STORYMIRROR

शिक्षणयात्रा Shikshanyatra

Children Stories Classics

4  

शिक्षणयात्रा Shikshanyatra

Children Stories Classics

लळा

लळा

5 mins
393

गडाच्या पायथ्याला असलेल्या छोट्याशा खेड्यामध्ये सई राहते. तिच्या घरी तिचे आजी-आजोबा, वडील, आई, युग म्हणजे तिचा लहान भाऊ युगंधर असे छोटेसेच कुटुंब होते. तिचे वडील रामराव आपल्या मालकीच्या घरच्या शेतात राबत होते. घरी लागणारे ज्वारी, भात, गहू, मका अशी धान्ये आणि हरभरा, तूर, चवळी, पावटा, मूग, मटकी, सोयाबीन अशी कडधान्यांची पिके, भुईमूग, सूर्यफूल या तेलबिया ते पिकवत होते. सईची आई बांधावर व वाफ्यातून कांदा, लसूण, मोहरी, तीळ अशी मसाल्याची पिके आणि मेथी, पोकळा, चाकवत, करडा, अंबाडी, पालक या पालेभाज्या व टोमॅटो, वांगी या फळभाज्यांची पेरणी करत असे. शेतातील घरामागच्या जागेत मांडव घालून दोडका, कारले, पडवळ अशा फळभाज्यांची लागवड करत असे. थोड्या उरलेल्या शेतात ऊस लावलेला असायचा. 

आपल्या शेतीच्या मशागतीसाठी सईच्या वडिलांनी बैलजोडी बाळगलेला होती. घरच्या शेतीची मशागत झाल्यानंतर ते इतर लोकांच्या शेतीच्या मशागतीसाठी जात होते. साखर कारखाना चालू झाल्यानंतर तीन-चार महिने उसाच्या वाहतुकीचेही काम करत होते. आजी-आजोबा वय झाल्यामुळे घरीच राहत होते. वडिलांना शेतीच्या कामात आई मदत करत होती. सई चौथीच्या वर्गात शिकत होती. युग पहिलीच्या वर्गात शिकत होता. 

शेतामध्ये दिवसभर राबून मिळालेल्या धान्यावर ते गुजराण करत होते. सर्व कुटुंब सुखी आणि समाधानी होते. 

रामरावांनी आपल्या शेतीच्या मशागतीसाठी घेतलेली बैलजोडी अतिशय देखणी होती. गावात सर्वांना ती जोडी आवडलेली होती. तिच्या वडिलांनी त्या बैलांची नावे हौशा व महाल्या अशी ठेवलेली होती. हौशा स्वभावाने शांत होता, पण महाल्या थोडा रागीट होता. सईच्या वडिलांशिवाय तो इतर कोणाला फिरकूही देत नव्हता. 


शाळेत एकदा नवा पाठ शिकत असताना गुरुजी म्हणाले, "आपण आपल्या घरातील प्राण्यांशी प्रेमाने वागलो तर त्यांनाही आपला लळा लागतो. मांजराची शेपटी ओढणे, विनाकारण कुत्र्याला दगड मारणे असे करू नये. यामुळे त्यांना राग येतो व ते आक्रमक होऊन प्रतिहल्ला करतात. अशा घटना वारंवार घडल्या तर त्या प्राण्याचा स्वभावच बदलून जातो. आपण त्यांना प्रेम दिले तर तेही आपल्याला प्रेमच देतात. आपण त्यांचा द्वेश केला तर तेही आपला तिरस्कार करतात."

सईला वाटले आपण प्रयोग करून पाहावा. त्या दिवशी घरी आल्यावर तिने आईकडून अर्धी भाकरी मागून घेतली. आईला वाटले कुत्र्यासाठी भाकरी नेली असेल; पण नाही. सई तर भाकरी घेऊन गोठ्याकडे गेली. हौशा बैलाला भाकरीचा एक घास चारला, थोड्या अंतरावर उभे राहून तिने हात लांब करून दुसरा घास महाल्या बैलाला दिला. असे करता करता म्हैस व गायीबरोबर कधी ती ओला चाराही बैलांना देऊ लागली. एरव्ही जवळपास कोणी गेले तर डोळे विस्फारून, आपली टोकदार शिंगे रोखून, नाकाने 'फुसऽऽऽ... फुसऽऽऽ...' आवाज करून अंगावर धावून आल्यासारखे करणारा महाल्या काही दिवसांनी तर सई कधी चारा किंवा भाकरीचा घास द्यायला येते याची वाटच बघत असायचा. 

सईनेही धाडस करून मग हौशाबरोबर महाल्याच्या अंगावरून हात फिरविणे, त्याच्या मानेखालची पोळी, कपाळ खाजविणे, त्यांच्या कानात व पापणीत लपून बसलेले गोचीड काढणे असे करत करत जवळीक साधली. 

सई बिनधास्तपणे गोठ्यात वावरू लागले. कधी कधी बाबांबरोबर सकाळी गोठा स्वच्छ करायला, जनावरांना चारा खायला द्यायला जाऊ लागली. या गोष्टीची तिच्या आजोबांनाही अपूर्वाई वाटायची. ते विचारायचे, "सई बाळ, तुला भीती नाही का वाटत महाल्याची?"

सई म्हणायची, "आजोबा, आमच्या सरांनी एकदा सांगितलं होतं आपण मुक्या प्राण्यांना प्रेम दिले तर तेही आपल्यावर प्रेम करतात." 

 एकदा शेतात नांगरणीचे काम चालू असताना अचानक दुपारी सईचे वडील बैलगाडी घेऊन शेतातून घरी आले. त्यांना सईच्या आजोबांनी विचारले, "का रे बाळा, का लवकर आलास आज?" 

