Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kalpita Pandit Patki

Romance Tragedy

1.7  

Kalpita Pandit Patki

Romance Tragedy

एकरूप

एकरूप

5 mins
1.7K


ती आणि तो दोघे एक ठराविक अंतर राखून बाजूबाजूला चालत होते. त्याच्या हातात तिची बॅग होती. १५ दिवसांसाठी ती मामाकडे जाणार होती. तो तिला सोडायला बस स्टँडवर आला होता. तिचे आई वडील आधीच गावी गेले असल्याने त्याला तिला भेटता आले होते. नाहीतर तिचे वडील म्हणजे विक्षिप्त माणूस, आपल्या मुलीशी कोणी मुलगा बोलतोय हे बघून त्यांनी आधी तिच्या आणि मग त्याच्या दोन मुस्काटात लगावल्या असत्या. ती जाम घाबरायची तिच्या वडिलांना! खासकरून जेव्हा तो आसपास असायचा. नेहमी म्हणायची ती त्याला, "तू अप्पांच्या समोर असलास आणि माझ्याकडे बघत असलास कि मला खूप भीती वाटते . अप्पांना कळले ना तर आपले काही खरे नाही, पण तू अजिबात ऐकत नाहीस माझे!" तो हसून तिचा हात हातात घ्यायचा आणि म्हणायचा, "तुझे अप्पा म्हणजे राक्षस नाही आहेत कोणी! माणूसच आहेत, हा! जरा वेडसर वागतात पण त्यांना तुझी काळजी वाटते म्हणूनच ना? पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?" ती त्याच्या डोळ्यात बघत थोडीशी लाजत "हो" म्हणायची. तो खुश होऊन म्हणायचा,"मग झालं तर! नाहीच ऐकले ना तुझ्या अप्पांनी तर त्यांच्या नाकाखालून अशी घेऊन जाईन ना तुला कि मग बसतील शोधत आपल्याला!" ती त्या कल्पनेनेच मनमोकळे हसायची आणि तिच्या हसण्यात तो ही हरवून जायचा.

ती तशी भित्री भागूबाई तर हा अगदी मनमौजी! दोघांची भेट एका गाण्याच्या कार्यक्रमात झाली होती. तिथेही ती अप्पांबरोबरच आली होती. अप्पांच्या एका मित्राने आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमात हा तबलजी म्हणून आला होता. अप्पा स्वतः संगीत शिकवत असल्याने अशा कार्यक्रमांना ते तिला आवर्जून नेत असत. हीचा आवाज जात्याच सुरेल त्यात अप्पांच्या शिकवणुकीत हि अजूनच तरबेज झालेली! त्याचीही तबल्यावरची थाप उत्तम....त्या दिवशी तिने त्या कार्यक्रमात "घननिळा लडिवाळा" म्हंटले आणि तिच्या प्रेमाचा हिंदोळा त्याच्या मनात झुलू लागला. त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केलासुद्धा, पण ती तर साधे बघायलाही तयार नव्हती त्याच्याकडे! नशिबाला मात्र काही वेगळेच मान्य होते.

त्याचे कौशल्य बघून अप्पांनी तबलजी म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्याला विचारले. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्याशी बोलायची आणि तिचा सुरेल आवाज ऐकायची पुरेपूर संधी! तिच्या आवाजामुळेच तो तिच्या प्रेमात पडला होता खरंतर. हळू हळू त्या दोघांची मैत्री झाली. पण अबोल मैत्री! सगळ्या गप्पा नजरेनेच. मग मात्र धीर करून ती त्याच्याशी बोलायला लागली. अप्पा नसताना तरी इतकी हिंमत करतच असे ती! तिच्या नकळत तिला तो आवडायला लागला. आता तर अप्पांची भित्री भागुबाई थोडेसे धाडस करून त्याला भेटायला बाहेर जाऊ लागली. अप्पांच्या धाकातही त्याच्या हळुवार, अबोल, नाजूक प्रेमाची कळी खुलायला लागली. अप्पांशी लवकरच बोलणार होता तो त्यांच्याविषयी. तिला मागणी घालून मानाने त्याची सहचारिणी म्हणून घेऊन जाणार होता. ती देखील याच दिवसाची वाट बघत होती.

