pravin talole

Drama Inspirational

4  

pravin talole

Drama Inspirational

आगीतून फुफाट्यात

आगीतून फुफाट्यात

20 mins
493


विपुल पोटासाठी औरंगाबाद सोडून मुंबईत आला. आता नशिब उजळणार ही खात्री घेऊनच, गेली चार पाच वर्षे लो. बाबू जगजीवनराम रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून सेवेत होता. आता शिकून घेण्याचा काळ होता, अनुभवाची शिदोरी जमवायची होती. पोराची आबाळ व्हायला लागली म्हणून आईने औरंगाबाद जवळच्या खेड्यातली मुलगी शोधली. विपूलला ती पसंत पडली, ती ही एमएससी झालेली होती. मुंबईला जायला मिळणार या कल्पनेचा तिला खूप आनंद झाला होता, सध्या नोकरी करत नव्हती पण घेतलेलं एवढं शिक्षण वाया जाणार नाही ही तिला खात्री होती.

  

विपुल आणि वर्तिकाचं लग्न थाटामाटात पार पडलं. डॉक्टर नवरा मिळाला याचा खूप अभिमान होता तिला. विपुलला हॉस्पिटलमार्फत प्रायव्हेट सोसायटीत एक फ्लॅट मिळाला, तो किती डेकोरेट करु असं वर्तिकाला झालं होतं, नाना तऱ्हेची तोरणं, झुबंर, भिंतीच्या रंगाला मॅच होणारे दारा-खिडक्यांचे पडदे. सगळं कसं मनासारखं होत होतं. दिवसभर विपुल घरी नसे, कधी पाळयांच्या ड्युट्याही लागत, शेकडो पेशंट येत, त्यांच्या आजारांचा मानसिकतेचा अभ्यास त्याचं अभ्यासू मन सारखाच करत होतं. कधी कधी लंच ब्रेकही मिळत नसे. पण ही रुग्णसेवा करण्यात पुढील आयुष्यात फायदा होईल, असा साधा भोळा पण महत्वाचा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. पांढरा ॲप्रन, ग्रीन मास्क, स्टेथोस्कोप सतत त्याच्या जवळ असायचाच.


मुंबईची वस्ती, दाटीवाटी, त्यातून उत्पन्न होणारे निरनिराळे आजार पाहून त्याला आश्चर्य वाटायचं सुरुवातीला, पण आता सवय झाली होती त्याची, मेडीकल कॉलेजमधली खास मैत्रिण चार्मी त्याला नेहमी म्हणायची, “तू ना खूप नाव कमावणार आहेस, किती मेहनत करतोस? अरे हे सरकारी इस्पितळ आहे, इथे रात्रंदिवस रोग्यांचा राबता चालूच असतो. ही मुंबई आहे. सदोदित, चालूच असते. जशी औद्योगिक राजधानी आहे तशीच ही मुंबई साथीच्या रोगांचं, निरनिराळ्या विचित्र आजाराचं माहेरघर पण आहे. जरा वेळेवर खातपित जा, रेझिटन्स पॉवर कमी झाली तर तूच आजारी पडशील, तेव्हा तुझी प्रॅक्टिस जरा जपून कर.”

   

वर्तिकाला दिवस गेले. ओकाऱ्यांनी सुरुवातीला ती खूप हैराण झाली. शेवटी विपुलने तिला त्याच्या बाबू जगजीवनराम चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तिथे बेडवर वर्तिका झोपून विपुलची धावपळ, त्याला एक चांगला डॉक्टर मानलं असलेलं ऐकायला मिळत होतं. आपल्या नवऱ्याची स्तुती ऐकून वर्तिकाच्या अंगावर मूठभर मांस चढलं होतं. लवकरच ती बरी झाली. चार्मीशी तिची चांगली ओळख झाली, आपला नवरा अत्यंत साधा आहे, महिलांशी, बरोबरच्या डॉक्टर मुलींशी तो केवळ मैत्रीचेच नाते ठेवतोय ही खात्री पण झाली.


वर्तिका औरंगाबादला बाळंतपणासाठी गेली. एका डॉक्टरची पत्नी म्हणून नर्सेस, आया, डॉक्टर्स सर्वच आदराने वागत होते. वर्तिकाला मुलगी झाली, नाव ठेवलं स्वर्णिमा, स्वर्णिमा सहा महिन्याची झाल्यावर मुंबईला परत आली. आता सारा दिवस स्वर्णिमाच्या संगोपनातच जात होता. गोबऱ्या गालाची, निळी घारी, गोरीपान, भरपूर जावळ असलेली स्वर्णिमा सर्वांची लाडली झाली होती. शेजारीपाजारी कुटुंब तिला खेळवायला घरी न्यायचे, ती त्यांच्यासह खेळाची, कधी आवाज काढायची पण कसं कळत होतं तिला कुणास ठाऊक? तिला विपुल यायची वेळ झाली की तिचा चेहरा बदलायचा, तिला विपुल यायला हवा असे ती गोंधळ घालायची, काही केल्या थांबायची नाही रडणं, पण विपुल दारात दिसला की ती खूप खूष हसाची. बापाचा स्पर्श झाला की सगळं गाडं सुरळीत व्हायचं तिचं.

   

“काय ही पोर आहे! तुम्ही येईपर्यंत भयंकर गोंधळ घालते बाबा, काही सुचू देत नाही, बाहेर फिरवून आणलं तरी तिच्या मनात एक फक्त बाबाच असतो.”

    

“अगं असंच असतं, मुलांना आई लागते, तर मुलींना बापच आवडतो, हे अनभिज्ञ नातं आहे. हा अगदी जुना संकेत आहे, मुलीचं बापावरच प्रेम असतं, बघ तू पुढे असंच होईल.” या त्याच्या बोलण्याचं प्रत्यतंर थोड्याच दिवसात आलं.

    

त्या रात्री विपुलला खूपच उशिर झाला. उशिरामुळे वर्तिकाही कंटाळली होती. भूक लागलेली असून जेवतही नव्हती, त्यात स्वर्णिमाने विपुलची येण्याची वेळ टळल्यावर मोठं भोकाड पसरलं. काही केल्या ती रडायाची थांबेना, शेवटी वर्तिकाने एक युक्ती केली, मोबाईलवर ती विपुलशी बोलू लागली, “तुम्हाला यायला अजून किती वेळ लागेल?”

  

“बारा तरी वाजतील रात्रीचे, तू जेवूण घे. हार्ट ॲटॅकचा पेशंट सिरियस आहे, आम्ही सगळेच थांबलोय, स्वर्णिमा झोपली का?”

