भुतावळ
भुतावळ
सकाळी डोळे उघडतात
अन मनाच्या गाभाऱ्यात
क्षणात जमते भुतावळ
एकापाठुन एक एक करत
हळूच येतात सरपटत
काही गहिरी काही विरळ
नैराश्य, रोष व फसगत
हसतात वाकुल्या करत
मनाचा होत जातो छळ
हे असे का बरं घडतं
माझ्याच वाट्याला का येतं
मन होत जाते विव्हळ
जीवत्वाचे पाश तोडत
जावे सरळ स्मशानात
विचारांची नुसती वावटळ
जुन्यास उरी धरत
बसे जे मन कण्हत
खंतांची काटेरी बाभूळ
मग तेच मन धीर देत
आपलेच हित साधत
करीत जाते ताळमेळ
जुन्याला मूठमाती देत
नित्य नूतन भरारी घेत
गाठते आकाश निर्मळ
सूर्यतेजाने ढग जाती पांगत
मन फिनिक्सच्या रुपात
बघताच पळाली भुतावळ