आज जाताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्यांची भेट झाल्यापासून तर शिकावणूकीच्या निमित्ताने तो सततच तिच्या समोर असायचा आणि आता एकदम १५ दिवसांचा विरह! त्याला हरप्रकारे काळजी घ्यायला सांगून अगदी बस पुढे निघून जाईपर्यंत त्याच्याकडे साश्रू नयनांनी खिडकीतून बघणाऱ्या तिला, त्याने १५ दिवस पुरेल इतके नजरेत साठवून घेतले होते. आता तिची वाट बघणे हेच काम होते त्याचे! तो विरह त्याला सहन होत नव्हता. ती परत आल्यावर अप्पांशी बोलण्याचा त्याचा निर्णय झाला होता. सोळाव्या दिवशी तिची बस यायच्या वेळेला तो स्टॅण्डवर गेला. तडक समोर जायला नको म्हणून लांबूनच तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला. बस आली, पण ती आली नाही. अप्पा आणि तिची आईदेखील दिसले नाहीत. याच्या काळजाचा ठोका चुकला. काय करावे सुचेना. तरी हिंमत हरला नाही. धीर ठेऊन रोज त्या वेळेला बस स्टँडला जाऊन, ती यायची वाट बघू लागला.......पण ती आली नाही.

आणि अचानक एक दिवस अप्पांनी त्याला घरी बोलावले. "अप्पांचा निरोप! म्हणजे ती आली असणार"...... होता तश्या अवतारात तो घरात पोहोचला. अधाशासारखी त्याची नजर घरभर तिला शोधात होती पण तिचा मागमूस नव्हता. आता तो चक्रावला. त्याच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. अप्पाना काही विचारायची तर सोयच नव्हती. गुदमरून गेला त्याचा इतकुसा जीव! "उद्या घरी पाहुणे येणार आहेत तेव्हा एक उत्तम कार्यक्रम करायचा आहे गायनाचा! मंडळी खुश झाली पाहिजेत. तयारीला लागा तुम्ही!" अप्पांनी फर्मान सोडले तसा तो भानावर आला. "गाण्याचा कार्यक्रम? म्हणजे उद्या तरी ती असेल घरात!" असे मनाला समजावले त्याने. काहीतरी विपरीत घडल्याचे, त्याचे मन त्याला ग्वाही देत होते पण तो खोट्या आशेवर मनाला समजावत होता.

दुसऱ्या दिवशी अप्पांच्या मर्जीप्रमाणे सगळी तयारी झाली होती. अंगणात उभारलेल्या मंचावर तो तयार बसला होता..... शोधक नजरेने! अप्पानी सगळ्या गावाला निमंत्रण धाडले होते. त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती आली होती. ती कुठे होती यापेक्षा ती आली होती याचा आनंद जास्त होता......थोड्यावेळातच घराचा दरवाजा उघडून ती अंगणात आली. सुंदर काठपदराची साडी नेसून, गळ्यात सुरेख मोहन माळ आणि.......हिरवा चुडा आणि मंगळसूत्र लेऊन.....तिच्यामागून तिच्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठा दिसणारा एक माणूस आला आणि तो काय समजायचे ते समजला.......

नजरेत असंख्य वेदना घेऊन ती त्याच्याकडे बघत होती. तो मात्र कोरड्या डोळ्यांनी तिला बघत राहिला. तिचे ते गोंडस, लोभसवाणे रूप त्याने कित्येक वेळा मनात स्वतःसाठी रंगवले होते. पण आता ते त्याचे नव्हते, ती त्याची नव्हती, नियतीने तिचा डाव अप्पांच्या रुपात साधला होता. त्याची ती नजर बघून तिची हालचाल मंदावली, संथपणे ती मंचावर येऊन गायला बसली....त्याच्या आवडीचे "घननिळा लडिवाळा".... तिच्या गाण्यातली आर्तता त्याच्या तबल्याच्या थापेत साठली होती. आता तो फक्त तिला आणि तिलाच बघत होता आणि ती त्याला! त्याच्या नजरेतली वेदना हळू हळू वाढत जाऊन अचानक संपली. तो बसल्याजागी धाडकन कोसळला. ती उठून देहभान हरपून त्याच्याकडे धावली......तो निपचित पडून होता. नियती अजून सुखावली नव्हती, तिच्याकडे बघून भेसूर हसत होती.....पण तीसुद्धा त्याचीच प्रेयसी होती. धाडसी, हिंमत न हरणारी.....तिने नियतीला हरवले....त्याच्याच म्हणण्याप्रमाणे नियतीच्या नाकाखालून तो तिला घेऊन गेला....अप्पा धावत त्यांच्याजवळ गेले. रागाने लालबुंद होऊन त्यांनी तिला हाक मारली पण एक नाही दोन नाही. आता त्यांनी तिला उठवण्यासाठी तिचा हात धरला आणि तो गळून पडला.......ते भीतीने दूर झाले.....त्याच्या निष्प्राण देहावर तिचा अश्रूही न सुकलेला देह निपचित पडून होता.....

नियतीने त्यांना या जगात एकत्र येऊ दिले नसले तरी ते एका वेगळ्या प्रवासाला एकत्र निघाले होते, जिथे त्यांच्यात विरहाला जागाच नव्हती......


Rate this content
Log in

More marathi story from Kalpita Pandit Patki

Similar marathi story from Romance