   

“हो हो तिने तर रडून घर डोक्यावर घेतलंय, मी तर कंटाळले बाबा या पोरीला, सारखं बा…बा...बा चाललय. काय करु तिला घेऊन येऊ का तुम्ही भेटल्याशिवाय ती शांत होणार नाही, काय करु सांगा.”


“एक काम कर, हा फोन तिला दे मी तिच्याशी बोलतो,” विपुलच्या सांगण्याप्रमाणे वर्तिकाने फोन स्वर्णिमाच्या कानाशी धरला.

   

“हॅलो, स्वर्णिमा, सोनू ए सोनू रडायचं नाही, असं मी थोड्या वेळात येतोच आहे, तू दुदु पिऊन झोप, आता भेटला ना बाबा, राणी गं माझी राणी, जो जो कर हं.”

   

हे शब्द ऐकताच त्या कोवळ्या अजाण बालिकेच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, रडणं थांबलं, ती बाटलीभर दुध प्यायली आणि झोपली. शांत, झोपेत हसत.

    

रात्री एक वाजता बेल वाजली, वर्तिका जागीच होती, दारात थकलेला, भुकेने, धावपळीने, टेन्शनमुळे थकलेला विपुल उभा होता, तो दारात आला, हातपाय धुवले, नाईट ड्रेस घातला, त्यालाही स्वर्णिमाला जवळ घेण्याची ओढ लागली होती. तो तिच्या पाळण्याजवळ गेला आणि तिला प्रेमाने साद घातली.

  

“स्वर्णिमा, सोनू, अगं माझं पिलुं ते झोपलं का?” असं म्हटल्यावर बरोबर स्वर्णिमा जागी झाली. विपुलला बघून आनंदी झाली, हातपाय नाचवू लागजी, घागऱ्यांची झुमझुम कानाला गोड वाटत होती. तिने दोन्ही हात पसरले, विपुलने तिला बिलगावं म्हणून विपुलने तिला घेतलं, तिचे पापे घेतले, गोंजारलं, पाळण्यात ठेवलं. ती पटकन झोपली. विपूल – वर्तिका जेवले, बेडरुममध्ये गेले, पुन्हा स्वर्णिमा उठली, रडायला लागली, स्वर्णिमा का रडतेय हे त्या बापालाच लक्षात आलं, त्याने तिला आपल्या कुशीत बेडवर घेतलं, तिला बाबा परत जाऊ नये म्हणून त्याला बिलगून राहायचं होतं.

    

“ पाहिलंस, मी तुला म्हटलं होतं ना मुलीचं बापावरंच खूप प्रेम असतं.”

    

“पटलं मला, काय द्वाड आणि हुशार आहे. बाप काहीच करत नाही तरी तोच आवडतो आणि मी दिवसभर तिचं करते ते गेलंच कुठे? कमाल आहे या पोरीची, घ्या तिला कुशीत, संभाळा तिला रात्रभर.”

   

“आणि तू?”

    

“मी, मी आहेच शेजारी.”

    

स्वर्णिमाला कोपऱ्यात सरकवून विपुल, वर्तिका जवळ आला, त्याने तिला बाहुपाशात घेतलं, क्षणभरात सारा दिवसभराचा क्षीण नाहीसा झाला. एकांतात ते तसेच झोपी गेले.

    

दुसऱ्या दिवशी सकाळी आवरता आवरता विपुल, पत्नी वर्तिकाला म्हणाला, “काल रात्री जे दृश्य तू पाहिलंस ती केवळ स्पर्शाची जादू होती, लहान मुलं तर मायेच्या आपल्या माणसांच्या स्पर्श-सुखासाठी आसुसलेली असतात. माणूस जन्माला येतो तेव्हा स्पर्शानेच जग ओळखता येते. ठराविक माणसांचा व इतरांचा स्पर्श त्यांना आपोआप आणि लगेच कळतो. तुझा आई म्हणून स्पर्श तर खूप महत्वाचा आहेच, पण स्वर्णिमाला पिता म्हणून माझाही स्पर्श ओळखता येतो. ती आसुसलेली असते स्पर्शासाठी, हे नैसर्गिक वरदान असतं त्या बाळांना.”


“बरं चल लवकर नाश्ता दे, स्वर्णिमा उठली तर मी अडकून पडेन, सध्या कोरोनाची साथ सगळीकडेच पसरलीय, साधा सर्दी-खोकला झाला तरी लोक मोठ्या हॉस्पिटलला आमच्याकडे येतात, उगीचंच गर्दी वाढतेय, काम वाढतं.”

   

“प्रायव्हेट डॉक्टर दवाखाने, OPD, कन्सल्टिंग, ॲडमिट करुन घेत नाहीत. बहुसंख्य नामवंतांनी दवाखाने, हॉस्पिटल्स चक्क बंद ठेवलीत. सामान्य आजारासाठीसुद्धा त्यामुळे लोकांची परवड होतेय. कोरोनामुळे सगळेच घाबरलेत. लॉकडाऊन आहे त्यामुळे त्याची वातावरणात अधिक भेसूरता जाणवतेय. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खाजगी डॉक्टरांनी दवाखाने चालू करावे, रुग्णांना औषधोपचार द्यावे, त्यांनी दवाखाने बंद ठेवणं हे मानवता वादी नसून असंवदेनशील आहे अशी टीकाही केलीय.”

   

“तरीही डॉक्टर मंडळी घरी मस्त फॅमिली लाईफ एन्जॉय करताहेत, त्यांचं म्हणणं असं की, दवाखान्याची स्वच्छता करायला सफाई कामगार नाहीत, मिश्रक कामावर येत नाहीत आणि जर पेशंटची गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. आमच्या सरकारी रुग्णालयात सर्व सुरक्षा सुविधा घेऊन परिचारीका, वॉर्ड बॉय, सफाईवाले रजा न घेता २४ तास सेवा देताहेत. मग खाजगी डॉक्टरांनाच या अडचणींवर तोडगा का काढता येत नाही.”

     

“चल मी निघतो.“ त्याने तोंडाला मास्क, हातात मौजे घातले व निघाला. नंतर स्वर्णिमा उठली, बाबा दिसेना म्हणून तिने गदारोळ केलाच, पण नंतर शांत झाली.


हॉस्पिटलला आज प्रचंड गर्दी होती, ३०० खाटा पूर्ण भरल्या होत्या. विलगीकरण कक्षात जवळ जवळ ८०/९० लोक होते. शिवाय नवीन पॉझिटीव्ह रिपोर्टवाले ॲडमिट होत होते. हॉस्पिटलला बाजाराचं स्वरुप आलं होतं.


कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डमध्ये संपूर्ण देह झाकणारा सूट, सॅनिटायझरचा फवारा, मास्क, सॉक्स बूट, हँड ग्लोव्हज सारं वापरावं लागत होतं. तरीही पेशंटचा सतत बारा तास सहवास होताच. बहुतेक जण व्हेंटिलेटरवर होते, तासातासाने तपासण्या कराव्या लागत. कितीही जपलं तरी त्या रुग्णाचे जवळ गेल्यावर स्पर्श होतच असे. जवळपास महिनाभर तो याच वॉर्डमध्ये होता. पेशंटच्या वेदना, विव्हळणं कधी कधी कानाला असह्य व्हायचं. ताप, खोकला, सर्दी, घसादुखी, श्वसनाला त्रास ही तशी सामान्य आजारपाणाची लक्षणेच करोना पेशंटमध्ये होती. साठीच्या पुढचे ५-६ रुग्ण त्याच्या डोळ्यादेखत प्राण गेलेले त्याने पाहिले. त्याला आपल्या बाबांची आठवण व्हायची, आईची काळजी वाटायची.

   

दुपारी जेवणानंतर त्याला आळोखे पिळोखे येऊ लागले, शिंका खूप आल्या. डोकं खूप घण मारल्यागत दुखू लागलं, अंगात कणकण वाटू लागती. त्याने एक डोकेदुखीसाठी क्रोसिन घेतली आणि कामाला सुरुवात केली, पण थोड्याच वेळात त्याला खूप थकवा आला, ताप वाढू लागला, त्याने त्याच्या वरीष्ठ डॉक्टरना तसं सांगितलं, डॉक्टरांनी त्याची घरी जाण्याची गाडीने व्यवस्था केली.

  

अचानक, अवेळी विपुल घरी आलेला पाहून वर्तिकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याचा चेहरा पार उतरलेला होता. तिने त्याला सोडायला आलेल्या त्याच्या मित्रांचे आभार मानले, ते म्हणाले, “वहिनी अर्ध्या रात्री जरी फोन केलात तरी आम्ही तुम्हाला मदत करु, काळजी करु नका.” ते निघून गेले.

   

पुढले दोन-तीन दिवस विपुलला ताप आणि खोकला होताच, पारा वाढत होता, उतरत होता. वर्तिकाला बाहेरच्या वातावरणामुळे भल्याभल्या शंका येऊ लागल्या.

   

“अगं, हे काही इतकं सिरियस नाहीय, चार-पाच दिवस आराम केला की ठीक होईन मी, खूप कामाचा ताण पडलाय ना अलिकडे, त्यामुळे असेल.”

   

“अहो, पण तुम्ही स्वत:च डॉक्टर आहात आणि कोणतीही टेस्ट न करता घरात गप्प आहात नवल वाटतं तुमचं.”

   

त्या सगळयात एक गोष्ट आनंदाची होती, ती म्हणजे विपुलची छोटीशी बाहुली स्वर्णिमा मात्र एकदम खूष होती. कारण तिला तिचा बाबा आयताच घरात मिळाला होता, पण तिला एकदाही त्याच्या जवळ जाऊ न देण्याची खबरदारी घेत होती, त्या छोट्या जिवाला डोळ्यासमोर असून जवळसुद्धा घेता येत नाही, याचा विशाद मात्र त्याला वाटत होता.

   

एका मध्यरात्री विपुलला श्वसनाचा त्रास होऊ लागला, तो अस्वस्थपणे अंथरुणावर बसला, दम्याच्या रुग्णांना दिला जाणारा श्वसनासाठीचा स्प्रेही त्याच्याकडे होता, तो ही वापरुन पाहिला पण व्यर्थ. त्याचा श्वास गुदमरु लागला, तेव्हा त्याने कशीबशी वर्तिकाला हाक मारली, त्याची ती अवस्था बघून तिची बोबडीच वळली, हातपायाला कंप सुटला, तिला विपुलने हॉस्पिटलला फोन करायला खुणेने सांगितलं. ती शेजारच्या फ्लॅटमधल्या माणसांना घेऊन आली, एकाने फोन केला अँबुलन्स आली, विपूलला ताबडतोब आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.

  

त्याच्या घशातून रक्त घेण्यात आलं, नाकपुडयातून रक्त घेण्यात आलं, काही इंजेक्शन्स देण्यात आली. एकूण विपुल गंभीर अवस्थेत होता. वर्तिकाला त्याच्यापासून दूर बाहेर जा सांगण्यात आलं, जन्म आणि मृत्यूचा झगडा चालू होता. पण्ं विपुलने अनेक पेशंट पाहिल्याने तो खंबीर होता. त्यातच एका सकाळी एका परिचारिकेचा त्याच वॉर्डात मृत्यू झाला, सर्वच पेशंट घाबरले. उद्या आपला नंबर नाही ना?


रक्त चाचण्या पॉझिटिव्ह आल्या, विपुलला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वर्तिकाला घरीच विलगीकरणात राहायला सांगितले. आता प्रश्न होता स्वर्णिमाला सांभाळण्याचा, तिने आई-वडीलांना बोलावून घेतलं, पण बस, रेल्वे, खाजगी वाहन सर्व बंद येणार कसे? वर्तिकाने फोन करुन ज्या शेजाऱ्यांना बोलावलं त्यांची पण तपासणी करुन प्रत्येकाला विलगीकरणाची सक्ती केली. सारी सोसायटीच सीलबंद झाली.

   

दुध, भाजीपाला, फळं, औषधं, बँक व्यवहार सारंच बंद झालं, त्यांच्यासाठी वॉचमनकडून सर्वजण सोय लावत होते. पोलीसांना तोंड देत देत वर्तिकाचे आई-वडील आले, वर्तिकाने हॉस्पिटलला फोन केला व अडचण सांगितली, हॉस्पिटलने एक कार पाठवली, त्यातून आईवडील स्वर्णिमाला घेऊन गेले.

    

नवरा दूर, मुलगी विलग एरव्हीचा एकटेपणा वेगळा, तो सहज पार करता येतो. पण हा दुरावा, एकटेपण तिला असह्य होत होतं. तर विपुलही कुंटुबापासून वंचित अवस्थेत निराश, उदास झाला होता. या आजारात मन:शक्ती क्षीण होते हे त्याला माहिती होते.

