Kalpita Pandit Patki

Romance

3.2  

Kalpita Pandit Patki

Romance

सेलिब्रेशन

सेलिब्रेशन

25 mins
1.5K


गेले आठ दिवस ती "या" दिवसासाठी तयारी करत होती. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. वर्षभर त्याने तिच्यावर जी प्रेमाची उधळण केली होती त्याची तिला आज परतफेड करायची होती. हो परतफेडच! कारण प्रेम करणे त्यानेच तिला शिकवले होते.


प्रेम काय असते आणि त्याचे किती पैलू असू शकतात हे तिला माहीतच नव्हते. लहानपणीच आई वारल्याने ती आणि बाबा यांचाच काय तो परिवार! नातेवाईक सुद्धा फार नाहीत. बाबा कामात व्यस्त असायचे. त्यांचे तिच्यावर खूप प्रेम पण बिचारे बायको निवर्तल्यामुळे विचित्रपणे संसारात अडकलेले! लेकीला त्रास नको आणि पत्नीवर मनापासून प्रेम म्हणून दुसरे लग्न केले नाही! त्यामुळे त्यांना जसे जमत होते तसे का होईना, त्यांनी तिला आईची माया दिली. पण शेवटी आई ती आईच म्हणून नातेवाईकांच्या नजरेत प्रेमापेक्षा सहानुभूती आणि "आईविना पोर" असाच भाव जास्त! समजायला लागल्यानंतर या सगळ्याचा तिला तिटकारा येऊ लागला. बाबा आपल्यासाठी खूप करतात याची तिला समज आली. आपला परिवार म्हणजे आपण आणि बाबा हे तिच्या मनात पक्के बसले. या अश्या लोकांचे प्रेमही नको आणि दया तर अजिबातच नको. वडिलांना आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, हे तिला कळायला लागले. जरी तिला त्यांच्याशी खूप खूप बोलायची इच्छा असली तरी ते कामावरून फार दमून येतात तेव्हा त्यांना कटकट वाटेल किंवा त्रागा होईल असे वागणे ती टाळू लागली. वेळ बघून बाबांचा मूड बघून ती बोलायला शिकली. बाबा सुद्धा तिला शक्य तितका वेळ देत असत. सुट्टीच्या दिवशी सगळा वेळ तिच्यासाठीच ठेवत असत. तीच त्यांचे जग होती. ती देखील तिचा शक्य तेवढा वेळ, आयुष्यभर एकटे राहून स्वतःच्या इच्छा अपेक्षा मारून तिच्यावर आईसारखीच माया केलेल्या बाबांसाठी देऊ लागली. हळू हळू तिचे आयुष्य एका पद्धतीत सेट झाले. आता बाबा आणि ती म्हणजे दोन छान मित्र होते. कोणतीही गोष्ट ती बाबांशी बोलू शकत होती आणि बाबा तिच्याशी. आईची उणीव बाबांनी भरून काढली होती. दिवस सरत होते ती मोठी होत होती आणि बाबा थकत चालले होते. आता तिचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी सुद्धा सुरु झाली होती. नातेवाईक, ओळखी-पाळखीचे आता तिच्या लग्नाबद्दल बाबांजवळ चौकशी करू लागले. बाबांनाही आता आपल्या मुलीला तिच्या सुखी संसारात नांदताना बघायचे वेध लागले. पण तिचा नकार ठाम होता. लहानपणी मुली धरतात तसा हट्ट तिने धरला, "मी बाबांना सोडून कुठेही जाणार नाही. लग्न तर मुळीच करणार नाही." बाबांनी आणि बाकीच्यांनी समजावयाचा खूप प्रयत्न केला पण सगळे व्यर्थ!


एकंदर परिस्थितीमुळे तिचा स्वभाव थोडा विक्षिप्त झाला होता. आपण आहोत तसेच छान आहोत आणखीन नसती नाती वाढवून घेण्यात काही अर्थ नाही असे तिला वाटायचे. कोणीही कोणाच्या आयुष्याला पुरत नसते. आईचे काय झाले? बाबा एकटेच पडले ना! या सगळ्यातून जाण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे असे तिला वाटायचे. पण बाबांनी तिचा हट्ट मोडून काढायचं ठरवले होते . त्यांना तिची काळजी लागून राहिली होती. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्यात सुद्धा ती म्हणावी तशी रमत नसे. तिला एकटे राहायला आवडत असे पण म्हणून आयुष्यभर एकटे राहणे योग्य नाही आणि काही असले तरी माझ्या डोळ्यादेखत ती सेटल झाली की माझी चिंता मिटली. तिचे जग माझ्याभोवती गुरफटून घेतलय तिने आणि ते तितकंच आहे किंवा तितकंच राहावे हे तिला वाटतंय पण असे नसते हे तिला कळायला हवे आता! या विचारांनी त्यांचे मन चिंता करीत असे.


आणि अखेर बाबांनी आपले म्हणणे खरे केले आणि काही अटी शर्तींवर ती एकदाची किमान मुले बघायला तरी तयार झाली. अर्धी लढाई बाबांनी जिंकली होती. त्यातल्या त्यात जे काही जवळचे म्हणण्यासारखे नातेवाईक होते त्यांना हि बातमी बाबांनी लगेच पोचती केली आणि सगळा महिला वर्ग आनंदाने त्यांच्या आवडत्या वरसंशोधनाच्या कामाला लागला. वर वर सगळं छान आहे असे ती दाखवत असली तरी लग्न न करण्याचा तिचा निर्णय पक्का होता. त्यासाठीच तिने कोणत्याही स्थळाला सर्वप्रथम तीच एकटी भेटेल अशी अट घातली होती. हा हा म्हणता सात आठ स्थळे बघून झालीसुद्धा! पण मुलीच्या सगळ्या गोष्टी अगदी उत्तम असताना देखील पहिल्याच भेटीत स्थळाचाच नकार यायला लागला, त्यामुळे एकही स्थळ घरापर्यंत पोहोचले नव्हते. ती जिंकण्याचा आनंद साजरा करत होती पण बाबा मात्र फारच खचायला लागले. इतकी गुणी पोर, हुशार, चांगली शिकून उत्तम पगाराची नोकरी करणारी, नाकी डोळी नुसती नीटस नव्हे तर सुंदर, गोरा रंग, बोलके डोळे, नाजूक बांधा आणि स्वभावाने शांत, मितभाषी पण आपले म्हणणे नीट मांडणारी अशी एकंदर व्यक्तीमत्व असलेली. तरीही प्रत्येक स्थळाने नकार का द्यावा? बाबांना काही केल्या याचे उत्तर मिळत नव्हते.


