एक मैफिल अशीही...
एक मैफिल अशीही...


कृष्णमेघांनी प्रफुल्लित वसुंधरा सबंध,
हिरव्या चैतन्याचा दरवळला मृद्गंध!
मिटविण्या आता चातकाची आस,
वरुणाने पाठविला पाऊस हा खास!
दूर त्या सरितेपल्याड,
तरु वल्लरींनी नटला पहाड!
श्रावणातल्या सरींचा होताच स्पर्श,
दरी-खोऱ्यातून ओसंडतो निर्मळ हर्ष!
ऋतुत या मन माझे भलतेच हळवे,
झुळुकेपरि अलगद सप्त सुरांकडे धावे!
साद घालाया मंजुळ नभी पाखरांचे थवे,
अंगणातला रसिक चाफा डोले वाऱ्यासवे!
इंद्रधनु दिसता आभाळी मोहक सुंदर,
दाटून येई आठवणींचे पाणी लोचनांवर!
फुंकर घालाया सज्ज मल्हाराचे मधुर स्वर,
अन् सांडतात शब्द गहिरे कोऱ्या कागदावर!
घन गर्द सावलीत घेता मोकळा श्वास,
चिंब ओल्या भावनांचा होई सारा प्रवास!
मुग्ध मैफिलीत या वाटे चौफेर उल्हास,
ऊन शोधण्याचा आताशा नकोच अट्टाहास!