   

कुणीही रुग्णाशी संवाद साधू नये म्हणून मोबाईल जॅमर लावलेत हे त्याला ठाऊक होतं, त्यामुळे वर्तिकाची काय अवस्था असेल? स्वर्णिमा कशी आहे हे काहीच कळू शकत नव्हतं.

  

वर्तिका मात्र विपुलच्या प्राणघातक कोरोनामुळे हवालदिल झाली होती. त्यात टी.व्ही.वरच्या बातम्या काळजाचं पाणी पाणी करत होत्या. अमेरिकेत २ लाख कोरोनाबाधित, १७९२ जणांचा मृत्यू. स्पेनमध्ये ५ लाख मृत्यू, इटलीत सात लाख मेले, प्रेते पुरण्यासाठी जागाही नाही. महाराष्ट्रात परदेशी न गेलेल्या लोकांनाही करोनाची लक्षणे, मुख्यमंत्री निधीत १९७ कोटींची आर्थिक मदत जमा. केरळमध्ये ३२ वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू. सात १० वर्षाच्या आतील मुले कोरोनाच्या प्रादुर्भावाने रुग्णालयात के.इ.एम मध्ये नर्सेस व डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा.

   

हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या या न्यूज ऐकून ती अधिकच चिंतेत पडायची. उद्या विपुलला असं काही झलं तर…..? स्वर्णिमाला बाबा कसे दाखवायचे? आपल्याला कोण आधार देईल? एवढं मोठं आयुष्य कसं, कोणाच्या आधारावर जगायचं? विपुल बरे होतील ना? कधी? त्यांना साधं बघताही येत नाहीय. मग भेटणं तर दूरच.

   

तिला देवघरातल्या मूर्तीचा राग आला. तिने एका डब्यात देव भरुन अडगळीत तो डबा फेकून दिला. माणूसच माणसाला तारतो आणि मारतो! मग देव काय करतो? 

  

आजचं विज्ञान, सध्याचे लॉकडाऊन, डिस्टन्सिंग हे उपायच जर हा रोग घालवणार असतील तर देवाची प्रार्थना कशाला? माणसातली माणुसकी, स्वच्छ, शुद्ध मन आणि विचार, परोपकारी स्वभाव हे गुणच देव आहेत. दगडाचा, पितळ्याचा देव काय करतो? झूठ आहेे सारं आजमितीस. मनाची अशी धारणा अशा वेळी होतेच.

   

एकटीच विचार करत बसायची.

सातव्या दिवशी फोन आला.

विपुलचे सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेत.


तरीही त्याला आणखी दोन दिवस निरीक्षणाखाली विलग कक्षात ठेवलं, आता आणखी पंधरा दिवस असंच विलग राहायचं होतं.

विपूल आणि वर्तिका वेगवेगळ्या खोल्यात राहात होते, पण स्वर्णिमा इथे नसल्याने दोघेही बैचेन होते. त्यात सासू-सासरे रोज वर्तिकाला फोन करुन जावयाची चौकशी करायचे. स्वर्णिमा आता सारखी तुमची आठवण काढून रडतेय, तिला इथे राहायचं नाहीय; जिथे असाल तिथेच थांबा असे आदेश आहेत. आम्ही पण घर सोडू शकत नाही. काय करु तुम्हीच ठरवा, असं निर्वाणीचं बोलत होते. आता खूप मोठा पेच पडला होता, तिकडे विपुलचे आईवडील त्रासले होते, ते इकडे येऊ शकत नव्हते. तर इकडे हे दोघे क्वारंटाइनमध्ये होते.

  

यातून काय मार्ग काढायचा?

स्वर्णिमाला तर आई-बाप हवे होते!

इकडे आड तिकडे विहीर!

एवढ्या भीषण वातावरणात नियमांचं उल्लंघन तरी कसं करायचं?

पण तो कोवळा जीव, त्याचा तरी काय दोष?

त्याला आपले आई-बाप भेटावे ही त्याची अपेक्षाही चूकीची आहे का?

   

त्यात कोरोनाच्या बाधेबरोबर औरंगाबादमध्ये ‘सारी’ नावाचा विषाणू कार्यक्षम होऊन त्याचा फैलाव होतोय, हे नवं संकट तिथे असताना स्वर्णिमाला काही झालं तर? या विचाराने आणि बातम्यामुळे विपुल आणि वर्तिका दोघेही पार कोलमडून गेले. त्याच त्याच प्रश्नाने रडकुंडीला आले.

  

त्यांनी शेजाऱ्यांना विनंती केली, आमच्या स्वर्णिमाला जाऊन घेऊन येता का? त्यावर शेजारपाजाऱ्यांनी त्यांना काहीच सहमती दिली नाही उलट त्यांच्याशी त्या सर्वांना क्वारंटाईनची शिक्षा भोगावी लागतेय, याचा राग बोलून दाखवला. दरवाजे बंद करुन त्यांच्याशी संबंध तोडून टाकले. अशा प्रसंगी मानवता दाखवणारा कोणी पुढे आला असता तर हा प्रश्न सुटला असता, पण समाज पाषाण हृदयी झाल्याचा मन हेलावून टाकणारा वाईट अनुभव दोघांना आला आणि निर्घृणतेची चीडही आली.

    

शेवटी नाईलाजाने ते दोघंही डीन मॅडमकडे गेले. त्यांना बघून डॉक्टर आंनंदित झाल्या.


“या या डॉक्टर विपुल, काय कशी आहे तब्येत?”

    

“मॅडम, सर्वांच्या सहकार्याने आणि तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित आहे, पण….पण एक अडचण आहे, मॅडम...”


“काय, काय हो, काय अशी समस्या आहे की तुम्ही माझ्यापर्यंत आलात?”

     

“मॅडम तुम्हाला काय सांगू?”

     

“मग, आत आलात कशाला?” मॅडम हसत बोलल्या.

     

“मॅडम, प्रॉब्लेम असा आहे की, आमची मुलगी स्वर्णिमा, मी जेव्हा कोरोनाबाधीत झालो तेव्हा माझे सासू-सासरे तिला गोड बोलून आमच्यापासून सुरक्षिततेसाठी औरंगाबादजवळ माझं गाव आहे, तिथे घेऊन गेले. आता बरेच दिवस झाले, ती आता राहात नाहीय, सारखी आमची आठवण काढतेय. दिवस-रात्र तिने त्यांना हैराण केलंय. तिचा एकच ध्यास आई-बाबा पाहिजे. मुंबईला चला, तिने ताप काढलाय,”

     

“किती वर्षाची आहे?”

     

“चार.. चार वर्षाची, पहिल्यांदाच आमच्यापासून अलग झालीय.”

