आता आऊ सुद्धा एका दगडावर बसली होती. सगळ्यांनाच तहान लागली होती बरी गोष्ट ही की मी पाण्याची बाटली घेतली होती. नाहीतर गावात साधं दुकान ही दिसत नव्हतं. सगळी दुकाने रस्त्यालगतच लागली होती बहुतेक. थोडावेळ मी सुद्धा बसून घेतलं पाणी पिल्यावर एक म्हातारा गृहस्थ येताना दिसला मी त्याला जवळ जाऊन विचारलं त्यांनी आम्हाला वर खाली नीट पाहिलं आणि म्हणाला,
"मुंबईवरून आलासा व्हय, बघा गावात सगळी जुनी लोक घरदार विकून कधीचीच गेल्याती..खूप कमी लोक हायती जुनी तुम्ही असं करा हितन वापस माग जावा आनं पुढच्या गल्लीतून सरळ जा आत जा उजवीकड आन मग डावीकडं वळा तिथंच ढोर गल्ली हाय तिथं विचारा कुनालाबी."
मी त्या आजोबांचे खूप धन्यवाद मानले. पुन्हा आमचा लवाजमा त्या गल्लीच्या दिशेने कूच करत निघाला. उजवी कडे डावी
कडे करत आम्ही त्या गल्लीत पोचलो पण आऊला काही तीच घर आठवना मग मी तिथे उभा असलेल्या एक माणसाला विचारले खरं तर मला वाटलं की हा सुद्धा कोण राखमामाई माहीत नाही असेच म्हणेल पण त्याने सरळ सांगितले की इथून डावी कडे वळा समोर रखमा माई दारात भांडी घासत बसलीय बघा.. हे ऐकून मला त्या माणसाला कोणतं बक्षीस देऊ असे झाले. असा विश्वास त्याचा बोलण्यात होता की माझ्या मनात कोणत्याच शंका राहिल्या नाहीत. आई ने एकदाचा सुटकेचा स्वास घेतला. मी आनंदून ही बातमी आऊ ला सांगितली तशी आऊ पावले झप झप टाकीत डावी कडे वळली मी आणि आई सुद्धा त्या गल्लीत वळलो समोर थोडे दूर एक जर जर झालेंली म्हातारी दारात भांडी घासत बसली होती ही हीच ती राखमामाई की जिला आम्ही गावभर शोधत फिरत होतो. पण ती आमच्या कडे पाठ फिरवून भांडी घासत बसली होती तिला लांबून पाहताच आऊची पाऊले मात्र मंद गतीने पडू लागली किती किती भावना.. प्रश्न ..उत्कंठा तिच्या मनात उमटत होत्या. तिचा चेहरा पाहूनच मी भारावून गेलो होतो. एक एक पाऊल ती तिच्या जवळ जात होती जणू काही एक एक वर्ष ती मागे भूतकाळात जात होती.. तिच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण झपाट्याने डोळ्या समोरून जात होता. सुखात दुखत दिलेली साथ.. ती गप्पानची कातरवेळ.. त्या भोगलेल्या व्यथा..ती केलेली हौस मौज ती केलेली भटकंती.. ते खेळ..एकमेकांची गुपिते.. सर्व सर्व काही एक क्षणात आऊच्या नजरे समोरुन गेले आणि कंठ दाटून डोळ्यात असावे येऊन तिने राखमामाईला हाक दिली,
"रखमा ...ये रखमा.."आऊला पुढचे शब्द उच्चारने कठीण झाले होते.
आईच म्हणाली,
"रखमा मावशी... ओ रखमा मावशी बघितलं कोण आलंय."
आईने जरा मोठ्याने बोलल्यावर राखमामाई ला आवाज गेला तिने तसेच मागे वळून बघितले.. आणि दोन्ही हात धुवून गुढघ्यावर ठेवून मोठ्या कष्टाने उठत नावलाईने म्हणाली,
"आ! कोण आलय बाबा माझ्याकडं .. "
आऊ डोळ्यात असावे ठेवतच म्हणाली,
"राखमे , ओळख पडतीया की न्हाय ग"
"आ ! कोण राणू !तू तू हायस !"
