STORYMIRROR

शिक्षणयात्रा Shikshanyatra

Children Stories Inspirational Children

3  

शिक्षणयात्रा Shikshanyatra

Children Stories Inspirational Children

बिस्किटांचा पुडा

बिस्किटांचा पुडा

6 mins
227

.    सोन्या तिसरीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या घरी बाबा, आई आणि सात-आठ महिन्यांची छोटी बहिण छकुली एवढंच छोटं कुटुंब. सोन्या शाळेला जात होता. बाबा शेतमजुरीला जात असायचे. आई मात्र बाळाला घेऊन घरीच असायची.


    बोलण्यात पटाईत, अभ्यासात हुशार, खेळात नंबर एक असा सोन्या एक दिवस शाळेतून घरी येत होता. शाळा त्यांच्या गल्लीच्या एका कोपऱ्यावरच होती. शाळेच्या मैदानातून एक पाऊल टाकलं की गल्लीत यायचा. त्या गल्लीच्या तोंडावरच सदामामांचं पानपट्टीचं दुकान होतं. पानपट्टी कसली नावालाच. तिथे सर्व काही मिळायचं. पेन्सिल, पेन, पाटी, वह्या, दप्तर, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मीठ, साखर इतकंच नाही तर छोट्या-मोठ्या औषधांच्या गोळ्याही त्याच्या दुकानात मिळायच्या. चाॅकलेट आणि खाऊच्या पाकिटांची तर रेलचेलच होती. 

सदामामा हा सोन्याच्या आईचा मानलेला भाऊ. तो सोन्याला म्हणाला, "सोन्या, चॉकलेट खाणार का?"

    सोन्याने मानेनच नको म्हटलं, "मामा आज अभ्यास लै हाय, जातो घराकडं." म्हणून पळतच घरी आला. घरात आल्याबरोबर दप्तर खाली ठेवलं, शाळेचे कपडे खुंटीला अडकवले, हात पाय धुतले, दुसरे कपडे घातले आणि लगेच अभ्यासाला बसला. 

पाच दहा मिनिटं झाली असतील अभ्यासाला बसून, इतक्यात घरातून छकुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू यायला लागला. खूपच जोरजोरात ती रडत होती. तिच्या रडण्यामुळे सोन्याचा अभ्यासात लक्ष लागेना आणि तो दंगा एकूण शेजारची हौसामावशी धावतच आली आणि सोन्याच्या आईला म्हणाली, "ए पारे, तुला काय अक्कल हाय का नाही! पोर रडायला लागलीया, सारं घर डोस्कीवर घेतलंय. काय घराच्या खापऱ्या उडून जायची वाट बघतीयास? काय पाहिजे बघ की तिला!" 

    सोन्याची आई म्हणाली, "हौसामावशी, भूक लागलीया तिला."

    "आगं, मग भूक लागली म्हणून काय सांगतीस, भात दे की खायला तिला."

    "मावशी भात नाही घरात." 

    "मग, दूध पाज तिला कपभर."

    "दूधबी नाही घरात. दूध नाही म्हणून आम्ही चहाबी करत नाही कवा. आमचं काय शेतभात हाय? काय शेळ्या म्हशी आहेत? हातावरचं पोट." 

    "अगं मग निदान अंगावर तरी पाज."

    "हौसा मावशी, ह्या कोरोनावर इस्तू पडला. काम मिळत नाही. चार दोन दिवसांनी कारभारी कामाला जात्यात. मी आता वरीसभर ह्या बाळासाठी घरातच हाय. मला बाळाला टाकून कामाला जायला घडत नाही. ज्या दिवशी कारभाऱ्यास्नी काम मिळेल त्या दिवशी कारभारी येताना मजुरीच्या पैसे घेऊन तांदूळ, तेल, चटणी, मीठ घेऊन येत्यात. घरात आल्यावर भात शिजवून खातोय, भात शिल्लक राह्यला तर दुसऱ्या दिवशी सकाळची न्याहरी. सोन्याला दुपारी शाळंत डाळभात मिळतोय खायला. आम्ही दोघं उपाशीच. गेलं वरीसभर असंच चाललंय. 

    ह्या आठवड्यात कारभार्‍यास्नी कामच नाही मिळालं. घरात हुता त्यो पैसा पुरवून-पुरवून कसातरी बाजार करत हुतो. दिवस ढकलत हुता. काल संध्याकाळी घरात काय पैसं नव्हतं. कारभाऱ्यांनी दुकानातून उधारीवर तांदूळ, चटणी-मीठ आणलं. भात शिजवला. सोन्या गेला होता खेळायला. खेळून आलेला सोन्या म्हटला, 'आई, मला भूक लय लागलीया. भात दे खायला.'

     शिजवलेल्या भाताच्या पातेल्यातला निम्म्यापेक्षा जास्त भात एकट्या सोन्यानचं खाल्ला. उरल्याला भात कारभाऱ्यास्नी वाढला."

     "आणि तू गं काय खाल्लंय?"