     

“मग, तुमचं म्हणणं काय आहे?”

     

“तिला आणायला जाऊ का? लगेच परत येतो.”


मॅडम हे ऐकून संतापल्या, त्यांनी बेल दाबली.


विपुल, तुम्ही हा प्रश्न विचारताय? कमाल आहे तुमची? डॉक्टर आहात ना, डॉक्टरचं मन दगडासारखं असलं पाहिजे. तुम्ही जीवघेण्या आजारातून बाहेर पडलात, बाहेर काय चाललंय? आजचा आकडा १२६४ आहे बाधितांचा, ९० मृत्यू झालेत. मुख्यमंत्री, पंतप्रधान, पोलिस घसा फोड करताहेत. संयत भाषेत जनतेच्या कानी कपाळी ओरडत आहेत घराबाहेर पडू नका. आपण सारेच जनतेसाठी प्राणांची बाजी लावून रात्रं-दिवस लोकांसाठी झटतोय. साथ आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने लढा देतोय कोरोना विरुद्ध आणि तुम्ही मला एवढ्या लांबच्या प्रवासासाठी परवानगी मागताय?”

     

वर्तिकाच्या डोळयातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या पाहून डीनबाईंचा रागाचा पारा उतरला.

     

“नाही मॅडम, सर्वांनी असहकार पुकारलाय. कोणीही आम्हाला घरात घेत नाही, बोलत नाही, दारसुद्ध उघडत नाहीत.”

     

“अरे अशावेळी तर सहकार्य करायलाच हवं लोकांनी...“


“नाही मॅडम, समाजाचं चित्र वेगळंच आहे. आम्ही जणू गुन्हेगारच आहोत असं समजत आहेत शेजारी, मित्र, नातलग. उलट पोलिसांनाच मारहाण होतेय. तरुण मुलं पण गाड्या उडवतायत. परिस्थितीचं गांभीर्य या घडीलाही समाजाला नाही आहे. आम्ही इथे आहोत पण आमचे जीव स्वर्णिमाच्या आठवणीने माशासारखे तडफडत आहेत. त्यात तिकडे ‘सारी‘ने थैमान घातलंय. तुम्हाला ठाऊक आहेच. उद्या माझ्या स्वर्णिमाला काही झालं तर?” वर्तिकाला पुढे बोलवेना, ती हमसाहमशी रडू लागली.

     

“मुली रडू नकोस, मीही आई आहे. आईच्या भावना मलाही समजतात. आपण काही तरी मार्ग काढू. जा तुम्ही दोघं. मानसिक क्लेश करुन घेऊ नका. मी बघते काय करायचं?” डॉ. हसल्या, त्यांचं हसू सकारात्मक, मातृत्वाची कदर करणार होतं. एका ताटातुटीला, भेटीचा आनंद देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु झालाय, हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एरव्ही बहुश: स्त्री ही स्त्रीलाच मारक ठरते, पण इथे एक आई दुसऱ्या आईला पूरक ठरेल असं वाटत होतं, घडणार होतं.


“लहान मुलांना स्पर्शाची ऊब खूप कळते. आई-वडीलांचा स्पर्श हा तर मुलांचं, बालकांचं अनेक आजारावर औषधं असतं. अजूनही आपली मुलं मोठी असली तरी मी घरी येताच त्यांना आनंद होतो. आई-वडील नसतेच तर तिला त्यांची आठवण येण्याचा प्रश्नच नव्हता. पण ही अवस्था वेगळी आहे. स्पर्शातून शरीरात जैविक बदल होतात. प्रेमळ स्पर्श झाला तर स्वर्णिमा, विपुलची मुलगी पटकन बरी होईल. ‘ऑक्सिटोसिन‘ या संप्रेरकाने शरीरात उत्पन्न होताच सकारात्मक बदल घडून येतात हे आपण हार्टच्या, हायपरटेन्शनच्या पेशंटमधून पाहिलेले आहे. एकाला सवलत दिली तर इतरही सोकावतील. तेव्हा काय करावे?” मॅडम विचार करत होत्या.

           

“कायद्याचं उल्लंघन की माणुसकीला प्राधान्य? उद्या त्याच्या मुलीचं काही बरं-वाईट झालं तर? पत्रकार टपलेलेच आहेत. वाभाडे काढायला... आपण माणसांचे डॉक्टर आहोत. त्यात विपुल आत्ताच कोरोनातून सहीसलामत सुटलाय. या आजारानंतर रुग्णांची मानसिक दुर्बलता येते असे अभ्यासले जातेय. त्याच्या असंतुलनामुळे कदाचित तो आणखी आजारी झाला तर... तर शिंतोडे माझ्यावरच उडतील. या कष्टाने मिळवेलेल्या पदावरुन, पदच्युत करायलासुद्धा शासन कमी करणार नाही.”

           

मॅडमनी, टेबलावरची बेल दाबली, शिपाई आत आला.

           

“जी मॅडम.”

           

“अरे सोपान, मी घरी फोन केलाय. माझी गाडी विपुल सरांच्या घराकडे न्या. मी फोन केलाय घरी, मुलाला आणि ते डॉ. नेहा आणि प्रकाश बोत्रे दोघांना बोलव, अर्जंट, एक मिनिटात.”


“अरे तुम्ही दोघं विपुलच्या घरी जा आणि त्यांना गाडीतून इथे आणा माझ्याकडे, पळा लवकर माझी MH 6730 माहिताय ना?” चौघेजण आले, ”नेहा, प्रकाश तुम्ही जा, आपलं काम करा.”

           

“हे बघा, मी तुम्हाला माझी खाजगी गाडी देतेय, तिने ताबडतोब रवाना व्हा. मी तुम्हाला तपासून सर्टिफिकेट देते, विपुल तुझी डिस्चार्ज फाईल बरोबर ठेव. कोणालाही अजिबात सांगायचं नाही, केवळ तुमच्या मुलीसाठी मी सोडतेय.” प्रथम वर्तिकाला तपासलं.


“अरे विपुल शी इज प्रेग्नंट. वा वा काॅंग्रॅट्स. शी इज नॉर्मल. हे आपल्या तिघातच ठेवायचं, तिथे वातावरण कसं आहे?”

           

“एकदम पीसफूल, प्रदुषणरहित, औरंगाबादपासून ३० कि.मी वर एक खेडेगाव आहे. तिथलेच आम्ही दोघं.”


”हे बघ विपुल, तब्येत जप, काही त्रास व्हायला लागला तर लगेच परत ये, निघा आता.”


