फक्त तू माझीच आहे (अष्टाक्षरी)
फक्त तू माझीच आहे (अष्टाक्षरी)
चंद्रकोर उमटली
प्रिये भयाण रात्रीला
जीव झाला वेडा पिसा
सखे तुझ्याच भेटीला
दूर का गेली निघून
साथ माझी तू सोडून
माझ्या आर्त भावनेला
सुया अनंत टोचून
आठवांचे काहूर हे
आले बघूनी नभात
वाट तुझी पाहतो मी
चंद्रकोरी प्रकाशात
सांगू कसे मी कुणाला
जीव तुझ्यावरी जडे
नको तुझे हे बहाणे
आता तरी ये ना गडे
नेत्र माझे तुझ्यासवे
क्षणोक्षणी वाट पाहे
ऐक भावना मनाची
फक्त तू माझीच आहे