विरजण
विरजण


कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात नारळाचे उंच माड, आंब्याच्या बागा, सडपातळ सुपारीची झाडं आणि सुगंध दरवळणारा फणस. आनंद, म्हणजे माझा मित्र. मे महिन्याची सुट्टी लागली की, मामाचं गाव गाठायचं आणि दिवसभर बागेत हिंडत बसायचं, हा त्याचा दिनक्रम. खेळायला वाडीतली बच्चेकंपनी असायची. क्रिकेट, विहिरीत पोहणे, झाडावर चढणे, लगोरीचे खेळ रंगायचे. हळूहळू,गावाकडे जाणं कमी झालं. आनंदही मोठा झाला. ऑफिसच्या गडबडीत गाव विसरला.
एकदा नेहमीप्रमाणे कामावर जात असताना सिग्नलला, स्कुटीवरच्या मुलीकडे त्याचं लक्ष गेलं. मुलगी ओळखीची वाटली. त्याने गाडीची काच खाली करून तिला हात केला, 'माफ करा! मी असं तुम्हाला भर रस्त्यात काच खाली करून विचारतोय! पण मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. आपण एकमेकांना ओळखतो का?' त्या मुलीने आनंदला लगेच ओळखलं. ती म्हणाली, 'अरे आनंद!' तेवढ्यात सिग्नल सुटला. तिने स्कुटी पुढे घेतली आणि थांबली. आनंदनेही गाडी बाजूला घेतली. ती म्हणाली, 'तुला बघून किती आनंद झाला म्हणून सांगू! अरे मी सौंदर्या. गावकरांची मुलगी. तुमच्या वाडीबाजूला आमचं घर नाही का गावाला!' आनंदची ट्यूब पेटली. लहानपणची शेंबडी सौंदर्या, मोठी होऊन इतकी सुंदर दिसेल आणि आपल्याला अशी मुंबईत भेटेल याची त्याला कल्पनाही नव्हती. 'तू तर गावाला येत नाहीस, म्हणून मीच आले!!' आणि इतकं बोलून ती हसली. ते हास्य बघून आनंदची विकेट गेलेली होती. कामावर जायला उशीर होतोय म्हणून, दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. कधीतरी सविस्तर बोलू! असं ठरवून, आपापल्या कामावर निघाले.
सौंदर्या गावकर म्हणजे आनंदची बालमैत्रीण. लहानपणी गावाला लगोरी, क्रिकेट खेळताना नेहमी एका संघात खेळायचे दोघे. जेवण जरी आपापल्या घरी करत असले तरी, एकमेकांशिवाय, दोघांचं पान म्हणून हलायचं नाही. दर दोन दिवसांनी, सौंदर्या आनंदच्या घरी थोडं दही मागायला यायची, विरजणासाठी. आनंदकडे म्हशी खूप होत्या, त्यामुळे दूध, दही, ताक खूप असायचं. दही घ्यायला आली की जायचीच नाही परत. दोघे खेळत बसायचे. मग, तिच्या घरून आज्जी यायची आणि दह्याच्या वाटीला, नातीसकट घेऊन जायची. घरच्यांना शेतीत मदत कर, झाडावर चढून आंबे काढ,फुलपाखराच्या मागे पळ असले उद्योग करण्यात सौंदर्या पुढे असायची. गावावरून परतल्यावर आनंद काही दिवस सौंदर्याच्या आठवणींमध्ये रमलेला असायचा. शाळा चालू झाली की अभ्यास सुरू.