मॅडमनी पी.ए.ला बोलवलं. ‘Health Certificate’ दिलं. दोघेही अत्यंत आनंदित झाले.

           

“थॅंक्स मॅडम, तुम्ही डॉक्टर नाही, देवमाणूस, देवीस्वरुप आहात, तुमचे आभार कसे मानावे कळत नाही.”

           

“ओ.के चला निघा लवकर, लेक वाट पाहात असेल.”

     

गाडीवर महाराष्ट्र शासन, इमर्जन्सी ड्युटी स्टीकर असल्याने कुठेच अडचण आली नाही. रात्री खूप उशिरा विपुल वर्तिका घरी पोहोचले. त्यांना अचानक आलेले पाहुन विपुलचे आई-वडीलांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

           

“स्वर्णिमा?”

           

“झोपली आता, गोष्ट सांगितली. आई-बाबा उद्या येतील अशी समजूत घातली तेव्हा कुठे स्वारी झोपली.”


सकाळी उठल्याक्षणीच आई दिसल्याबरोबर स्वर्णिमाने तिला मिठी मारली, “बाबा पण आले?”

           

“हो...”

           

इतक्यात विपुल समोर आला, तो दिसताच स्वर्णिमा आनंदाने घरभर नाचली. बापाचे पापे घेतले, खूप खूश झाली.

           

“आपण कधी जायचं मुंबईला? मला कंटाळा आलाय.”


“हो जायचं हं, लवकरच. आता आम्ही आलोय ना तुला घ्यायला. आपण पम् पमने (गाडी) जायचंय, तू खिडकीजवळ बस हं.”

           

“जावईबापू आल्यासारखे आठ-पंधरा दिवस राहा, आम्हालाही बरं वाटेल.”

           

“नाही हो, आम्ही आमची हॉस्पिटलकडून कशी सुटका करुन घेतली; ते आमचं आम्हालाच ठाऊक.”

     

विपूल आणि वर्तिका दोघंही दोन खोल्यात राहात होते, विलगीकरण पाळत होते.

     

गाव खूप सुंदर होता, शांतता होती, स्वच्छता होती, हवामान थंड होतं. समोरच हिरवीगार टेकडी होती, गाई-बौलांच्या घुंगरु घंटांनी मधुर निनाद उमटत होता. हे दृश्य शहरात कुठलं. ? ज्वारी, गव्हाच्या शेतात गोफणीने पाखरं उडवणारा पाहून विपुलला स्वर्णिमा म्हणाली.


“पाखरांना दाणापाणी नको का? हा दुष्ट आहे माणूस खडे का मारतो. बिचारी पाखरं मरतील की,” तिच्या त्या बोलण्याने विपुलला हसू आलं. तिचं पक्षी प्रेम किती आहे हे त्याला कळून चुकलं.

           

दोन दिवस मजेत गेले, तिसरा दिवस मात्र पुन्हा अवघड परिस्थितीत उजाडला. सासूबाई हरणाताई आणि वर्तिका दोघींनाही फणफणून ताप भरला, उद्या तर निघायचं होतं. तासातासाने दोघींची परिस्थिती गंभीर झाली. हरणाताईंना श्वसनाचा त्रास सुरु झाला. विपुलने ओळखलं, यांना कोरोना बाधा झालीय. कदाचित प्रवासत माझ्या जवळ बसून वर्तिकालाही असावी. त्याने औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयाला फोन करुन अँबुलन्स मागवली. दोघींनाही नेऊन दाखल केलं, तिथे दाखल करुन घेण्यासाठी खूपच त्रास झाला. शेवटी त्याने C.S कडे जाऊन स्वत:चे ओळखपत्र दाखवले तेव्हा दोघींना ॲडमिट करुन घेतलं, ट्रीटमेंट सुरु झाली.


आता सासरे अण्णासाहेब आणि विपुल, स्वर्णिमा तिघेच होते, शेजारणीने त्यांना रोज जेवण देण्याची सोय केली. जेवणानंतर विपुल पुन्हा रुग्णालयात गेला. दोघीही व्हेंटिलेटरवर होत्या, झोपल्या होत्या.

           

“बाबा मी आईजवळ झोपणार,” स्वर्णिमा हट्ट करु लागली.

           

“नको बाबा, आई आणि आजीला बाऊ झालाय, तिच्या जवळ जायचं नाही. या काचेतून दिसतेय ना आई? चल मी घरी तुला गोष्ट सांगतो, मग तू जो जो करतशील ना,”

           

“हो, आज्जी मला रोज गोष्ट सांगायची.”

     

विपुलने स्वर्णिमाला मांडीवर घेतलं. खरं तर ते आरोग्यदृष्ट्या विलगीकरणाच्या विरुद्ध होतं, पण परिस्थिती अशी पेचात टाकण्यासारखी निर्माण झाली होती, पण विपुल मनाने अतिशय खंबीर होता. त्या जोरावर त्याने कोरोना मुक्ती मिळवली होती.


“बाबा गोष्ट सांग ना...“ स्वर्णिमाचा हट्ट चालूच होता. त्याने आताच आज पेपरात वाचलं होतं की, पूर्वीही काही संत, महात्मे आजाऱ्याला गावाबाहेर राहायला लावून दवा पाणी देत होते. ते एक प्रकारचं क्वारंटाईनच होतं.

     

“ऐक हं, एक होता फकीर बाबा, त्याला सगळे लोक ‘बाबाच ‘ म्हणायचे. त्याला त्याकाळी ॲलोपथीचा वापर फारसा नव्हाता. तो झाडपाल्याची औषधं, मुळ्या, काढे, लेप, मलम असं द्यायचा. तो एका मशिदीत राहायचा, ती अगदी जुनी आणि पडकी झालेली होती. लोक त्याला म्हणायचे, बाबा आमच्या घरी चला... पण तो कोणाकडेच जात नसे. लोक, गावकरी त्याला जेवण आणून द्यायचे, सगळ्याचं जेवण एकत्र कालवून तो आधी कुत्री, माजरांना खाऊ घालायचा, मग तो जेवायचा.”

     

“शी, असला घाणेरडा बाबा होता तो...” मध्येच स्वर्णिमा बोलली.


“नाही गं, त्याला स्वच्छता खूप आवडायची, तो गावाचे रस्ते झाडायचा. झाडांना विहीरीचं पाणी काढून घालायचा, फुलं गावकऱ्यांना वाटून टाकायचा.”

           

“वेडाच होता तो.”

