यथा राजा...
यथा राजा...
आटपाट नगरातील दरबारात एक कवी उभा राहिला. दरबार गच्च भरलेला होता. लोक त्याला ऐकायला उत्सुक होते. स्वतः राजालाही त्याच्या कविता ऐकायच्या होत्या. फार दिवसापासून तो त्याची स्तुती ऐकत होता, म्हणून त्याने या कवीला पाचारण केले होते. कवी म्हणाला, "राजन तुम्ही मला काय बक्षीस देणार?"राजा म्हणाला, "अरे मला कविता आवडली तर सुवर्णकंठा देईन."कवी म्हणाला, "मला सुवर्ण कंठा नको. मला १५ आणे बक्षीस हवे." राजा म्हणाला, "तू म्हणतोस तर ठीक आहे. १५ आणे तर १५ आणे बक्षीस देईन. पण मला कविता आवडली तर! आता तुला कविता वाचायला हरकत नाही." कवीने आपले चोपडी सावरली. घसा खाकरला आणि कविता वाचायला उभा राहिला. "जो कोतवाल भ्रष्ट त्याचा शिपाई भ्रष्ट जो शिपाई भ्रष्ट त्याचा कारकून भ्रष्ट जो कारकून भ्रष्ट त्याचा अधिकारी भ्रष्ट जो अधिकारी भ्रष्ट त्याचा प्रधानमंत्री भ्रष्ट आणि जिथे प्रधानमंत्री भ्रष्ट तिथे या सर्व व्यवस्थेवर अंकुश ठेवणारे सत्ताधारी भ्रष्ट हेच अंतिम सत्य."दरबारात आलेल्या त्या साहित्यिकाने कवितावाचन केले आणि राजा चाट पडला. तो म्हटला, "हा प्रत्यक्ष माझ्यावरतीच आरोप आहे. फक्त आरोप करू नकोस सिद्ध करून दाखव."साहित्यिक म्हणाला, "ठीक आहे. दाखवतो. तुमच्या शिपायाला बोलवा."राजाने द्वारपालाला सांगून शिपायाला बोलवले. साहित्यिकाने शिपायाला विचारले, "बाबारे, महाराजांनी घातलेला नियम मोडून मी आज सकाळी राजबागेतील एक गुलाबाचे फूल तोडून घेतले तेव्हा तू काय केलेस?"तो शिपाई म्हणाला, "तुम्ही गुन्हा केला म्हणून मी तुम्हाला दंड केला."साहित्यिक म्हणाला, "ठीक आहे. माझ्याकडून किती दंड वसूल केला? ते खरे खरे सांगावे." सुरुवातीला तो शिपाई कुरकुरत होता, 5पण राजाने दटावल्यानंतर त्याने कबूल केले आणि म्हणाला की, "हे खरे आहे. या माणसाकडून सोळा आणे दंड वसूल केला आहे. परंतु ते सगळे सोळा आणे माझ्याकडे नाहीत. त्यातला फक्त एक आणा माझ्याकडे आहे बाकीचे १५ आणे मी कारकुनाकडे दिले आहेत."राजा म्हणाला, "ठीक आहे. आता काय करायचे." साहित्यिक म्हणाला, "कारकुनाला बोलवा."त्यानंतर शिपायाने कारकुनाला बोलावून आणले. कारकुनाला राजाने विचारले, "बाबारे, हा साहित्यिक दरबारात येत असताना त्याने राजबागेतील गुलाबाचे फूल तोडले म्हणून त्याला शिपायाने १६ आणे दंड केला आहे आणि तो वसूल करण्यात आला आहे, पण शिपाई म्हणतो त्यातील एकच आणा त्याच्याकडे आहे बाकीचे पैसे कुठे आहेत?"कारकून म्हणाला, "गोष्ट खरी आहे. १६ आणे वसूल केले असले तरी त्यातला एक आणा शिपायाकडे आहे. बाकीचे पंधरा आणे माझ्याकडे दिले होते. त्या १५ आण्यातील दोन आणे मी ठेवून घेतले आणि उरलेले १३ आणे अधिकाऱ्याकडे दिलेले आहेत."राजाने त्या कारकुनास अधिकाऱ्याला बोलवायला सांगितले. कारकुनाने अधिकाऱ्याला बोलावून आणले. राजाने अधिकाऱ्याला विचारले, "कारभारी, या साहित्यिकाने राजबागेतील गुलाबाचे फूल तोडले म्हणून शिपायाने १६ आणे दंड केला आहे. ते पैसे तुमच्याकडे आले आहेत का?"तो बोलण्यास चाचरत होता, पण महाराजांनी दरडावल्यावर पोपटासारखा बोलू लागला आणि म्हणाला, "घेतले असतील पण माझ्यापर्यंत फक्त १३ आणे आले. त्यातले चार आणि ठेवून घेऊन उरलेले ९ आणे मी प्रधानजींकडे दिलेले आहेत. विचारा त्यांना." राजा म्हणाला प्रधानजींना बोलवा. त्या अधिकाऱ्याने प्रधानजींना बोलावले. राजाने प्रधानजीला विचारले, "का हो! आपल्या राज्यात राजाचा हुकूम कोणी मोडला तर त्याला किती दंड केला जातो."