अशातच एक दिवस तो तिच्या आयुष्यात आला. उंच,देखणा,भरदार शरीरयष्टीचा, हसतमुख आणि प्रचंड बडबड्या, भरपूर मित्र मैत्रिणी आणि खूप मोठं कुटुंब असणारा. तिच्या बाबतीत असे कधीच झाले नव्हते पण तो तिला आवडला. का? कसा? तिलाही कळत नव्हते पण निदान त्याच्याशी गप्पा मारणे बोरिंग नसेल इतके वाटण्या इतपत तो आवडला होता. असं असलं तरी लग्न न करण्याच्या निर्णयावरून ती हलली नव्हती. त्यांची पहिली भेट तशीच झाली जशी तिला दरवेळी हवी असायची. तिने सांगितलेल्या हॉटेल मध्ये reserved टेबल वर तो तिची वाट बघत बसला होता. सांगितल्या वेळेपेक्षा अर्धा तास पुढे होऊन गेला होता तरी तिचा पत्ता नव्हता. पण हा पठ्या मस्त गाणी ऐकत कॉफी पित तिची वाट बघत होता. अशी वाट बघणे सुद्धा एन्जॉय करणाऱ्यांपैकी तो होता. ती बरोबर एक तास उशिराने आली. तीच तिची strategy होती. म्हणून सॉरी देखील न म्हणता सरळ "hi" म्हणून तिने जराशा परक्या स्वरातच बोलायला सुरुवात केली.


ती- Hi मी कस्तुरी देशपांडे ! 


तो - हॅलो मी साहिल अग्निहोत्री. (त्याच्या स्वभावाला अनुसरून) एक विचारू का? तुला यायला इतका उशीर का झाला? I mean is everything alright?


ती - (थोडीशी वैतागुनच) मला अपेक्षित होता हा प्रश्न! प्रत्येकाची mentality हीच आहे. पुरुष उशिरा आला तरी चालेल पण बाईने पुरुषाला वाट बघायला लावणे म्हणजे चूक , चूक कसली गुन्हाच.....पण मला हे मान्य नाही.....स्त्री-पुरुष समानता सगळे नुसते नावाला....


साहिल- (तिला हाताने थांबायची खूण करत) हॅलो हॅलो! तुझा काहीतरी major गैरसमज होतोय. तुझ्या वडिलांची तब्येत बरी नसल्याचे आई म्हणाली म्हणून मी विचारले, otherwise तू उशिरा आलीस म्हणून मी वैतागून तुला विचारायचे काही कारणच नाहीये. तू काही माझी बायको नाही आहेस (मिश्किल चेहऱ्याने) आणि बायको असतीस तरी मी काळाजीनेच विचारले असते. अजून एक, हे माझ्या बाबतीतही घडू शकले असते ना? मी उशिराने आलो असतो तर? So please हे सगळे सोड. कशाला उगाच यात पडायच? आपण ज्यासाठी भेटलोय त्याबाबत बोलूया. काय वाटते?


कस्तुरी त्याच्याकडे बघतच राहिली. हा अनुभव तिच्यासाठी नवीन होता. असे आत्तापर्यंत कोणताही मुलगा वागला नव्हता तिच्याशी. काही मुलगे निघून गेले होते ती येईपर्यंत न थांबता तर काही थांबले असले तरी ती त्यांच्याशी उर्मटपणे वागली होती म्हणून ते वैतागले होते. एकंदरीत सगळेच विस्कटत जाऊन तिला हवा असलेला नकार पक्का करून कस्तुरी आनंदाने घरी जात असे. पण साहिल जे वागला, बोलला त्यासाठी कस्तुरीकडे काही उत्तरच नव्हते.


कस्तुरी- (थोडीशी गडबडून) ओक्के, ठीक आहे. माझी सगळी माहिती तर तू वाचलीच असशील. तू काहीही विचारायच्या आधी माझ्या काही अटी आहेत त्या मला सांगायच्या आहेत. (तिचा नेहमीचा game तिने सुरु केला होता. तिच्या अटी मान्य नाहीत हे मुलाच्या चेहऱ्यावरच तिला कळायचे)


साहिल - अटी? सही आहेस तू! सांग सांग.


साहिल अगदी लहान मुलांसारखा उत्सुकतेने तिच्याकडे बघू लागला. तिला त्याचा स्वभावच काही कळत नव्हता. ती शांतपणे त्याच्याकडे बघत विचार करत होती. तो तिच्या उत्तराची वाट बघत होता.


कस्तुरी - (मनात) हा वेडा आहे का? हा पहिलाच असेल ज्याने कोणत्याही आठीशिवाय माझ्या अटी विचारल्या आहेत. पण अटी ऐकल्यावर हवाच गुल होणारे महाराजांची! तिच्या या विचारांवर तिचे तिलाच हसू आले.


आणि त्याला ती आवडली. त्याच्याच भाषेत सांगायचे तर ती click झाली! हसताना ती खूपच गोड दिसत होती. तो तिच्याकडे बघतच राहिला.


कस्तुरी- (हसणे थांबवून चेहरा compose करून) नंबर एक -मी लग्नानंतर बाबांना सोडून राहणार नाही. तुला माझ्यासोबत माझ्या घरी राहावे लागेल.


नंबर दोन - मला मुळातच लोकांच्यात राहायला फार आवडत नाही त्यामुळे लग्नानंतर प्रत्येक ठिकाणी मी तुझ्यासोबत किंवा तुझ्या घरच्यांसोबत आलेच पाहिजे असा हट्ट तू किंवा तुझ्या घरच्यांनी धरलेला मला चालणार नाही. 


नंबर तीन - मला लहान मुले आवडतात पण मला माझे स्वतःचे असे मूल नको आहे त्यामुळे याबाबत तुझ्या घरच्यांना तुला समजवावे लागेल. 


या तीनही अटी मान्य असतील तर आणि तरच पुढची बोलणी करायची माझी तयारी आहे. नाहीतर पुढे जाण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते.


तो काय उत्तर देईल हे कस्तुरीला आत्तापर्यंत भेटलेल्या मुलांवरून समजून चुकले होते पण यावेळी तिचा अंदाज खोटा ठरला, साहिल वेगळा होता.

साहिल- Oh my god! कसली सही आहेस तू! एकदम straight forward! (थेट तिच्या डोळयांत बघत) आवडलीस तू मला! मान्य आहे मला कि या अटी थोड्या अवास्तव आहेत पण त्या अटी आहेत, त्या कशाही असू शकतात. (हसत) माझ्या सोयीने असत्या तर त्यांना अटी म्हंटलेच नसतेस ना आपण! हे बघ कस्तुरी बाकीच्यांचे मला माहित नाही पण लग्नाबद्दलचे माझे विचार खूप वेगळे आहेत. मला लग्न करून फक्त एक टिपिकल बायको घरात आणायची नाही आहे जी माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या मागेपुढे करत बसेल आणि मला फक्त प्रेयसी सुद्धा नकोय जी माझ्या आकंठ प्रेमात बुडून गेलेली असेल. कुठलीही गोष्ट अति झाली की नको होतेच. मला एक छान मैत्रीण हवी आहे. जी मला प्रत्येक ठिकाणी साथ देईल, जिच्याशी मी आयुष्यातली कोणतीही गोष्ट न घाबरता, न लाजता, न विचार करता शेअर करू शकतो. जिच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. जी माझे काही चुकत असेल तर मला समजावेल, सांभाळेल. माझ्या घरच्यांबरोबर बाहेर नाही गेली तरी माझ्या घरच्यांची काळजी मी नसताना तरी नक्कीच घेईल. जिच्यावर मी माझे संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकले तरी कमीच असेल अशी एक मैत्रीण मला हवी आहे आणि अशी भन्नाट मैत्री मला मिळणार असेल तरच मी लग्न करणार आहे नाहीतर मी आहे तसा मस्तच आहे. बोल काय म्हणणे आहे यावर तुझे?