     

त्याने दिलेल्या औंषधाने अनेकांचे कठीण आजार बरे व्हायचे. तो रोग्याला आपल्या मशिदीत घेऊन जायचा. आजाऱ्याची सेवा करायचा. आजारी माणूस बरा झाला की मग तो त्याला घरी जा सांगायचा. बघ आता सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला आई आणि आजीला भेटू दिलं नाहीच ना, मग हेच धोरण तो शंभर वर्षापूर्वी चालवत होता.

     

एक दिवस त्याची कीर्ती ऐकून एक मुस्लीम आजारी माणूस त्याच्याकडे आला, त्याने अनेक डॉक्टरांकडे औषधं घेतली, पण त्याचा आजार बरा होत नव्हता. तो जगायलाही कंटाळला होता. फकीर बाबाने त्याला त्या जुनाट, घाणेरड्या मशिदीत नऊ महिने रहा असे सांगितले, ते स्वत: त्याची सेवा करायचे, औषधे तयार करुन पाजायचे. स्वत: जात्यावर दळलेल्या पीठाच्या भाकरी त्याला खायला घालायचे, गावाबाहेर चावडीत झोपायला सांगायचे.


चावडीवरची दलदल, चावडीची पडकी खोली, ओल्या भिंती, खडकाळ कच्ची जमीन त्यामुळे थोड्याच दिवसात त्याला तिथे राहाण्याचा कंटाळा आला. आता आपण कसे सगळे घरात बसलोय. तसाच तो घरापासून दूर, निर्मनुष्य जागी रहात होता. त्याला त्याच्या बायको, मुलांची आठवण यायची. तुला कशी आमची आठवण यायची, तशीच.”


स्वर्णिमा पेंगुळली होती. तरी खुदकन् हसली, ”तो फकीर बाबा रुग्णांना बरं करतोय अशी ख्याती पसरली होती. त्यामुळे त्याचाही विश्वास बसला होता. एका रात्री त्याने तिथे राहण्यापेक्षा पळून जावे असा विचार करुन तो पाण्याची सुरई घेऊन रात्रीच्या गडद अंधारात रेल्वे गाडीपर्यंत चालत निघाला. चालून दमला, त्याने विचार केला, समोर झोपडी आहे, तिथे कुणीतरी राहात असेल त्यांच्याकडे विसावा घेऊ मग गाडीला जाऊ, पण त्या झोपडीत एक मरणाच्या घटका मोजत असलेला एक म्हातारा तडफडत पडलेला होता. त्या रुग्णाला त्याची दया आली, त्याने त्याच्याकडे पाणी मागितले, तो म्हातारा फकिर पाणी प्यायला आणि त्याने प्राण सोडले. तो रुग्ण घाबरला पुन्हा चावडीवर आला नऊ महिने पूर्ण झाले, मग ते बाबा त्याला म्हणाले.


जा तुझ्या घरी, तू बरा झालास, तू तिथे राहिला असतास तर तुझा आजार लोकामध्ये पसरला असता, म्हणून तुला मी अलग करुन इथे ठेवलं, औषधं दिली. त्या रुग्णाने बाबाचे पाय धरले, आभार मानले आणि गावी गेला.”

     

गोष्ट सांगण्यात विपुल अगदी रंगून गेला होता, त्याला मुलगी झोपी गेली हे ही कळलं नही. त्याने तिला मांडीवरुन खाली ठेवली, विचारात पडला.


म्हणजे विलगीकरण हेच औषध आजही लागू पडतंय, आपल्याला ते नविन व त्रासदायक वाटतयं, पण हा उपाय भारतात फार पूर्वीपासून सुरु होताच. वानप्रस्थाश्रमात जाणं हा सुद्धा विलगीकरणाचाच प्रकार असावा. वृद्धांना शांतता मिळावी, त्यांचे आजार घरातल्यांना होऊ नये म्हणूनही ते वनात जात असतील, निसर्गसान्निध्यात ते निरोगी राहून दीर्घायुषी होत असणार असं मला वाटतंय. आज इतक्या वर्षांनतंर त्याची अमंलबजावणी होतेय ही आनंदाची गोष्ट आहे.


त्याने अंथरुणावर पडून मोबाईल न्यूज लावल्या. महाराष्ट्राचा कोरोनाबाधितांचा आकडा २४५५ झाला हे वाचून त्याचा भितीने थरकाप उडाला, दुसऱ्या दिवशी त्याने त्या रुग्णालयातील हलगर्जीपणा, दुर्लक्ष, औषधांची वानवा, अस्वच्छता बघितली, तिडीक आली डोक्यात. त्याने सिव्हील सर्जनला भेटून डिस्चार्ज मागितला वर्तिका आणि हरणाबाईंना. मुंबईच्या त्याच्या डीन मॅडमला खरी परिस्थिती सांगितली. त्यांनी सी.एस ना दोन्ही पेशंट अँबुलन्सने व्हेंटिलेटरवर, कार्डियो युनिटसह असलेली गाडी देऊन मुंबईला पाठवण्यास सांगितले, हॉस्पिटलचं धाबं दणाणलं, कारण मॅडम सी.एस ना बोलल्या की आरोग्यमंत्र्यांना तुमचं हॉस्पिटल व्हीजीट करण्याची विनंती मी केलेली आहे.

     

वर्तिका, विपुल, स्वर्णिमा, अण्णा, हरणाताई सगळेच अँबुलन्सने मुंबईला निघाले. विपुल जिथे होता तिथेच वर्तिकाला ठेवण्यात आलं, पण हरणाबाईना कोरोना नसून ‘सारी‘ या नव्या विषाणुचा संसर्ग झाला होता. यामुळे औरंगाबदेत जवळपास २०० बाधित होते तर १५ मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे हरणाताईंना स्वतंत्र कक्षात ट्रीटमेंट सुरु झाली. मुंबई ती मुंबईच इथे आल्यावर दोघींच्यातही खूप सुधारणा झाली.


विपुलला मात्र वाटलं, आगीतून फुफाट्यात पडलो, पण स्वर्णिमामुळे हे सारं सहन करणं भाग होतं. आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड घालायलाच हवे. कसलाही विचार न करता विपुल पुन्हा हॉस्पिटलमधे ड्युटीवर हजर झाला, त्याच्या मनात रुग्णसेवेचं रुजलेलं बीज आता अंकुरलं होतं, घरात आराम करत बसणं त्याला अपराधीपणाचं वाटत होतं, ही रुग्णसेवा नव्हे, देशसेवा आहे. सीमेवर भारतीय जवान साऱ्या देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात. हा रोग पण मानवजातीशी रोगाचं युद्ध पुकारलंय, आपण सैनिक आहोत, लोक आपल्या हाती रुग्णांचे देह नव्हे प्राण सोपवतात, त्या प्राणांचं मोल आपण त्यांना रोगमुक्त करुन हसतमुखाने पाठवायला हवं.