तिने आश्चर्याने तोंडावर हात धरला अनपेक्षित पणे तिच्या डोळ्यातून पाणी आले. राखमामाईच्या प्रत्येक शब्दात आनंद प्रेम आश्चर्य भरभरून होते. त्या दोघीनि गळा भेट घेतली दोघीच्या डोळ्यातून टपा टपा पाणी गळू लागले. त्यावेळी असे वाटले की सगळे क्षण थांबले असावेत असंख्य दुःखे यातना दोघींच्या आत सामावून त्यांचे आनंदात रूपांतर झाले असावे ही भेट दोन जिवलग मैत्रिणीची होती मैत्रीची परिभाषा या अमूल्य क्षणांना माहीत होती.. काळ वेळ हरपून जावावे सृष्टी स्तब्ध व्हावी आणि सगळं विरून जावे फक्त नि फक्त अभिव्यक्त व्हावे मैत्री. दोन क्षणात त्यादोघी किती तरी वेळ एक मेकां ना गळा भेट देत होत्या.
मोठ्या प्रेमाने तिने आम्हाला आत घरात घेतले. घर कसले साधी खोपाडीच होती ती. आम्ही तिघे कसे तरी दाटीवाटीने बसलो. बाहेरची भांडी एकत्र करून राखमामाईने आत आणले. मटक्यातील पाणी तिने प्यायला दिले. तो पर्यंत आम्ही तिच्या सर्व हालचाली टिपून घेत होतो. कमरेत आता ती वाकली होती तरी अंगातली रग काही कमी झाली नव्हती. कामाची चिकाटी होती. गोरा रंग निळे डोळे म्हातारपणात ही तजेलदार वाटत होती. हाताची जाड बोटे आणि रांगडी लकब तिच्या आयुष्य भरात केलेल्या कामाची पावती होती. उन्हात पावसात राबलेल्या या देहाची कांती अजून सुवर्ण झाली होती. सगळं आवरून ती आमच्या बरोबर बोलायला बसणारच होती पण आऊला काही राहवेना ती म्हणाली,
"राखमे राहू दे की काम ...जरा बस जवळ दोन शब्द बोल मी काय घडी घडी येत न्हाय..तुला भेटायला"
रखमा माई चेहर्यावर स्मित ठेवत म्हणाली,
"अग माझ्या शिवाय कोण करणार हाय काम मलाच मेलीला करावं लागतं."
असे म्हणत ती दारात बसली .बाहेर चकचकीत ऊन पडलं होतं बाहेरून गर्मीच्या वाफा आत घरात येऊन थंड होत होत्या. रखमा माई उन्हात आपलं अर्ध शरीर ठेवून बसली होती तिच्या सुवर्ण कांती आता सूर्यप्रकाशात चमकू लागली होती. आऊ सुद्धा तिच्या शेजारी बसली आणि आम्ही दोघे घरात. तशी आम्ही तिला साधी विचारपूस केली तर तिने इतकंच सांगितले की
तिची मुलगी मैना लग्न करून सासरी गेली आणि रखमा माई एकट्या उरल्या. गेली कित्येक वर्षे ती एकटीच राहत आहे आणि स्वतःची उपजीविका ती स्वतःच करत आहे. तिची मुलगी कधी तरी येत असे तिला भेटायला. गावात भांडी धुणे करून तिला पैसे मिळत त्यातच ती पोट भरत असे . खरे तर नवरा असे पर्यंत आधी थोडी चांगली परिस्थिती होती. पण तो गेल्या नंतर परिस्थिती अजून बिकट होत गेली.
खूप वर्षा नंतर दोघी भेटल्या होत्या जवळची विचारपूस झाल्यावर दोघीच्या गप्पा रंगल्या होत्या.
" राणू..मंबाईला बरा का सगळं "
"काय खरं काय ..काय नाय"
"जयऱ्या न चांगलं बस्तान बसवलं म्हणकी"
"कोण .."
"जयऱ्या ग"
"जयऱ्या ...तेच चांगलं हाय सगळं "
"लई कष्ट केल्यात तुझ्या मुलांनी"
" मस्त....मस्तच हाय, शंकऱ्याच अजून काय नीट न्हाय बघ"
" ते मुंबेला बाम स्पाट झाल्यात म्हून की"
"बाम.. कसलं बाम"
"बाम नाय ग!.. ते बिल्डींगी पडल्यात न्हाय का ते बाम स्पाट"
"ते व्हय ..का कुणास ठाऊक कुणी केलं की लै लोक मेलं म्हणत्यात."