    "मी तांब्याभर पाणी पिऊन झोपलो. आज सकाळीही काय नाही. कारभारी गेल्यात आज कामाला. येथील आता. मग खाईन थोडा भात सगळीजण."

    "द्वाडा, मग असं करत जा कवा पैस जवळ येतील तवा एखांदा गुलकनचा बिस्कीटचा पुडा आणून ठेवत जा घरात. काय खायाला नसंल तव्हा त्यो पुडा खाईत जा. चांगलं दूध येतं त्यांनं. बाळाला रडवत जाऊ नकोस. रडूनशान टाळू दुखावंल तिची. सोन्याची आई बरं म्हणाली. 

     हौसामावशी आपल्या घराकडे गेली. सोन्यानं अभ्यास बंद केला. वही, पेन, पाटी, पुस्तक पिशवीत भरलं आणि आईजवळ जाऊन म्हणाला, "आये, आगं माझ्या दोस्ताचा बड्डे हाय. जाऊ का मी? 

     आई म्हणाली, "कुठला दोस्त?"

    "आगं, त्यो हर्षा नाही का हर्षा! माझं जिगरी दोस्त नाही का! त्याचा बड्डे हाय."    

     "सकाळपासून सांगितलं नाहीस मला! आज संध्याकाळी बड्डेला जायचं म्हणून. पण तू मला कुठे नाही सांगितलं अजून?"

     "अगं माझ्या ध्यानातच नव्हतं. आता एकदम आठवण झाली. मी जातो बड्डेला."

     आई म्हणाली, "नको जाऊ." 

     सोन्या म्हणाला, "आगं आई, त्यो माझा जिगरी दोस्त. मी जर त्याच्या बड्डेला नाही गेलो तर माझ्या संग खेळणार कोण? मला अभ्यासाला मदत कोण करणार? जातो की! असा जातो... असा येतो." 

    सोन्याचा जास्तच हट्ट बघून आईनं होकार दिला. सोन्यानं एक उडी मारली, सरळ घराच्या बाहेर अंगणात. दनाट पळाला शाळेच्या रस्त्याकडं. 

    थोड्या वेळाने सोन्याचा बाबा घराकडे आला. येतानाच त्यांनं दुकानातून बाजार आणला होता. सोन्याच्या आईनं भात शिजवला. कारभाऱ्याला भात खाऊ घातला. बाळालाही गरम गरम भात वरणाच्या पाण्याबरोबर चारला. आणि सोन्याची वाट बघत बसली. इतक्या सोन्या आला. 

    आल्या आल्या सोन्या म्हणाला, "आई, आगं का नाही लय भारी बड्डे होता. हे बघ हर्षाच्या बाबांनं बिस्किटाचा पुडा दिलाय मला. घे, खा तू."

      सोन्याच्या हातात बिस्किटाचा पुडा बघून आई चपापली. तिला शंका आली म्हणून म्हणाली, "वाढदिवसाला पोरं बिस्किटाचा पुडा घेऊन जात्यात. आणि तू तर म्हणतोयस हर्षाच्या बाबांनं तुला बिस्कीटाचा पुडा दिला!" 

    "माझ्या ध्यानात नव्हतं जायाला उशीर झाला. मी जाईस्तोर केक कापला हुता. सगळ्यांस्नी वाटला हुता. चॉकलेट, चुरमुरंबी वाटलं हुतं. काय शिल्लक नव्हतं म्हणून हर्षाचा बाबा म्हटला, "हर्षद, अरे सोन्याला निदान एखादा बिस्किटाचा पुडा तरी दे. मग हर्षाने मला बिस्किटाचा पुडा दिला. खा... खा तू आई."

     आई म्हणाली, "ठेव तिथं डब्यात. बघू उद्या सकाळ."

     सोन्यानं बिस्किटाचा पुडा कपाटातल्या डब्यात ठेवला. आईने वाढलेला भात खाल्ला. आणि झोपायला गेला पण झोप काय येत नव्हती. सारखा उलथा-पालथा, या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवर तळमळत होता. बर्‍याच उशेरानं डोळं झाकलं

     दुसऱ्या दिवशी सकाळीआईची हाक आली, "सोन्या, उठ. घे त्यो बिस्कीटाचा पुडा आणि चल बाहेर. कुठून आणलास तू बिस्कीटचा पुडा? खरं खरं सांग."

     सोन्या म्हणाला, "आगं हर्षाच्या बड्डेला गेल्यावर त्याच्या बाबांनीच दिलाय बिस्कीटांचा पुडा."

     आई चिडून म्हणाली, "खोटं बोलू नकोस. सकाळीच मला हर्षाचा बाबा दारावरनं डेरीकडं जात्याला भेटला होता. मी विचारलं त्यांना. बड्डे-बिड्डे काय नाही असं म्हणाले. खरं सांग कुठून आणलास बिस्कीटांचा पुडा?"

     बिस्कीटच्या पुड्याचं नाव आईने घेतल्याबरोबर सोन्या थरथर कापायलाच लागला. सोन्याने खरं खरं सांगितलं. आई म्हणाली, "तो बिस्कीटचा पुडा घे." छकुलीला काखेत घेऊन एका हातात सोन्याचा हात धरून आई सदामामाच्या दुकानाकडे चालू लागली.