सईचे वडील म्हणाले, "दादा, आपल्या एका बैलाचा खांदा दुखावला आहे आणि त्याला कसलीतरी गाठ उठलेली आहे, त्यामुळे त्याला त्रास होत आहे, म्हणून मी घरी आलेलो आहे."

 सईचे वडिलांनी डॉक्टरांना बोलावून औषध पाणी केले पण ती गाठ कमी होत नव्हती.

बैल पाहायला आलेल्या शेजारच्या काकांनी 'बैलाच्या खांद्याला दररोज तेल व हळद चोळा जखम बरी होईल' असे सांगितले, पण सईच्या वडिलांना ते काम वेळेत जमत नव्हते. 


महाल्याला आणि सईला एकमेकांचा लळा लागला होता. सईची हाक ऐकली की तो कान टवकारून बघायचा. सई शाळेला जाताना त्याला भेटल्याशिवाय, फिरायला जाताना त्याला सांगितल्याशिवाय कधीही इकडे तिकडे जात नव्हती. 

  

एके दिवशी सई घरात आल्याबरोबर आपल्या आईला म्हणाली, "आई, मला हळद आणि तेल दे."

आई म्हणत होती, "अगं, कशाला हवंय तुला हळद आणि तेल."

सई म्हणाली, "मला पाहिजे आहे. थोडं काम आहे."

सईने हळद आणि तेल घेतलं आणि जाऊन बैलाच्या खांद्याला ती चोळू लागली. आठवडाभर ती सतत शाळेतून आली की बैलाच्या खांद्याला हळद आणि तेल चोळत होती आणि त्याचा चांगलाच परिणाम झाला. बैलाच्या खांद्यावरची जखम भरून आली. तेल आणि हळद लावल्यामुळे माशा बसत नव्हत्या त्यामुळे जखम लवकरच बरी झालीआणि बैल पूर्वीसारखे काम करू लागला, त्यामुळे सईला तर बैलाचा अधिकच लळा लागला होता. 

असेच एक दिवस सई शाळेला गेली होती आणि तिचे वडील बाजारला गेले होते. घरात कोणी नव्हते. गावाशेजारी रस्त्याचे काम चालू होते तेथे झालेल्या सुरुंगाच्या मोठ्या आवाजाने महाल्या बैल बिथरला आणि दावे तोडून सैरावैरा पळू लागला. अगोदरच मारका बैल म्हणून तो सगळ्या गावात प्रसिद्ध होता आणि तो दावे तोडून सुटल्यानंतर सगळे लोक काळजीत पडले व त्याच्या पाठीमागे धावून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण महाल्या काही सापडत नव्हता. एखाद्या माणसाने काठी घेतली तर तो त्याच्या अंगावर धावून जायचा. रामराव तर बाजारला गेलेले, आजोबांना काही तितकसं काम जमत नव्हतं. मग काय करावे हा सगळ्यांसमोर प्रश्न पडला. इतक्यात आजीबाई म्हणाल्या, "अहो, आमच्या सईला बोलावून आणा बैल आपोआप शांत होईल." 

लोक म्हणाले, "आँ, आम्ही एवढे मोठे ताकतवान आहोत तरी आम्हाला तो बैल ऐकत नाही आमच्या अंगावर धावून येतो आणि एवढ्या चिमुरड्या पोरीला तो कसा काय वठणीवर येणार?"

तरीपण एक जण म्हणाला, "बघूया तर!"

आणि तो शाळेत गेला शाळेत गेल्यानंतर शाळेतल्या मॅडमला सांगितले की, "सईचे थोडे काम आहे आणि तिला घरी न्यायला आलेलो आहे."

मॅडमने सईला विचारले, "बाळ, या काकांना तू ओळखतेस का?"

सई म्हणाली, "हो आमच्या शेजारीच राहतात. पण का हो काका, का बोलावले आहे घरी?"

काका म्हणाले, "अगं सई, तुझा तो महाल्या बैल आहे ना तो बिथरला आहे, दावे तोडून सैरावैरा पळत सुटला आहे. त्याला पकडून बांधून ठेवायला हवा. तो असाच पळत राहिला तर इतर कुणा गाई-बैलांवर हल्ला करेल किंवा माणसांवर सुद्धा हल्ला करेल. तुझे बाबा तर बाजारला गेलेत. तेव्हा तुझी आजी म्हणाली की सई आल्याशिवाय तो शांत होणार नाही. म्हणून तुला बोलवायला आलो आहे."

सईने दप्तर आवरले, मॅडमनी सईला शाळेतून घरी नेत असल्याबद्दल

काकांची सही घेतली आणि सहीला पाठवून दिले.

सई शेतात आल्याबरोबर सईला आजीने सांगितले, "अगं आपला महाल्या स्वतःचं दाव तोडून इकडे तिकडे पळायला लागलाय. काय झाले बघ जरा."

सई माळरानावर गेली आणि मोठ्याने महाल्याला हाक मारल्याबरोबर बाभळीच्या वनातून महाल्या धावत धावत आला आणि आपल्या खरखरीत जिभेने सईचा हात चाटू लागला. मग सईने त्याची वेसण धरली आणि आणून खुंट्याला बांधला. 

जमलेल्या लोकांना एवढा मारका बैल चिमुरड्या पोरीला लळा लावतो याचे आश्चर्य वाटले. 

सईचे आजोबा म्हणाले, "जनावर असलं म्हणून काय झालं! माणसानं जर त्याला जीव लावला तर ते सुद्धा माणसावर जीव लावतं."

महाल्या बैल सुटल्यामुळे त्याला पकडण्यासाठी जमलेले सर्व लोक समाधानाने आपापल्या घरी गेले. 


Rate this content
Log in

More marathi story from शिक्षणयात्रा Shikshanyatra