कालांतराने दोघेही कॉलेजला गेले. तो मुंबईत आर्टस् आणि ती गावाजवळ असलेल्या एका कॉलेजात सायन्सला. बारावीच्या परीक्षेनंतर भेटलेले, ते शेवटचं. त्या भेटीत तर त्यांनी कोणालाही न सांगता, सायकल चालवत रत्नागिरी गाठलेली. नाही म्हटलं तरी त्यांचं गाव आणि रत्नागिरी साठ किमी अंतर होतं. ते रत्नागिरीत गेले. हॉटेलात जेवले, पिक्चर टाकला. समुद्र किनाऱ्यावर सावलीत बसून, पुढे आयुष्यात काय करणार याबद्दल गप्पा मारल्या. तेव्हापासूनच खरंतर आनंदला ती आवडायची. पण कसं आहे ना, जगात दोन प्रकारची मुलं असतात. पहिला प्रकार म्हणजे आपल्या मनात आहे ते, थेट मुलीला जाऊन सांगणारी आणि दुसरा प्रकार म्हणजे, ओठी आलेले शब्द गिळून, हवापाणी, करिअर वगैरे मुद्द्यांवर गप्पा मारणारी. आनंद दुसऱ्या प्रकारातला होता. जेव्हा ते घरी परतले, तेव्हा दोघांना जाम ओरडा पडला. दुसऱ्या दिवशी आनंदचे पाय खूप दुखत होते आणि ताप पण आलेला. होणारच तसं!! १२० किमी सायकल चालवणं आणि ते ही डबल सीट! खायचं काम नाही!
आनंद मग त्यानंतर कॉलेज, एकांकिका, मग पुढे जाऊन नाटक, सिनेमाचं प्रमोशन या सगळ्यात गुंतला गेला. तो एका नामांकित मीडिया कंपनीचा मालक होता. आयुष्यात प्रगती करत पुढे सरकताना, सौंदर्या आणि गाव मागेच राहिलं. तिनेदेखील शेतीमधली पदवी संपादन केली. मुंबईत राहायला लागून तिलाही २ वर्ष झालेली. शेतातला माल थेट घरी पोहोचवणाऱ्या एका स्टार्टअपची ती, सर्वेसर्वा होती. दोघंही यशस्वी होते आयुष्यात.
आणि आज तब्बल आठ वर्षांनी ते भेटले. दोघांच्या दिसण्यात खूप फरक झालेला. ती नावाप्रमाणे सौंदर्यात न्हाऊन निघालेली आणि हा चेहऱ्यावर झळकणाऱ्या हास्यात. हळूहळू फोनवर बोलणं चालू झालं. कामाच्या वेळा सांभाळून भेटणं जमत नव्हतं. आठवड्यात एखाद्या शनिवारी भेटू असं त्यांनी फोनवर ठरवलं. आपण इतक्या वर्षांनी तिला भेटणार, पहिल्या भेटीतच तिला विचारुया का? तसेही घरचे लग्नाच्या मागे लागलेच आहेत! असे विचार त्याच्या मनात चालू होते. न कर्त्याचा वार शनिवार म्हणतात, पण या दोन कर्त्यांचा शनिवार शेवटी उजाडला. एका समुद्र किनारी थाटलेल्या कॅफेत दोघे भेटले. कॉफीसोबत जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी घातलेला धुडगूस, गावाकडची मजा असे सगळे विषय हाताळून झाले. रत्नागिरी मोहीम आठवून हसायला आलं. आनंदच्या मनात घालमेल चालू होती, हिला विचारावं का? की नको!! आणि शेवटी आनंद घाबरतच म्हणाला, 'सौंदर्या! बरेच दिवसांनी भेटून, खूप मजा आली! कॉफी पण छान होती! खरं तर मला, तुला काही विचारायचं.... म्हणजे सांगायचं आहे!' त्यावर ती हसली आणि म्हणाली, 'अरे! मलापण तुला काही सांगायचंय, खरं तर दाखवायचं आहे.' आणि तिने आपल्या हातातली अंगठी त्याला दाखवली. 'माझं लग्न ठरलं अरे!! कोकणातलाच आहे. माझा स्टार्टअप पार्टनर आहे आणि आता आयुष्याचा पण! योग्यवेळी भेटलास!! खरेदीसाठी मला मदत लागेलच.' इतके वर्षांनी ती भेटली म्हणून आनंद ज्या आनंदात होता, त्या आनंदावर विरजण पडलं.
ही सगळी गोष्ट आनंदने मला सांगितली, तेव्हा मला कळत नव्हतं, त्याला धीर कसा देऊ! कारण त्या सौंदर्याचं लग्न माझ्याशीच ठरलेलं!