आस निरंतर
आस निरंतर
अबोलच असतो तू
नि:शब्दात विरुन जातात
कितीतरी भावना...
तरी का कुणास ठाऊक
ते क्षण संवादीनी होतात
सहवासातले...
शब्दाविना बोलणं होतं
तुझ्यापर्यत पोहोचणं होतं
अन् हृदयाला भिडणंही होतं
विणेच्या तारातले अंतरही
सूर आळवतातच नं
तेही हवेहवेसे..
तसेच काहीसे सूर
स्पंदनांनी बहरलेले
या अबोल मैफिलीतले...
भेट क्षणाचीच पण
मनभर प्राजक्त पखरुन गेलेली
हृदयात नक्षी कोरुन गेलेली...
वय हातात नसतं पण मन धावतं
संकोचाच्या धुक्यापलीकडे...
म्हणूनच ही आसक्त ओढ
सहवासाची...
निरंतर आस तुझ्या भेटीचीच
भेटीनंतरही...