"मंबाईला कसलं जगणं बाई ..लै वंगाळ एकदा गेले होते..कसली गर्दी आन कसली लोकं.. (म्हातारी एक उसासा टाकत म्हणाली)गावात हाय..तेच बरं हाय."
बाहेर पडलेल्या चकचकीत उन्हा कडे निर्विकारपणे बघत राखमामाई बोलत होती.
" ..आता थोडीच वर्ष बाकी हाय... कधी येळ येईल काय माहीत लवकर मरण यावं म्हणते मी.."
आऊ" काय ग बोलते ..तू मरत नसती लवकर.."
"..करत नसते..काय करत नसते.."
"मरत नसते ग मरत"
"मरत ...काय करायचं जगून तरी आता..या फाटक्या झोपडीकडं कुणी फिरकत पण न्हाय.. सगळे आपापल्या कामात गुंतल्याती ..कुणाला येळ हाय हित बघायला. "
" हा ते पण हाय म्हण ..तिथं जवळ असून कोण लवकर दिसत न्हाय की भेटत न्हाय .. त्यांचा त्यांचा परपंच पडलाय ..म्हाताऱ्या माणसांसाठी कुणाला येळ न्हाय.."
पुन्हा दोघी समोर पाय पसरून बाहेर एकटक बघू लागल्या. आऊ ने बोललेलं मात्र मनाला लागलं होतं. खरच म्हाताऱ्या माणसांना लोकं दुर्लक्षित करतात.. म्हणून तर कदाचित आऊ खूप गप्प गप्प राहत असावी.. म्हणून रखमा माई आज एवढ्या वर्धक्यात एकटी राहत आहे. मी त्या दोघींना बराच वेळ बघत होतो.. दोघी ही कानाने थोड्या बहिऱ्या होत्या बरेच शब्द त्यांना वेगळे ऐकू येई त्यामुळे आऊ एक बोले तर राखमामाई दुसरेच बोले..पण तरी त्यांचा संवाद थांबला नव्हता. दोघी ही भूतकाळातल्या बऱ्याच गोष्टीना उजाळा देत आनंदात बोलत होत्या. इकडे आई मात्र आता कंटाळली होती. म्हणून आईच म्हणाली
" मावशी आता लय उशीर झालाय गाडी सुटलं जातो आम्ही आता."
आई ने असे म्हटल्यावर दोघी भानावर आल्या. राखमामाई उठली तिने तीन मोडकी ताटं घेतली. ते बघून आई म्हणाली,
"काय करताय मावशी.. जेवण वैगेरे काही करू नका जेवून आलोय आम्ही.."
"असं कसं पहिल्यांदा अलाव माझ्याकडं ..थोडं खाऊन घ्या माझ्या गरीबाकड"
असे म्हणत राखमामाई ने एका मोडक्या कढई वजा हंड्यातून भात ताटात वाढले. शेवटच्या ताटात भात वाढायला तिने त्या हंड्यातून भात खरडून खरडून काढला. तो छोटा हंडा किती तरी ठिकाणी दबला गेला होता. काळा ठिक्कर पडला होता. भात वाढून झाल्यावर तिने त्यावर थोडी थोडी साखर टाकली. आई म्हणाली,
" मावशी सगळं नका वाढू तुम्हाला ठेवा जरा"
"माझं झालाय खाऊन तुम्ही घ्या "असे म्हणत तिने मोठ्या प्रेमाने आम्हाला वाढले.. आम्ही कोणतीही उपेक्षा न करता ते खाऊन टाकले. घरात एक जुनाट बलब लागला होता. तो बलब सोडला तर वीज वापरायला कोणतीच इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात नव्हती. चार मोडकी भांडी एक चूल या पलीकडे घरात काही ही नव्हतं. पत्रांच्या भिंती वर फांद्यांच्या व गवताचे छप्पर टाकले होते . पण ती कितीही गरीब असली तरी मनाने ती श्रीमंत होती. तिने दिलेले जेवण न घेणे म्हणजे तिच्या गरिबीची उपेक्षा केल्या सारखे झाले असते. जेवण झाल्यावर आम्ही उठलो आऊला सुद्धा उठणं भाग होतं. मी आई बाहेर आलो राखमामाई आणि आऊ एकमेकांना आलिंगन देऊन डोळ्यात असावे आणून रडत होत्या. भरल्या डोळ्याने आऊ तशीच बाहेर आली. पाटोपाठ राखमामाई सुद्धा आली. बाहेर ऊन आता जरा उतरले होते. मी आणि आई निरोप घेण्या साठी राखमामाई च्या पाया पडलो. तशी पाठीवर मायेने हात फिरवत राखमामाई म्हणाली,