कस्तुरीला आता साहिलशी काय बोलावे ते सुचतच नव्हते. एकतर तो तिच्यावर नजर खिळवून होता. त्याच्या डोळ्यात भयंकर आत्मविश्वास जाणवत होता.तिचा मेंदू तिला "याचे काही ऐकू नकोस" असे सांगत होता पण मन मात्र त्याच्या नजरेत अडकून पडले होते. जणूकाही त्याची नजर तिला सांगत होती, "माझ्यावर विश्वास ठेवून तर बघ. सगळे काही नीट होईल." तिचे मन अस्वस्थ झाले.


पूर्वानुभवाप्रमाणे तिच्या या सगळ्या अटी ऐकल्यानंतर मुले टाटा बाय बाय करून गेलेली असत आणि कस्तुरी तिची आवडती कॉफी पिऊन या सगळ्याचं celebration करत बसलेली असे. पण साहिलने मात्र तिला या सगळ्याची संधी दिलीच नाही. ती काही बोलणार इतक्यात.....


साहिल- हा अजून एक, मला वाटते मला तुझ्या अटी मान्य करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण त्या आधी माझी एकच अट आहे ती म्हणजे होकार किंवा नकार ठरवण्यापेक्षा आपण एकमेकांचे मित्र होऊ शकतो का हे समजायला हवे आधी, त्यासाठी आपण किमान महिनाभर तरी सतत भेटूया, एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी, रुसवे फुगवे समजून घेऊया. नाही जमले तर आपल्याला कोणी सुळावर देणार नाहीये आणि मुख्य म्हणजे मलासुद्धा समजेल कि तुझ्या अटी मान्य करून त्या पूर्ण करण्याची क्षमता खरेच माझ्यात आहे की नाही. तुलाही समजेल कि माझ्या बरोबर तू आयुष्यभर राहू शकशील कि नाही. माझ्या घरी सुद्धा मी सरळ आपले बोलणे सांगून टाकेन, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल याची मला खात्री आहे. तुझ्या बाबांशी तू बोल. आता सांग कसा वाटला हा प्लॅन?

साहिल ने कस्तुरीची पार विकेट काढली होती. "आता हे काय नवीन? मी उगाच आले इथे असे तिला झाले होते. ती स्वतःच्याच प्लॅन मध्ये गुंतल्यासारखे तिला वाटायला लागले. याला अटी डायरेक्ट मान्य नसल्या तरी प्रॉब्लेम पण नाहीये काही असे म्हणतोय. म्हणजे नक्की काय समजायचे? हा म्हणतो तसे एक महिना भेटायचे का याला. स्वभावाने तरी बरा वाटतोय.मी इतके अतिरेकी वागत होते बोलताना पण जरा म्हणून त्रागा दिसला नाही याच्या चेहऱ्यावर उलट कौतुकाने सगळे ऐकत होता माझे. ठीक आहे बघूया बाबांशी बोलून, त्यांचा सल्ला घेऊन कळवेन आणि मग भेटेन याला." भेटेन या तिच्या निर्णयाचे तिलाच आश्चर्य वाटले. पण आत्ता तिला एका कॉफी ची नितांत गरज होती. साहिलच्या या बौन्सरमुळे तिचे डोके जड झाले होते.


ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर येऊन त्याला काही म्हणणार इतक्यात वेटरने तिच्या आवडत्या कॉफीचे दोन मग्स तिच्यासमोर आणून ठेवले. ते बघून तिचा चेहरा प्रसन्न झाला. आल्यापासून पोक्तपणे बोलणारी ती साहिलकडे बघून छानसं हसली आणि त्याला मनापासून थँक्स म्हणाली.


साहिल - का गं? थँक्स काय त्यात! कॉफी तर मागवलेय. हा फक्त मला आवडते ती मागवलेय. नेक्स्ट टाइम तुझ्या आवडीची मागवू. तू विचारात गढून गेली होतीस, म्हंटले उगाच डिस्टर्ब नको करायला. जरा कुठे भेटायचं ठरवत असशील तर कॅन्सल करायचीस. (असे म्हणून तो जोरात हसला.)


कस्तुरी - (त्याच्या हसण्यात थोडीशी सहभागी होत) इतके काही नाही आहे हा! पण गम्मत अशी आहे की तू माझ्या आवडीची कॉफी मागवली आहेस, त्यामुळे तुला शंभर मार्क्स! (इतके बोलली मात्र पण तिला हे कळत नव्हते की याच्याशी बोलताना आपल्याला इतके मोकळे कसे वाटतंय? इतका नाकझाडा आहे आपला स्वभाव, बाबा आणि एक दोन मैत्रिणी सोडल्या तर कोणी म्हणजे कोणी आवडत नाही आपल्याला मग हे काय?) 


असा विचार करत तिने गरम गरम कॉफी झटक्यात संपवली आणि ती जायला उठली.

साहिल - अरे वा! मग तर आपण भेटायलाच हवे कस्तुरी, कारण आपली पहिली आवड तर मिळती जुळती आहे. लग्न दुय्यम आहे गं पण मैत्री तर नक्कीच होईल आपल्यात मस्त, हो कि नाही? आणि काय ग, तुला कॉफी अशी गरमा गरमच आवडते कि आता मी पकवतोय म्हणून इथून निसटायला अशी प्यायलीस? (आणि तो मिश्किल हसला)


कस्तुरी - (मनात) कसा आहे हा? कित्ती बोलतो.दमत नाही का? वेडा आहे जरासा! सगळे त्याला कळते जसे काही, असा आव आणतो. (पण यावेळी तो तिला आवडला. निदान एक चांगला मित्र तर नक्कीच होईल तो याची तिला खात्री वाटली. तिचे आल्यापासूनचे वागणे आणि आत्ताचे वागणे यात फरक होता.)"बाबांशी बोलून तुला काय ते कळवते.

इतके बोलून ती निघाली.


घरी येऊन कधी एकदा बाबांना सांगतेय असे झाले होते तिला. बाबा तिची वाट बघत होते. फ्रेश झाल्यावर तिने त्या दोघांचे बोलणे बाबांना सांगितले. बाबांनाही त्याचा विचार पटला आणि साहिल-कस्तुरी भेटायला लागले.

