सुखाचा बुरखा
सुखाचा बुरखा
ज्या ठिकाणच्या मातीत उगवल्या, वाढल्या
हसल्या, खेळल्या ती माती सोडून
दुसऱ्या जमिनीत रुजतात,
फुलतात, फळतात या तेजस्विनी|
सुखाचा बुरखा पांघरून
दु:खाचा कढ पितात माझ्या भगिनी ||धृ||
स्वत:ला मूल होत नाही म्हणून
स्वत:च्या हाताने नव-याचे दुसरे लग्न
लावून देतात या तपस्विनी |
सुखाचा बुरखा पांघरून
दु:खाचा कढ पितात माझ्या भगिनी ||१||
असं म्हणतात, एका म्यानेमध्ये
राहत नाहीत दोन तलवारी पण
सवतीलाही बहिणीप्रमाणे जपतात या योगिनी |
सुखाचा बुरखा पांघरून
दु:खाचा कढ पितात माझ्या भगिनी ||२||
मनाचा मोठेपणा दाखवता दाखवता
अंत:करणात उठलेला
जाळ विझवता विझवता
तिळ-तिळ तुटतात या विरहिणी|
सुखाचा बुरखा पांघरून
दु:खाचा कढ पितात माझ्या भगिनी ||३||
लेकराचे बोबडे बोल
ऐकता ऐकता
पती विरहाची वेदना
पचवता पचवता
स्वतःला छंदात गुंतवतात या मानिनी|
सुखाचा बुरखा पांघरून
दु:खाचा कढ पितात माझ्या भगिनी ||४||
भावा पुरूषा तूही असं वागला असतास
दोष असता तुझ्यात तर पत्नीचे दुसरे लग्न लावला असतास
नाही ना! मग का दिला त्या दोघींचा बळी
वंश वाढविण्यासाठी तुझा?
सख्यांनो व्हावं लागेल ग तुम्हाला आता सौदामिनी||५||
