STORYMIRROR

Minal Kulkarni

Classics

3  

Minal Kulkarni

Classics

पाऊस

पाऊस

1 min
296

पाऊस सुखातही

पाऊस दु:खातही

पाऊस झेपावणाऱ्या

इवल्याश्या पंखातही

पाऊस रिमझिमतो

कधी पापण्या भिजवायला

पाऊस कोसळतो

चिंब मनाला रुजवायला

पाऊस उंचउंच डोंगरावर

पाऊस खोलखोल दऱ्यांमध्ये

पाऊस तळहातावर अलगद

झेललेल्या गारांमध्ये

पाऊस हिरवा हिरवा

रानातून ओघळतो

पाऊस तुझ्या गालावर

हलकेच विरघळतो

प्रेमात बरसताना

पाऊस सोहळा होतो

राधेसह भिजताना

पाऊस सावळा होतो

पाऊस तुझ्या नजरेत

साठवावा ऐसा

पाऊस नाजुक क्षणाला

गोठवावा तैसा

कधी पाऊस होऊन वैरी

छेडी विरहाचे गीत

तर कधी पाऊस दोघांसवे

चाले एका छत्रीत

पाऊस मनाच्या

हिंदोळ्यावर झुलतो

पाऊस नभाच्या

सप्तरंगांना भुलतो

पाऊस पाषाणह्रदयी

पाठ फिरवणारा

पाऊस पिलाच्या चोचीत

चारा भरवणारा

पाऊस वीजेसह

अंगावर धावून येतो

पाऊस रेशमी 

उन्हेही लेवून येतो

पाऊस टपटप तळ्यात

उठवून वलय जातो

पाऊस निशब्द मनात

माजवून प्रलय जातो……


Rate this content
Log in

More marathi poem from Minal Kulkarni

Similar marathi poem from Classics