साहिल प्रचंड बडबड्या असल्याने सुरुवातीचे काही दिवस कस्तुरी फक्त श्रोत्याची भूमिका बजावत होती. जरी साहिल तिला बोलते करायचा प्रयत्न करत असला तरी ठराविक बोलणे आणि हो नाही इतकेच काय ते तिचे त्यांच्या संभाषणातलं योगदान! पण त्याच्या गप्पा ऐकण्याचा तिला कधीच कंटाळा येत नसे. लग्न सोडून तो सगळ्या विषयांवर तिच्याशी भरभरून बोलत असे. त्याचे मित्र-मैत्रिणी, त्याने केलेले ट्रेक्स, त्याची फसलेली पाककृती, त्याची पेंटिंगची आवड, त्याच्या घरच्यांचे मजेशीर स्वभाव आणि बरेच काही! कस्तुरीसाठी हा एक वेगळाच अनुभव होता. आयुष्य इतके सोप्पे आणि मजेशीर सुद्धा असू शकते याची तिला कल्पनाच नव्हती.हळू हळू बाबांबरोबर साहिलसुद्धा तिच्या comfort zone मध्ये समाविष्ट होत होता. तिला साहिलची कंपनी आवडायला लागली होती. हळू हळू ती साहिलाशी बोलायला लागली, त्याच्याशी तिच्या गोष्टी शेअर करायला लागली. सुरुवातीला साहिल तिला, ज्याच्या आयुष्यात कसलीच अडचण नाही मज्जाच मज्जा आहे असा cool, मनमौजी वाटला होता पण हळू हळू तिला तो कळायला लागला. या अशा मस्तमगन साहिलच्या आत एक शांत, गंभीर आणि जबाबदार साहिल दडला होता. दिवस पुढे जात होते तसे साहिल आणि कस्तुरीचे नाते बदलत होते.या सगळ्यात एक महिना कसा संपला हे कस्तुरीला कळलेदेखील नाही.


आज सुद्धा ती नेहमीप्रमाणे त्यांच्या ठरलेल्या हॉटेलमध्ये reserved टेबलवर त्याची वाट बघत होती. मोस्टली साहिल तिच्या आधीच तिथे हजार असायचा पण काही महत्त्वाचे काम असेल तर तो तिला तसे कळवून थोडा उशिराने पोहोचत असे. आज साहिलने तिला तसे काहीच कळवले नव्हते आणि तो आलाही नव्हता. त्यामुळे कस्तुरीला जरा काळजी वाटली. तिने त्याला फोन लावला तर तोही switched off येत होता. रोजच्यापेक्षा एक तास पुढे निघून गेला तरी त्याचा काही पत्ता नव्हता. आता मात्र कस्तुरीची घालमेल सुरु झाली. "का आला नसेल हा अजून? काही urgent काम आले असेल का? पण तसे असते तर त्याने नेहमीसारखा फोन केलाच असता ना? कदाचित मीटिंग लांबली असेल म्हणून फोन करायला मिळाला नसेल, अरे पण एक मेसेज तर करायचा! एक तर मला भेटायचे म्हणून बाईक पण फास्ट चालवतो वेडा! मला कित्ती टेन्शन येतं! असे म्हंटले कि मलाच हसतो आणि म्हणतो 'ए वेडू टेन्शन काय घेतेस? तुला उशीर नको माझ्यामुळे म्हणून मी फास्ट येतो पण घाई करत नाही काही, डोन्ट वरी मी सेफ ड्राईव्ह करतो.' असे असले तरी भीती वाटतेच ना? नेहमी मी सोडून देते पण आज नाही! आज आला की चांगला कान पिळणारे मी त्याचा! मग कान पकडून सॉरी म्हणाला ना तरी ऐकणार नाही आहे. पण आहे कुठे हा?"


कस्तुरीला काय करावे सुचत नव्हते. बाबांना टेन्शन येईल म्हणून तिने त्यांनाही काही कळवले नव्हते. इतक्या वेळात शंभरदा तिने त्याला कॉल केला होता पण परिस्थिती बदलली नव्हती. त्यामुळे तिचे मन नको नको ते विचार करायला लागले. पुन्हा एकदा त्याचा फोन ट्राय करण्यासाठी तिने फोन हातात घेत असतानाच हॉटेलच्या दरवाज्यातून आत येत असलेला साहिल तिच्या नजरेस पडला. होती तशीच ती धावत त्याच्याजवळ गेली. तिला आजूबाजूचे भान राहिले नव्हते. साहिल काही रिऍक्ट होणार इतक्यात तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या नकळत टचकन एक टपोरा थेंब तिच्या गालावर ओघळला आणि मग साहिलचा शर्ट भिजेपर्यंत ती रडत राहिली. साहिल तिला घेऊन टेबलापाशी कधी आला हे तिला समजलेही नाही. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याने तिला शांत केले. बराचवेळ ती तशीच त्याला बिलगून होती. तो सुखरूप आहे आणि आपल्याजवळ आहे याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.

साहिल- ए वेडू, अगं रडतेस काय अशी? I am really sorry यार! अगं नेहमीच्याच वेळेत निघालो मी पण रस्त्यात बाईक पंक्चर झाली. ते सगळे सोपस्कार पार पाडावे लागले. उशीर व्हायला लागला, म्हणून तुला फोन करेन म्हंटले तर बॅटरी ड्रेन झाल्यामुळे फोन बंद झाला. बाकी कुठून फोन करेन म्हंटले तर नेमका तुझा नंबर मला पाठ नाही. सगळा गोंधळ झाला. पण आता no problem.


कस्तुरी - (भेदरलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत) खूप घाबरले होते मी. नको नको ते विचार येत होते डोक्यात! आपले माणूस गमावणे काय असते मला माहित्येय साहिल! आणि मला तुला गमवायचे नाही आहे. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. तुला काही झाले असते तर मी काय केले असते?

"पण असे काही झालेच नसते", असे म्हणत साहिलने तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला आणि तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला, "हा बघ! मी इथे तुझ्या समोर आहे आणि अगदी सुखरूप आहे. तू प्लिज शांत हो." असे ,म्हणत त्याने तिचे डोळे पुसले आणि वेटरला दोन कॉफीची ऑर्डर दिली. एव्हाना कस्तुरी सावरली होती. आपण कसे रिऍक्ट झालो हे जाणवून तिला थोडे ऑकवर्ड झाले. पण साहिलच्या ते गावातही नव्हते. तो अगदी शांत चेहऱ्याने तिच्या हातावर थोपटत स्नॅक्सची ऑर्डर देण्यासाठी मेनूकार्ड चाळत बसला होता. "मी फ्रेश होऊन येते" म्हणून इतकावेळ साहिलला चिकटून बसलेली ती झटकन उठली आणि गेली.


फ्रेशरूममध्ये आरशात स्वतःला बघताना तिला साहिलच्या मिठीतला तो क्षण आठवला आणि ती लाजली. त्याचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. त्या जाणिवेने तिचे हृदय धडधडायला लागले. "काय झाले होतं मला? त्याच्यापासून लांब जावे असे वाटतच नव्हते. काय वाटले असेल त्याला? कशी वेड्यासारखी वागले मी! खरेतर आजपर्यंत कोणाचीच इतकी काळजी वाटली नाही मला ! पण आज तो दिसेपर्यंत जीव टांगणीला लागला होता. का झाले असे? हल्ली असेच होते, त्याचा चुकून झालेला ओझरता स्पर्श सुध्दा माझ्या अंगावर शहारा आणतो. सतत तो बरोबर असावा असं वाटते, त्याच्याबरोबर खूप सेफ आणि शांत वाटते. का होते असे?" हजारो प्रश्न आणि धडधड चेहऱ्यावर घेऊन ती त्याच्या समोर येऊन बसली. त्याच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत होत नव्हती तिला. पण त्याच्याकडे बघत राहावेसे वाटत होते. त्याने खाण्याची ऑर्डर विचारण्यासाठी तिच्याकडे बघितले आणि तिने तिची नजर चोरली. असे दोन-तीन वेळा झाले. साहिलच्या ते लक्षात आले आणि तो तिच्याकडे रोखून बघू लागला. अलगद तिचा हात त्याने हातात घेतला. त्याची नजर तिच्यावरच खिळली होती. तिच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव त्याला बरेच काही सांगून गेले. तिने धाडस करून त्याच्याकडे बघितले आणि तिचा लाजरा चेहरा बघून तो हरखला. काय बोलावे हे दोघांनाही सुचत नव्हते. बराचवेळ दोघे फक्त डोळ्यांनी एकमेकांशी बोलत होते. आssपण साहिलच्या प्रेमात पडलोय यावर कस्तुरीचा विश्वास बसत नव्हता आणि साहिलसाठी तर हा अनपेक्षित धक्का होता. कस्तुरीला आपल्याबद्दल इतके काही वाटते हे त्याला आजच कळत होते. दोघेही एका वेगळ्याच विश्वात होते.......


इतके सगळे असले तरी साहिलला कस्तुरीच्या अटी लक्षात होत्या. त्यामागे तिचेे स्वतःचे असे एक योग्य कारण होते जे त्याला समजायला लागले होते. आत्ता तिला त्याच्याबद्दल जी ओढ वाटत होती ती नक्की मैत्री, प्रेम कि निव्वळ सहवास आहे म्हणून आहे, या सगळ्याचा तो मनात विचार करत होता. तिच्याशी या सगळ्या गोष्टींवर स्पष्टपणे पण तिला न दुखावता बोलणे फार गरजेचे होते. कोणत्याही गोष्टीचा आपल्याला हवा तसा अर्थ सोयीस्करपणे तो काढणार नव्हता.


उशीर झाल्याने साहिल कस्तुरीला घरी सोडून परत निघाला. याआधीही एक दोन वेळा त्याने तिला असे घरी ड्रॉप केले होते. दरवेळी त्याला बाय करून कस्तुरी घरी निघून जात असे पण आजची गोष्ट वेगळी होती. ती बाईकवरून उतरून साहिलच्या समोर उभी राहिली, घुटमळली. ती आता निघणार इतक्यात साहिलने तिचा हात आपल्या दोन्ही हातांच्या पकडीत घट्ट पकडला. कस्तुरीला काय करावे सुचत नव्हते, तिला हात सोडवून घ्यायचा होता पण त्याच वेळी त्याची आपल्या हातावरची पकड अधिकच घट्ट व्हावी असेहि वाटत होते. त्याच्या त्या स्पर्शाने ती सुखावत होती, खुुलत होती. साहिलला सुद्धा तिचा स्पर्श हवासा वाटत होता. लाजताना ती इतकी सुंदर दिसत होती की साहिलला स्वतःला भानावर आणावे लागत होते. कस्तुरीचे तर शब्दच संपले होते. ती त्याच्या बोलण्याची वाट बघत होती. त्यांचे हळुवार नाते फुलत असल्याची जाणीव दोघांनी होत होती. हीच वेळ आहे तिच्याशी बोलायची असे मनात म्हणत त्याने तिच्याशी बोलायला सुरुवात केली:


साहिल - कस्तुरी? (तिच्या डोळ्यात बघत तिच्या मनात काय चालू असेल याचा अंदाज घेत) एक विचारू? रागावणार नाहीस ना ?


कस्तुरी - (अजूनही चेहऱ्यावर लाजरे भाव तसेच असताना) हम्म !


साहिल - Are you sure about your decision? म्हणजे मी जे काही तुझ्या डोळ्यांत वाचतोय ते खरे आहे कि तो फक्त माझा समज आहे? तुला अजून वेळ हवा असेल तर I am ok with it. आत्ता कुठे आपली मैत्री सुरु झाली आहे आणि मैत्रीण म्हणून माझ्यासाठी दिवसेंदिवस तू खूप महत्वाची होत चालली आहेस. तुला समजतंय ना मला काय म्हणायचंय ते? (कस्तुरी फक्त गोड हसली) खरंतर स्थळ म्हणून मला तू पहिल्या दिवशीच आवडलीस पण माझे जे काही मत आहे लग्नाबद्दल ते तुला पटेल, रुचेल कि नाही याचा अंदाज नव्हता. मग विचार केला निदान तुला सांगून तर बघू आणि तेच केले. आणखी एक, तुझ्या कोणत्याही निर्णयाचा मी मनापासून आदर करेन. पण त्या आधी अजून काही गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत. तुला आणि मला आत्ता जे काही एकमेकांबद्दल वाटतंय ते फक्त सहवासातून निर्माण झालेले आकर्षण नाही आहे याबद्दल मला खात्री आहे. ही फक्त मैत्री नसून त्यापलीकडचे नाते आहे. मी तुझ्यात गुंतत चाललोय कस्तुरी आणि तू माझ्या आयुष्यात नसणे मी सहन करू शकत नाही. तुझे आजचे वागणे मला जाणवले नसते तर मी कदाचित तुला हे कधीच सांगितले नसते. मी माझ्या मनाची तयारी केली होती. पण आता मात्र तुला सगळे माहिती असायला हवे. अजूनही माझे तेच म्हणणे आहे कि मी तुझ्या निर्णयाला आनंदाने हो म्हणेन. फक्त तू तुझा निर्णय विचारपूर्वक घे. आणि हो! आता राहिल्या तुझ्या अटी! यावर मी आधीच आई-बाबांशी घरी बोललो आहे , तू त्याची काळजी अजिबात करू नकोस. तुझ्या सगळ्या अटी पूर्ण करायची जबाबदारी माझी! आणि निव्वळ मी तुझ्या अटी पूर्ण करणार आहे म्हणून लग्नाला तू हो म्हणावसं असे मी अजिबात म्हणणार नाही. (कस्तुरी आश्चर्याने त्याचे म्हणणे ऐकत होती) आता घरी जा. बाबा वाट बघत असतील, उद्या बोलू,


इतके सांगून साहिल तिथून निघाला. कस्तुरी बराचवेळ तो गेला त्या वाटेकडे पाहत उभी होती. साहिलने पुन्हा एकदा तिचे मन जिंकले होते. तिने काही न बोलतादेखील सगळ्या परिस्थितीचं तारतम्य राखून त्याने तिला, त्याचे मत आणि विचार जाणीवपूर्वक सांगितले होते. तो साहिलच होता ज्याच्याबरोबर ती तिचे सगळे आयुष्य जगू शकली असती. तिचा निर्णय झाला होता.


दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने बाबांना तिचा निर्णय सांगितला. बाबांनाही ख्यप आनंद झाला. साहिलच्या आई-वडिलांशी बोलून त्यांनी लग्नाचा दिवस पक्का केला आणि शुभवेळी शुभमुहूर्तावर साहिल-कस्तुरी लग्नबंधनात अडकले.


कस्तुरीची पहिली अट पूर्ण करण्यासाठी साहिलने लग्नानंतर सहा महिन्याचा वेळ मागितला होता. जरी कस्तुरीचे साहिलवर प्रेम होते तरी अजून तिला प्रेमाची व्याख्या पूर्णपणे कळली नव्हती. नात्यातले प्रेम हे सुद्धा तितकंच महत्वाचे आणि जिव्हाळ्याचे असते याची तिला कल्पनाच नव्हती. सहा महिने तिला जरा जास्त वाटले होते पण साहिलसाठी ती तयार झाली. साहिलचे आई-अप्पा खूपच प्रेमळ होते. कस्तुरी म्हणजे त्यांची मुलगीच होती जणू! साहिलची आई तर घरातल्या सगळ्या गोष्टीत कस्तुरीला सहभागी करून घेत असे. जसे साहिलच्या आवडी-निवडीला घरात महत्व होते तसे ते कस्तुरीच्यादेखील होते. जितकी माया साहिलवर त्याच्या दुप्पट माया कस्तूरीवर करायची साहिलची आई! या सगळ्या गोष्टींमुळे कस्तुरीचे त्रयस्थ वागणे बदलायला लागले होते. तिला सासू-सासऱ्यांबद्दल भयंकर आदर आणि कौतुक वाटायला लागले होते. सहा महिन्यात साहिलची आई आणि कस्तुरी या दोघींचे नाते फक्त सासू-सुनेचे राहिले नव्हते तर त्या दोघी छान मैत्रिणी झाल्या होत्या. अप्पा तर अगदी तिच्या बाबांसारखेच होते भयंकर प्रेमळ! बरेचदा अप्पा तिला तिच्या बाबांकडे स्वतः सोडून येत असत. कस्तुरी खूप खुश होती. कुटुंब खूप मोठे असले तरी आटोपशीर होते.कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी सगळे एकत्र जमून मज्जा करत असत बाकी वेळी सगळे आपापल्या विश्वात. पण गरज पडली की पुन्हा सगळे एकत्र. घरात साहिल सगळ्यांचा भयंकर लाडका होता. मुलगा, नातू, भाऊ, काका, मामा अशी सगळी नाती तो सुंदर पार पाडत होता. त्यांचे मैत्रीचे नाते तर त्याने फुलासारखे जपले होते. इतकी सगळी नाती तिला कधी नव्हतीच त्यामुळे तिला साहिलचे खूप आश्चर्य वाटायचे. बरे इतके सगळे असूनही कधीच साहिलने किंवा त्याच्या आई-बाबानी कस्तुरीला कुठेही येण्याची, कोणताही कार्यक्रम अटेंड करण्याची जबरदस्ती केली नाही. तिच्या अटी संभाळूनसुद्धा त्यांनी तिच्यावर प्रेम करण्यात कसलीच कसूर केली नव्हती. त्यांच्या या अशा वागण्यामुळे कस्तुरीचा स्वभाव बदलू लागला. हळू हळू ती स्वतःच सगळ्या ठिकाणी सहभागी होऊ लागली. जितकी जपणूक, आपुलकी तिला मिळत होती तितकीच परत द्यायची ती मनापासून प्रयत्न करू लागली आणि हे सगळे करताना तिला कसलाही त्रास होत नव्हता उलट आनंदच होत होता.


त्यादिवशी कस्तुरी घरीच होती. आई-अप्पा कुठेतरी बाहेर गेले होते. मीटिंग लवकर संपल्यामुळे साहिलदेखील लवकर घरी आला. त्याच्या जवळच्या चावीने त्याने दार उघडले तेव्हा हॉलमध्ये पुस्तक वाचता वाचता झोपी गेलेली कस्तुरी त्याला दिसली. गोड हसत तिच्याजवळ जाऊन त्याने तिच्या हातातले पुस्तक बाजूला ठेवले आणि तिच्या कपाळाला अलगद त्याचे ओठ टेकवले आणि हळूच पुटपुटला "Love you." तिला त्रास होऊ नये म्हणून हळूच तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. खरंतर कस्तुरी तेव्हाच जागी झाली होती जेव्हा तिला चावीने दार उघडल्याचा आवाज आला, साहिल येणार हे तिला माहित होते पण गम्मत म्हणून तिने झोपायचे नाटक केले. पण साहिल जे वागला त्याने ती डिस्टर्ब झाली. कधी कधी साहिलचे तिच्यात हे असे गुंतणे तिला आवडत असले तरी त्रास देऊन जात असे. तो जरी वर वर "ऑल वेल" दाखवत असला आणि तिची अट सांभाळत असला तरी तिला कळत होते कि त्याचे तिच्यावर नितांत प्रेम आहे आणि नवरा-बायको म्हणून त्यांचा एकमेकांवर अधिकार आहे, जो तो कधीच बजावत नाही. एखाद्या फुलासारखे तिचे मन तो जपत आला होता. त्याने त्याचे शब्द पाळले होते. तिचेही त्याच्यावर प्रेम होते पण नवरा-बायकोचे जे नातं असायला हवे ते त्यांच्यात नव्हते rather कस्तुरीच्या अटीप्रमाणे तिलाच ते नको होते आणि साहिल तिचा मान राखत होता. कितीतरी मोहाचे क्षण त्याने टाळले होते आणि कस्तुरीलाही ते समजत होते. सगळे कळत असूनही काही वळत नव्हते. साहिलने दोघांसाठी गरम गरम कॉफी आणून तिच्यापुढे ठेवली आणि तिची विचारांची तंद्री भंगली. कॉफी पिता पिता दोघांच्या गप्पा चालू झाल्या:


कस्तुरी- साहिल इतक्या सगळ्यांना खुश ठेवणे कसे जमते रे तुला? मला तर खूप टेन्शन येते! काही चुकले तर? कोणी दुखावले गेले तर असे वाटते! तशी सगळी छानच आहेत रे, आई अप्पा तर ग्रेट आहेत, पण मग भीती वाटते की.....


साहिल - मला कळतंय तुला काय म्हणायचं ते! अगं पण कसे आहे ना आपले मानले एखाद्याला कि सगळे जमते, प्रेम सगळं शिकवते. आता तुझेच बघ, कित्ती रमलीस तू इथे, सहा महिने कसे संपले कळले का तुला? नाही ना?