" लय मोठा माणूस हो..येत जा आजी ला घेऊन माझ्या भेटीला ..मला मेलीला एकटं एकटं आयुष्य झालाय ...तुम्ही आलात तर बरं वाटलं खूप.. "
आऊ थोडं रडवेला आवाजात म्हणाली,
"राखमे ही आपली शेवटचीच भेट हाय बघ..आता पुण्यनदा होत न्हाय यायला ..म्या चालले परवा मुंबईला..एकदा का मुंबईला गेले की परत काय कोण आणत नसतंय हितं.. "
"व्हय बाई आता परत भेटतु की मरतु देवालाच ठाऊक ..हित नाय भेटली परत तर वर भेट मग"
दोघी आता हसायला लागल्या. पुन्हा एकदा आऊ ने तिला अलिगंन दिले. आणि आम्ही जायला निघालो. थोडं पुढे त्या वळणावर गेल्या वर आऊ ने तिला वळून बघीतलं राखमामाई पदराने डोळे पुसत होती. आऊ सुद्धा डोळे पुसत तिला हात हलवून शेवटचा निरोप देत होती.
पावणे पाच ला आलेली एस टी आम्हाला मिळाली होती. आत एस टी जवळ पास रिकामीच होती. एस टी ने वेग पकडल्यावर आत आता गार वारे येत होते. धड धड करत एस टी सोलापूरकडे धावू लागली होती. आऊ पुन्हा एकदा खिडकीत बसून बाहेर बघत होती पण मला खात्री होती की ती आता अनुभवलेल्या या सुवर्ण क्षणांना आठवून मनाच्या अथांग सागरात साठवून ठेवत होती. माझ्या ही मनात तिच्या या अपूर्व भेटीच्या आठवणी चीर अनंत राहणार होत्या. त्यांच्या या भेटी मुळे मी सुद्धा भावुक झालो होतो. नान्नज वरून जाताना रिकाम्या एस टी सारखे मन सुद्धा उदास आणि रिकामे वाटत होते. मला ठाऊक होते त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर पूर्ण विरामकडे सरकत होते. पण तरी मला प्रश्न पडत होते. या दोघी पुन्हा भेटू शकतील का? की पुन्हा कधीच यांची भेट होणार नाही ?
दोन वर्षाने राखमामाई वारल्याची खबर कुठून तरी आली. आऊचे डोळे भरून आले. खरे तर राखमामाई ला स्वर्गवासीं होऊन महिना झाला असावा मग ती खबर आमच्या पर्यंत आली होती. राखमामाई गेली पण ती आऊच्या मनात मात्र जिवंत राहिली होती. शेवटच्या क्षणी एकदा तिला भेटता आले असते तर...असे कदाचित दोघींनाही वाटले असावे. राखमामाई गेली ती पोकळी मनात ठेवून दोन वषे आऊ जगली नंतर ती सुद्धा अनंतात विलीन झाली. शेवटी या दोघींना पुन्हा काही भेटता आले नाही आणि ते शक्य ही होणार नव्हते हे प्रखर सत्य आऊला ठाऊक होते. माणसाला ही प्रतारणा पदोपदी ठेच लागल्या गत होत असते. काही गोष्टी माहीत असून ही त्या आपण बदलू शकत नाही. याची मोठी खंत मनात सलत असते. अशा किती तरी मनातल्या सल आऊ आणि राखमामाई सोबत घेऊन जगत होत्या. पण त्यांच्या मैत्रीची उब त्यांच्या मनाला सुख देत राहिली होती. आता दोघी ही या जगात नाहीत. पण त्यांची मैत्री त्यांची शेवटची भेट मात्र माझ्या आठवणीत माझ्या स्मरणात कायम राहिली आहे.
