निथळ
निथळ
एका निथळत्या तिन्हीसांजेला
कुणा एका अश्राप शब्दाला कवितेचे स्वप्न पडावे....
कुणी सांगावे ती असेलही तेव्हा सैलावलेली
नेहमीचे हटवादी आणि निग्रही गच्च गच्च कोश न पांघरलेली ..
संधीप्रकाशाचा ओलसर केशरगंध
झिरपू दे तिच्या गात्रांमध्ये ..
नि मोहरून यावी त्या शब्दाकाठच्या वळणावर
आणि
तेव्हा निमित्त व्हावे सावल्यांनी वळणापुढची वाट अडविल्याचे ..
आता तो शब्द
ती कविता
आणि
त्यांच्या श्वासांमधला एकांत ..
त्या उमलत्या रात्री
त्या शब्दमग्न कवितेने तापलेल्या देहानिशी
त्या शब्दात विरघळावे ...
खरंच एका निथळत्या तिन्हीसांजेला
कुणा एका अश्राप शब्दाला कवितेचे स्वप्न पडावे....