महाराजांच्या बायकोचा भाऊच प्रधान होता. तो म्हणाला, "अर्थातच नियमाप्रमाणे एक आणा दंड आकारला जातो. आज सकाळी एका इसमाने राज बागेतील एक गुलाबाचे फूल तोडले म्हणून एक आणा दंड केला आहे आणि तो मी राजकोषात जमा केला आहे."अहो प्रधानजी पण हा एक साहित्यिक आहे तो म्हणतो की त्याच्याकडून १६ आणे दंड वसूल केला आहे. जे काय खरे खरे असेल ते कथन करा. लपवाछपवी अजिबात करू नका. कोणाची गय केली जाणार नाही." महाराजांच्या या दटावणीने प्रधानजी थोडासा चपापला आणि बोलता झाला, "महाराज १६ आण्याचे मला काय माहीत नाही. परंतु अधिकाऱ्याने मला नऊ आणे आणून दिले होते मी त्यातील आठ आणे काढून घेतले आणि एक आणा दंड म्हणून राजकोषात जमा केला." महाराज म्हणाले, "पण आपल्याकडून १६ आणे वसूल केले गेले असा त्याचा आरोप आहे. त्यात काही तथ्य आहे का?"प्रधानमंत्री म्हणाला, "असेल... पण माझ्यापर्यंत फक्त नऊच आणि आलेले आहेत."राजा प्रधानाला म्हणाला, "अरे! मी तर दंड किंवा मदत म्हणून केवळ एका व्यक्तीकडून एक आणाच वसूल करायला परवानगी दिलेली आहे. मग हे कसे काय घडले. तुमच्याकडे आलेल्या नऊ आण्यातील एक आणा राजकोषात जमा करून आठ आणे आपल्याकडे का ठेवले? याचा त्वरित खुलासा करा नाहीतर तुम्ही सर्वजण म्हणजे शिपाई, कारकून, अधिकारी व तुम्ही दंडासस पात्र व्हाल."प्रधानजीने तोंड उघडले. ते म्हणाले, "महाराज, तुम्ही म्हणता ते ठीक आहे. दंड एक आणा किंवा मदत एक आणा वसूल करा परंतु महाराणीसाहेब दररोज बाजारात व सराफ कट्ट्यावर जात असताना त्यांचा होणारा खर्च मला करावा लागतो. तो नाही केला तर प्रधानजी पदावरून हाकलून देण्याची धमकी त्या मला देतात. त्यासाठी मी नऊ आणे दंड वसूल करून द्या असे अधिकाऱ्याला सांगितले आहे. नऊ आणे दंड जमा झाला की, मी त्यातील एक आणा रितसर राजकोषात भरतो व उरलेले आठ आणे महाराणीसाहेबांचे शौक पूर्ण करण्यासाठी खर्च करतो. त्यामुळे दंडही वसूल होतो आणि माझी प्रधानपदाची नोकरीही टिकते."त्यानंतर महाराजांनी अधिकाऱ्याकडे मोर्चा वळवला आणि त्याला म्हणाले, "बाबारे तू चार आणे कशासाठी ठेवून घेतलेस? का ठेवून घेतलेस?" त्यावर अधिकारी म्हणाला, "महाराज, माझा पगार तर तुम्हाला माहीत आहेच. पण प्रत्येक महिन्याला माझी बदली करतो असे सांगून प्रधानजी काही रक्कम मागून घेतात. ती रक्कम मी पगारातून देऊ शकत नाही आणि इच्छितही नाही. मग कुठून द्यावे हे पैसे? त्यासाठी युक्ती सुचली म्हणून प्रधानजींनी सांगितलेल्या नऊ आण्यांऐवजी मी तेरा आणे दंड वसूल करायला कारकुनाला सांगतो व त्यातील चार आणे माझ्याकडे ठेवून घेतो. माझे वर्तन गैर असेल तर मला शिक्षा व्हावी."यानंतर महाराजांनी कारकुनाला विचारले, "बाबारे, अधिकाऱ्याने सांगितलेल्या १३ आण्यांऐवजी १५ आणे दंडवत वसुली तू का सांगतोस?"कारकून म्हणाला, "महाराज, तुम्ही प्रधानजीसह प्रत्येक महिन्याला राज्याचा हालहवाल बघण्यासाठी दौरे करत असता त्यावेळी होणारा खर्च मी करावा असे प्रधानजी सांगतात. माझ्या पगारात माझे घरचे कसेबसे भागते. मग तुमच्या दौऱ्याचा खर्च करण्यासाठी म्हणून मी माझे दोन आणे दंडात वाढवायला सांगत असतो."शेवटी महाराजांनी शिपायाला विचारले, "बाबारे, मग तू १५ आणे दंड वसूल करण्याऐवजी एक आणा वाढवून दंड वसुली का करतोस?"