     

कौटुंबिक समस्येमुळे स्वर्णिमाला घराजवळच्या एका पाळणाघरात ठेवण्याची विपुलने व्यवस्था केली. ही सोय ती गावी असती तर जमली नसती, त्यामुळे तो आता बिनघोर झाला. त्याने बायको आणि सासू दोघीही ॲडमिट असल्याने स्वत: २४ तास ड्युटीला वाहून घेतले.


चार दिवसानंतर वर्तिकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तो सारखाच वर्तिकाला आणि हरणाताईनां विश्वास देत होता, धीर देत होता. तो स्वत: स्वत:च्या आव्यविश्वासाने, जिद्दीने, स्वयंशिस्तीने, नियमित उपचाराने आणि मी बारा होणारच त्या एकमेव सकारात्मक दृष्टीने यशस्वी झाला होता. तो वर्तिकासह सर्वच रुग्णांना, बाधित, विलगीत, संशयित या सर्व प्रकारच्या अगतिक आणि धास्तावलेल्या लोकांना दिलासा देत असे, तुम्ही नक्की बरे व्हाल.  

     

त्या हॉस्पिटलने एक चांगली सोय, सुधारणा केली होती. रोज एका माणसाला जो कोरोनामुक्त झालाय त्याला स्वत:चे अनुभव सांगण्यासाठी निमंत्रित केले जात होते. जेणेकरुन रुग्णाचे मनोबल वाढावे. सतत पाच दिवस वर्तिका आणि हरणाताईंचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तेव्हा त्यांना डिस्चार्ज देण्याचे सोपस्कार सुरु झाले. आज विपुल विजयी झाला होता, तीन संकटातून सहीसलामत सुटला होता. मॅडमच्या परवानगीने त्याने आज स्वत: समुपदेशन मी... करतो असे सांगितले, मॅडम तयार झाल्या.


“माझ्या मित्रांनो, बंधु-भगिनींनो, कोरोना या विषाणुच्या बाधेने सारे जगच चिंतेत आहे, सारे व्यवहार ठप्प झालेत, त्यात अफवा पसरवल्या जात आहेत. पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस, आया, अँबुलन्स चालक, सफाई कामगार स्वत:च्या अडचणी बाजूला ठेवून, जीव धोक्यात घालून, देशसेवेने झपाटून रात्रंदिवस काम करत आहेत. आज महाराष्ट्रात २१११ एवढे बाधित रुग्ण तयार झालेत, त्यातले १४६१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. लोकांमध्ये घबराट आहे, पण घाबरण्याचे कारण नाही. शासनाने करोनाला अटकाव करण्यासाठी नायर व K E M रुग्णालयाचे वैद्यकीय माहविद्यालयाचे माजी संचालक डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली नऊ तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातही सहा सदस्यीय समितीची स्थापना झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासह होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी कसे करता येईल यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार शास्त्रज्ञ लवकरच यावर ठोस प्रतिबंध, लस, औषधे शोधून काढतील असा मला विश्वास वाटतो. जे काही मृत्यु झालेत, त्यात त्या रुग्णांचे वय ५५ च्या पुढे आणि मधुमेह, बी.पी, टी.बी, कॅन्सर असे आधीपासूनच आजार अडले होते. एकूण त्यांची प्रतिकारशक्तीच मुळात कमी होती. आपल्याला कोरोना झाला म्हणजे आपण मरणार, ही समजूतच चुकीची आहे. मी व माझी बायको आणि सासूबाई तिघेही डॉक्टरांच्या मेहनतीने पूर्ण बरे झालो आहोत. आमच्याकडे बघा. उद्या तुम्हीही नक्की बरे होणार आहात. तेव्हा आत्मविश्वासाने उपचार घ्या.


सर्व नेते मंडळी, कलाकार, सरकारी अधिकारी, विख्यात डॉक्टर्स, अभिनय क्षेत्रातले लोक हात जोडून विनवतात, घरात थांबा, सुरक्षित राहा, रोगमुक्त व्हा. तरीही समाज त्यांची आवाहने धुडकावून गर्दी करत आहेत, बिनकामाचे रस्तोरस्ती फिरत आहेत. घोळक्याने गप्पा मारत आहेत. उलट पोलिस, नर्सेस, डॉक्टरांवरच हल्ले करत आहेत. लॉकडाऊनची अंमलबजावणी यशस्वी करुन दाखवा. भारत हा जगातला पहिला देश आहे, ज्याने रोगप्रसार रोखण्यासाठी आधीच बंदी घातली. फक्त घरात राहाणे एवढे सापे काम जर कोरोनाच्या राक्षसाला ठार करु शकते, तर आपण आपल्या देशासाठी एवढेही साधे योगदान देऊ शकत नाही का? ‘सारी’ नावाचा आणखी एक विषाणू सक्रिय झालाय, त्यालाही रोखण्याचा केवळ ‘घरी राहाणे‘ हाच सर्वोत्तम उपाय आहे. देशाला वाचवा, तुम्ही जगा, इतरानांही जगू द्या. मी लढाई जिंकलो, तुम्हीही जिंका. सर्वांना माझ्या शुभेच्छा. ‘भारत कोरोना मुक्त‘ हा मथळा पेपरात वाचण्याचा दिवस आता दूर नाही, पण जनतेने, शिस्त, संयम, स्वैराचार करु नये, मग ही बातमी लवकरच येईल, लक्षात ठेवा, धन्यवाद. घरात राहा-कोरोनामुक्त व्हा! पुन्हा सांगतो.”

     

विपुल, वर्तिका, हरणाताई हसतमुखाने मॅडमचे आभार मानून बाहेर पडले. आता स्वर्णिमा अण्णांच्या ताब्यात गेली. ती चिमूकली चांगली राहिली हे ही खूप चांगले झाले. आता वर्तिकाला प्रतिक्षा होती, स्वर्णिमाच्या भावाच्या जन्माची. होणारा बाळ निरोगी असावा हीच सर्वांची इच्छा होती.


“आगीतून सुटलो – फुफाट्यात पडलो, पण वाचलो, विज्ञानाची किमया. ” विपुल वर्तिकाला सोशल डिस्टन्शींग पाळत म्हणाला, ती ही हसली होकारार्थी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama