Vishakha Kulkarni

Drama Fantasy Romance

3  

Vishakha Kulkarni

Drama Fantasy Romance

वॉटरकलर्स

वॉटरकलर्स

7 mins
15.6K


तुझा विचार करतांना मन एवढ्या पुढे जातं, की काही वेळाने सुरवात देखील आठवत नाही. तू माझ्या आयुष्यात खूप अनाहूतपणे आलास आणि खुशाल मनाचा ताबा घेतलास. तू आणि मी कसले विरुद्ध टोकाचे! मी स्वप्नाळू, ड्रीमलॉस्ट अशी काहीतरी होते आणि तू कमालीचा प्रॅक्टिकल, आहेस तिथे जगणारा. तरी आपलं कस जमलं देव जाणे!

    'देव'...केव्हातरी तू म्हणालेलास, मी अजून क्लिअर नाही, मी आस्तिक की नास्तिक यात. तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं, आपल्या दृढ विश्वास असणाऱ्या गोष्टींवरही अनेकदा प्रश्नचिन्ह उमटू शकतं. तुझ्याकडून खूप काही शिकले मी. लोकांच्या असण्या-नसण्याने स्वतःला फरक पडू न देणं हेही तुझं धोरण. जे मला शेवटपर्यंत आत्मसात करता आलं नाही, आणि आज तू नसताना वाटतंय ते तेव्हाच आत्मसात केलं असतं तर आयुष्यातली दोन वर्ष वाया नसती गेली. तुझ्या आठवणीत फालतूसारखी उन्माळून पडले मी. तू तेव्हाही म्हणाला असतास, ठीके, एवढं काय? तू बोलून दाखवलं नाहीस तरी माझ्या आयुष्याचा एक भाग तू आणि तुझ्या आयुष्याचा एक भाग मी व्यापलो होतो. पण इतर मुलींसारखी मीही तुझ्यात खुपच्याखूप गुंतले होते. तू मात्र तुझ्या अंगभूत गुणासारखा माझ्यात असूनही अलिप्त राहिलास.

        मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा मी तुझ्या घरी water project survey साठी आले. तुझ्या खोलीत मला फार ओळखीचा वास आला. तुझ्या हातात सर्व्हेचा कागद सहज देऊन खोली बघत बसले. तुझ्या खोलीवरून बॅचलर असशील याचा मुळीच अंदाज आला नव्हता. ऍब्सट्रॅक्ट पेंटिंग्ज भिंतीवर बसून सांगत होती, तू चार चौघांसारखा उथळ नाहीस. समोरच रायटिंग टेबल थक्क करेल एवढं टापटीप होतं. आणि त्याच्यासमोरचा तो कॅनव्हास, तो कोरा वाटायचा, पण नंतर कळलं त्या कोऱ्यात वॉटर कलर असा सामावलाय, की दोघांनीही एकरूप व्हावं!

          तू तो फॉर्म नीट भरून दिलास तोवर हाताचा ओझरता स्पर्श करण्याऐवढी हिम्मत झाली माझी. तुला लक्षात आलं, हे पाहून थोडी चपापले मी. पण तू खांद्यावर हात ठेवून रिलॅक्स केलंस आणि हायसं वाटलं. निघताना खिडकीत येऊन कोरड्या आवाजात विचारलस, "Excuse me, Sorry, तुम्हाला पाणी हवे असेल तर घेऊ शकता" आणि हसत मी निघून गेले.

      तुला कसलीच भीती नव्हती ना, एकदा तू काहीतरी धार्मिक का काय पुस्तकावर समीक्षा लिहिलीस आणि घराबाहेर लोक संतप्त होऊन ऍसिड बिसिड फेकत जाळपोळ करत आले. तेव्हा तू चक्क मला कुशीत घेऊन,चेहऱ्यावर कसलेच भाव नसणाऱ्या निरागस मुलाचे भाव चेहऱ्यावर पांघरून झोपला होतास आणि मग उठून मी घाबरले म्हणून मला मूर्खांत काढलस. तेव्हा तू करून दिलेली कॉफी एरवीपेक्षा जास्तच स्ट्रॉंग झालेली रे..

      तुला आठवतंय?बाबांनी माझ्या तुझ्याकडे येण्या जाण्याला जेव्हापासून विरोध सुरु केला आणि माझ्या माघारी तू त्यांना भेटून बऱ्याच गप्पा मारल्यास,त्याच्या पुढचा आठवडाभर ते अगदी भलत्याच मूड मध्ये होते!