शिपाई म्हणाला, "महाराज, हे प्रधानजी माझ्या गल्लीतच राहतात. त्यांची बायका-मुले नेहमी ऐश करत असतात. ते बघून माझ्या बायकोलाही थोडीफार हौस मौज करावी वाटते. ती करता यावी तसेच मलाही मित्रांच्या संगतीने काही सवयी लागल्या आहेत, त्या पूर्ण करता याव्यात म्हणून मी प्रत्येक वेळी कायदा मोडणाऱ्या व्यक्तीकडून वसूल करायच्या दंडात कायदा मोडणाऱ्या व्यक्तीकडून वसूल करायच्या दंडात माझ्यासाठीचा एक आणा अधिक करून दंड वसुली करतो. मी गुन्हा करतो हे मला माहीत आहे. मी गुन्हा केल्यानंतर चौकशी होणार आणि माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मला दंड/शिक्षा होणार, परंतु मी तशी वेळच येऊ देत नाही. माझ्यावरील आरोपाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचे मी हात ओले करतो आणि निर्दोष राहतो. त्यासाठीही या एका आण्याचा उपयोग होत असतो."राजाने शेवटी पुन्हा एकदा प्रधानजीकडे मोर्चा वळवला आणि म्हणाले, "प्रधानजी, अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधी लाचलुचपत प्रतिबंध विभाग काम करत असतो ना? तरी असे का घडते?"मधेच तोंड घालून साहित्यिक म्हणाला, "महाराज मी सांगतो, तुम्ही कायदा केला एका इसमाकडून केवळ एक आणा दंड किंवा मदत वसूल करायची आणि तुम्ही गुन्हा झाल्याचे कळल्यानंतर फक्त विचारत होता की 'आज किती लोकांनी कायदा मोडला? त्या इसमांकडून दंड वसूल केला का?' सगळी यंत्रणा 'होय' म्हणत होती आणि प्रत्येक इसमाचा दंडाचा एक आणा राजकोषात जमा होत होता. त्यामुळे खाली आणखी काय-काय घडत आहे याची तुम्हाला कल्पना नव्हती. ते सर्व तर आत्ता तुमच्या लक्षात आलेच आहे. उरली गोष्ट लाचलुचपत खात्याची. लाचलुचपत खाते तक्रार आल्यास सापळा रचून अधिकाऱ्यांना अधून मधून पकडते. मात्र बऱ्याच अधिकाऱ्यांना आपण आज रचल्या जाणाऱ्या सापळ्यात पकडले जाणार आहोत याचे स्वप्न पडते. त्यामुळे ते सावध होतात. आमचा विभाग जागृत आहे, चलाख आहे, कार्यरत आहे हे दाखवण्यासाठी ज्या काही कारवाया होतात त्या कारवायानंतर नियमाप्रमाणे सहा महिने लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले जाते, परंतु त्यानंतर वरिष्ठांच्या मर्जीने व कायद्यातील त्रुटींचा आधार घेऊन अर्ध्या पगारावर सहा महिने व पुढे पूर्ण पगारावर काम करत राहतो. लाच लुचपत विभागाने पकडलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व शिक्षेचे काम करण्याचा अधिकार त्यांना नाही. ते न्यायालयात खटला दाखल करतात आणि पुढे 'तारीख पे तारीख' होत जाते. बऱ्याचदा जाळ्यात पकडलेला अधिकारी सेवानिवृत्त होतो, पेन्शन खाऊन, मृत्यूही पावतो, परंतु त्या केसचा निकाल लागत नाही. या दरम्यान लाचलुचपत खात्याकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीला तारखेसाठी किती हेलपाटे घालावे लागतात याची मोजदाद नाही. ते बघून सहसा लोक तक्रार करायलाच धजावत नाहीत. जे मूठभर धजावतात आणि तक्रार करतात त्यांच्या बाबतीत हे असे घडते. ती कल्पना तुम्हाला यावी म्हणूनच मी कविता सादर केलेली आहे. आणि माझ्याकडून जे पैसे घेतले त्यातला एक आणा तर दंडाचा आहे तो नियमाप्रमाणे जमा व्हायलाच हवा. उरलेले माझे १५ आणे मला मिळावेत म्हणून कवितेची बक्षिशी १५ आणे हवी असे मी सांगितले."महाराणीचा शौक म्हणजे अवघड जागचे दुखणे होते. महाराज म्हणाले, "कवी महाशय, मी न्यायाधीशामार्फत एकसदस्यीय समितीची स्थापना करून खरे खोटे निश्चिती करून जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्यायची व्यवस्था करतो. आणि खरोखरच घडलेला प्रकार सत्य असेल, तसे सिद्ध झाले तर तुमचे १५ आणे तुम्हाला परत करतो. पण त्यासाठी तुम्ही आणि तुमच्या सर्व नागरिकांनी येत्या निवडणुकीत मलाच जिंकून देऊन राजपदावर बसवायला हवे."तो साहित्यिक महाराजांच्या आज्ञेची, न्यायालयाच्या कारवाईची वाट बघत आहे. त्याच्या हयातीत खटल्याचा निकाल लागावा एवढीच त्याची अपेक्षा.
