वेळेचे अचूक व्यवस्थापन...
वेळेचे अचूक व्यवस्थापन...
रुद्र रात्री उशिरापर्यंत संगणकावर काहीतरी कामाच्या गडबडीत होता.. तेवढ्यात त्याची आई तिथे येते आणि विचारते, काय रे बाळ का जागा आहेस इतका वेळ आणि इतका अस्वस्थ का दिसत आहेस तू आज.. काय झाले?
रुद्र अचानक चिडून बोलतो.. गप गं आई.. तुला काय कळतंय यातलं.. एक तर आधीच कामाची गडबड त्यात तुझे काय हे मधेच? उगाच माझे डोकं खाऊ नको हा आता तू .. आधीच मी खूप अस्वस्थ आहे.
तेवढ्यात आई बोलते, अरे तुला त्रास देण्यासाठी नाही आले रे बाळ, तू थोडा अस्वस्थ दिसलास म्हणून विचारले रे..
अगं आई काही नाही गं.. उद्या आमच्या ऑफिसमध्ये परदेशातून काही पाहुणे येणार आहेत आणि नेमका तो रमेश उद्या ऑफिसला येणार नाही आहे.. त्याची तब्येत काल रात्री अचानक बिघडली आहे आणि सरांनी आता उद्याच्या मीटिंगची सर्व जबाबदारी अचानक माझेवर टाकली आहे. त्याचंच टेन्शन आलंय गं मला..
अरे काय तू बाळ, कोणत्याही कामाचं असे दडपण नसतं घ्यायचं.. असे दडपण घेतले ना, कोणतेच काम कधीच अचूक नाही होत रे. तू शांतपणे नीट अभ्यास कर अगोदर, नीट व्यवस्थापन कर, मगच तुझ्या कामाला सुरुवात कर. व्यवस्थापन केल्याशिवाय कोणतेच काम पूर्णत्वास जात नाही. आता माझेच बघ ना, घरी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं काही ना काही काम चालूच असते ना आणि ऑफिसमध्ये लागणारे काम ते वेगळेच. तुम्ही आजकालची पोरं ना, जरा काही वेगळे काम लागले ना लगेच अस्वस्थ होता. अरे हे आव्हान समज आणि यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल तुला. तू असा लगेच खचून गेलास तर या स्पर्धेच्या युगात कसा काय टिकणार रे बाळ तू..
आजकालच्या युगात तुम्हाला तर खूप साऱ्या सोयी सुविधा, नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तुला माहित आहे का? असले काहीच नव्हते रे. आता संगणक आला, मोबाईल आला हे सगळंच नवीन होते माझ्यासाठी तरीही मी न डगमगता त्याचं ज्ञान आत्मसात केले, म्हणूनच तर मी अजून ही टिकून आहे नोकरीमध्ये.. दडपण घेऊ नकोस आलेले आव्हान स्विकार आणि पुढे जा.. एवढंच बोलून आई तिच्या बेडरूममध्ये निघून गेली..
खरचं आईच्या त्या बोलण्यानं काम करण्यास एक नवीन उत्साह आणि जोश मिळाला. मी असा विचारच केला नव्हता कधी.. आई कडून ही गोष्ट मी फार पूर्वीच शिकायला हवी होती. वेळेच अचूक व्यवस्थापन time management कसे करायचं ते.
ती रोज सकाळी लवकर उठून घरातील आवराआवर करून, सकाळची देवपूजा, स्वयंपाक, मग डब्यांची घाई हे सर्वांचं आवरून मग तिच्या ऑफिसला जायची घाई अशीच सुरु होते तिची दिवसाची सुरुवात. मग नंतर ऑफिसमधील काम तेही अचूक आणि वेळेवर. नंतर पुन्हा घरी आले की रात्रीच्या जेवणाची तयारी सर्वांना जेवण देऊन त्यानंतर किचनमधील सर्व कामे आवरून तिला मिळणारा आराम तोही काही तासांचाच.. आज ती पन्नाशीच्याही पुढे गेली आहे पण आजही तिचा उत्साह आणि काम उरकण्याचा जोश अजूनही आहे तसाच आहे. आयुष्यातील गेली ३०-४० वर्षे झाली आजही तिचा तो नित्याचा दिनक्रम अखंडितपणे चालू आहे. पण कधीच तिने कोणती तक्रार केली नाही किंवा तक्रार करण्याची वेळीही तिने कधी येऊ दिली नाही. मध्यंतरी पप्पा आम्हाला अचानक सोडून गेले, पण त्या मानसिक धक्क्यातून तिने स्वतःला सावरले. तिने न खचता डगमगता खंबीरपणे बहिणेच्या व माझ्या लग्नाची जबाबदारी पार पडली. सुटीचा दिवस असो किंवा रोजचा दिनक्रम तिचे वेळेचे अचूक व्यवस्थापन खरंच वाखाणण्याजोगे आहे.
वेळेचे अचूक व्यवस्थापन time management यासाठी आम्ही आजकालची मुलं बाहेर वाटेल तेवढे पैसे खर्च करून त्याचे प्रशिक्षण घेत असतो. पण खरंच वेगळा वर्ग लावून प्रशिक्षण घेण्याची गरज आहे का? खरंच विचार करण्याजोगी गोष्ट आहे ना.. मला तर वाटतं याची काहीच गरज नाही.. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरात time management चं एक चालतं फिरतं उत्तम उदाहरण असतं ते म्हणजे आपली "आई".
"आई माझा गुरु, आई कल्पतरू" असे म्हणताना खरंच आज मनाला अतिशय आनंद होत आहे. खरंच आपल्या आयुष्याचा पहिला गुरु ही आपली आईच असते आणि याचा मला आज पुन्हा प्रत्ययदेखील आला.