     या तिघांना दुकानाकडे येताना बघून सदामामा गडबडला. सोन्याच्या हातात बिस्कीटांचा पुडा बघून तर तो पुरताच घाबरला. अलीकडे पॅकबंद पुड्यामध्येसुद्धा अळ्या, किडे सापडू लागले होते. त्यामुळे पारूआक्का सुद्धा तक्रार घेऊन येत असावी असं त्याला वाटलं म्हणून तो घाबरला होता. न राहून त्यांना विचारलं, "काय आक्का, का आलीस दुकानाकडं?"

    पारुआक्का म्हणाली, "त्यो बघ बिस्किटांचा पुडा."

    बिस्कीटच्या पुड्याचं नाव घेतल्यावर तर सदामामाची पाचवर धरण बसली. पुरती बोबडीच वळली. "का... का... का... काय झालं आक्का?"

    "ह्यो बिस्किटाचा पुडा तुझ्या भाच्यानं रात्री दुकानातनं चोरून आणलाय घराकडं."

     चोरी म्हणताच सदामामाला बरं वाटलं. आपल्या दुकानाची बदनामी टळली म्हणून. तो पटकन उडी मारून सोन्या जवळ आला. सोन्याच्या हातातला बिस्किटाचा पुडा घेतला. आणि म्हणाला, "सोन्या, काल शाळा सुटल्यावर घराकडं जाताना मी तुला काल चॉकलेट देऊ का? म्हणालो होतो. तू म्हटलास नको. तवा जर बिस्किटाचा पुडा पाहिजे म्हटला असतास... तर मी तुला दिला नसता का? सांग... खरं सांग... का चोरलाच बिस्किटाचा पुडा? मी तुला मारणार नाही, कावणार नाही, रागवणार नाही; पण सांग. खरं खरं सांग."

     सोन्यानं एकदा आईकडे बघितलं. पुन्हा सदामामामाकडे बघून तो सांगू लागला, "काल संध्याकाळी शाळेतून घरी गेल्यावर अभ्यासाला बसलो. छकुली लय रडायला लागलेली. तिचा दंग ऐकून शेजारची हौसामावशी पळत आली. ती आईला म्हणाली, "पारे, पोरीला काय झालं गं टाळा पसरायला. खायला काहीतरी दे.'

     घरात खायला काय नव्हतं. दूध बी नव्हतं. आईच्या अंगावर दूध नव्हतं, तवा हौसामावशी म्हणाली, "पारे, पैसा आल्यावर एखादा गुलकनचा बिस्कीटाचा पुडा आणून ठेवत जा घरात. तो खाल्ला म्हणजे लई दूध येतंय.' आईने बिस्कीटांचा पुडा खावावा, तिला दूध यावं आणि छकुली शांत व्हावी म्हणून मी बिस्किटाचा पुडा चोरून नेला." सोन्याचं बोलणं संपायच्या अगोदरच सदामामाच्या डोळ्यातनं अश्रूधारा ओघळायला लागल्या. तो बिस्किटाचा पुडाू घेऊन सदमामा दुकानात गेला. तो बिस्कीटांचा पुडा त्यांनं फळीवर ठेवला. खाली वाकून एक मोठा बॉक्स बाहेर काढला आणि सोन्याच्या आईला म्हणाला, "आक्का, तुला शपथ आहे. ही माझी भाऊबीजेची भेट समज आणि बॉक्स घेऊन घरला जा त्यात अडीच डझन म्हणजे तीस बिस्किटाचे पुढे आहेत. दररोज एक पुडा घेत जा, तू दोन-चार बिस्किटं खात जा. सोन्याला दोन-चार देतलं आणि शकीला खाल्लं तर तिला पण देत जा."

    पारुआक्का 'नाही नाही' म्हणताना सदा मामांनं तो बिस्किटाचा बॉक्स उचलून सोन्याच्या डोक्यावर ठेवला. आणि जावा म्हणून सांगितलं. 

     घराकडे परत येताना आई सोन्याला समजावत होती, "काल संध्याकाळी तू एक बिस्कीटांचा पुडा आणलास की चोरी होती बाळा. चोरी केली, खोटं बोललो, लबाडी केली तर आपल्याला शिक्षा होते, लोक नावं ठेवतात. मारहाण करतात. आयुष्यात कधीही चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. आज मात्र तुझ्या डोक्यावर जो बिस्किटाच्या पुड्यांचा बॉक्स आहे, ते बक्षीस आहे. आपण खरं बोललो, चांगलं वागलो तर आपल्याला बक्षीसं मिळतात."

     डोक्यावरचा बिस्किटांचा डबा बॉक्स सांभाळत सोन्या म्हणत होता, "आई, मी कध्धी-कध्धी चोरी करणार नाही, खोटं बोलणार नाही."

     सोन्याची आई समाधानाने घराकडे परतत होती.


Rate this content
Log in

More marathi story from शिक्षणयात्रा Shikshanyatra