माझा होशील ना?
माझा होशील ना?
आनंदाचा पाऊस होऊन कधी
धो-धो अंगणी माझ्या बरसशील ना?
चैतन्याचा मृद्गंध होऊन मग
अंतर्मनात नित्य दरवळशील ना?
सांग रे सख्या माझा होशील ना?
आयुष्याच्या मैफिलीतला माझ्या
तो सुमधुर सूर तू होशील ना?
सुरात माझ्या सूर मिसळून
जीवनगाणे माझे फुलशील ना ?
सांग रे सख्या माझा होशील ना?
उन्हातले शीतल चांदणे होऊन
कधी मनाच्या कवाडातून आत डोकावशील ना?
साथ तुझ्या अंगाईची देऊन
थकल्या जीवाला रिझवशील ना?
सांग रे सख्या माझा होशील ना?
अनोळखी गर्दीत वावरताना
माझा विश्वासू वाटाड्या तू होशील ना?
आयुष्याची नौका सागराच्या कैक लाटांवर तरंगताना
सदैव साथ माझी तू देशील ना?
सांग रे सख्या माझा होशील ना?