कस्तुरी - तेही खरंच आहे. पण मग मला ना कळत नाही रे साहिल कि कसे वागावे? माझ्यामुळे तुमच्यात कसली अढी नको आहे मला. आता हेच बघ आपण जर का बाबांकडे राहायला जाणार आहोत तर आई -अप्पा नाही म्हंटले तरी दुखावले जातील ना? म्हणजे मान्य आहे कि तू त्यांना आधीच या सगळ्याची कल्पना दिली आहेस पण अटी मी घातल्या आहेत ना त्यात त्यांचा दोष काय आहे? मी ना खूप विचार केला यावर पण मग बाबा सुद्धा एकटे आहेत ना रे? त्यांना माझी गरज आहे. मग असे वाटते की इथे सुद्धा आई-अप्पांना तुझी गरज आहेच कि? कसे करायचे रे साहिल? (स्वतःवरच वैतागून) मला कोणालाच दुखवायचे नाही आहे पण भीती वाटते कि काहीतरी गडबड नक्कीच होईल माझ्याकडून! पूर्वीची गोष्ट असती तर मी बिनधास्त बाबांचा विचार करून निर्णय घेतला असता पण आता कितीही म्हंटले तरी आपला सगळ्यांचा विचार येतोच मनात. तुला पण माझ्यामुळे खूप अड्जस्ट करावे लागते ना? कशाचेच सुख नाही तुला. मी उगाच आले का रे तुमच्यात? तू कित्ती सुखी होतास एकटाच असे वाटते मग कधी कधी! तुम्ही सगळे काहीच बोलत नाही पण शेवटी वाटतेच ना?


(साहिलला तिच्यातला बदल जाणवत होता. ती आता फक्त तिचा किंवा बाबांचा विचार करत नव्हती , सगळ्यांचा विचार करत होती. कस्तुरीचा जो स्वभाव त्याला अपेक्षित होता तो त्याला आता दिसत होता. ती मनाने वाईट नाही याची त्याला खात्री होती. परिस्थितीमुळे तिचा स्वभाव विचित्र बनला होता. तिच्यापरीने ती सगळ्यांना आनंदात ठेवायचा मनापासून प्रयत्न करत होती हे साहिलच्या कधीच लक्षात आले होते) 


तिच्या जवळ जात तिच्या डोळ्यात बघत साहिल तिला म्हणाला "तू मला माझ्या आयुष्यात हवी होतीस कारण मला तू आवडलीस, आपली वाटलीस पण त्याचा अर्थ असा नाही ना कि मी फक्त माझाच विचार करायचा. तू एक अख्खी वेगळी व्यक्ती आहेस आणि तुला तुझी मत, निर्णय, भावना आहेत, त्याचा मी चुराडा करू शकत नाही आणि तुही केलेसच ना माझ्यासाठी अड्जस्ट. तुझी एक तरी अट मी अजून पूर्ण केली आहे का? नाही ना तरीसुद्धा तू फक्त माझ्यासाठी सहा महिने बाबाना सोडून इथे राहते आहेस ना? Then I have to respect your courage!" हे सांगताना आपसूकच त्याचा हात तिच्या गालावर स्थिरावला आणि तो तिच्या डोळ्यात बघत राहिला. त्याला तिला जवळ घ्यायचे होते. त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे हे सांगायचे होते. शारीरिक सुख हे सगळे नाही आहे त्याच्यासाठी, तिच्याबाबरोबर असताना तो मानसिकरीत्या सुखी असतो हे सांगायचे होते, पण त्याला असे काहीही बोलायचे, वागायचे नव्हते ज्याने ती त्याच्यापासून दूर गेली असती म्हणून तर त्याने या नात्याला मैत्रीच्या बंधनात ठेवले होते त्यामुळे स्वतःला भानावर आणत तो तिच्यापासून लांब जाऊन खिडकीबाहेर बघत उभा राहिला.


तो जरी काही बोलत नसला तरी त्याचा स्पर्श तिला सगळे सांगून गेला होता. कस्तुरीला त्याची हि अवस्था समजत होती पण कसे वागावे हेच कळत नव्हते. एकदा तिला वाटले सगळे सोडून त्याच्या कुशीत शिरावे आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा पण तिची बुद्धी तिला साथ देत नव्हती. असे प्रसंग हल्ली त्यांच्यात वारंवार होऊ लागले होते. दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड ओढ होती पण भावनिक गुंतागुंतच इतकी झाली होती कि त्याचा उपाय कसा करावा हे दोघांनाही कळत नव्हते.


थोड्या वेळाने साहिल तिच्याजवळ येऊन बसला. आता तो अगदी रिलॅक्स दिसत होता. त्याने कसलेसे पेपर्स तिच्यापुढे धरले आणि तिला म्हणाला, "शिफ्टिंगची तयारी करा मॅडम! आपण पुढच्या आठ दिवसात दुसरीकडे राहायला जातोय." कस्तुरीला काही कळेचना! तिने ते पेपर्स चेक केले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्याच बाबांच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्याच मजल्यावरची एक रूम साहिलने विकत घेतली होती. म्हंटल्याप्रमाणे सहा महिन्यात साहिलने कस्तुरीची पहिली अट पूर्ण केली होती. पण तिला यात आनंद मानायचा कि दुःख हेच समजत नव्हते.


कस्तुरी - (पाणावलेल्या डोळ्यांनी) तू.... तू माझ्यासाठी...पण आई-बाबा इथे एकटेच....साहिल हे बरोबर आहे का? तू आई-बाबांपासून लांब राहणार तेही माझ्यामुळे....नको साहिल...मी चुकले...माझ्या या मुर्खासारख्या अटीमुळे मी घर तोडतेय असे वाटतंय मला....आधीच तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप करताय. आईना काय उत्तर देऊ मी? कित्ती वाईट वाटेल त्यांना? नको प्लिज, मला अजून लाजवू.....


साहिल -(तिची हि अशी रिऍक्शन बघून तो खो खो हसत सुटला) अगं हो हो! जरा दम तर घे. एक तर तू वेडी आहेस. स्वतःला हवा तसा विचार करून स्वतःला दोष देऊन मोकळी होतेस. तुला कोणी सांगितले कि आपण आई-अप्पांना सोडून तिकडे जाणार आहोत. आपण सगळे शिफ्ट होतोय एकत्र राहण्यासाठी! म्हणजे आपल्या दोघांनाही तुझे बाबा आणि माझे आई-बाबा यांच्या जवळ राहून त्यांची काळजी घेता येईल.


कस्तुरीने साहिलला घट्ट मिठी मारली. आयुष्य खुप सोप्या पद्धतीने जगता येत याची जाणीव तिला पुन्हा एकदा साहिलने करून दिली.


ठरल्याप्रमाणे साहिल-कस्तुरी आई-अप्पांबरोबर कस्तुरीच्या जुन्या घराजवळ शिफ्ट झाले. कस्तुरीचे बाबा पण खूप खुश होते. आता तर कस्तुरीला स्वर्ग दोन बोटे उरला होता. तिची सगळी आवडीची माणसे तिच्या आजूबाजूला होती आणि तिला सगळ्यांबरोबर राहता येणार होते. त्यांची काळजी घेता येणार होती......

आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. गेला महिनाभर ती या दिवसाची आतुरतेने वाट बघत होती. याच दिवशी तिने तिच्या नवीन घराची वास्तुशांत देखील करून घ्यायचे ठरवले होते. आई-अप्पांनी तिच्या या निर्णयाचे स्वागतच केले. साहिलचे आणि तिचे सगळे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी या सर्वाना तिने स्वतःहून अगत्याचे आमंत्रण दिले होते. साहिलला या सगळ्याचे खूप कौतुक वाटत होते. कस्तुरी आयुष्य जगायला शिकत होती आणि या सगळ्याला साहिल निमित्त झाला होता याचे त्याला समाधान होते.


दिवसभर कस्तुरीची खूप धावपळ झाली होती. साहिलच्या आईची दमणूक होऊ नये म्हणून तिने स्वतःहून सगळ्या गोष्टींची काळजी घेतली होती. इतकी धावपळ होऊनही ती मनाने उत्साही आणि समाधानी होती. रात्री सगळे आवरून ती त्यांच्या बेडरूम मध्ये गेली. साहिल पुस्तक वाचत बसला होता. ती त्याच्या जवळ येऊन बसली. त्याने पुस्तक बाजूला ठेवले आणि तिच्याकडे बघत म्हणाला, "थँक्स कस्तुरी. आजचा प्रोग्रॅम खूपच सुंदर झाला. तू खरेच खूप छान अरेंज केले होतंस सगळे! सगळेच कौतुक करत होते तुझे. मुख्य म्हणजे तू हे सगळे स्वतःच्या मनाने ठरवून केलेस याचा मला जास्त आनंद आहे...... मला माहित नाही तुला हे आवडेल का पण खूप दिवसापासून तुझ्यासाठी एक साडी घ्यायची होती मला. आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, भले आपले नातं नवरा-बायकोसारखे नसले तरी प्रेमाचे तर नक्कीच आहे, म्हणून तुझ्यासाठी हे गिफ्ट - Happy Wedding Anniversary" असे म्हणत त्याने उशीमागून एक सुंदर डेकोरेट केलेला बॉक्स तिच्या हातात दिला. कस्तुरीने तो उत्सुकतेने त्याच्या हातातून घेतला आणि झटकन उघडला. त्यात एक लाल रंगाची गोल्डन बॉर्डर असलेली शिफॉनची सुंदर साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लॉऊज होता. कस्तुरी साहिलकडे बघून समाधानाने हसली. "हा रंग तुला खूप खुलून दिसेल असे मला वाटले म्हणून मी आणला, तुला आवडली नसेल तर आपण बदलून घेऊ." टिपिकल नवऱ्यासारखे बोलत होता तो! "नाही रे खूप छान आहे, थँक्स. तू पण खूप दमला आहेस ना जरा आडवा हो तोवर मी एक काम राहिलंय ते करून आलेच" इतके म्हणून कस्तुरी तिथून गेली. थोडावेळ साहिलने तिची वाट बघितली पण शेवटी दिवसभराच्या धावपळीमुळे त्याला झोप लागली.


जरावेळाने त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली. सुरुवातीला त्याला काही कळलेच नाही पण मग लक्षात आले कि तो कोणाच्यातरी बांगड्यांचा आवाज होता. अर्धवट झोपेमुळे त्याला आजूबाजूचे काही कळत नव्हते. डोळे चोळतच तो बेडवर उठून बसला. आजूबाजूला बघितले तर सगळे बेडरूम छोट्या छोट्या दिव्यांच्या ज्योतींनी उजळून निघाले होते. रूमच्या मध्यभागी टीपॉय ठेऊन त्यावर एक सुंदर आणि मोठा केक ठेवला होता. त्या केक वर "Happy First Anniversary Sweetheart" असे लिहिले होते आणि त्यावर एक मेणबत्ती लावली होती. साहिल त्याकडे हरवल्यासारखा बघतच राहिला. त्याच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती. कस्तुरी त्याला असे काही सरप्राईज देईल याचा त्याने विचारसुद्धा केला नव्हता. "कस्तुरी! पण ती आहे कुठे?" 


आता त्याचे लक्ष चहूकडे गेले. बेडरूमच्या बाल्कनीत कस्तुरी बाहेर बघत उभी होती, त्याने दिलेली साडी नेसून, हिरवा चुडा भरून! तो शांतपणे तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. लाल साडी, गळ्यात मंगळसूत्र, हिरवा चुडा, मोकळे सोडलेले सुंदर लांब केस, चेहऱ्यावर अगदी हलकासा मेकअप यामुळे ती इतकी सुंदर दिसत होती कि त्याला काही सुचत नव्हते. तिला बघत राहावेसे वाटत होते. हजारदा बजावून सुद्धा मन त्याच्या ताब्यात राहत नव्हते. इतकी सुंदर ती यापूर्वी कधीच दिसली नव्हती. तिने वळून थेट त्याच्या डोळ्यांत बघितले आणि तो संपला. त्याला कळतच नव्हते काय होतंय ते! ती जसजशी जवळ येत होती त्याच्या छातीचे ठोके वाढत होते. एरव्ही तिच्याशी तास-तास गप्पा मारणारा तो आज त्याला बोलायला शब्द सुचत नव्हते. तरीसुद्धा तो काही बोलणार तोच कस्तुरीने तिचा हात त्याच्या ओठांवर ठेवला आणि तो शहारला. त्याला तिची प्रत्येक हालचाल जाणवेल इतकी त्याच्या जवळ येत ती त्याला म्हणाली, शsss....एक क्षण शांततेत गेला आणि त्याच्या डोळ्यांत बघत ती म्हणाली "I Love You Sahil, I Love You a lot. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, तुझ्या प्रेमाशिवाय, प्रेम काय असते ते तू मला शिकवलंस नाहीतर मी अशीच राहिले असते. माझ्या त्या सगळ्या अटी हा माझा निव्वळ मूर्खपणा होता. I am really sorry. माझ्या मुर्खपणामुळे मी आधीच खूप वेळ घालवला आहे पण आता नाही. मला तुझ्यासोबत माझे अख्खे आयुष्य तुझी पत्नी म्हणून जगायला आवडेल. तुला समजतंय ना मला काय म्हणायचंय?" तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत मानेनेच हो म्हणाला. कस्तुरीने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि आपले नाजूक ओठ अलगद त्याच्या ओठांवर टेकवले. असंख्य ठिणग्या त्याच्या शरीरात पेटल्या. त्याच्या घट्ट मिठीत कस्तुरीला जास्तच सुरक्षितता जाणवली. या क्षणाची तो गेले कित्येक दिवस वाट बघत होता. त्याने समाधानाने डोळे मिटले.

आधीच सुंदर असलेलं कस्तुरी आणि साहिलचं नातं आता अजूनच भक्कम झाले होते. एका नव्या नात्याचे खऱ्या अर्थाने Celebration सुरु झाले होते......


Rate this content
Log in

More marathi story from Kalpita Pandit Patki

Similar marathi story from Romance