    तू असा एकटाच का राहतोस?तुझ्या घरचे कुठे आहेत? तुझे फार कुणी मित्र का नाहीत? असल्या माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा तुला भयानक कंटाळा आलेला. माहितेय मला, पण तरी, बाबा दिल्लीत असतो आणि आई तिच्या नवऱ्यासोबत कॅनडा ला असते. या एका वाक्यात विषय संपवलास तू. एवढा का कमी बोलतोस रे? किंवा बोलायला लागलास कि पियानोवर बोटं फिरवल्यासारखं लयीत बोलायचं...

    "वस्तूंमध्ये जीव टाकत जाऊ नकोस. कुणीतरी पीढ्यान पिढया जपलेलं, पहिल्या लग्नाची रात्र, पाडव्याची भेट, पहिला पगार असल्या क्षणाचं साक्षीदार झालेलं सोनं वितळवताना जस सोनाराला काही वाटत नाही तस हो. तुझा तर कानातल्याच्या खड्यात जीव. हड्!"

"तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही रे!"

"मरणारेस का? जा मग.आत्ताच मर."

असलं काहीतरी बोलायचं आणि मग हात पसरून मला म्हणायचं,"ये."

एकदा आपण यादी केली होती तुझ्या गर्लफ्रेंड्सची, ज्या तुझ्या दृष्टीने तुझ्या कुणीही नव्हत्या! चक्क पंचेचाळीस नावं गोळा झाली रे!

तुझ्या आवडीनिवडी सुद्धा तुझ्यासारख्याच होत्या, विचित्र आणि अनप्रेडिक्टबल!

मुलखाचा शौकीन तू! दर महिन्याच्या सुरवातीला एखादं महागडं यू डी कोलोन आणून ती बाटली फोडून खोलीच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यायची आणि पुढे महिनाभर डोकं उठेस्तोवर तो वास घ्यायचा..किंवा चार पाच दिवस एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाऊन सर्वात महाग सर्व्हिस घेऊन यायचं, मग पुढचा महिनाभर मॅ्गी वर दिवस का काढावा लागेना! असला तू!

    तुझ्या बर्थडेला सरप्राईस वैगेरे पांचटपणा काही करायचा नाही अस सांगून ठेवलंस. कसला बोअर वाटायचास तू अशावेळी! पण मग त्यानंतर पुढच्या आठवड्यात आपण बीचवर गेलेलो,पौर्णिमेच्या दिवशी, तेव्हाच्या दुधाळ चांदण्याखाली तू वाजवलेली गिटार ही सेलेब्रशनची सर्वात श्रीमंत व्याख्या पटली!

"तू माझ्यावर मनापासून वैगेरे प्रेम करतेस ना"

"हो.स्वतःपेक्षाही जास्त."

"मला तुझ्याविषयी काही नाही वाटत ग पण. नको एवढं इन्टेन्सली वगैरे प्रेम करूस बदल्यात काही मिळणार नाही."

"काय रे,  तुझ्या भिंतीवरचा तो कॅनव्हास कोराच दिसतो. तरीही तो तिथून हलवलेला तुला चालणार नाहीये ना? तू अपेक्षा करतोस का त्याच्यावर अचानक सुरेख चित्र उमटावं?"

"अं हं.एकतर तो कोरा नाही,आणि त्यावर काही उमटाव अशी अपेक्षाही नाही."

"Exactly. एकतर तू भावनाशून्य नाहीस. आणि तुला माझ्याविषयी प्रेम वाटावं अशी अपेक्षाही नाही."

मला माहीत होतं, सुरवातीला जरी तू माझ्याविषयी खरंच काही वाटत नसलं, तरी माझ्यापासून अगदीच अलिप्तही नव्हतास. त्यादिवशी मला तो कोरा कॅनव्हास एकदम सगळ्याच रंगांनी भरल्यासारखा भासू लागला..

त्या रविवारी सकाळी मी आले,तेव्हा घराला छानपैकी कुलूप लावून तू कुठेतरी गायब झालेलास. बराच वेळ मी दार वाजवून, दमून पायऱ्यात बसले. संध्याकाळी दारात तुझ्यासाठी नोट ठेवून मी निघाले तेव्हा खिडकीतून चावी फेकत तू ओरडलास, "कुलूप उघड आणि मग जा..." तेव्हापासून आजही ती चावी माझ्याकडे आहे.

आज तू माझ्यासोबत नाहीस याच मलातरी काही वाटत नाहीये. तुलाही नसेल वाटत बहुदा. पण कधी उगाच वाटत, तुला आठवत असेल मी. अजूनसुद्धा. खरंच, एवढी कारणीभूत होते कारे मी तुझ्या स्वभावातल्या बदलांना?

भैय्याचं प्रमोशन झालं त्या रविवारी मी आले नव्हते तुझ्याकडे. अचानक ठरल्याने निरोपसुद्धा नाही देता आला. पण सोमवारी सकाळी जे माझ्यासमोर होत, ते खरंच धक्कादायक होत. तेव्हा जाणवलं, हे काहीतरी वेगळं आहे. तू रात्रभर दारासमोर खुर्ची टाकून दारात, खिडकीत येरझाऱ्या घालत बसला होतास?  त्यादिवशी मी दिसताक्षणी मारलेली मिठी सिक्योरिटी देणारी होती. आपले बंध खूप खोलवर आहेत याबद्दल आश्वस्त करणारी होती. त्यादिवशीनंतर "मला तुझ्याविषयी काही वाटत नाही." हे वाक्य तुझ्या तोंडून कधीच आलं नाही.

कोठावळे वकीलांना तुझ्या घराबाहेर जाताना पाहून वाटलं, पुन्हा याने काहीतरी प्रक्षोभक लिहिलं आणि नोटीस आली! आता बाहेर राडे होणार,लोक तुला शिव्या घालणार, आणि तू खिडक्या-पडदे लावून रसिक बलमा किंवा नाचे मन मोरा ऐकत बसणार! पण नाही, अस काही नव्हतं, तो महिनाभर तू अशाच कसल्या कसल्या धावपळीत काढलास आणि अचानक चक्क मला चॉकलेट वगैरे गिफ्ट केलंस!

"हे काय?"

"तुला आवडतात न चोकलेट्स."

आणि पुढचा मिनिटभर ख्या ख्या हसत आपण ती चॉकलेट्स मिळून खात होतो. Those were the most beautiful days of my life"

त्या दिवशी मी घरात पाऊल टाकलं आणि सरप्राइझेसचा सिलसिला सुरु झाला, माझ्यासाठी तू स्वतः लंच बनवणं खूप स्पेशल होतं, आणि त्यांनतर कोणत्याही मुलीला आयुष्यात queen असल्याचं फील देणारी वेलवेट बॉक्स मधली डायमंड रिंग!Wow!!

"तू एवढी महाग रिंग..."

"अग सगळ्या पुस्तकांचे हक्क एकत्र विकले"

"काय?"

"पुन्हा नव्याने लिहायचं, त्यात काय"

मी निःशब्द होते. हळूहळू डोळ्यासमोरच सगळं ब्लर होत गेलं, तो कॅनव्हास सुद्धा!

"ए, तुला आवडेल अस सगळं केलंय, आता भोकाड पसरू नका चला." आणि पुन्हा तुझा तो सेक्युर्ड स्पर्श! और कुछ नही चाहिये झिंदगीसे.

पण अस सगळं सुंदर परिकथेसारखं आयुष्य असतं का कधी? "आलोच.."म्हणत तू पुढच्या मिनिटाला गायब झालास, तो पुन्हा न दिसण्यासाठीच बहुधा..

मी बराच वेळ वाट पाहत होते तुझी. बाहेर त्या नेहमीसारख्या टापटीप टेबलवर फाइल होती,बहुधा त्यादिवशी वकिलांच्या हातात तीच होती, एरवी महत्वाची समजून तिला हात नसताच लावला मी. पण तुझी वाट पाहतांना कोणास ठाऊक ती मी उचलली, आणि जे समोर आलं, ते खूप धक्कादायक होतं..

Hey dear,

मला माहितेय तुला हे वाचून खूप मोठा धक्का बसणार आहे. पण मला वाटत तू हे शांतपणे वाचावंस आणि तितक्याच शांतपणे स्वीकारावंस. जेवढं तू मला ओळखतेस, तुला चांगलं माहितेय, माझ्या आयुष्याला मी आखलंय. ज्यात माणसाच्या माणसाशी अटॅचमेंटला जराही स्थान नव्हतं. मी माझ्या मूड्स प्रमाणे जगणं ठरवलं आहे. जे माझ्या आयुष्यात येतात, ते त्यांचा मूड घेऊन येतात आणि त्यांचा मूड घेऊन जातात. हा तुझ्यासमोरचा जो कॅनव्हास आहे न, ज्याबद्दल तुला नेहमीच उत्सुकता राहिली आहे, त्यावर माहितेय, सगळे कलर्स आहेत. अगदी सगळे, आणि सगळ्यांमध्ये कॉमन आहे पाणी! हे रंग पाहणाऱ्याच्या मूडसप्रमाणे बदलतात, समोरच्याच्या नजरेप्रमाणे दिसतात, रागावणाऱ्याला तामसी, तर शांत असणाऱ्याला विलक्षण सात्त्विक. त्यांच्यातल पाणी त्या कॅनव्हासला रंगाशी जोडून ठेवतं. त्यांना दिसूनही अस्पष्ट करतं. या सगळ्यात काहीतरी अर्थ शोधत असायचो मी. मी आयुष्यभर आयुष्याच्या सगळ्या भावनांमधून दूर जात राहिलो, कशातही गुंतलो नाही. कधीच नाही. पण मला आश्चर्य वाटत, गेले काही दिवस मी माझाच राहिलो नव्हतो. मला चांगलंच उमगलं, मला तू आवडायला लागली होतीस. माझ्या प्रत्येक विचारांचा बेस तू बनत चालली होतीस. मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो आणि आता हे अमान्य करण्यात अर्थ नव्हता. गेले जे काही दिवस मी तुझ्यासोबत घालवले, मला माहितेय आपल्या आयुष्यातले ते सर्वात सुंदर दिवस होते. पण मला या साऱ्यात खरोखर गुंतायचे नाहीये ग. आज मी, सगळ्या आयुष्याला चॅलेंज करू पाहणारा हा अवलिया तुझ्यासमोर सपशेल हरला. आणि या हरलेल्या आयुष्याला चॅलेंज करण्यासाठी एका नव्या प्रवासाला सुरवात करायला मी निघालोय. मला तुझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर प्रेम बनायचं होतं, त्यासाठी शक्य तेवढं सारं मी केलं. मला माहितेय अस अर्ध्यात सोडून जाणारं प्रेम यशस्वी नसेलही कदाचित, पण तुला सर्व सुखे दिल्याचं समाधान माझ्या मनात असेल. मी गेल्यानंतर तू स्वतःच आयुष्य हव्या त्या पद्धतीने जगायला स्वतंत्र आहेस. टेबल वरची ती फाईल, त्यात तुझ्या माझ्या अद्वैताचे साक्षीदार झालेले हे घर तुझ्या नावे करत आहे. तुला आयुष्यभर दरमहा पुरून उरेल एवढी रक्कम बँकेत जमा होत राहील. मला शोधण्यात वेळ वाया घालवू नकोस. आणि वाटसुद्धा बघू नकोस. आणि डोन्ट वरी, आयुष्याचं जिगसॉ सॉल्व करेन आणि येईन बहुधा. आय प्रॉमिस तुझ्याशिवाय माझ्या प्रेमाची अधिकारी आणखी कुणीही होणार नाही. कधीच.

मी त्या क्षणाला प्रचंड कोसळले होते. उर फुटेस्तोवर ओरडून दुःख ओकावं वाटतं होतं. हे असलं काही होईल याची तिळमात्र शंका मला आली नव्हती. जिवाच्या आकांताने रडले, उन्माळून पडले. दोन वर्ष जवळजवळ निर्जीव अवस्थेत काढली. दुःखाचे कढ हळूहळू ओसरत होते. एका मोमेंट ला वाटलं, यार आपल्याएवढं लकी क्वचितच कोणी असेल. रिलेशन मध्ये कोणताही गुंता नाही, क्लेश नाही काही नाही, असल्या तर गोड आठवणीच होत्या गाठीला, मग का रडायचं?

आणि अत्ता, याक्षणी मन आरश्यासारखं स्वच्छ ठेवून हा विचार करतेय. पाठीमागे लता 'रसिक बलमा...' गातेय. मी नेहमीची स्ट्रॉंग कॉफी घ्यायला उठते, आणि तो कोरा, स्वच्छ कॅनव्हास त्याच जागी सारे रंग स्वतःत दडवून हे तटस्थ पणे पाहतो आहे.

 

 


Rate this content
Log in

More marathi story from Vishakha Kulkarni

Similar marathi story from Drama